हेमंत कर्णिक
नंदा खरे गेले. एक व्यासंगी आणि बहुआयामी लेखक गेला. कृतिशील विचारवंत, साक्षेपी संपादक, उच्चभ्रूपणाशी फटकून असलेला कलाप्रेमी गेला. माझा गप्पिष्ट मित्र गेला. एक गोष्ट मात्र राहून गेली : तीस वर्षांपेक्षा दीर्घ आमची मैत्री; पण एकमेकांना ‘अरे-तुरे’ करणं राहून गेलं!

नंदा खरे यांचा आणि माझा परिचय तसा जुना. ‘ज्ञाताच्या कुंपणावर’ या त्यांच्या पुस्तकाचं परीक्षण मी लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो. विज्ञान हा एक बुद्धीला खाद्य देणारा, विचाराला प्रवृत्त करणारा आणि अतोनात आनंद देणारा विषय आहे, या माझ्या धारणेला या पुस्तकाने पुष्टी दिली. असलं पुस्तक लिहिण्यासाठी विज्ञानावरील लिखाणाचा जो व्यासंग लागतो, तो त्यांच्यापाशी होता. आपल्याला मिळणाऱ्या आनंदात दुसऱ्याला सहभागी करून घेण्याची इच्छा त्यांच्या ठायी होती. मी आवर्जून त्यांच्याशी परिचय करून घेतला आणि त्या काळात आम्ही मित्र काढत असलेल्या ‘आजचा चार्वाक’ या वार्षिकात लेख लिहिण्याची त्यांना विनंती केली. त्यांनी लेख लिहिला; पण त्याच्या पुढच्या वर्षी नाही लिहिला. ‘सुटे आणि छोटे लेख लिहिण्यात ऊर्जा घालवण्यापेक्षा पुस्तकं लिहावीत,’ हे त्यांचं मत होतं. आणि त्याप्रमाणे ते पुस्तकं लिहीत राहिले. अगदी शेवटपर्यंत त्यांचं लिहिणं थांबलं नाही.
नंदा खरे हा हाडाचा लेखक होता. म्हणजे एका बाजूने त्यांनी विपुल लेखन केलं आणि प्रत्येक पुस्तकासाठी कष्ट घेतले. ‘अंताजीची बखर’ ही मराठीतली एक असामान्य कादंबरी आहे. एका बाजूने ती काल्पनिक आहे. ‘अंताजी’ असा कोणी त्या काळात होऊन गेला नाही (नंदा खरेंचं नाव अनंत.. त्यावरून ‘अंताजी’!), पण त्यातल्या प्रत्येक घटनेला ऐतिहासिक आधार आहे. त्यातलं सतीचं वर्णन, लढाईचं वर्णन ऐतिहासिक नोंदींवर आधारलेलं आहे. मराठी इतिहासातल्या काही महत्त्वाच्या घटनांना योगायोगाने अंताजी साक्षी होतो आणि त्या घटनांचं वर्णन आपल्याला- आजच्या काळातल्या वाचकाला सांगतो, अशी त्या कादंबरीची रचना आहे. हा अंताजी इरसाल आहे. चौकस, आगाऊ आहे. भावनेच्या भरात वाहून जाणारा नाही. त्यामुळे त्याची नजर परखड आहे. त्याची भाषा आत्मगौरवाची नाही. तो सतीप्रथेला निष्ठुर, अमानुषच म्हणतो. एका कोवळ्या वयातल्या तरुणीला जिवंत जाळण्याचं समर्थन करण्यासाठी जो निर्दयपणा लागतो, तो अंताजीपाशी नाही. मराठी इतिहासातल्या त्या कालखंडाची वस्तुनिष्ठ जाण हवी असेल तर कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकाऐवजी, त्या काळातल्या कुण्या पराक्रमी व्यक्तिरेखेचा गौरव करणाऱ्या कादंबरीऐवजी ‘अंताजीची बखर’ वाचावी.

