श्याम पेठकर
अभूतपूर्व असा दुष्काळ यंदा पडणार, असे सगळेच म्हणत आहेत. म्हणजे १९७२ पेक्षाही अधिक भीषण दुष्काळ यावर्षी असेल. महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीरदेखील केला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होईल, हे दिसत आहे. गेल्याच अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात रोज आठ शेतकरी आत्महत्या करतात, अशी आकडेवारी दिली आहे. दुष्काळाशी सामना कसा करायचा, यासाठी सरकारी पातळीवर आणि सामाजिक पातळीवरही चिंतन आणि बैठका सुरू आहेत. अशा वातावरणात महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचा नायक अचानक एग्झिट घेतो, हे धक्कादायक आहे.

नानाशी माझा संबंधच मुळात शेतकर्‍यांच्या समस्यांमुळे आला. माझा मित्र मकरंद अनासपुरे याच्यासाठी मी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरचा चित्रपट लिहिला. या चित्रपटाच्या सुरुवातीला निवेदक म्हणून नानाने आग्रहाने आवाज दिला होता. एक तर विषय भीषण सामाजिक समस्या असलेला, नानाच्या जवळचा आणि त्यात मकरंदवर नानाचा विशेष जीव. त्यामुळे नानाने तो आवाज दिला. तो चित्रपटही पाहिला आणि त्यानंतर नानाशी संबंध आला. नानाचा प्रचंड दरारा होता. पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा नाना खूप प्रेमाने बोलत होता, पण त्याच्याविषयी धाक किंवा दरारा एवढा होता की, वाघाच्या पिंजर्‍यासमोर उभे असताना आपण घाबरून कमालीचे सावध असतो, तशी माझी अवस्था झाली होती.

हा चित्रपट आला, त्याची खूप चर्चा झाली. अगदी बाळासाहेब ठाकरे यांनाही तो चित्रपट खूप आवडला. त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनादेखील तो दाखवला. पण मकरंद, सयाजी, नागेश भोसले ही मंडळी मुळात त्या समस्येची जाणीव व्यवस्थेला व्हावी म्हणून हा चित्रपट करत होती. त्या अर्थाने तो व्यावसायिक चित्रपट नव्हता. आपला गौरव झाला, चर्चा झाली, पण समस्या मात्र सुटली नाही, ही खंत मकरंदच्या मनात होती.

मग एक दिवस आम्ही गप्पा मारत बसलो असताना शेतकरी आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांची, विशेषत: विधवा पत्नींची जी काही अवस्था होते, त्यावर मी, हरीश इथापे आणि मकरंद बोलत राहिलो. मुंबईला परत गेल्यानंतर मकरंदने फोन केला की, ‘‘या विधवा महिलांना काही मदत करता येते का? यासाठी मी चित्रपटसृष्टीतील समविचारी मित्रांशी बोलतो आहे. आपण एक निधी संकलित करू.’’ मात्र दरम्यान नानाशी मकरंदची भेट झाली. नानांनी नुकताच ‘वेलकम’ हा चित्रपट पूर्ण केला होता. नानाचा शिरस्ता होता की, ते त्यांच्या चित्रपटातील मानधनाचा एक तृतीयांश भाग सामाजिक कार्यासाठी द्यायचे.

मग ते मकरंदला म्हणाले की, ‘‘गावभर निधी गोळा करत बसण्यापेक्षा मीच पैसे देतो.’’ मकरंदचा मला फोन आला. त्यांनी ९ ऑगस्ट २०१५ ला बीड येथे जवळपास दीडशे शेतकरी विधवा महिलांना पंधरा-पंधरा हजार रुपये प्रत्येकी मदत करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. मकरंद म्हणाला की, ‘‘नानांची इच्छा आहे की, विदर्भातील जवळपास १००-११० महिलांनाही आपण पंधरा-पंधरा हजार रुपये प्रत्येकी देऊ. मात्र ही रक्कम चार रूपांमध्ये तुझ्याकडे पाठवतो आणि तुम्ही लोक ती पुढे महिलांपर्यंत पोहोचवा ’’

