हुश्श!

माणसांच्या आजवरच्या इतिहासात ही स्पेस नाकारणारी घटना कधी घडलेलीच नाहीये

मुक्ता चैतन्य  muktaachaitanya@gmal.com

‘‘हुश्श! सुटलो एकदाचे!’’

‘‘हुश्श!! सुरू झाली बाई एकदाची शाळा..’’

सकाळी सकाळी व्हॉट्सअ‍ॅप मेसेज खणाणला.

‘‘हो गं! मुलं जाम पकली होती घरात बसून बसून..’’ – मी.

‘‘मुलं नाही, मी जास्त पकले होते. वर्क फ्रॉम होम करा, पोरांना सांभाळा, खाण्याच्या फर्माईशी.. या नॉन एंडिंग ट्रॅपमधून फायनली माझी सुटका झाली..’’

व्हॉट्सअ‍ॅपवर किती टाईपणार ना? म्हणून मग मैत्रिणीला फोनच लावला. त्याबरोबर दूध उतू जावं तसं मैत्रीण भसाभस बोलायला लागली. लॉकडाऊन, शाळाबंदी वगैरे प्रकारांनी ती इतर सगळ्याच पालकांसारखी कावलेली होती. कधी एकदा मुलं शाळेत जाताहेत असं काहीसं तिला झालं होतं.

‘‘मी ‘मीन’ (‘दुष्ट’ या अर्थाने. हल्लीच नाही तर पूर्वीपासून आईने तिचा स्वत:चा विचार केला की सारी कायनात तिला गिल्ट देण्यामागे हात धुऊन लागते. त्यामुळे आपण हा असा स्वार्थी विचार केलाय यानेच इतर कुणी गिल्ट देण्याआधी जगातल्या बहुतांशी मातांना जबरदस्त गिल्ट येतो आणि आपण अत्यंत ‘मीन’ आई आहोत की काय असा दरदरून घाम फोडणारा, धरणीकंप होणारा प्रश्न मातांच्या मनात तयार होतो.) आई नाहीये ग! पण शॉट बसतोच ग डोक्याला.. सारखं काय घरात घरात..’’ मुलं शाळेत जाताहेत या विचाराने आपल्याला हायसं वाटलंय याचाच गिल्ट वाटून ती सारवासारव करत म्हणाली.

‘‘नाही ग! मीन गर्ल नाहीयेस तू.. (त्यातल्या त्यात एक अत्यंत पाचकळ जोक मारून तिचा ताण हलका करण्याचा प्रयत्न मी केला.) असं वाटणं खूपच स्वाभाविक आहे ना. मुलांना आणि आपल्यालाही कुठे सवय आहे १२ महिने २४ तास एकत्र असण्याची?’’

‘‘हो ना! तुलाही असंच वाटतंय ना..?!’’ तिच्या आवाजातलं ‘हुश्श! हायसे!’ स्वर मुळीच लपून राहिले नाहीत. आपण एकटे नाही, ही भावना जगातल्या सगळ्या मातांसाठी फार गरजेची असते. कारण आपण एकटेच वेगळा काहीतरी विचार करत असतो असं वाटलं तर अथांग सागरात आपण एकटेच एका ओंडक्यावर लटकून नाकातोंडात पाणी जाऊ नये यासाठी प्रयत्न करतो आणि सारं जग फूटभर अंतरावर उभं राहून कसलीही मदत न करता फक्त मजा घेतंय असं काहीतरी वाटण्याची दाट शक्यता असते.

खरं तर तिची तगमग अगदीच समजण्यासारखी होती.. आहेच. उगाच खोटं कशाला बोला? आणि आदर्श पालकत्वाच्या भुसभुशीत ट्रॅपमध्ये कशाला अडका? करोना महामारी आणि त्यानंतर अंगावर येऊन आदळलेले लॉकडाउन्स, शाळाबंदी आणि सगळ्याच गोष्टी ऑनलाइन करण्याची अपरिहार्यता यामुळे आम्ही पालक जाम वैतागलेलो आहोत. कसंय ना, सुरुवातीला सगळ्या कुटुंबाला आता वेळ मिळणार, एरवी इतर करण्याच्या गोष्टींचे जे फक्त मनसुबे रचले जातात ते आता प्रत्यक्षात उतरवता येणार वगैरे जे वाटत होतं तो उत्साह अल्पशा काळात संपला. आणि मन मग ‘स्पेस द्या’ची मागणी करायला लागलं. नुसती मागणी नाही, तर आतून ओरडायलाच लागलं म्हणा ना! पण स्पेस तर काही कुणालाच मिळाली नाही.