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

विज्ञान म्हणजे काय, वैज्ञानिक शोध कसे लागतात, वैज्ञानिकांची वैचारिक शिस्त कशी असते यांचा रसाळ परामर्श घेणारं त्यांचं पुस्तक ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ आणि ‘अंताजीची बखर’ ही ऐतिहासिक काळातल्या एका काल्पनिक पात्राभोवती रचलेली कादंबरी अशी दोन पुस्तकं एकाच लेखकाने लिहिलीत यावरून त्या लेखकाला विविध विषयांमध्ये रस होता, गम्य होतं हे दिसून येतं. पण दोन्हीकडे लेखक एकच आहे याचा आणखी एक वेगळा अर्थ होतो, तो लक्षात घ्यायला हवा. सत्याकडे काणाडोळा करून विज्ञान पुढे जाऊ शकत नाही; आपल्याला गैरसोयीची ठरणारी निरीक्षणं नाकारून एकही वैज्ञानिक शोध लावता येणार नाही; या वैज्ञानिक वृत्तीशी एकरूप झाल्यामुळेच नंदा खरे यांना ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ लिहिता आलं. आणि त्याच चिकित्सक, सत्यशोधक वृत्तीतून त्यांनी मराठी इतिहासाच्या एका कालखंडाकडे परखडपणे पाहणाऱ्या ‘अंताजीची बखर’ आणि तिचा पुढचा भाग ‘बखर अंतकाळाची’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या. पहिल्या पुस्तकाच्या लिखाणामागे जसा भौतिकी, जीवशास्त्र, उत्क्रांती तत्त्व या विषयांवरचा सखोल व्यासंग आहे, तसाच व्यासंग या दोन ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या लिखाणामागे आहे. त्यातल्या एकाही घटनावर्णनावर ते निराधार असल्याचा आरोप करता येणार नाही. या दोन लिखाणांवरून असं निश्चित म्हणता येतं की, या माणसाला आपलं जग, आपला देश, आपली संस्कृती समजून घेण्याची अपार इच्छा आहे आणि त्या इच्छेच्या पूर्तीसाठी वाचन, मनन, अभ्यास करण्याची तयारीसुद्धा आहे. आणखी एक- त्याबरोबरच आपल्याला सापडलेलं सत्य आणि ते शोधण्यात आपल्याला मिळालेला निखळ, स्वार्थाचा स्पर्श नसलेला शुद्ध आनंद इतरांबरोबर वाटून घेण्याची ओढदेखील आहे. हा माणूस एकलकोंडा नाही. आपलं सुख आपल्यापाशी ठेवून जगणारा नाही. हा माणूस ‘सामाजिक’ आहे. समाजातल्या सगळ्यांना आपलं मानणारा आहे असंसुद्धा नक्की म्हणता येतं.

‘मॅन ॲण्ड सुपरमॅन’ या नाटकाच्या प्रस्तावनेत जॉर्ज बर्नाड शॉ यांनी एक विधान केलं आहे : Every woman is not Ann, but Ann is Every woman… प्रत्येक स्त्री ॲन नव्हे; पण ॲनमध्ये प्रत्येक स्त्री सामावलेली आहे. तो आरोप नंदा खरेंवर करता येतो : प्रत्येक मनुष्य म्हणजे नंदा खरे नाही; पण नंदा खरे हा मानवजातीचा आदर्श प्रतिनिधी आहे. कुतूहल, ज्ञानलालसा, नवीन माहिती, नवीन ज्ञान प्राप्त झाल्यावर आपल्या जाणिवेची चौकट सुधारून घेण्याची तयारी आणि या सगळ्या प्रक्रियेमधून एकंदर मानवजातीचीच प्रगती घडवून आणण्याची क्षमता हे असले गुण प्रत्येक मानवाच्या ठायी असतात असं मुळीच नाही. पण मानवजातीचा इतिहास मांडताना ‘मानव’ ही व्यक्ती राहत नाही, एक संकल्पना होते. आणि त्या संकल्पनेच्या ठायी हे गुण असल्याशिवाय मानवी जगताची प्रगती होऊ शकणार नाही. नंदा खरे संशोधक नव्हेत; पण सत्य शोधणं, सत्य स्वीकारणं आणि ते सत्य सर्वासमोर मांडणं, हे ते सतत करत राहिले. त्यांच्या एकूण लिखाणामागे हाच हेतू होता असं स्वच्छ म्हणता येतं.

