मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

बाजार! भाजीचा.. कपडय़ांचा.. खेळण्यांचा.. धान्याचा.. तसाच बायकांचा.. काय फरक आहे? सगळ्या जीवनावश्यक उपयोगी वस्तूच की! एकदा पैसे टाकले की झालं. हवी तशी ‘दुल्हन’सुद्धा मिळवून देतो हा बाजार. आणि नकोशी झालेली मुलगी या बाजारात ‘खपवता’सुद्धा येते! अहो, तशी रीतच आहे मुळी. ‘घेणाऱ्याचा’ फक्त पैसा बघायचा. वय, स्वभाव, रूप या सगळ्या नगण्य गोष्टी. तेवढंच एक खाणारं तोंड कमी नाही का होत? किती सरळ आहे व्यवहार! आणि खरं तर लग्न म्हणजेसुद्धा काय? एका अस्तित्वावर मालकी हक्क गाजवायची समाजमान्य सोयच ती! आणि एकदा ‘दुल्हन’ म्हणून तिच्यावर हक्क स्थापित झाला की तिचं मन, शरीर ही सगळी त्या मालकाचीच मालमत्ता! समाजात आत्तापर्यंत प्रचलित असणाऱ्या, अतिशय चीड आणणाऱ्या या चालीबद्दल भाष्य करणारा, समाजाचा ‘तो’ कुरूप चेहरा दाखवणारा, १९८२ साली आलेला, सागर सरहदी दिग्दर्शित, स्मिता पाटील, नसिरुद्दीन शाह, फारुख शेख आणि सुप्रिया पाठक यांच्या ताकदीच्या अभिनयानं हलवून टाकणारा ‘बाजार’ हा चित्रपट! नवाबांचं साम्राज्य लयाला गेल्यानंतर केवळ ‘बडा घर, पोकळ वासा’ अशी अवस्था झाल्यावर जिथे नवाबांनी आपल्या मुलींनाही शरीरविक्रय करायला भाग पाडलं, तिथे जे मुळातच गरीब होते त्यांचं काय? खोटय़ा शानोशौकतपायी नोकरी न करणारे, घरच्या बायकांनी नोकरी केली तर प्रतिष्ठेला धक्का लागेल असं मानणारे घरातले पुरुष! आणि त्यांचं निमूटपणे ऐकणाऱ्या त्यांच्या बायका!! यात खऱ्या प्रेमाची होणारी धूळधाण आणि स्त्रीत्वाचा प्रचंड अपमान यांचं फार दाहक चित्रण करणाऱ्या या चित्रपटाला अतिशय सुंदर शायरीची जोड मिळाली आणि खय्यामसाहेबांनी त्या वातावरणाचा पूर्ण अभ्यास करून दिलेल्या चालींमुळे तर यातली गाणी विशिष्ट उंचीवर पोहोचली. ही गाणी अजूनही अस्वस्थ करतात. आतून गलबलतं ही गाणी ऐकताना.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली

नजमा (स्मिता पाटील) हैदराबादमधून अख्तर (भरत कपूर) बरोबर मुंबईत पळून आलीय. नवाब घराण्यातली असूनही तिची आईच तिला देहविक्रय करायला सांगते. संतापलेली नजमा अख्तरच्या लग्नाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मुंबईत येते. पण सहा र्वष झाली तरी अख्तर तिला झुलवतोय. तिच्याकडे फक्त रात्रीपुरतं येऊन पहाटे निघून जाणं, नात्याला कसलंही स्थैर्य न देणं यामुळे नजमा मनातून दुखावलेली आहे. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा हैदराबादपासूनचा मित्र शायर सलीम (नसिरुद्दीन शहा) आता मुंबईतच आहे.. तिला भेटतोही. आणि निक्षून सांगत राहतो की, ‘‘अख्तर, तुझ्याशी कधीही लग्न करणार नाही. तू एक खोटं, बेगडी आयुष्य जगतेयस.’’ पण नजमा अजूनही अख्तर लग्न करेल या आशेवर आहे. अख्तरचा आखातात काम करणारा मालक शाकीर मुंबईत आल्यावर नजमाला बघतो आणि (एक लग्न झालेलं असूनही) आपल्यालाही अशी एक छान ‘दुल्हन’ हवी, हे त्याच्या डोक्यात येतं. अख्तरला पैशांची गरज असते. मालकाच्या हातात सगळ्या नाडय़ा असल्याने तो नजमाला हैदराबादहून एक छानशी मुलगी शाकीरसाठी शोधायला सांगतो. पैसे मिळाले तर अख्तर आपल्याशी लग्न करेल या आशेने नजमा याला नाखुशीनंच तयार होते. हैदराबादला अतिशय सहज मुली ‘उपलब्ध’ होतील याची नजमाला इतकी खात्री असते, की ती केवळ आठ दिवसांची तयारी करते. परतीची तिकिटंही तयार असतात. जेव्हा शाकीर तिला विचारतो की, ‘‘साडय़ा, चपला घेताना तू दहा दुकानं फिरतेस आणि मुलगी एवढय़ा लवकर कशी निवडणार आहोत आपण?’’ यावर नजमाचा जवाब असतो, ‘‘आपके ‘बाजार’ में सब से सस्ती कोई चीज है ना, तो वो है ‘औरत’!’’ दागिने, कपडे आदीचे सौदे होतात, खरेदी होते. फक्त एक मोठी ‘खरेदी’ बाकी असते. अखेर सलीमसह सगळी मंडळी हैदराबादला जायला निघतात.

