‘चंपानाटक किंवा नरगुंदकर व टिपू सुलतान यांची लढाई’ या पुस्तकाच्या नावापासूनच त्याचे वेगळेपण सुरू होते. इतके लांबलचक उपशीर्षक क्वचितच पाहायला मिळते. या नाटकाचे लेखक बळवंत रघुनाथ लिमये हे पोलीस इन्स्पेक्टर होते. या नाटकाचा प्रयोग झाला अथवा नाही हे पुस्तकात नमूद केलेले नाही. नाटकाचे सात अंक आहेत. तो जमाना जरी संगीत नाटकांचा असला तरी यात अनेक गाणी नाहीत. फक्त दोन पदे आहेत. एक जोगी रागातले, दुसरे नाटकाच्या अखेरीस देवीच्या प्रार्थनेचे.संगीत नाटकांच्या जमान्यात असे गद्यात्मक नाटक, पूर्ण लांबीचे, लढाईचे वर्णन करणारे- कोणी का लिहावे? पोलीस इन्स्पेक्टर असलेल्या माणसाकडून अशा लेखनाची अपेक्षा तेव्हा केली जात नव्हती. म्हणूनच त्यामागचा हेतू प्रस्तावनेत लिमयांनी स्पष्ट केला आहे- ‘नरगुंद नावाच्या लहानशा संस्थानाला टिपूच्या अमलाखालून मुक्त करणाऱ्या परशरामभाऊ पटवर्धन या सरदारांच्या वंशजांच्या चरणी लेखकांनी पटवर्धन घराण्याच्या उपकाराचे स्मारक म्हणून लिहिले.’ हा हेतू जसा स्वच्छ, तसाच नाटक लिहिण्याच्या कसोटय़ा कोणत्या, याचेही भान लेखकाला होते. ते पुढे म्हणतात, ‘पुस्तक लिहिण्याचे काम जोखमीचे! घटनांची वास्तवता, वाक्यरचना, माधुर्य, अर्थलालित्य, इ. बाबी आवश्यक. चांगल्याचा परिणाम चांगला व वाईटाचा वाईटही दाखवावा लागतो.’नाटय़कलाकृती रंजक, वास्तव आणि तरीही बोधपर असावी असा दंडक १२५ वर्षांपूर्वी कसा होता, हेच यावरून स्पष्ट होते. वास्तवतेचे भान राखल्याने या नाटकातील टिपू सुलतान व त्याचे सरदार, सैनिक मंडळी उर्दूमिश्रित हिंदी बोलतात. प्रेक्षकांना/ वाचकांना ते कळावेत म्हणून अनेक उर्दू शब्दांचे अर्थ मराठीत तळटीपांत दिले आहेत.नरगुंद संस्थानावर टिपू सुलतानचा डोळा असतो. ते लढाई न करता हाती पडावे म्हणून टिपू सुलतान आपला वकील (तो ब्राह्मण आहे!) याला नरगुंदचे संस्थानिक भावे यांच्याकडे पाठवतो. भावे व त्याचे मंत्री त्याला सामोपचारे टिपूचे मांडलिकत्व पत्करायला तयार होत नाहीत. टिपू हल्ला करायची योजना आखतो. भाव्यांच्या दरबारातला एक मुत्सद्दी टिपूला भाव्यांचे कमकुवत दुवे सांगतो. भाव्यांच्या मदतीला आलेले सैन्य परत जाईल अशी चाल रचतो. अखेर लढाईत नरगुंदकर भाव्यांचा पराजय होतो. ते व त्यांचे साथीदार कैद होतात. त्यांचा एक उमदा सरदार कत्तलीतून वाचतो. फकिराचा वेश घेऊन यात्रा करीत पुण्याला येतो. तेथे नाना फडणवीस यांना आपल्या सवालातून पेशव्यांचे सैन्य मागे फिरल्याने काय हानी झाली, ते सुनावतो. नाना फडणवीस त्याला बोलावतात. तो फकीर नसून भाव्यांच्या पदरीचा सरदार आहे हे हेरतात. ओळख स्पष्ट झाल्यावर पेशव्यांचे सैन्य लवकरच टिपूचा पाडाव करायला जाईल, असे ते त्याला सांगतात. त्याप्रमाणे परशरामपंत पटवर्धन टिपूवर चालून जातात. भावे मुक्त होतात. त्यांचा सरदार अमृतराव, भावे व इतर यांची देवीच्या देवळात भेट होते.. असे थोडक्यात हे कथानक आहे.यात चंपा कोण, हा प्रश्न सहजच पडतो. तर ती आहे अमृतराव यांची पत्नी आणि संस्थानिक भावे यांची मानलेली बहीण. त्यातही थोडे वेगळेपण आहे. संस्थानचे मालक भावे हे चित्पावन ब्राह्मण आहेत. तर चंपा ही त्यांच्या आईने लहानपणापासून वाढविलेली पोरकी मराठा मुलगी आहे. भाव्यांची प्रगतिशील विचारधारा एवढय़ापुरतीच नाही. चंपा व अमृतराव एकमेकांना प्रिय आहेत व लग्न करू इच्छितात, हे समजल्यावर ते स्वत: त्यांचे लग्न लावून देतात. पुन्हा आपल्या सेवेत असणाऱ्या साऱ्या सैनिकांबद्दल, दरबाऱ्यांबद्दल त्यांना स्नेह, ममत्व आहे. मालक-नोकर संबंधांचा आदर्श पाठ असे हे सगळे वातावरण आहे.