राहुल बनसोडे
धर्मस्थळ आणि शहर म्हणून आजही ‘विकास’च तर होतोय नाशिकचा! पण महाराष्ट्रातल्या या तीर्थक्षेत्राचं, नदीकाठानं बहरणाऱ्या शहराचं आपण काय करतो आहोत?
नाशिक म्हटलं की तिथली मिसळ हमखास आठवणार. त्यानंतर तिथली धर्मस्थळे आठवणार. गोदावरी नदी आणि या नदीच्या घाटावर व्यतित केलेले दिवस किंवा वर्षे आठवणार. याशिवाय नाशिकची द्राक्षेही प्रसिद्ध आहेतच. नाशिक ही देशाची वाईन राजधानी आहे आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातही हे शहर अग्रेसर आहे. याशिवाय अख्ख्या भारतात वापरल्या जाणाऱ्या चलनी नोटा इथेच छापल्या जातात. आणि मुरमुऱ्यांपासून ते हरभऱ्यापर्यंत आणि कांद्यापासून फ्लॉवपर्यंत अनेक शेती उत्पादने इथूनच रोज देशभरात पाठवली जातात. तुम्ही अलीकडे कुणाला पन्नास रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुलाब दिला असेल तर तो नाशकातूनच आलेला असेल. आणि तुम्ही सेलिब्रेशनमध्ये महागडी शॅम्पेन वा वाईन प्यायला असाल तर तिही नाशकातूनच आलेली असेल.
या एवढय़ा भल्यामोठय़ा ओळखींशिवाय नाशिकची आणखीही एक ओळख आहे.. ती इथल्या संपन्न निसर्गाची. आपल्या बहुविध वैविध्याची ओळख मिरवण्याची संधी नाशिकला मिळाली आहे ती इथल्या नद्यांना असलेल्या भरपूर पाण्यामुळे आणि त्या पाण्याने घडवलेल्या संस्कृतीमुळे. नदीच्या खोऱ्यात विकसित झालेल्या सिंधू संस्कृतीची एक शाखा नाशकातही नांदत होती.. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या हरप्पन संस्कृतीशी संपर्कात होती. आणि त्यांच्यात ज्ञानाचे आदानप्रदानही होत होते, यावर किती लोक विश्वास ठेवतील? आपल्या शहराच्या नावाचा उल्लेख सर्वात प्राचीन धर्मग्रंथामध्येही येतो हे वाचल्यावर कुणालाही अभिमान वाटेल. पण आपले शहर धर्मग्रंथांहूनही जुने आणि कल्पनेहूनही सुंदर होते असे कुणाला सांगितल्यास ते कितपत खरं वाटेल? तेव्हा अगदी पहिल्या बिंदूपासून नाशकाची गोष्ट सांगितली पाहिजे. कुठल्याही धर्मग्रंथाचा आधार न घेता! ज्या सह्यद्रीला लागून नाशिक शहर वसलेले आहे तो सह्यद्री हिमालयाहूनही खूप जुना- पंधरा कोटी वर्षांचा आहे. तर ज्या दख्खन पठाराच्या कडेवर नाशिक वसलेले आहे, त्या पठाराचे वय आहे सहा कोटी साठ लाख वर्षे. या दोन्हीच्या संगमातून नाशकाचा भूभाग जरी बनला असला तरी त्याला त्याचे सध्याचे पर्यावरण मिळून अवघी ऐंशी लाख वर्षे झाली आहेत. या ऐंशी लाख वर्षांत इथे अनेक नद्यांनी जन्म घेतला, अनेक प्रवाह धरतीत गडप झाले, हजारो वेळा जंगले उगवली, पुन्हा जमिनीत गाडली गेली आणि त्यावर पुन्हा जंगले उगवून आली. या जंगलांमध्ये हरणं होती, वाघ होते, बिबळे, तरस असे अन्नसाखळीतल्या उच्च स्तरातील प्राणी होते. तर पाण्यात हरतऱ्हेचे मासे, खेकडे आणि कासवे होती. गोदावरीचे त्याकाळचे खोरे अॅतमेझॉनच्या खोऱ्याहून कमी समृद्ध नव्हते. इथली जैवविविधता तितकीच रंगीत आणि अद्वितीयतेने भरलेली होती. नाशकाचा हा भूभाग आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यातले जग हे एदेनच्या बागेहून कमी सुंदर नव्हते.