या सत्यशोधनाच्या अनावर आकांक्षेपोटी त्यांनी ‘कहाणी मानवप्राण्याची’ हा जाडजूड ग्रंथ लिहिला. माणूस कसा घडला याचं हे तपशीलवार वर्णन. त्यातली माहिती अर्थातच त्यांनी अनेकानेक पुस्तकांच्या परिशीलनामधून मिळवली. पण हे पुस्तक केवळ अनेक ग्रंथांमधल्या लिखाणातून उचललेल्या तुकडय़ांचं संकलन नाही. ती माहिती पचवून स्वतंत्रपणे केलेलं लिखाण आहे. पुस्तक मराठी आहे. आणि मिळवलेली माहिती जरी इंग्रजी वाचनातून आलेली असली तरी मानवाचा इतिहास मांडण्यामागचा त्यामागचा दृष्टिकोन ‘देशी’ आहे.
इथे एक प्रश्न विचारता येतो : विज्ञानाचा पाईक ‘देशी’ असू शकतो का? विज्ञानावर कुठल्याच देशाची मालकी नसते, ते साऱ्या मानवजातीचं असतं; मग इथे ‘देशी’ असण्याचा अर्थ काय?

..बरोबर आहे. तसं पाहिलं तर विज्ञान मानवाचंसुद्धा नसतं. पण विज्ञानाचं आकलन आणि त्याचा वापर जेव्हा वेगवेगळे मानवसमूह करून घेतात, तेव्हा ते सर्व मानवजातीचं राहत नाही. तंत्रज्ञान हे विज्ञानाचं अपत्य सर्व मानवजातीला सारखी फळं देत नाही. सत्य शोधायला निघालेल्या संवेदनशील लेखकाला मानवजातीमधल्या विषमतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नंदा खरेंना करता आलं नाही. ‘उद्या’ या त्यांच्या पुस्तकाला ‘फिक्शन’ (काल्पनिक, ललित साहित्य) म्हणणं त्या पुस्तकावर अन्याय करणारं ठरेल. ‘उद्या’मधला समाज फार दूरच्या भविष्यातला नाही. त्यातले शोध म्हणजे कल्पनेच्या भराऱ्या नाहीत. त्यातल्या वातावरणाची चाहूल आज ऐकू येते आहे. त्यांचं ‘बाजार’ हे पुस्तक बाजार या प्रक्रियेविषयी आहे. हा बाजार प्रथम कसा अवतरला आणि तंत्रज्ञानामधून जसं जग जवळ येत गेलं, तसा हा बाजार कोणतं विक्राळ रूप धारण करता झाला याचं वर्णन या पुस्तकात आहे. हे भौतिक विज्ञान नाही. हा इतिहास नाही. हे कपोलकल्पित कथात्म लिखाणही नाही. त्याच्या कव्हरवरचं विधान आहे- ‘मूल्यहीन अर्थव्यवहाराविषयी मुक्त चिंतन.’ लेखक तोच आहे.. घटनांच्या, प्रक्रियांच्या खोलात जाऊन सत्य शोधू पाहणारा आणि वाचकांशी ते शेअर करू पाहणारा.. ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ आणि ‘अंताजीची बखर’ लिहिणारा. ‘बाजार’मध्ये तो स्वत:ची सामाजिक बांधिलकी व्यक्त करतो आहे. समाजाकडे पाठ फिरवून सत्य शोधता येत नाही असं अंतर्यामी पटलेल्या जबाबदार नागरिकाची ही कृती आहे.