मी त्याला म्हणालो की, ‘‘तुमची रक्कम आहे, ती तुम्ही आपल्या हाताने इथे येऊन द्यावी. नागपूरला मी कार्यक्रम अरेंज करतो.’’ नाना हे कदाचित ऐकत होते. (खरे तर नानाला मी हयातभर ‘नाना’ असे एकेरी संबोधन वापरत आलेलो आहे, कारण तो खर्‍या अर्थाने आमचा बाप होता.) नानांनी ते ऐकून फोन हाती घेतला, त्याच्या खास शैलीमध्ये मला दटावले आणि मग म्हणाला की, ‘‘ठीक आहे, ९ चा बीडचा कार्यक्रम आहे, १० ऑगस्टला मी नागपूरला येतो.’’ तो ६ ऑगस्टचा दिवस होता आणि संध्याकाळचे सात वाजून गेले होते. मी वर्धेला सेवाग्राम आश्रमात होतो. तत्काळ माझे मित्र आणि आता नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असलेले, तेव्हा वकील असलेले आणि ‘जनमंच’ या चळवळ करणार्‍या संघटनेचे अध्यक्ष असलेले अनिल किलोर यांना फोन केला. त्यांनी अर्धा तास मागितला, पुढल्याच फोनवर मला सांगितले की, ‘‘१० तारखेला सकाळी ९ ची वेळ जमते का विचार, कारण नंतर देशपांडे सभागृह बुक आहे.’’ मी परत मकरंदला फोन केला. नानांनी सांगितले की, ‘‘हो, येतो. कार्यक्रम उभा कर.’’ मग रात्री दहा वाजेपर्यंत नागपूरला परतायच्या आधी पत्रिका डिझाईन करून पाठवूनही दिली होती.

नाना पाटेकर

नागपुरात १० तारखेचा कार्यक्रम झाला. जनमंचने खूप चांगला कार्यक्रम उभा केला. पतीच्या आत्महत्येनंतर संसार सांभाळणार्‍या ११० शेतकरी महिलांची यादी तयार करणे आणि त्यांना नागपूरपर्यंत आणण्याची जबाबदारी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी ती जबाबदारी पार पाडली. व्यवस्थेने ज्यांचे सौभाग्य त्यांच्या कपाळावरून पुसून टाकले, अशा जवळपास ३५ हजारांवर शेतकरी विधवा महिला आजही कापूस पट्ट्यामध्ये असाव्यात. त्यांचे सरासरी वय साधारण २८ इतकेच आहे. म्हणजे ज्या वयामध्ये चांगल्या घरच्या मुलींच्या लग्नाचा विचारही होत नाही, त्या वयामध्ये या मुली लग्न करून, दोन-दोन लेकरे पदरी असताना विधवा झाल्या होत्या.

विमानतळावर नानाला सोडायला गेलो असता नाना म्हणाला की, ‘‘तू मला फसवले. फसवले म्हणण्यापेक्षा अडकवले. कारण आता इतक्या मोठ्या प्रमाणात जर विधवा महिला असतील, तर त्यांना असे वार्‍यावर सोडून आपण कसे जाऊ शकतो?’’ नानाच्या डोक्यामध्ये विचार घोळत होते. पुढच्याच महिन्यात मला आणि हरिभाऊला निरोप आला की, ‘‘पुण्याच्या माझ्या घरी या.’’ तिथे नानाने ‘नाम फाउंडेशन’ स्थापन करण्याची कल्पना मांडली. अर्थात नावापासून सगळे नानाच्या डोक्यात होतेच. २० सप्टेंबर २०१५ रोजी या संस्थेची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी झाली आणि पुढच्या पाच-सात दिवसांमध्येच जवळपास सात ते आठ कोटी रुपये लोकांनी या कामासाठी दिले. अर्थात यामागे नाना पाटेकर नावाची पुण्याई होती. नाना हा सामाजिक तळमळ असलेला कृतीशील कार्यकर्ताही आहे, हा विश्वास लोकांच्या मनात होता.

नाना आणि मकरंदमुळे मराठवाडा, विदर्भ, जळगाव म्हणजे खानदेश या भागातून कार्यकर्ते गोळा झाले. सगळ्यांचाच नामोल्लेख केला तर लेख पसरट होण्याची भीती आहे. तसेही ‘नाम’मध्ये पदांना महत्त्व नाही. कुणी यायचे ‘नाम’मध्ये प्रवेश हवा, असे म्हणायचे. नाना सांगायचा, ‘‘तशी काही औपचारिक प्रक्रिया नाही… जो काम करेल तो ‘नाम’चा! काम सुरू करा…’’ मात्र विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवातीला जलसंधारणाची, म्हणजे नदी-नाला खोलीकरण, बंधारे अशी कामे सुरू झाली. नागपूरजवळच्या कुही तालुक्यातील टाकळी नावाच्या गावात ७० एकराचा तलाव क्रिकेटचे मैदान झाला होता, तो आम्ही पूर्ण खोदून नव्याने तयार केला. त्यामुळे आज त्या गावाची रयाच पालटली. उमरखेडजवळ ११३ एकराचा तलाव असेच मैदान झालेला होता, तोही लोकसहभागातून आणि लोकचळवळीतून आम्ही तयार केला.