अवघ्या ४० हजार वर्षांपूर्वी माणसाने या भूभागावर पाय ठेवला आणि त्या दिवसापासून या शहराचा गर्भ आकाराला यायला सुरुवात झाली. हा प्रदेश आधी भरपूर फळांचा आणि लुसलुशीत मांसाच्या प्राण्यांचा. त्यातले कितीतरी लुसलुशीत प्राणी त्या आद्य नाशिककरांनी खाऊन संपवले. हे फक्त जमिनीवरचे अन्न. पाण्यात पाहावे तर माणसांना लॉटरीच लागली होती. इतक्या प्रकारचे आणि इतक्या चवींचे मासे याआधी माणसाने कधी पाहिलेच नसतील. त्यातले अर्धेअधिक खाण्यायोग्य नव्हते, त्यामुळे ते पकडलेही जात नसत. पण खाण्यायोग्य मासे बरेच होते आणि ते पकडण्यासाठी किती विविध प्रकारचे गळ बनवले जात. इथून जवळच असलेल्या नांदगाव तालुक्यातल्या लोढरे गावी अशा गळांचे कितीएक अवशेष सापडले आहेत. माणसे कदाचित मासे खाऊन कंटाळली असावीत किंवा नदीत मासे कमी झाले असतील, किंवा मग इतर काही कारणांमुळे माणसांनी दहा हजार वर्षांपूर्वी येथे शेतीचा शोध लावला असावा. अर्थात हा आजच्या शेतीचा प्रारंभिक अवतार होता आणि त्यावर माणसे पूर्णत: अवलंबून नव्हती. गोदावरीची उपनदी प्रवरेच्या खोऱ्यात सावळदा येथे सापडलेल्या भारताच्या आद्य कृषीसंस्कृतीचे अवशेष पाहायला मिळतात.
साधारण पाच हजार वर्षांपूर्वीपर्यंत बहुसंख्य लोकसंख्या ही शिकार, शेती आणि पशुपालन या तीन पातळ्यांवर जगत होती. बऱ्याच गरजा या जंगलात नैसर्गिकपणे उपलब्ध असलेल्या वस्तूंमधूनच भागवल्या जात. भरपूर मध, डिंक, लाकूडफाटा जंगलातूनच उपलब्ध होत असेल तर कशाला फक्त शेतीच्या मागे लागा? शेती उपयुक्त होती, पण तीत फाजील महत्त्वाकांक्षा नव्हती. या मिश्र जीवनपद्धतीत पुढे धातुसंस्कृतीचा प्रभाव पडू लागला. चाकाच्या शोधाने आर्थिक व्यवस्था सर्वदूर पोहोचली आणि शेतीतून जास्तीचे उत्पन्न घेण्याची पद्धत आली. चाक आले तसे रथ आले, रथ आले तसे राजे आले आणि राजे आले तसे त्यांच्या राजधान्या आल्या.. जिथून शहराची निर्मिती सुरू झाली. इथे कधी राजधानी म्हणून, कधी उपराजधानी म्हणून, किंवा कधी मांडलिक, तर कधी फक्त बाजारपेठेचे गाव म्हणून नाशिक जगत, वाढत राहिले. याच काळात ते कधी या धर्माच्या प्रभावाखाली, तर कधी त्या धर्माच्या प्रभावाखाली आपली सांस्कृतिक प्रगतीही करीत राहिले. या संमिश्र काळातही बराचसा एकोपा आणि शांतता राखण्यास या शहराला यश आले असावे, कारण इथे सर्वच धर्माची जुनी धर्मस्थळं अगदी सुव्यवस्थित राखली गेलेली दिसतात.