तिकडे हैदराबादला एक वेगळीच प्रेमकहाणी जन्म घेत असते. टपोऱ्या डोळ्यांची, बोलक्या चेहऱ्याची, तेजतर्रार शबनम (सुप्रिया पाठक) आणि तिच्यावर अतिशय भाबडं प्रेम करणारा सरजू (फारुख शेख). या सरजूला नजमा भाऊ मानते. शबनमसुद्धा एकेकाळी श्रीमंत असलेल्या, पण आता कफल्लक झालेल्या नवाब घराण्यातली मुलगी आहे. पण सरजू आपल्यावर किती मनापासून तिच्यावर प्रेम करतो, हे ती जाणून आहे. त्या दोघांचा प्रणय फुलतो तो मखदूमसाहेबांच्या शायरीतून..

‘फिर छिडी रात बात फूलों की (मखदूम मोहीउद्दीन, लता मंगेशकर, तलत अझीझ)

रात है या बारात फूलों की..’

किती नाजूक असावं एखाद्या गाण्यानं.. एक ‘फूल’ ही कल्पना शायर कशी फुलवत नेतो. सर्वत्र फुलांचा जिक्र.. जाईजुईच्या प्रमाथी गंधात न्हायलंय हे गाणं..

‘फूल के हार.. फूल के गजरे

शाम फूलों की, रात फूलों की..’

या गाण्यात त्या पाकळ्यांचा तलमपणा आहे. मदमस्त करणारा चमेलीचा गंध आहे. गुलाबाचा मुलायम स्पर्श आहे. पण तरीही हे गाणं ‘मादक’ नाही, तर विलक्षण खानदानी, संयमी शृंगार व्यक्त करणारं आहे. त्यात एक तहजीब सांभाळलीय.. अदब ठेवलीय! एकमेकांना ‘आप’ म्हणून संबोधणं हासुद्धा त्याच संस्कारांचा परिणाम आहे.

‘आपका साथ, साथ फूलों का

आपकी बात, बात फूलों की..’

खरं बघायला गेलं तर यात कल्पनाविलास असा नाहीच. पण सगळे विचार त्या फुलांपाशी कसे आणून ठेवलेत. मग तुम्ही त्याचा हवा त्या कोनातून अर्थ घ्या! फुलासारखा सहवास.. फुलांसारखं बोलणं! अशा त्याला अनेक छटा मिळतात.

‘ये महकती हुई गझल मखदूम,

जैसे सेहरा में रात फूलों की!’

काय सुंदर कल्पना आहे! आपलं हे दोघांचं गाणं.. जणू वाळवंटातली फुलांची सुखशय्या अंथरलेली.. मीलनरात्र!