नाना नेहमी म्हणायचा, ‘‘अरे पाऊस येईल नाही येईल याचा विचार करू नका. आपण भांडी तयार ठेवायची. आभाळाच्या मनामध्ये आपल्याविषयी दया येईल रे आणि पाऊस येईल.’’ त्यामुळे आम्ही झपाटून कामाला लागलो आणि विदर्भ, मराठवाडा, खानदेश यासोबतच मग पश्चिम महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले. आज नाम फाउंडेशनचे काम केवळ एखाद्या एका क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर शेतकरी, जलसंधारण, आपत्ती निवारण, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकास अशा अनेक स्तरांवर ते विस्तारले आहे. २०१५ पासूनच्या या कामांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रति कुटुंब १५ हजार रुपये आणि इतर शेतकरी कुटुंबांना प्रति कुटुंब २५ हजारांची आर्थिक मदत, करार शेती, शेतकर्‍यांच्या मुलांचे सामूहिक विवाह, चारा व अन्नधान्य वितरण, ठिबक सिंचन आणि आर.ओ. पाणी प्रकल्प यांचा समावेश आहे. मात्र नाम फाउंडेशनच्या कामाचा सर्वांत मोठा आवाका जलसंधारणात दिसून येतो. तब्बल ३ हजार ४२३ गावांमध्ये विविध जलसंधारणाची कामे, ३५ धरणांमधील गाळ काढणे, ३ हजार ५१३ जलस्रोतांवर काम, २३० नद्यांचे पुनरुज्जीवन, ८४२ ओढे-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, २ हजार २४५ पाझर तलावांची दुरुस्ती व विकास, २२८ किलोमीटर कॉन्टूर कंटूर ट्रेंच अर्थात ‘सीसीटी’ आणि डीप सीसीटीची कामे, तसेच २३८ कालव्यांची स्वच्छता अशी कामे करण्यात आल्याची नोंद आहे. या कामांमधून तब्बल ८ कोटी ५७ लाख ३२ हजार ४१७ घनमीटर गाळ काढण्यात आला असून, संस्थेच्या आकडेवारीनुसार पाणीसाठ्यात ६० हजार १२ कोटी लिटर म्हणजेच २१.२ टीएमसी इतकी वाढ झाली आणि ७१ लाख ५५ हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आली. या जलसंधारणाच्या कामांचे लाभार्थी १ कोटी ३६ लाख ३२ हजार ४३७ इतके असल्याचे नमूद आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील ५० गावांमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत व पुनर्वसन, कोविडच्या काळात ११ हजार २३६ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण, वैद्यकीय तपासणी शिबिरे, घरांची बांधणी, अन्नधान्य आणि भोजन शिबिरांच्या माध्यमातून मदत करण्यात आली. महिलांसाठी १ हजार २७० शिवणयंत्रे, ६०० शेळ्या तसेच विविध लघुउद्योगांसाठी यंत्रसामग्री देण्यात आली. निवासी शाळा, ४५४ सायकली, ग्रंथालय, व्यायामशाळा, शैक्षणिक साहित्य, डिजिटल शाळा आणि संगणक प्रयोगशाळा असे उपक्रम सुरू झाले. ३ लाख ९३ हजार ७५ वृक्षांचे रोपण, १३ हजार ५१६ शोषखड्ड्यांची निर्मिती, बीज बँक प्रकल्प आणि महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाच्या सहकार्याने ४५६ गावांमध्ये १ हजार ४०० किलोमीटर कालवा स्वच्छता अशी अनेक कामे करण्यात आली आहेत.