यानंतर युग बदलले. चाकांच्या शोधानंतर तितकाच महत्त्वाचा दुसरा शोध लागला वाफेच्या शक्तीचा. चाकाच्या शोधानंतर बनलेल्या रथांमुळे लढाया झाल्या असतील, तर वाफेच्या शक्तीच्या शोधानंतर बनलेल्या बोटींमुळे युद्धे झाली. या युद्धात नाशकाची हार झाली आणि ते परकीय सत्तेच्या ताब्यात गेले. या परकीय सत्तेच्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या होत्या. मुंबईहून रेल्वे लोहमार्ग खोदत खोदत ते पुढे सरकत होते आणि कसाऱ्याचा घाट पार करून पुढे पठारावर शिरताना त्यांना नाशकात पहिली सुवर्णसंधी दिसून आली. पण त्यांचे हे मनसुबे इथला एक महत्त्वाचा वर्ग काही मानेना. विना-बैलाची विना-घोडय़ाची गाडी आपोआप चालत असेल तर असली अभद्र, अपशकुनी गाडी आम्ही शहरातून अजिबातच जाऊ देणार नाही, या निग्रहावर ते अडकले. मग ब्रिटिशांनी बारा किलोमीटर दूर नाशिक रोड रेल्वे स्टेशन बांधले. यानंतर ब्रिटिशांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी इथे पायदळाची मोठी रेजिमेंट उभारली, आलिशान बंगले बांधले, भलेमोठे तुरुंग आणि या तुरुंगाहून जरा चांगल्या, पण बंगल्यांहून कमी अशा हजारो क्वार्टर्स बांधल्या. याशिवाय तत्कालीन कमिशनरचे कार्यालय, कोर्ट हाऊस, नद्यांवरचे उंच पूल, पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या, नळ-व्यवस्था, पोस्ट ऑफिसेस, रेल्वे स्टेशन, स्टॅम्प्सपासून ते नोटा छापणारे भव्य छापखाने ही सर्व ब्रिटिशांच्या महत्त्वाकांक्षेतून जन्मलेली अपत्ये. हा पारतंत्र्यातला इतिहास आणि त्या इमारती आज कुठल्याही विशेष पडझडीशिवाय नेटाने उभ्या आहेत.
मग येतात ते पिछले सत्तर साल. या सत्तर वर्षांत हे शहर सुरुवातीला परिवर्तनवाद्यांच्या आणि नंतर पुनरुज्जीवनवाद्यांच्या प्रभावाखाली आलेले दिसते. ब्रिटिशांनी शहरात सुरू केलेली नळव्यवस्था शहरात सर्वदूर पोहोचली आणि तिला चोवीस तास पाणी उपलब्ध असावे म्हणून गोदावरीवर धरण बांधण्यात आले. याचदरम्यान शहरापासून जवळच्या गावांत रस्ते आणि कालव्याचे पाणी नेण्यात आले आणि बदल्यात तिथून ताजा भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य शहरात आणून विकले जाऊ लागले. पुढे शेतीत महत्त्वाकांक्षा आणखी वाढल्या तसा हा भाजीपाला मुंबईसारख्या शहरातही जाऊ लागला. आज मुंबईत जे काही खाल्ले जाते त्यातल्या एक-चतुर्थाश गोष्टी नाशिकमधून आलेल्या असतात. ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर नाशकातली शेती प्रगत होत गेली. त्यात द्राक्षासारखी प्रचंड फायद्याची, पण जोखमीची पिके घेण्यासारखे हवामान असल्याने इथली द्राक्षाची बाजारपेठ विस्तारली. लवकरच इथे कुणीतरी वाईनची द्राक्षे पिकवून त्यांची वाईन बनवून पाहिली आणि बघता बघता नाशिक ‘वाईन कॅपिटल’ बनले. समांतर काळात ब्रिटिश छापखाने आणि व्यवस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांचे जीवनमान बदलले आणि वाढत्या गरजांसह मुक्त अर्थव्यवस्थेने इथे आपले बस्तान मांडले. शहराची लोकसंख्या काही वर्षांत दुप्पट होत होत आता २२ लाख इतकी झाली आहे. अवघ्या वीस वर्षांत अफाट वेगाने वाढलेल्या या शहराची भूक भारतातल्या इतर शहरांसारखीच आहे. या शहराला प्रचंड पेट्रोल लागते. प्रचंड प्रमाणात प्लास्टिक आणि पाणी लागते. आणि या तिन्हीच्या अतोनात वापरातून प्रदूषणही प्रचंड होते.