अजून एक मैत्रीण पण जाम वैतागलेली होती या करोनाकाळात. तिच्या वैतागण्याचा पोत जरा वेगळा होता. आदर्श एकत्र कुटुंब. म्हणजे सासू-सासरे, ती दोघे आणि दोन मुलं असं सहा जणांचं कुटुंब. मैत्रीण आणि तिचा नवरा दोघंही नोकरी करणारे. त्यामुळे अर्थातच वर्क फ्रॉम होम. पण आता घरातच आहोत म्हटल्यावर एरवी नुसते उपचारापुरते होणारे सणवार साग्रसंगीत करण्याचं टुमणं घरात उपटलं. गणपती म्हणू नका, नवरात्र म्हणू नका, इतर कुळधर्म, कुळाचार म्हणू नका.. अचानक सासू-सासऱ्यांना आणि नवऱ्यालाही परंपरा जागवल्या आणि जपल्या पाहिजेत असलं काय काय वाटायला लागलं. आणि वर्क फ्रॉम होमची धावपळ सांभाळून हे सगळं घरातल्या कर्त्यां सुनेनं करावं अशी आपसूक मागच्या दारातून येणारी अपेक्षाही सोबत आलीच. मैत्रिणीची त्या काळात घरात प्रचंड भांडणं झाली. जे कालपर्यंत केलं नाही, ते आज निव्वळ घरातून काम आहे म्हणून करायचं आणि दमायचं, हे तिला अजिबात मान्य नव्हतं. तर घरातल्या इतर प्रौढांना अचानक परंपरा जपण्यापासून मुलांना संस्कृती कशी काय कळणार’पर्यंत अनंत गोष्टी महत्त्वाच्या वाटायला लागल्या होत्या. आपली या सगळ्यातून कधी सुटका होणार, याकडे ती मैत्रीण डोळे लावून बसली होती.

अशा एक ना अनेक घटना.. करोना महामारीने माणसांना इच्छा असो-नसो, एकमेकांच्या उरावर बसायला भाग पाडलं होतं. त्यातून ज्या घरात लहान मुलं होती तिथे तर वेगळाच सीन होता. लहान मुलांना रमवायचं कसं, हा प्रश्न पडलेल्या तमाम पालकांना व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीपासून इतर सगळ्या माध्यमांमधून सतत सृजनशील होण्याचे डोस पाजले जात होते. ‘कल्पक बना, कल्पक बना’चा पाढा वाचताना पालक म्हणून अगणित प्रश्नांना सामोरं जायची वेळ सगळ्यांवरच आली होती, हे विसरून कसं चालेल? बरं, बाकी मोठय़ांचे प्रश्न सोडून द्या, पण सतत ‘कल्पक’ असण्याचा ताण पालकांवर येऊ शकतो. आणि सगळ्याच पालकांकडे सतत कल्पक असण्याची मानसिक, शारीरिक, सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक क्षमता नसते ना! आता तुम्ही म्हणाल, कल्पकतेचा आणि आर्थिक स्थितीचा काय संबंध? तर आहे ना! कल्पक व्हा आणि मुलांची क्रिएटिव्हिटी वाढवून त्यांना रमवा. या कॅटेगरीत जे जे काही मोडणारं व्हायरल झालं होतं त्यातलं सगळं नाही, पण बहुतांशी अत्यंत खर्चीक प्रकरण होतं. क्राफ्टच्या व्हिडीओजमध्ये जे मटेरियल वापरलं जात होतं ते आणायचं तर हजारएक रुपयांचा खड्डा खिशाला पडणार, हे उघड. हे फक्त एक उदाहरण. आधीच नोकऱ्या गेलेल्या, पैशांची तंगी सोसणारे पालक महागडं मटेरियल खरेदी करून मुलांना गुंतवून कसं ठेवणार, हा मुद्दा होताच. पण व्हायरलची दुनिया बिनडोक असते. तिथे असले कसलेही प्रश्न निर्थक असतात. असे अगणित निर्थक, पण पालकांना क्रिएटिव्ह होण्यासाठीचा क्रॅश कोर्स देणारे असंख्य व्हिडीओ या काळात पाहिले. याने होतं काय, तर पालकांच्या मनावरचा ताण कमी होण्याऐवजी वाढतो. आपण पुरेसे क्रिएटिव्ह नाही का, आपली आर्थिक क्षमता नाहीये, इथपासून असंख्य विचारांची जाळी मनात तयार होता आणि त्या गुंत्यात अडकून पडायला होतं.

आणि सरतेशेवटी, आपल्या समाजात आपण शाळेकडे पाळणाघर या नजरेतून बघतो, हे अमान्य करून कसं चालेल? शाळा ही पालकांसाठीही मोठी सोय आहे. या सोयीमुळेच तर मुलं आणि पालक सगळ्यांनाच आवश्यक ती स्पेस मिळते. माणसांच्या आजवरच्या इतिहासात ही स्पेस नाकारणारी घटना कधी घडलेलीच नाहीये. अशी परिहार्यता कधी निर्माणच झालेली नाहीये. त्यामुळे अशा स्पेस नाकारणाऱ्या काळाशी सामना कसा करायचा असतो, हे आपल्यापैकी कुणालाही नीटसं माहीत नाही.

म्हणूनही शाळा सुरू होताहेत, थोडं थोडं रूटिन सुरू होतंय.. हे हुश्श करणारंच आहे. हुश्श! नक्कीच हुश्श!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navratri festival celebration life in routing after school reopening zws

ताज्या बातम्या