लिखाणात हे सारं करणाऱ्या नंदा खरेंचं समाधान नुसती पुस्तकं लिहून होणार नव्हतंच. दि. य. देशपांडे यांनी विवेकवादाला वाहिलेलं ‘आजचा सुधारक’ हे मासिक चालवलं, त्याच्या संपादनात त्यांचा हातभार होता. आणि दि. य. देशपांडे यांच्यानंतर काही वर्ष प्रमुख संपादक ही जबाबदारीसुद्धा त्यांनी उचलली. ते नागपूरनिवासी. नागपूरजवळच्या एका शाळेत ते व त्यांचे काही मित्र, त्यांची पत्नी नियमित जात असत आणि तिथल्या मुलांना पुस्तकी शिक्षणापलीकडचं योगदान देण्याचा प्रयत्न करीत. डॉ. अभय बंग यांनी ‘शोधग्राम’मध्ये परिवर्तनशील प्रेरणा असलेले तरुण घडवणारा ‘निर्माण’ हा उपक्रम सुरू केला तेव्हा नंदा खरे तिथेही सहभागी झाले होते. भूतकाळात न रमणाऱ्या, बदलाला नकार देत डबकं होऊन न राहणाऱ्या आणि क्षणोक्षणी नवीन रूप धारण करणाऱ्या विज्ञानाच्या प्रेमात असणाऱ्या नंदा खरेंकडे तरुणांचा सतत राबता असे. आपण तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं त्यांनी कधीच मान्य केलं नसतं; परंतु त्यांच्याशी गप्पा करून प्रेरणा घेणाऱ्या तरुणांचं प्रमाण मोठं आहे. कारण नंदा खरे हा माणूस विद्वज्जड नव्हता. विद्वान ते होतेच; परंतु त्यांच्या विद्वत्तेचं ओझं त्यांच्या सान्निध्यात कोणालाही कधी जाणवलं नाही. त्यांना क्रिकेट तसंच इतर खेळांमध्येही रस होता. ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’मध्ये एका ठिकाणी त्यांनी ‘स्वैर’ (रॅण्डम) या संकल्पनेचा अर्थ सांगताना सुनील गावस्करचा संदर्भ दिला आहे, तो अगदीच चपखल आहे. त्याच पुस्तकात अखेरीस ते टेनिस या खेळात शिरतात. त्यांच्याशी गप्पा करणं अतिशय आनंददायक असे. ते कधी मुंबईला आले की मला फोन करत. मग एक दिवस त्यांच्याशी विज्ञानापासून राजकारणापर्यंत अनेक विषयांवर गप्पा मारण्यात जाई. फोर्टात स्ट्रँड बुक डेपो, पीपल्स बुक हाऊस या त्यांच्या भेट देण्याच्या जागा होत्या. नागपूरला गेलो की मी त्यांच्याच घरी उतरत असे. बंगल्यातल्या गेस्ट रूममध्ये माझा मुक्काम असे. बंगल्याच्या मधल्या भल्यामोठय़ा दालनाचे दोन भाग पाडणारं एक पुस्तकांच्या शेल्फचं पार्टिशन होतं. त्या शेल्फमध्ये वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं असत. त्यावरून त्यांचा चौफेर व्यासंग लक्षात येत असे. आल्डस हक्सलेची ‘द आयलंड’, आर्थर कोस्लरची ‘द कॉलगर्ल्स’ या कादंबऱ्या त्यांनीच मला वाचायला दिल्या.
केशवसुतांच्या फटकळ कवितेच्या आकर्षणातून त्यांनी त्यांच्या पुस्तकांची नावं केशवसुतांच्या कवितेतून उचलली. मालतीबाई बेडेकर म्हणजे मूळच्या बाळूताई खरे या त्यांच्या आत्या. त्यांचा त्यांना अभिमान होता. साहित्याशी असा जवळचा संबंध असला तरी त्यांचं त्यांच्या ‘धंद्या’वर तितकंच प्रेम होतं. ते सिव्हिल इंजिनीयर होते आणि वयाची विशी ओलांडल्यावर त्यांनी बांधकाम व्यवसायातल्या जबाबदाऱ्या अंगावर घ्यायला सुरुवात केली. ‘दगडावर दगड, विटेवर वीट’ हे त्यांचं आत्मकथन तेव्हाचे, धरणं बांधण्याचे, खाणी खणण्याचे अनुभव सांगतं. आपण ठेकेदारी केल्याचासुद्धा त्यांना अभिमान होता. ठेकेदारी करण्यातलं आयुष्य किती कष्टप्रद, तणावयुक्त होतं हे सांगताना तिथल्या रांगडय़ा भाषेचा ते आवर्जून उल्लेख करत आणि ठेकेदार म्हटल्यावर केवळ तिरस्कार व्यक्त करण्यामागच्या अडाणीपणाविषयी संतापही दर्शवीत.