नंतर येतात मागचे ५०-६० दिवस.. ज्यात मी गोदावरी नदी आणि तिचा या शहराशी असलेल्या संबंधाचा जवळजवळ रोज विचार करतो आहे. २१ एप्रिल २०२२ रोजी दुसरी हीट् वेव्ह आपल्या परमसीमेवर असताना माझ्या दोन मित्रांना आणि दोन मैत्रिणींना गोदाकाठी सांडव्यावरच्या देवीपाशी अड्डा जमवायची लहर येते. हे जरा स्त्रीशक्तीवादी वाटू शकते, कारण या चमूत ‘लोकसत्ता’च्या स्तंभलेखिका परिणीता दांडेकर, गोदावरीवर पीएच. डी. करणाऱ्या डॉ. शिल्पा डहाके, पाणी फाउंडेशनचे ज्ञानेश मगर आणि सोशल मीडियातले प्रसिद्ध फोटोग्राफर अभय कानिवदे यांचा समावेश होता. आमच्यातल्या प्रत्येकाने या काठावर भरपूर वेळा एकेकटय़ाने अळमटळम् केलेले आहे. अगदी तशीच अळमटळम.. पण एकत्र आणि फुलांच्या सुगंधासह करण्याचा आमचा प्लॅन होता. नाशकातल्या तांबट आळीतून आम्ही सराफ बाजारात, सराफ बाजारातून फुलबाजारात, फुलबाजारातून मेन रोडवर, मेन रोडवरून दहीपुलापर्यंत आणि दहीपुलावर जाऊन बुधा हलवायाची जिलबी खाऊन आम्ही या प्रवासाची सांगता केली. या इवल्याशा अवखळ प्रवासात गोदाकाठी हिंडताना एक नेहमीचे मिथक आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. आणि ते मिथक आहे सरस्वतीचे मिथक. घाटांच्या संस्कृतीत जिथे कुठे दोन नद्या मिळतात तिथल्या स्थानांना आपसूकच पावित्र्य येते आणि त्यातून धार्मिक शहरे निर्माण होतात. धर्म आला म्हणजे त्यासोबत त्याचे फिक्शनही येते आणि त्यात कधी कधी नद्यांचे संगम दोनपेक्षा जास्त नद्यांचे असू शकतात. बंगालमध्ये असा त्रिवेणी संगम वास्तवात आहे. पण जेव्हा तिसरी नदी फिक्शनमध्ये दिसते आणि वास्तवात तिथे दोनच नद्या अस्तित्वात असतात, तेव्हा तिसरी नदी खरंच कधी होती की ते मिथकच आहे, याचा शोध अनेक जण आयुष्यभर घेत राहतात. अगदी सगळ्याच नद्यांच्या संगमावर!