नानाचा परिणाम! यात नाना असल्यामुळेच पडलेला फरक पैशापेक्षाही मोठा होता. साधेपणा, सच्चेपणा, परस्परांवरचा विश्वास टिकवण्याचा संदेश नानाकडून आपसूक मिळत होता. नागपूरनंतर हरीश इथापे यांनी वर्धेला कार्यक्रम घेतला. तिथेही शंभरावर महिलांना पंधरा-पंधरा हजार रुपये वाटले गेले. नाना त्या कार्यक्रमासाठी आला आणि त्याने ‘मी हॉटेलला उतरणार नाही, एक तर आश्रमात उतरेन नाहीतर तुझ्या घरी’ असे हरीशला सांगितले होते. नाना हरीच्या घरी थांबला. त्या घरात प्रवेश केल्याबरोबर नाना म्हणाला, ‘‘हरी, घरी उतरतो म्हणाले तर तू तर घराचेच हॉटेल करून टाकले!’’ नाना स्वत:च्या हाताने स्वयंपाक करायचा आणि आम्ही नानाच्या हातचा स्वयंपाक तिकडे जेवलो होतो.

ज्या महिलांना आम्ही शेळ्या दिल्या होत्या, त्या महिला वर्ष-दोन वर्षांत त्यांच्याजवळच्या शेळ्या ज्या त्यांना अतिरिक्त वाटायच्या, त्या इतर त्यांच्यासारख्या महिलांना द्यायच्या. एका महिलेला आम्ही विचारले की, ‘‘तू तुझ्याजवळच्या शेळ्या का देतेस?’’ तर ती म्हणाली की, ‘‘नानाने आम्हाला दिल्या ना, मग आमची जबाबदारी आहे की आम्हीही इतरांना द्यायचे.’’ नानांनी केवळ शेळ्या दिल्या नाहीत, तर ही जबाबदारीसुद्धा दिली.

त्या काळात आम्हाला ठिकठिकाणी फोन यायचे, कारण नानाने सांगितले होते, ‘शेतकर्‍यांनी आत्महत्या करायची नाही, आमच्या लोकांना फोन करायचा.’ त्यामुळे रोज मला आणि हरिभाऊला फोन यायचे. विदर्भात एक चांगले नेटवर्क तयार झाले होते. घाटंजी येथील महेश पवार, पुसद येथील आनंद देशमुख अशी कार्यकर्ता मंडळी गोळा झाली होती.

दर महिन्याला पुणे किंवा औरंगाबाद येथे बैठका व्हायच्या. मराठवाड्यातून अरविंद जगताप, राजेश शेळके, विदर्भातून आम्ही दोघे, नाना आणि मकरंद जमायचो आणि कामाचा आढावा घेतला जायचा. नाना सांगायचा की, ‘‘तुम्हाला कामं किती करायची आहे ती करा, मी झोळी घेऊन निघालेलो आहे, पैशाला कमी पडू देणार नाही.’’

नंतर महाराष्ट्र सरकारनेही या कामाची दखल घेतली आणि आता टाटा समूहासोबत मोठे काम सुरू आहे. सीईओ म्हणून गणेश थोरात हे काम पाहतात. एक सहज सुरू झालेल्या चळवळीला एक स्थिर, कॉर्पोरेट म्हणता येईल असे स्वरूप आलेले आहे. आणखी खूप मोठे काम उभे करायचे होते… आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपण काय करायला हवे, याचे चिंतन सुरू होते. नानाशी बोलायचे होते, पण नानाशी बोलायचे म्हणजे तुमची पूर्ण तयारी हवी. मग मी बारीक-सारीक संदर्भासह टिपण तयार केले आणि आपण काय करू शकतो, हे नीट कागदावर मांडले. नानाला फोन केला. नाना म्हणाला की, ‘‘याचा एक नीट पेपर तयार कर, मकरंदशी बोलून घे, मग आपण गणेशला सांगून एक योजना तयार करू.’’ माधुरी दीक्षित यांच्या संचालनात ‘मराठी कोण होणार करोडपती’च्या चित्रीकरणाला नाना येणार होता. कदाचित त्या काळात आमची भेट झाली असती. नक्कीच भेट घेणे शक्य असते तर नानाने तसे सांगितले असते, पण ‘भेटू’ असे बोलला होता. पण आज सकाळी सात वाजता अचानक हरीशचे इतके फोन? ‘नाना गेला…’ माझ्या राज्यात कोरडा दुष्काळ का पडला रे बाबा, त्याचा जाब विचारेल का नाना, वर जाऊन?
pethkar.shyamrao@gmail.com