अविनाश सप्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीमध्ये रंगभूमी आणि नाटकांची चर्चा करताना, बोलताना आणि लिहिताना अनेक संज्ञा आणि संकल्पनांचा वापर केला जातो. या संज्ञा आणि संकल्पना काही प्रमाणात भारतीय नाटय़शास्त्रातून आणि मोठय़ा प्रमाणात पाश्चात्त्य नाटय़शास्त्रातून घेतलेल्या असतात. पण त्यांचा वापर खूप वेळा काटेकोरपणे, नेमकेपणाने आणि त्यांचा मूळार्थ समजून न घेता ढिसाळपणे केला जातो. परिणामी अशी समीक्षा गोंधळच निर्माण करते. सांप्रतच्या काळात तर याचा प्रत्यय वारंवार येताना दिसतो. त्याचबरोबर ज्यांना गांभीर्यपूरक नाटय़समीक्षा करायची आहे त्यांना संज्ञा आणि संकल्पना यांचा परिभाषासंग्रह ग्रंथरूपात आणि एकत्रितपणे संदर्भासाठी मराठीमध्ये उपलब्ध नसणे ही मोठीच उणीव आहे हेही लक्षात येते. सुदैवाने ही उणीव आता डॉ. विलास खोले यांनी लिहिलेल्या आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह’ या बृहद्ग्रंथा च्या रूपाने भरून निघते आहे. ८२६ पृष्ठसंख्या असलेला हा या प्रकारचा मराठीतला पहिला ग्रंथ असून डॉ. खोले यांनी तो एकहाती लिहिला आहे. हा संदर्भग्रंथ  डॉ. खोले यांनी कठोर परिश्रम आणि सखोल अभ्यास करून सिद्ध केला आहे. भारतीय नाटय़शास्त्राच्या संदर्भात संस्कृतमधली मूळ अवतरणे आणि पाश्चात्त्य नाटय़शास्त्रातील परिभाषेच्या संदर्भात इंग्रजी भाषेतील मूळ व्याख्या व स्वरूपसूचक मजकूर दिला आहे. हा ग्रंथ भारतीय नाटय़शास्त्र, पाश्चात्त्य नाटय़शास्त्र आणि मराठी नाटय़रूपे अशा तीन विभागांत विभागलेला असून, एकूण २४४ नोंदींचा समावेश या ग्रंथात आहे. भारतीय रंगभूमीच्या संदर्भात भरतमुनींचे नाटय़शास्त्र आणि पाश्चात्त्य रंगभूमीच्या संदर्भात अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (पोएटिक्स) हे मुळारंभ मानले जातात. या दोन्ही ग्रंथांत नाटकासंबंधी ज्या संकल्पना आल्या आहेत त्या डॉ. खोले यांनी या ग्रंथात विचारात घेतल्या असून, त्यांच्या व्याख्या, स्पष्टीकरण आणि विवेचन केले आहे. भारतीय नाटय़शास्त्रामध्ये नाटय़लक्षण, नाटकाचे प्रयोजन, नाटय़प्रयोग, नाटय़गृह, अभिनय, कथानक, भाषा, नाटय़संवाद, सिद्धांत, नाटकातील पात्रे, नाटय़रचना इ. मुद्दय़ांचा विचार करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने इतर अनेक उपमुद्देही आले आहेत. त्यासंबंधी डॉ. खोलेंनी सहज समजेल असे विवेचन केले आहे. उदा. अभिनयाचे चार प्रकार- १) आंगिक- शारीर प्रतिक्रियांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या हालचाली, २) वाचिक- नाटकातील पाठय़ म्हणण्याची पद्धती, शब्दांचे शुद्ध उच्चारण, स्वरांचे यथोचित नियमन, ३) सात्त्विक- मानस शारीर रूपातून व्यक्त होणे, ४) आहार्याभिनय – म्हणजे नेपथ्यकर्म. यात रंगभूषा, वेशभूषा, अलंकार, इ.चा समावेश. नाटय़गृह- तीन प्रकार- १) विकृष्ट- आयताकार, २) चतुरस्र- चौकोनी आकार, ३) व्यस्त्र- त्रिकोनी आकार (डॉ. खोले यांनी या तिन्ही नाटय़गृहांच्या आकृत्या दिल्या आहेत). नाटय़रस- शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत. प्रेक्षकगुणविशेष- १) नाटकाचा नेमका हेतू जाणण्याची कुवत, २) विषयाशी एकरूप होणे, ३) नाटकाकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने न पाहता स्वच्छ दृष्टीने पाहणे, ४) संगीत योजना आणि वाद्ये यांच्या उपयोगाची चांगली माहिती असलेला, ५) सुसंस्कृत आणि सभ्य लोकांचे वर्तनप्रकार माहीत असलेला. रसांचा स्थायीभाव संबंध- १) विभाव- ज्याच्यामुळे स्थायीभाव उद्धृत होतो, २) अनुभाव- म्हणजे उद्धोथनानंतर प्रकट होणारे शारीरिक विकार, ३) व्यभिचारीभाव म्हणजे मानसिक विकार. भरताने नाटय़शास्त्राचा इतका सूक्ष्म व सविस्तर विचार केला आहे की त्यामुळे डॉ. खोले ‘भरताचे नाटय़शास्त्र हा जगातला अद्वितीय ग्रंथ आहे. नाटकाच्या उत्पत्तीपासून तपशीलवार चिकित्सा जगातल्या कुठल्या एका ग्रंथात झालेली आढळत नाही,’ असा अभिप्राय देतात. भारतीय नाटकात शोकांतिकेचा अभाव असून, त्याची पाळेमुळे आपल्या जीवनविषयक आणि कलाविषयक तत्त्वज्ञानात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natak ani rangbhumi paribhasha sangrah book review marathi theater marathi play zws
First published on: 17-10-2021 at 01:05 IST