हैदराबादी तहजीब असलेले प्रेमिक कसे व्यक्त होतील, हे जाणून केलेलं हे गाणं. सतारच्या अतिशय तेजस्वी पीसनं सुरुवात होते.. त्याला व्हायोलिन्सची साथ! खय्यामसाहेबांच्या चालीत एक तरी जवळच्या स्वरांची मुरकी असतेच असते.. नाजूक फिरत दाखवणारी. त्या ओळीचा तो आकर्षणबिंदू असतो. इथे या मुखडय़ात ही जागा ‘फूलों की’ म्हणताना ‘लो’ या अक्षरावर येते. त्या जागेचा, ‘रेगरेसा’ या स्वरांचा नेमकेपणा फार महत्त्वाचा. तलत अजीजच्या आवाजातलं ‘फिर छिडी रात..’ आणि लताबाईंच्या ‘रात है या बारात..’ यांची चाल सारखी असली तरी त्यांतसुद्धा फरक आहे. लताबाई ‘रा, त, है’ या तिन्ही अक्षरांना मींड देऊन, लडिवाळपणे मधल्या श्रृती भरून काढत गातात. म्हणजे ‘नी’, ‘सा’, ‘ग’ हे स्वर, ‘सानी’, ‘गसा’ मग असे पुढच्या स्वराचा कण देत गातात. तो अवकाश भव्य वाटायला लागतो. ‘फूल के हार’ म्हणतानाचा ‘हा’वरचा आकार.. लख्ख तेजस्वी.. अवकाश भरून टाकणारा.. जितका कमी वेळ तो आहे, तेवढय़ा कणभर मात्रेत तो पंचम एक सोनसळी प्रकाशझोत आपल्या अस्तित्वात मिसळून जातो.. त्या धुंदीतून बाहेर यावंसं वाटत नाही. त्यातच ’गजरे’वर पुन्हा लहानशी मुरकी आहे. ती एक सुगंधी जखम करून जातेच. तलत अझीझचा आवाज आणि लताबाईंचा आवाज यांचं एक विरोधी सौंदर्य एकत्र अनुभवायला मिळतं इथं. म्हणजे काहीसा पातळ आणि साधा असा तलत अझीझचा आवाज आणि ऐंशीच्या दशकात पूर्ण तेजाने झळाळणारा लताबाईंचा तो दिव्य, परिष्कृत आवाज. तरीही फार गोड लागतात हे दोन्ही आवाज इथे. त्या- त्या व्यक्तिमत्त्वांना खुलवणारे! हे दोघे एक ओळ एकत्र म्हणतात तेव्हा तर धारदारपणा आणि नाजूकपणा यांचा मिलाफ होतो. जणू एकाच वेळी त्या फुलाच्या गंधातून एक तीव्र तिखट छटा जाणवावी, अन् मग किंचित अवकाशानंतर त्याचा फक्त वरचा हळवा गंध जाणवावा, तसं हे दोन आवाजांचं कॉम्बिनेशन आहे. पडद्यावर अतिशय स्वच्छ नितळ भावना डोळ्यांतून व्यक्त करणारे फारुख शेख आणि सुप्रिया पाठक. तिनं माळलेल्या फुलांचा रंग, गंध तिच्या चेहऱ्यावर उजळून येतो. ‘नजरें मिलती है.. जाम मिलते है’ म्हणत डोळ्यांतून हलकेच ओठांकडे जाणारा तो शृंगार..

खय्यामसाहेबांच्या गाण्यांची खासियत भारदस्त व्हायोलिन्स.. काय देखणा कॅनव्हास मिळाला त्यांच्यामुळे! आणि नीट ऐकलंत तर गाण्यातली बास गिटारची अखंड सोबत आणि कडव्याच्या शेवटच्या ओळीच्या आधीचा त्याचा खास ‘पिकअप’ काय जादू करून जातो ते अनुभवता येईल. या गाण्यात सतार, तबला यांचे टोन त्या भावावस्थेत बुडूनच आलेले आहेत. पडद्यावर संध्याकाळच्या केशरी प्रकाशातून उमलणारी रात्रीची निळाई! फुलांचे रंग.. या गाण्याची नशा काही और आहे, हे नक्की. अशी फुलांची रात्र येणार असेल तर आयुष्यभर वाळवंट सुखाने तुडवेल कुणीही.. ‘जैसे सेहरा में रात फूलों की’!

हैदराबादला जाताना प्रवासात नजमाचा मिळणारा सहवास संपूच नये असं वाटत असताना आलेल्या आठवणी.. सलीमच्या मनातलं काहूर सांगणारी गझल..

‘करोगे याद तो हर बात याद आएगी (बशर नवाज, भूपेंद्र सिंग)

गुजरते वक्त की हर मौज ठहर जायेगी’

प्रत्येक प्रेम आपल्याला यशस्वी किंवा अयशस्वी या सदरात टाकता येत नाही. सलीमचं नजमावरचं प्रेम काहीसं असंच आहे. ते यशस्वी म्हणावं, तर नजमा त्याच्याशी लग्न करत नाही, तसं वचनही देत नाही. अयशस्वी म्हणावं, तर नजमा त्याला अव्हेरत नाही.. त्याचं प्रेम अमान्यही करत नाही.

