मेघना पेठे
एक संपूर्ण दशक आपल्या कथांनी गाजविणाऱ्या लेखिका मेघना पेठे यांचे नवे पुस्तक ‘डंदॅट, बींदेअर’ येत्या आठवड्यात दाखल होतेय. ‘नातिचरामि’ या कादंबरीनंतर दोन दशके त्यांनी काही भाग वगळता आपले लेखन बव्हंशी आपल्यापुरते राखले.‘दोन दशकांत लिहिलेल्या डायरीतले लेखनासंदर्भातले निवडक तुकडे’, ‘लेखनोत्तर आलेले सुखदु:खाचे अनुभव, आठवणी तसेच परखड मते सांगणारा एक मुक्त संवाद’ आणि ‘व्यक्तिगत जगणं, समकाळ आणि अर्थात लेखक काय असतो, यावर प्रकाश टाकणाऱ्या निवडक मुलाखती’ अशा तीन भागांत प्रकटलेल्या या पुस्तकातील काही अंश… वाचकाला सजग करणाऱ्या जाणिवांवरचा निव्वळ एक कवडसा…
१. जादूचा आरसा…
जगता जगता किती सवयी जडतात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यातल्या किती सवयी मोडतात. कधी सहज सुखानं, कधी खूप दुखवत… पण सवयी जडण्या-मोडण्याचा हा सिलसिला जारी राहतो. अर्थात सगळ्या काळांतल्या सगळ्याच माणसांप्रमाणे माझाही हा अनुभव आहेच. पण माझ्याबाबतीत एक सवय मात्र अशी, जी खूप लहान वयात जडली आणि आजतागायत मोडली नाही. ती म्हणजे डायरी लिहिण्याची सवय.
त्या त्या वयातल्या अकलेनुसार, असं कित्येक काही असायचं, की जे मनात राखता यायचं नाही, पण जनांच्यात म्हणताही यायचं नाही. संकोच, भीती, लाज, आत्मविश्वासाचा किंवा समोरच्याबद्दलच्या विश्वासाचा अभाव, अशा कित्येक बाबी मध्ये येत राहायच्या.
डायरी लिहिणं हा त्यावर सापडलेला एक रामबाण उपाय होता. डायरीत निर्धास्त, निर्भयपणे कुठेही पोचता यायचं… शिव्या, ओव्या, शाप, दुवा… काहीही देता यायचं. कुठलेही प्रश्न विचारता यायचे आणि कुठलंही उत्तर शोधता यायचं… प्रेम, द्वेष, टीका, स्तुती, वाहवा करायची आणि असूया वाटायची परवानगी, मुभा, संधी घेता यायची. शाबासकी, हुरूप सगळं काही हवं लागेल तेव्हा आणि तितकं स्वत:च स्वत:ला देता यायचं. डायरी म्हणजे न पटणाऱ्या जगात जगण्याच्या भगभगत्या शापाला मिळालेला उ:शाप!
न लिहित्या काळातही लिहिण्याबद्दलचे, न लिहिण्याबद्दलचे कित्येक विचार, उद्धृतं, आठवणी, इरादे, पश्चात्ताप, प्रतिसाद आणि प्रतिक्रिया मनात येत राहायच्या. त्या लिहून ठेवलेल्या होत्या. स्वत:च घातलेल्या हाकेला, स्वत:च ओ द्यावी तशा त्या दोन दशकांतल्या नोंदी. कितीही वेळा त्यात वाकून पाहिलं तरी दर वेळी नवंच काही दाखवणारा जादूचा आरसा…
लिहिताना एकटं वाटू लागलं, की जगाकडे पाठ फिरवून ज्यात शिरावं ते अभयारण्य… म्हणजे माझी डायरी…
२. लेखक लिहायचा थांबतो का कधी?
एकदा मला हसत म्हणाली की, कुठला प्रश्न मी तुला कधीच विचारू नये असं वाटतं?
मी लगेच म्हटलं, ‘‘तू लिहीत का नाहीस हल्ली? हा सगळीकडे विचारला जाणारा प्रश्न तू विचारू नकोस.’’ यावर ती गोडसं हसली आणि म्हणाली, ‘‘नव्हतेच विचारणार मी हा प्रश्न. म्हणजे मला उत्तर अगदी नेमकं ठाऊक आहे म्हणून नव्हे. पण मला असं धूसर वाटून गेलेलं आहे की, लेखक लिहीत नाही असं कधीच नसणार.’’
‘‘तुला जे धूसर वाटून गेलंय ना, तेच मला थोडं अधिक स्पष्ट कळलयसं वाटतंय. ते सांगते. एक म्हणजे लेखकाचं कित्येक दिवसांत काही छापून आलेलं नाही, प्रकाशित झालेलं नाही, म्हणजे त्यानं काही लिहिलेलं नाही हा निष्कर्ष तर्कदुष्ट आहे. लेखक त्याच्या खासगी अवकाशात काही काही लिहीत असेलही. पण त्याला ते छापायला द्यायचं नसेल. म्हणजे छापण्यायोग्य वाटत नाही म्हणून नाही. तर मुळात ‘छापण्यासाठी’ त्यानं ते लिहिलेलंच नाही असंही असेल की. कारण लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा त्याला स्वत:शी जाणवलेलं काही नोंदायचं तरी असतं. किंवा स्वत:ला जाणवलेलं काही उमगून घ्यायचं असतं. कधी कधी गळा काढून रडायचं असतं, करवादून शिव्या द्यायच्या असतात, कधी एखाद्याला एकतर्फी प्रेमात दुवा द्यायच्या असतात… कधी कुणाची खिल्ली उडवायची असते, तुच्छ लेखून थुंकायचं असतं… आता पुढे तू गाळलेल्या जागा भरत जा. पण हे सगळं त्याला त्याच्या स्वायत्त, खासगी अवकाशात करून मोकळं व्हायचं असतं. ते इतर कुणासाठीही नसतं. आणि अर्थात म्हणून ते छापलं जात नाही. कधीतरी तो त्यातून मोकळा होतो. आणि जे सलत होतं, ते का ते त्याला उमगू लागतं. किंवा उमगावंसं वाटायला लागतं; तेव्हा तो अनुभवांतून बाहेर येऊन त्यांच्याकडे बघतो आणि मग जे लिहितो ते प्रकाशित होतं किंवा होऊ शकतं. आणि मग वाचणारे म्हणतात, ‘लेखक लिहू लागला बरं…’ दुसरं आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे, निव्वळ अक्षरं किंवा त्यांनी बनलेले शब्द कातळावर, झाडाच्या खोडावर त्यानंतर कागदावर, किंवा आता स्क्रीनवर उमटणं म्हणजेच लिहिणं नाही. लिहिणं हा जगण्याचा अनुषंग आहे. किंवा लिहिणं म्हणजे ओसंडणं आहे. तर त्यामुळे लेखक उत्कटपणे समरसून आणि निरखत पारखत जगतो आहे की नाही हे मुळात महत्त्वाचं. त्या प्रतीचं आणि तऱ्हेचं जगणं थांबलं, वसा टाकून उतलेलं, छचोर आणि थिल्लर झालं की एका अर्थानं लेखक संपला आणि मग त्याचं लिहिणंही थांबलं. तोवर नाही. लिहिणं हा ज्या लेखकाचा धर्म आहे त्या लेखकाबद्दल मी बोलते आहे. छंद किंवा व्यवसाय म्हणून जो लिहितोय, त्या लेखकाबद्दल नाही. हे तू समजून घे.’’
३. एकमेकांचं ऐकण्याचं व्यसन?
ज्या अनेक माणसांनी आपल्या बेसावध असण्याचा फायदा घेतला आणि अक्षरश: आपल्या मना काळजाचे टवके काढले, ते सगळेच ओळीनं सरसर आठवले आणि विमनस्क होऊन मी अचानक गप्पच झाले. समोर पाहिलं तर तीही कुठल्याशा विचारात गढलेली होती. भिंतीला टेकून, पोटाशी धरलेल्या उशीभोवती हात आवळून, पसरलेल्या पायांची पावलं खाली-वर करत होती. तिच्याकडे बघताना मला कळेना की का बरं हिला मी ‘ये घरी’ म्हटलं? का तिच्याशी हे सर्व बोलावं वाटलं? हिचे भ्रम, हुरूप, कुतूहल आणि स्वप्नं अजून कोरी आहेत. काळाच्या ओघात अजून नखलली गेली नाहीयेत. आपलंच काही वर्षांपूर्वीचं रूप दिसलं का आपल्याला हिच्यात? मोह पडला मनाच्या त्या नितळतेचा? आणि आता आज -उद्याच हिची निघायची वेळ येईल. ती तिच्या गावात जाईल. तिच्या माणसांच्यात रमेल. तिच्या तिच्या दिनक्रमात झिरपू लागेल. चार दिवसांपूर्वी ही डोळ्यांत पाणी आणून मला विचारत होती, की ‘तुला माझी आठवण तरी येईल का ताई?’ आणि आता आपल्यालाच भीती वाटू लागली, की आपल्यालाच ‘हिनं आपलं आणि आपण हिचं ऐकण्याचं’ व्यसन तर नाही ना जडलेलं?
सांगणारा जसा श्रोत्याचा, तसाच लिहिणाराही वाचकाचा असाच गुलाम होतो का? कुसुमाग्रजांची ‘मृगनक्षत्र’ शीर्षकाची सुंदर कविता, ही मुलगी त्या दिवशी म्हणून दाखवत होती आपल्याला.
‘विचित्र या मृगयेत शिकारी, एकच शर सोडुनि मृगामागुनि अगतिक हिंडे विद्ध स्वत: होउनि! त्या कवितेतल्या या शेवटच्या ओळी म्हणताना तिच्या चेहऱ्यावर तिचं मिस्किल हसू होतं का? आणि त्या ऐकल्यावर आपल्या डोळ्यांत पाणी? काय की…
४. स्वत:शी बोलणं म्हणजेच का लिहिणं?
हे भुयार आहे की विवर आहे हे कळत नाही आणि दिवा दाखवायला कुणी नाही. हे वाहत्या नदीचं जिवंत पाणी उमजत नाही आणि त्याचा ठाव घ्यावा तर हिंमत नाही, कुव्वत नाही. हलक्या पोकळ फांद्या कमरेला बांधून वर्षानुवर्षं किनारेच्या किनारे तुडवत असताना, आत नदीत ढकलायलाच कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होऊन जाताना, ज्याची सय यावी असं कुणी नाही आणि आपली याद आली म्हणून ज्याचा घास अडेल, असंही कुणीच नाही. हाच तो उमगण्याचा क्षण असतो का, जेव्हा माणूस स्वत:शी बोलू लागतो? आणि अखेर स्वत:शी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे? दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो..
पण आपण स्वत:ला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो! मी लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मांडताना, हे अगदीच शक्य आहे, की ‘या तथ्यांच्या जबड्यातून सुटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी, एकटंच बागडत असेल!’
meghanapethe@gmail.com