नाशिकच्या सांडव्यावरच्या देवीपासून एक कि. मी. अंतरावर गोदावरीला दुसरी एक लहानशी नदी येऊन मिळते, तिचे नाव ‘वाघाडी’! या वाघाडी- गोदावरीच्या संगमावर अनेक पंथांची अनेक पुरातन मंदिरं उभी आहेत. ही जागा जर इतकी महापवित्र, तर मग इथे तिसरी नदीही येऊन मिळत असावी, असा गोड कयास करायला कुणालाही आवडेल. असाच कयास आम्हीही गंमत म्हणून करीत होतो. त्यासाठी पांडे मिठाईच्या डुगडुगत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जायची हिंमतदेखील आम्ही दाखवली. त्या उंच मजल्यावरून गोदापात्राचा ‘स्काय वू’ बघताना एकीकडे माणसांची गंमत वाटत होती, तर दुसरी पात्राचे संपूर्णत: सिमेंटने झालेले सरसपाटीकरण. हीदेखील संस्कृतीचीच देण असावी असे मनोमन मानून आम्ही दुसरीकडे जेव्हा पाहू लागलो तेव्हा नजरेस पडली ती नदीच्या तटबंदीला लागून असलेली घरे. ही तटबंदी तशी फार जुनी वाटत नाही. फार फार तर दीडशे वर्षांपूर्वीची असावी. कधीकाळी ही घरे व्हेनिस शहरातल्या घरांइतकी सुप्रसिद्ध आणि एक्झॉटिक असतील असे परिणीता दांडेकर यांचे मत पडले. आणि ही श्रीमंत घरे नजरेने स्कॅन करीत असताना आमच्यातल्या कुणाला तरी सरस्वती दिसल्याचा भास झाला. ही सरस्वती त्या तटबंदीच्या घराजवळून सरळसोट वाहत होती.. निदान तसे दिसत होते. त्या घराला लागून पुढच्या बाजूला एक मंदिर आहे. साधारण तीनशे किंवा त्याहून कमी वर्षे जुने. त्या मंदिरात देव आणि राजा रवि वर्माच्या महान चित्रांचे दर्शन घेऊन आम्ही लगतच्या घरात गेलो आणि प्राथमिक चौकशी व गप्पांनंतर यजमानांना ‘सरस्वती’बद्दल विचारले. त्यांनी समोर बोट दाखवले आणि सरस्वतीची माहिती देताना ती कधी नदी नव्हतीच, तो नालाच आहे, असे सांगितले. त्यांच्या पिढय़ांच्या आठवणींतही तो नालाच होता. आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला तर तिथे खरेच खूप मोठा नाला होता, ज्यातले पाणी पूर्णत: सांडपाणी होते. आणि हा प्रवाह थेट गोदावरीत न जाऊ देता तो पुढे मलजलशुद्धीकरण केंद्राकडे जातो असे आम्हाला सांगण्यात आले. तो नाला भले इतका प्रदूषित असेना, पण तो बराच जुना आहे हे स्पष्टपणे दिसत होते. पण तो प्रवाह कुठल्याही अर्थाने कधीकाळी नदी होती असे म्हणता येणार नाही. पण म्हणून तो इतका अस्वच्छही नव्हता. ऐंशी लाख वर्षांपूर्वी हा प्रवाहही इतर प्रवाहांसारखाच स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ होता. त्यानंतर अलीकडच्या ४० हजार वर्षांतही विशेष बदल झालेला नव्हता. आणि चार हजार वर्षांपूर्वी तर याच प्रवाहाने तत्कालीन सांडपाणी स्वीकारल्याने इथे संस्कृती आणि बाजारपेठ वसवता आली. नदीला वाईट म्हणत नाहीत, नाल्याला तरी वाईट का म्हणावे? गेली दोन हजार वर्षे तरी हे शहर अस्तित्वात आहे आणि गेली दोन हजार वर्षे तो नाला तिथे आहे. पण तो आजच्याइतका प्रदूषित कधीच नव्हता. हे प्रदूषण वाढले गेल्या २० वर्षांत. ४० वर्षांपूर्वी त्यात फारसे केमिकल्सचे पाणीही नसायचे. ६० वर्षांपूर्वी साबणही तुरळकच असायचा. आणि शंभर वर्षांपूर्वी हा प्रवाह नदीइतका स्वच्छ नसला तरी अनेक प्रकारच्या माशांना मुबलक खाद्य देणारा होता. हा नाला प्रदूषित असला तरी मेलेला कधीच नव्हता. तो मेला गेल्या अवघ्या ५० वर्षांत. आणि या मेलेल्या पाण्याला शुद्ध करून पिण्यायोग्य बनवले जात असले तरी ते प्रवाही असताना जीवनासाठी कुचकामी करण्याचा आपला अविरत उद्योग चालूच आहे.
wrahulbaba@gmail.com

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
What Sanjay Raut Said?
“देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी, त्यामुळेच..”; संजय राऊत संतापले
imd predicted hailstorm in north central Maharashtra
उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट… जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Urban Planning Exam marathi news
नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी