गेल्या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात नक्षलवाद्यांच्या चळवळीचा कणा समजल्या जाणार्‍या मलोज्जुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती याने आपल्या ६० सहकार्‍यांसह आत्मसमर्पण केले. चळवळीला अपयश येण्यात नेतृत्त्वाचा सशस्त्र लढाईचा अट्टहास कसा कारणीभूत होता, खालच्या कॅडरमध्ये निष्ठा आणि समर्पणभाव का निर्माण करता आला नाही यांसह अनेक प्रश्नांना उत्तरे देताना भूपती कधी हातचे राखतो, पण बर्‍याचदा कबुली देतो…

परायनार… अबूजमाडच्या पायथ्याशी वसलेले एक लहानसे गाव. भामरागडपासून साधारण वीसेक किलोमीटरवर. जायला रस्ता नाही. धानपिकासाठी शेतात केलेल्या गाठ्यांमधून मार्ग काढत या गावात पोहोचलो तेव्हा दुपार झालेेली. सोबत बहादूरशाह होताच. एका घरात गेलो. तिथे विशीतली एक आदिवासी तरुणी आणि पंचविशीतला एक तरुण आमचीच वाट बघत बसलेले. या दोघांनाही आत्मसमर्पण करायचे होते- लग्नासाठी. त्यासाठी ते शस्त्रे टाकून जंगलातून परतलेले. बहादूरशाह मध्यस्थ. त्यांच्याशी बोलताना कळले की भूपती नुकताच त्यांना भेटून गेलेला. समजूत काढण्यासाठी. एक तास आधी आलो असतो तर नक्कीच भेट झाली असती हे लक्षात आल्यावर मन हळहळले. कारण तेव्हा एखाद्या पत्रकाराला नक्षली नेत्याची भेट मिळणे, बातचीत होणे हे पत्रकारांच्या व्यावसायिक धाडसाचे लक्षण समजले जायचे.

‘‘तुम्ही समर्पणाचा निर्णय घेतल्यावरही भूपती रागावला नाही, मारहाण केली नाही?’’ हा त्या तरुणांना आमचा प्रश्न. ‘‘नाही, भूपती इतरांसारखा नाही. तो समजून घेतो.’’ हे त्या दोघांचे उत्तर. नंतर यथावकाश बोलणे झाले. पोलिसांच्या सापळ्यात न अडकता कधी आणि कसे भामरागडला यायचे हे बहादूरशाहने त्यांना नीट समजावून सांगितले, मग तिथून निघालो.

दुसरा प्रसंग २००६चा. एकदा रात्री १२च्या सुमारास सिरोंचावरून आलापल्लीकडे येत असताना दामरंचाजवळ नक्षलींचे झाडे तोडून रस्त्यावर टाकणे सुरू होते. वाहन थांबल्यावर घेरा पडला. कोण, कुठे, इतक्या रात्री प्रवास का अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. सर्वकाही सांगितल्यावर मोबाइल हिसकावून घेतले आणि आत जंगलात बसलेल्या वरिष्ठांकडे ते नेण्यात आले. एक तास झाला. काहीच निर्णय नाही. मग वाहनाभोवती गराडा करून असलेल्या एकाला विचारले. आत जंगलात बसलेला वरिष्ठ कोण? उत्तर मिळाले भूपती. भेटण्याची इच्छा आहे, विचारता का, असे म्हटल्यावर लगेच एक आत गेला. पंधरा मिनिटांनी मोबाइलसह परत आला. तो नाही म्हणतो. ही भेटण्याची वेळ नाही. नंतर निरोप देऊन बोलावू. यानंतर नक्षलींनी रस्ता अडवलेले झाड बाजूला केले आणि म्हणाले, ‘‘भूपतीने परवानगी दिली म्हणून समोर सोडतो आहोत अन्यथा माघारी पाठवले

असते किंवा सकाळपर्यंत इथेच बसवून ठेवले असते.’’  हे दोन्ही प्रसंग आठवले ते गडचिरोलीच्या पोलीस विश्रामगृहात भूपतीला प्रत्यक्ष भेटताना.

(आम्ही एका पक्षाच्या बॅनरखाली सरकारशी लढत होतो. आमची जादूई हत्यारे तीन. एक पक्ष, दुसरे समर्थित संघटना आणि तिसरे सैन्य. यापैकी सैन्यावरच लक्ष केंद्रित केल्याने पक्ष तसेच समर्थन करणारे मागे पडले. )

या भेटीची सुरुवातही त्याच्या चिडचिडीने झालेली. एकची वेळ दिली असताना तुम्ही तीनला कसे येता म्हणून तो कातावतो. मात्र तारक्काच्या (भूपतीची पत्नी, २०२४ मध्ये शरण) आधी घेतलेल्या मुलाखतीचा विषय काढताच त्याची कळी खुलते. ‘नक्षलवादाचे आव्हान’ हे पुस्तक दुसर्‍यांदा वाचले. ‘‘गेली तीस वर्षे तुम्हाला ‘फॉलो’ करत होतो,’’  असे त्याने म्हणताच वातावरणातला तणाव निवळतो. मग सुरू होतात प्रश्नांच्या फैरी.

एक शिस्तबद्ध कॅडरबेस चळवळ ही नक्षलवाद्यांची आजवरची ओळख. सरकार आणि सुरक्षा दलांचा दबाव वाढताच या शिस्तीला तडे गेले. मुख्य म्हणजे ज्यांच्याकडे या चळवळीचे नेतृत्व होते तेच शरणागती पत्करू लागले, दुसरीकडे खालचे कॅडर अजूनही लढतेच आहे, हे कसे? यावर ‘‘या अस्ताला नेतृत्वाचे अपयशच कारणीभूत आहे, त्यात मीही आलो,’’ असे थेट उत्तर देऊन भूपती क्षणात मोकळा होतो. शरणागतीच्या आधी नेतृत्व आणि कॅडरला उद्देशून लिहिलेल्या २२ पानांच्या पत्रात हे सारे नमूद केले आहे असे तो म्हणतो तेव्हा त्या पत्रातला मजकूर आठवतो. डाव्यांना दीर्घ पत्रे लिहिण्याची सवय. अगदी मार्क्स, लेनिन आणि माओच्या कारकीर्दीचा इतिहास मांडण्यापासून तर आताच्या स्थितीवर सखोल भाष्य करण्यात त्यांचा हातखंडा.

‘स्व-टीके’ची सवय असल्यामुळे हे होत असेल कदाचित. या पत्रात भूपतीने शरणागतीचा प्रस्ताव मांडतानाच भविष्यात गुप्त पद्धतीने काम करून भाकप (माओवादी) या पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देऊ, असे गाजर सर्वांना दाखवलेले. चळवळ का माघारली याची कारणेही विस्ताराने नमूद केलेली. तरीही आता काय ते थोडक्यात सांगा असा आग्रह धरल्यावर भूपती छताकडे डोळे लावून तपशीलवार सांगू लागतो. चळवळ वा पक्षाची व्याप्ती वाढवायची असेल आणि राजकीय उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर सैनिकीकरणावर भर नको, आपण जनतेत जायला हवे. किमान प्रभावक्षेत्रातील लोकांना तरी संघटित करायला हवे. त्यांच्या प्रश्नावर त्यांनाच समोर करून सरकारवर दबाव आणायला हवा असा विचार मी २००३ पासून सातत्याने मांडत आलो, पण आमच्या नेतृत्वाला बंदूक आणि युद्धाचीच भुरळ पडलेली. माझा आग्रह सातत्याने धुडकावून लावण्यात आला. मग तेव्हाच चळवळ का सोडली नाही यावर भूपती एकच शब्द उच्चारतो.  ‘सेंट्रलिटी ऑफ डेमोक्रॅसी’. कुणाला पटो ना पटो, आपले म्हणणे मांडत राहायचे.

(चळवळीतील वरिष्ठ नेते माओच्या विचाराने प्रेरित होते, पण खालचे कॅडर मात्र प्रेरित होऊ शकले नाही. गेल्या २५ वर्षांत अनेकांनी आत्मसमर्पण केले, पण त्यातल्या एकानेेही विचार पटले नाही असे कारण दिले नाही.)

नंतर केंद्रीय समिती जो निर्णय घेईल तो मान्य करायचा. कधी तरी माझे म्हणणे पटेल असा विश्वास होता. या बंदुकीच्या हव्यासामुळे शेकडो लोक मारले गेले. अनेक आदिवासींना नाहक प्राण गमवावे लागले. याची जबाबदारी चळवळ घेणार की नाही, यावर तो क्षणकाळ निरुत्तर होतो. लगेच काय उत्तर द्यावे हे त्याला सुचत नाही. थोडा विचार केल्यावर ‘‘या ‘मास किलिंग’च्या विरोधात मी होतो. कुणी ऐकत नसेल तर त्याला समजावून सांगा. तरीही ऐकत नसेल तर त्याच्यापासून सावध व्हा पण मारू नका. चंद्रपूरच्या खाण व्यवस्थापकाची, सूरजागडला धिल्लन या अधिकार्‍याची झालेली हत्या मला पटली नाही. त्याला चर्चेला बोलावून ठार मारण्यात आले. हे चुकीचे होते.’’

केवळ मारलेच नाही तर त्याने देण्यासाठी आणलेली लाचेची रक्कमही तुम्ही पळवली असे सांगताच भूपती पुन्हा निरुत्तर होतो. पैशाचे मला काही ठाऊक नाही, असे सांगून अधिक भाष्य करण्याचे टाळतो. मग बहादूरशाहला का मारले यावरही त्याचे उत्तर तेच. ‘‘शेखरने ही हत्या घडवून आणली. नंतर शरणागती पत्करून तेलंगणातील राजकारणात सक्रिय झाला. बहादूरशाहला मारू नका असे मी अनेकदा बजावले पण कुणी ऐकले नाही. जिरम घाटीत महेंद्र कर्मा आणि काँग्रेसच्या २६ नेत्यांची हत्या करण्यालाही मी विरोध दर्शवला होता पण नेतृत्वाने ऐकले नाही.’’ ज्याला तुम्ही नेतृत्व म्हणता त्याचा तुम्हीही एक भाग होताच की, मग हा जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रकार नाही का, यावर भूपती काही बोलत नाही. ‘‘मी विरोध केल्याचे चळवळीच्या रेकार्डमध्ये नमूद आहे. माझ्या लॅपटॉपमध्येही पत्रांच्या नोंदी आहेत,’’ असे सांगून तो स्वत:ला नामानिराळा ठेवण्याचा प्रयत्न करतो. ही चतुराई आत्मसमर्पणानंतर आलेली की हा बोलतो ते खरेच, या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही.

(एकेका राज्यातून आमचा प्रभाव कमी व्हायला लागला. शेवटी आम्ही बस्तरपुरते मर्यादित उरलो आणि थोडेफार अस्तित्व हेते ते गडचिरोलीत. लोक दूर जात आहेत याची जाणीव सर्वांनाच होती. अनेक पत्रकांमधून आम्ही तशी कबुली देत आलो पण सुधारणा कशी करायची, पुनर्रचना कशी करायची यावर मात्र नेतृत्वामध्ये एकमत होत नव्हते.)

चळवळीतील वरिष्ठ नेते माओच्या विचाराने प्रेरित होते पण खालचे कॅडर मात्र प्रेरित होऊ शकले नाही. गेल्या २५ वर्षांत अनेकांनी आत्मसमर्पण केले पण त्यातल्या एकानेही विचार पटले नाहीत असे कारण दिले नाही. हे अपयश नेमके कुणाचे, यावर भूपती विस्ताराने बोलतो. ‘‘चळवळीत सामील झालेल्या प्रत्येकामध्ये आम्ही निष्ठा आणि समर्पणभाव निर्माण करू शकलो नाही हे खरे. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा प्रत्येक कॅडरने जनतेच्या प्रश्नांशी स्वत:ला जोडून घेतलेले असते. मात्र नवीन कुणी आला की दे त्याच्या हाती बंदूक व कर शत्रूशी दोन हात याच धोरणाला महत्त्व आल्याने विचार रुजवण्याचा कार्यक्रम मागे पडला. केंद्रीय समितीचे याकडे वेळोवेळी दुर्लक्ष झाले.

२००५ नंतर माझ्याकडे कॅडरला वैचारिक निष्ठा शिकवण्याची जबाबदारी सोपवली गेली. मी कॅडरसोबतच आदिवासी मुलांसाठी ‘बेसिक कम्युनिझम ट्रेनिंग स्कूल’ सुरू केले. अनेक वर्ग घेतले. जवळजवळ चारशेच्या आसपास. यातून आदिवासी मुले चळवळीत दाखल झाली, पण त्यांना थेट लढण्यासाठीच पाठवले जायचे. यामुळे या प्रशिक्षण वर्गाचा फार फायदा झाला नाही. २००४ मध्ये विलीनीकरण झाल्यावर ‘पीएलजीए’ ही ‘गुरिल्ला आर्मी’ तयार करण्यात आली. त्यांना ‘सेंट्रल टास्क’च्या नावावर शत्रूंना मारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. लढणारे नक्षली अधिक निपुण व्हावेत म्हणून टीसीओसीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यात युद्धाचे प्रशिक्षण दिले जायचे. ते जानेवारी ते एप्रिल असे चार महिने चालायचे. या काळात नक्षलींच्या गावभेटी पूर्णपणे बंद व्हायच्या. यामुळे सामान्य जनता आणि चळवळ यातला दुरावा आणखी वाढला. सैनिकीकरणावर इतका भर देणे योग्य नाही असे मी वारंवार सांगून बघितले पण कुणीही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.’’

(चळवळ वा पक्षाची व्याप्ती वाढवायची असेल तर सैनिकीकरणावर भर नको, आपण जनतेत जायला हवे. त्यांच्या प्रश्नावर त्यांनाच समोर करून सरकारवर दबाव आणायला हवा असा विचार मी २००३ पासून सातत्याने मांडत आलो, पण आमच्या नेतृत्वाला बंदूक आणि युद्धाचीच भुरळ पडलेली. )

असा विरोध करणारे तुम्ही एकटेच की आणखी कुणी, यावर भूपती हसतो. ‘‘मी एकटाच नाही तर नर्मदा, श्रीकांत, श्रीनू, गिरीधर, मिलिंद तेलतुंबडे हे सारे माझ्या मतांशी सहमत होते. चळवळीत आम्हाला ‘सोनी ऊर्फ भूपती ॲण्ड कंपनी’ असे म्हणून चिडवायचे. मिलिंद केंद्रीय समितीत आल्यावर धोरण बदलेेल असे मला वाटले पण तसे काहीही घडले नाही.’’ आणखी कोणत्या मुद्द्यांवर विसंवाद होता, यावर भूपती सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर भाष्य करतो. पेसा व वनहक्क कायदा केव्हा लागू झाला? त्याची अंमलबजावणी कधी सुरू झाली? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हा आला याच्या तारखा त्याला पाठ असतात. ‘‘या दोन्ही योजना आदिवासींच्या हिताच्या आहेत त्यामुळे त्याला विरोध करू नये, असे मत मी २००७ ला झालेल्या पक्षाच्या महासभेत मांडले. यावरून आमच्यात तीव्र मतभेद झाले.

अनेक जण याच्या विरोधात होते. अखेर मी माझ्याकडे जबाबदारी असलेल्या गडचिरोलीत तरी आदिवासींना योजनांचा लाभ घेऊ द्यायचा असे स्वत:च ठरवले. नर्मदाने त्यासाठी अनेक सभा घेतल्या. गट्टाची सभा सर्वात मोठी. चार हजार लोक त्याला हजर होते.’’ – पण तुम्ही लेखामेंढा गावाला यावरून धमकी दिली. पैसे मागितले. यावर भूपती तत्परतेने नाही म्हणतो. ‘‘हा सारा अपप्रचार’’ असे म्हणत तो आजूबाजूला असलेल्या पोलिसांकडे बघतो. ‘‘बस्तरमध्ये या योजनेला चळवळीने तीव्र विरोध केला. संपूर्ण अबूजमाड मिळून सामूहिक मालकीचा एकच दावा मंजूर करा अशी मागणी केली. ते शक्य नव्हते. अखेर माझ्या आग्रहावरून आम्हीच काही गावांना पट्टे दिले. अर्थात त्याला शासनदरबारी अर्थ नव्हता. चळवळीच्या विरोधामुळे दुर्गम भागात मालकीचे दावेच तयार झाले नाहीत.

प्रशासन आत येत नव्हते. हे दावे तेव्हा तयार झाले असते व आदिवासींना जंगलाची मालकी मिळाली असती तर आज तेथे येऊ घातलेल्या खाणींसमोर कायदेशीर पेच उभा ठाकला असता. हेच मी सर्वांना पटवून देत होतो पण कुणी ऐकले नाही.’’ एकूणच कडव्या डाव्यांचा पोथीनिष्ठपणा आडवा आला तर, असे सुचवताच ‘डॉग्मॅटिक’ असा शब्द भूपतीच वापरतो. ‘शिधापत्रिका, सरकारतर्फे बांधून दिली जाणारी पक्की घरे, मोबाइलचे टॉवर, विजेचे खांब याला विरोध करू नका. आता या सार्‍या सुविधा जगण्याशी निगडित झालेल्या असे मी प्रत्येक बैठकीत सांगायचो, पण १९८०मध्ये स्वीकारलेली तत्त्वे सोडायला नेतृत्व तयारच नव्हते.’’

भूपती हे सांगत असतानाच कोंडापल्ली सीतारामय्याचा विषय निघतो. ज्याने पीपल्स वॉर ग्रुप तयार केला त्याच्यावरच तुम्ही कसा अन्याय केला, वाळीत टाकले असे विचारताच त्याची नजर पुन्हा वर जाते. ‘मुळात ही चळवळच कोंडापल्लीचे अपत्य. प्रभावक्षेत्र निर्माण करण्याची कल्पना त्यांचीच. आम्ही सारे यात ओढले गेलो ते त्यांच्यामुळे. मात्र सुरुवातीलाच नेतृत्वाशी त्यांचे मतभेद झाले व परिणती त्यांच्या निलंबनात झाली. हे घडायला नको होते असे आज वाटते पण आता उपयोग काय? असा प्रश्न तो हताशपणे विचारतो. ‘‘आम्ही एका पक्षाच्या बॅनरखाली सरकारशी लढत होतो. आमची जादूई हत्यारे तीन. एक पक्ष, दुसरे समर्थित संघटना आणि तिसरे सैन्य. यापैकी सैन्यावरच लक्ष केंद्रित केल्याने पक्ष तसेच समर्थन करणारे मागे पडले. बंदुकीला कमालीचे महत्त्व आल्याने बाहेर राहून काम करणार्‍यांनाही आमचे समर्थन करणे जड जाऊ लागले.’’

नक्षल चळवळीच्या वतीने बोलणारे आजही बाहेर आहेतच, पण आजघडीला- चळवळ अस्ताला जात असताना – यातले कुणीही समर्थनार्थ बोलताना दिसत नाही. अरुंधती रॉय दीर्घकाळ तुमची जंगलातली पाहुणी राहिली. तीही शांत आहे, यावर भूपती पुन्हा हसतो. ‘‘प्रत्येक जण आपापल्या फायद्यासाठी जवळ येत असतात. आता हे लोक का बोलत नाहीत ते त्यांनाच जाऊन विचारा. चळवळ सोडली म्हणून मला गद्दार ठरवले जात आहे. माझी शस्त्रे काढून घेण्याची जबाबदारी प्रभाकरकडे दिली होती, पण तोच आता मारला गेला. देवजीने माझ्यावर खूप टीका केली व आता स्वत:च शरण आला. वाईट काळ आला की असे घडतेच.’’

हिडमाचे काय झाले? तो तर हिरो झाला, त्याला शरणागतीसाठी का समजावले नाही? यावर त्याचा चेहरा कसानुसा होतो. ‘‘तो धडाडीने काम करणारा होता पण खालचा कॅडर होता. त्याच्या मृत्यूच्या काळात आदिवासींमध्ये ‘पंडूम’ सुरू होता. या सणाच्या काळात वर्षभरात गमावलेल्या आप्तेष्टांची आठवण केली जाते. नेमके तेव्हाच त्याचे पार्थिव गावात पोहोचले. त्यामुळे माध्यमांवर गर्दी दिसली.’’ त्याचे हे उत्तर ऐकून या चळवळीत तेलुगु नेतृत्व विरुद्ध आदिवासी अशी दरी निर्माण झाल्याची जी चर्चा आजवर होती तिला पुष्टीच मिळते. गेल्या पन्नास वर्षांपासून तुम्ही आदिवासींच्या हितासाठी लढत होता, मग या काळात एकही आदिवासी नेता तुम्हाला का तयार करता आला नाही, या प्रश्नावर भूपती कमालीचा गोंधळतो. ‘‘आम्ही वर्गआधारित संघर्ष केला. जात, धर्माला प्राधान्य दिले नाही.’’ असे संक्षेपात बोलून तो स्वत:ची सुटका करून घेतो. तुम्ही स्वत:ला चळवळीचे शिक्षक म्हणवता. त्यादृष्टीने हे अपयश मोठे नाही का, यावर तो सपशेल पराभवाची कबुली देतो.

‘‘मी चळवळीत दीर्घकाळ होतो पण २००५चा अपवाद वगळता चकमकीत अडकल्याचा प्रसंग कधी आला नाही. माझ्यातली बौद्धिक क्षमता हेरून मला शिकवण्याचे काम दिले गेले ते २००७ पासून. कदाचित त्यामुळेच मी बंदुकीच्या प्रभावातून दूर फेकला गेलो असेन,’’ असे गुळमुळीत उत्तर तो देतो. तुमच्यासाठी काँग्रेसची राजवट चांगली होती की भाजपची? तुमच्या र्‍हासाला सुरुवात कधी झाली, यावर बोलताना तो सुरुवातीला अडखळतो. ‘‘आम्ही २०१३ पासूनच जनाधार गमवायला सुरुवात केली. कारण मी सांगितले आहेच. एकेका राज्यातून आमचा प्रभाव कमी व्हायला लागला. शेवटी आम्ही बस्तरपुरते मर्यादित उरलो आणि थोडेफार अस्तित्व हेते ते गडचिरोलीत.

लोक दूर जात आहेत याची जाणीव सर्वांनाच होती. अनेक पत्रकांमधून आम्ही तशी कबुली देत आलो पण सुधारणा कशी करायची, पुनर्रचना कशी करायची यावर मात्र नेतृत्वामध्ये एकमत होत नव्हते. बर्‍याच चर्चा झाल्या. बाहेरून समर्थन देणार्‍यांनी अनेकदा पत्रे पाठवून आम्हाला सुधारणा सुचवल्या. माझा कंपू त्या तात्काळ अमलात आणाव्यात या मताचा होता. जनाधार वाढवायचा असेल तर पुन्हा एकदा प्रभावक्षेत्र आणि बंदूक सोडून भूमिगत व्हायचे. जनतेमध्ये जनजागृती करायची तसेच पाया पक्का झाल्यावर नव्याने लढाईला सुरुवात करायची, असा आमचा प्रस्ताव होता पण तो नाकारला गेला. त्यासाठी व्यावहारिक कारणे दिली जायची. जनतेत मिसळल्यावर अटक झाली तर काय वगैरे वगैरे.’’ यात कुठेही काँग्रेस मवाळ आणि भाजप आक्रमक असे वाक्य भूपती वापरत नाही.

आम्हीच आमच्या र्‍हासाला कारणीभूत ठरलो, असे सांगत हा पक्षीय प्रश्न टाळतो. आता पुढे काय? गणपती नेमका आहे कुठे? यावर तो मोबाइलमध्ये आलेली बातमी वाचून दाखवतो. गणपतीला तेलंगण पोलिसांनी ताब्यात घेतले अशा आशयाची. ‘‘आता पुढचे आयुष्य गडचिरोलीतच काढायचे. काय काम करायचे ते अजून ठरवले नाही. तारक्काची प्रकृती बिघडली आहे. तिची काळजी घेणे एवढेच काम सध्या करतो,’’ असे सांगत तो उठतो. मूळ राज्य असलेल्या तेलंगणात गद्दार म्हणून त्याला हिणवले जात आहे याची जाणीव त्याच्या बोलण्यातून होते, पण चाणाक्षपणे तो त्यावर उत्तर देण्याचे टाळतो.

devendra.gawande@expressindia.com