गंमत म्हणजे भाव्यांच्या संस्थानात चालणारे धार्मिक आचार, त्यांची नोकरांसंबंधीची उदार वृत्ती आणि त्यामुळे त्यांच्या राज्याची समृद्धी याचे वर्णन टिपू सुलतानाचा वकील मुकुंदराव याच्या तोंडून पहिल्याच प्रवेशात केले जाते. तिथल्या गडाचे कौतुकयुक्त वर्णन तर आहेच; पण तळटीपेत (पुन्हा एकदा) गडाची ऐतिहासिक माहितीही आहे.आता अशा स्वरूपाचे नाटक एकसुरी किंवा प्रचारात्मक होण्याचा संभव खूपच असतो. ते टाळण्यासाठी लेखकाने प्रयत्नपूर्वक काही प्रसंग घातले आहेत. चंपा व अमृतराव यांना परस्परांच्या प्रेमाची ओळख पटते, हा प्रवेश खूप मोठा आहे. त्या प्रवेशावर ‘सं. सौभद्र’ची दाट छाया आहे. (प्रस्तुत नाटक ‘सं. सौभद्र’नंतर आठ वर्षांनी आले.)पाहा- ‘सौभद्र’मध्ये सुभद्रेचे पद ‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी.. पेरियले जे प्रीतीतरूचे बीज हृदयी त्याला। अंकुर येऊन सदृढ तयाचा वृक्ष असे झाला। सुंदर तुम्ही कीर्तिमान तच्छायेला बसला..’  तर इथे चंपा म्हणते- ‘ज्यांच्या प्रीतीचे बीजारोपण माझ्या अंत:करणात झाले आहे त्यांच्याच गळ्यात त्यापासून वाढलेल्या वृक्षाला आलेल्या प्रेमफुलांची माळ..’सौभद्रात अर्जुनाने त्रिदंडी संन्यास घेतल्यावर सुभद्रेच्या सहवासात त्याची वर्तणूक ‘यती’ची राहत नाही. ‘चंपा’मध्ये अमृतराव संन्यासी होतो आणि तीर्थक्षेत्री चंपा दिसताच तो सरळसरळ तिचा पाठलाग करतो.मात्र, रंजकता कशी आणावी ते लिमये यांना बऱ्यापैकी ज्ञात होते असे म्हणावे लागते. कारण यातला खलनायक त्यांनी पुरेसा कृष्णवर्णात रंगविला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी तो फितुरी तर करतोच; पण चंपा ही मुस्लीम सरदाराला बहाल करायला बघतो. चंपा ही पतिव्रता व स्वामीनिष्ठ. तीही लढायला तयार होते. पुरुषवेशात लढताना पकडली जाते. खलनायक कृष्णाजीवर युक्तीने मात करून कैदेतून सुटते. संस्थानिक व त्यांच्या पदरची माणसे पडकली जातात व अनेकांना गोळ्या घातल्या जातात. त्यात आपला नवरा होता हे समजल्यावर ती आपल्या कुणबिणीबरोबर मुडदे तपासायला जाते. नवरा मृत असला तर सहगमन करायचे असा निर्धार करून मुडदे तपासताना तिचे भाषण पाहा-
‘‘या चमकणाऱ्या चांदण्या या माझ्या महालातील बिलोरी हंडय़ा होत. ही जळत असलेली सरणे प्रज्वलित केलेल्या समया होत. आणि ही जी आपली वीर मंडळी मारून टाकली आहेत ती देवडीवरील पहाऱ्याची माणसे होत. हे आकाश प्रतिबिंबित कावेरी नदीचे पात्र निळ्या मखमलींचे गादीवर पांढरी चादर पसरून तयार केलेला बिछाना होय.’पूर्वी साधी, सरळ, मुग्ध बोलणारी चंपा एकाएकी काव्यात बोलू लागते. कृष्णाजीपंताशी बोलताना ‘तुमचं बाई’ अशा स्त्रीधाटणीऐवजी ‘तुमचं बोवा’ असे पुरुषी बोलणे करते. कदाचित तिच्या अशा प्रसंगी उफाळून येणाऱ्या वाचेचे मूळ तिच्या ब्राह्मण सहवासात असावे. (अमृतराव म्हणतो- ‘आधी जात्याच सुगरण- त्यात श्रीमंतांचा सहवास, तोही कोकणस्थांशी.’ लेखकही कोकणस्थ होते हे लक्षात घ्यावे.) शक्यता अशी वाटते की, नाटक लिहून झाल्यावर त्यातला हा खटकणारा भाग लेखकालाही जाणवला असावा. त्यामुळे प्रस्तावनेत नाटक लिहिणे जोखमीचे, असे मत आले असावे.हे नाटक लिहिले गेले तेव्हा ब्रिटिश साम्राज्याला विरोध तीव्रपणे होऊ लागला होता. करमणूक हेच उद्दिष्ट या नाटकाचे नव्हते. प्रस्तावनेत हेतू स्पष्ट सांगितला गेला आहे, पण नाटक वाचताना जाणवणारा स्वराज्याच्या संरक्षणाचा घोष, मुस्लिमांचा तीव्र निषेध (मुस्लीमही परकीय आक्रमकच होते.) आणि स्वामिनिष्ठ धर्माचरण यांचा उद्घोष यामुळे असे वाटते  की या नाटकाचा खरा रोख ब्रिटिशांविरुद्ध तर नसावा?
‘चंपा नाटक किंवा नरगुंदकर व टिपू सुलतान यांची लढाई’,
लेखक- बळवंत रघुनाथ लिमये-नरगुंदकर,
जिल्हा धारवाड, प्रकाशन- १८९१,
पृष्ठे- १८२,  मूल्य- १२ आणे.
vazemukund@yahoo.com