अभिनयाचे शहेनशहा दिलीपकुमार यांच्या जाण्याने नाना पाटेकर यांच्या मनात उमटलेले उत्कट भावतरंग..

साहेब गेले..

खूप मंडळी खूप काही लिहितील. हे लिहिणं अपरिहार्य आहे.

लिहिताना शब्द अपुरे, थिटे..

मोठ्ठा कलावंत आणि मोठ्ठा माणूस.

मी त्यांच्या स्मृतीस वंदन करतो.

शेवटच्या यात्रेत सहभागी होता नाही आलं याची खंत शेवटापर्यंत राहील.

पित्यासमान पाठीवर फिरलेला हात अजून आठवतो.

एकदा घरी बोलावलं होतं त्यांनी. गेलो होतो.

खूप पाऊस होता. मी चिंब भिजलेला.

पोहोचलो तेव्हा दारातच उभे.

मला तसा पाहून आत जाऊन टॉवेल आणला.

माझं डोकं पुसलं.. स्वत:च्या हातांनी. स्वत:चा शर्ट दिला.

घातला माझ्या डोक्यावरनं.. असा.

मी पुन्हा चिंब झालो.

डोळे दगा देत होते.. मी सावरत होतो.

नंतर कौतुक.. आणि कौतुक आणि कौतुक.

‘क्रांतीवीर’मधला एक-एक प्रसंग घेऊन हे कसं, ते कसं, ते किती छान, ती कसं बोललास..

मी कुठेतरी पल्याडच गेलेला.

डोंगराएवढा माणूस.

त्याच्या अस्सल उर्दू आणि अस्सल इंग्रजीमधून कौतुक करत होता.

दोन्ही भाषा मला अपरिचित.

मी त्यांचे डोळे वाचत होतो.

त्यांनी डोळ्यांनी म्हटलेली कितीतरी स्वगतं, संवाद मी ऐकलेले आहेत.

‘गंगा जमुना’ हा मी त्यांचा पाहिलेला पहिला चित्रपट.

आणि नकळत आत कुठेतरी ठरलं :  आपण दिलीपकुमार व्हायचं.

कलावंत होण्याला पर्यायी शब्द म्हणजे दिलीपकुमार होणं.

मग त्यांचे सगळे चित्रपट पहात गेलो.  इथे तिथे.. जिथे कुठे जमेल तिथे.

सगळं भावविश्व या माणसानं व्यापून टाकलं.

आपण कधी या कलावंताला भेटू, हे माझ्या कधी खिजगणतीतही नव्हतं.

शिवाजी पार्कला ‘लीडर’ सिनेमाचं शुटिंग चालू होतं.

अलोट गर्दी. त्या गर्दीचा मीही भाग होतो.. एक कुठेतरी लांब.. कोपऱ्यात.

यांनी स्टेजवरनं सांगितलं, ‘हाताची मूठ वळवून जोरात हवेत फेका आणि म्हणा, ‘मारो.. मारो.’

सगळ्यांनी केलं. पण मी जरा जास्तच त्वेषानं केलं.

‘लीडर’ पहात असताना मी त्या गर्दीत आभाळात हात फेकणाऱ्या मला शोधत होतो.

पडद्यावर दोघेच दिसत होते : दिलीपकुमार आणि गर्दी.

आजसुद्धा मी अभिमानानं सांगतो, ‘माझा पहिला चित्रपट ‘लीडर’!’

त्यांचा माझा एक फोटो आहे..

कुणाच्या तरी मदतीसाठी फुटबॉलची मॅच होती..

क्रिकेटर्स आणि कलावंतांची. हे रेफरी होते.

फुटबॉल सोडून माझं सगळं लक्ष ह्य़ांच्याकडे.

आणि त्या गदारोळात किरण मोरेचा गुडघा माझ्या पोटात घुसला आणि मी कळवळून पडलो.

साहेबांनी मला गाडीतून नानावटी हॉस्पिटलमध्ये नेलं. मी किरण मोरेला धन्यवाद दिले.

एखाद्या क्लोजअप्मधून हा माणूस किती किती सांगून जायचा..

केवढं तरी.. डोंगराएवढं.

आज खूप आठवणी येतायत.

सगळ्यांचीच ही अवस्था असेल.

माझ्या पिढीला ह्य़ांचा स्पर्श झालेला.

आजच्या पिढीचं मला ठाऊक नाही.

सुखदु:खाचे, हर्षविमर्शाचे, प्रेमाचे, द्वेषाचे.. सगळ्यांचेच निकष बदलले आहेत.

मला वाटेल ते सगळ्यांनाच वाटेल असं नाही.

मी यांचा कोण?

तरीसुद्धा मी इतका कसनुसा का झालो?

त्यांच्या पत्नी सायराजींचं काय होत असेल? राहून राहून हाच विचार मनात येतोय.

पत्नी म्हणून असणं केव्हाच थांबलं.

आता कधी बाप, भाऊ, बहीण, मित्र.. आणि सतत आई.. याच भूमिकेत.

किती छान भूमिका वठवल्या त्यांनी या. अप्रतिमपणे.

चेहऱ्यावरचं हसू मावळू न देता.

काय आठवत असतील आता?

जिवंतपणीच्या आठवणी मृत्यूनंतर ओरबाडतात. रक्तबंबाळ करतात.

डोळ्यांचं बरं आहे.. झरता येतं.

मनाचं काय?

साहेबांनी व्यापलेला प्रत्येक कोपरा.. घरातला..

सायराजींना लपताही येत नसेल आणि सामोरंही जाता येत नसेल.

मी उद्या.. फार तर परवा सगळं विसरेन.

त्यांचं काय?

..त्यांचं काय?

कधी कधी मला वाटतं..

साहेबांनी सगळं विसरण्याचा बेमालूम अभिनय केला असावा.

आजूबाजूची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहून

त्यांनी कदाचित सगळं विसरण्याचं ठरवलं असावं.

एकांतात ते सायराजींशी नक्कीच बोलत असणार.

एक-दुसऱ्याचं जग होऊन बसले होते.

सायराजी, मी तुम्हाला खाली वाकून नमस्कार करतोय..

माझ्या देवाला तो पोचेलच!

lokrang@expressindia.com