याला विरोधाभास म्हणायचं का? त्यांनी एकदा मला गाडीत घालून त्यांनी बांधलेला नदीवरचा पूल दाखवला होता. ‘गडचिरोलीसारख्या जिल्ह्यत आम्ही पूल बांधले,’ असं ते म्हणाले. ‘आम्हा ठेकेदारांची भाषा तिखट, शिवराळ. इतर ठिकाणी त्यामुळे जिभेवर ताबा ठेवावा लागतो,’ असं ते म्हणत. पण खरं सांगायचं तर त्यांच्याइतका सुसंस्कृत माणूस क्वचित भेटतो. मी कधीही त्यांचा आवाज चढलेला ऐकला नाही. कोणाशीही बोलताना त्यांच्या वागण्यात कधी आढय़ता आलेली बघितली नाही. त्यांच्या वागण्या-बोलण्यात अंतर नव्हतं. त्यांना धार्मिक उपचारांचं फार बंधन वाटलं नाही. त्यांच्या मुलीचं लग्न पुण्यात झालं. मुंबईहून निघालेला मी पुण्याला पोचून धावतपळत लग्नाचा हॉल शोधत होतो. हॉल सापडला असं वाटलं तेव्हा आतून मंगलाष्टकं ऐकू येत होती, पण नवरा-नवरी दिसत नव्हते. हे नर्मदाचंच लग्न आहे ना, याची खात्री करण्यासाठी मी दारातल्या मागच्या माणसाच्या खांद्याला हात लावला. त्याने वळून बघितलं, तर ते खुद्द नंदा खरेच होते!

विज्ञानाविषयी प्रेम असलेला आणि विज्ञानाकडून मोठय़ा अपेक्षा ठेवणारा हा माणूस शेवटल्या काळात काहीसा निराश झाला होता. ते नैराश्य त्यांच्या अखेरच्या काळातल्या लिखाणात उमटलेलं आहे. पण समाजाकडून अपेक्षा उरल्या नाहीत म्हणून त्यांची कृतिशीलता आटली नाही. शेवटी अतिदक्षता कक्षात असतानासुद्धा त्यांचं पुढच्या लिखाणाचं नियोजन चालूच होतं.

नंदा खरे गेले. एक व्यासंगी आणि बहुआयामी लेखक गेला. कृतिशील विचारवंत, साक्षेपी संपादक, उच्चभ्रूपणाशी फटकून असलेला कलाप्रेमी गेला. माझा गप्पिष्ट मित्र गेला. एक गोष्ट मात्र राहून गेली. तीस वर्षांपेक्षा दीर्घ आमची मैत्री; पण एकमेकांना ‘अरे-तुरे’ करणं राहून गेलं!
whemant.karnik@gmail.com