‘करोगे याद तो..’! आठवणी.. काही हव्याशा, काही टाळण्यासारख्या आणि तरीही छळणाऱ्या. ‘करोगे’ हा शब्द फार महत्त्वाचा. ‘करोगे’ याद तो हर बात याद आयेगी.. आपोआप नाही आठवणार माझ्यासारखं तुला.. त्या आठवणींना यायची अनुमती दिलीस तर आठवेल तुला सगळं. जरी आत्ता मुद्दाम त्या आठवणी खोल गाडून टाकल्या आहेस, तरी आठवतील तुला ते दिवस..

हा अनादि अनंत काळ.. एक निरंतर प्रवाह. अनेक घटनांच्या लहरी घेऊन चाललेला. अखंड  वाहणारा. पण जरा आठवलंस तर हा प्रवाह थांबवण्याचं सामथ्र्य त्या आपल्या स्मृतींमध्ये आहे. हर मौज ठहर जायेगी! चंद्र म्हणजे आपल्या भूतकाळाचा आरसा.. सगळं स्वच्छ दिसतं त्यात.. ढगांच्या वेडय़ावाकडय़ा आकारातून काहीतरी आकृती मिळावी.. त्याला अर्थ यावा, तसंच या आठवणींचं आहे. उदास पायवाटसुद्धा तिची कहाणी सांगत असते.. फक्त आठवायला हवं..

‘बरसता भिगता मौसम धुवां धुवां होगा

पिघलती शम्मो पे दिल का मेरे गुमा होगा

हथेलियों की हीना याद कुछ दिलायेगी

गली के मोड पे सुना सा कोई दरवाजा

तरसती आंखों से रस्ता किसी का देखेगा

निगाह दूर तलक जाके लौट आयेगी!’

तो तुफान पाऊस.. ते भिजणं.. सगळ्यावर एक दाट, धूसर पडदा. माझ्या मनात त्याच्या फक्त शमा जळतायत, वितळतायत. ते मेंदीभरले हात. कसे विसरू शकतेस तू? अजूनही तुझी वाट बघणं काही सोडलं नाही.. तुला शोधणारी नजर लांबवर वाट न्याहाळून परत येते.. रिकामी..

बशर नवाज अतिशय हलक्या, नाजूक लेखणीनं सलीमचं मन उलगडतात. खय्यामसाहेबांनी ‘करोगे याद’ या दोन शब्दांतच गाणं अक्षरश: जिंकलंय. कसं सुचलं असेल पहिल्याच शब्दात शुद्ध आणि कोमल गंधार लागोपाठ घेणं? त्यात सगळी तडप आली.. आर्त पुकार आली.. अगं, आठव ते सगळं.. हे कळवळून सांगणारे पहिले ‘करोगे याद तो’ हे शब्द.. या दोन गंधारांनी अक्षरश: काबीज केलेत. त्यात भूपेंद्रजींचा आवाज.. तीनच शब्द, पण तीस शब्दांचं वजन आहे त्यात. काही आवाज असे असतात, की ते तालाच्या मात्रा भरून टाकतात. तीन मात्रांचा हा मुखडा इतका भरीव आहे की एकदा ऐकल्यावर रात्रंदिवस हे गाणं मनात वाजत राहतं. ‘गुजरते वक्त की..’मध्ये ‘ते’अक्षर लांबवल्यामुळे त्यात खूप मोठा काळाचा आभास निर्माण करता आला. शेवटी ‘सुनासा कोई दरवाजा’ म्हणताना ‘दरवाजा’ हा शब्द ऑफबीट येतो आणि त्यात पंचम, गंधार अशी दोन स्वरांची एक आशादायक संगती आहे. तेच स्वर ‘देखेगा’ शब्दावरही येतात. ‘ती येईल’अशी वेडी आशा जागवणारे! पण.. ‘निगाह दूर तलक’मध्ये पुन्हा तेच दोन गंधार- कठोर वास्तवाची जाणीव करून देणारे.. आठवणींचा डोह अधिकच खोल आणि गडद करणारे. संतूर,बासरी, किंचित गिटार.. एवढीच साथ आणि खय्यामसाहेबांची शैली दाखवणारे छोटे फीलर्स! अतिशय वेगळ्या प्लेनवरचं आहे हे गाणं.

घरगुती मैफलीत शबनमनं गायलेलं, लताबाईंचं ‘दिखाई दिये यू..’ आणि जगजीत कौरजींच्या ‘देख लो आज हमको जी भर के..’ या गाण्यांबद्दल उत्तरार्धात..