‘‘निषाद, आज घरी एक गंमत तुझी वाट बघतेय… मज्जा आहे बुवा एका मुलाची. आजपासूनच वाढदिवसाच्या भेटी यायला सुरुवात झाली.’’ आईने शाळेतून परत येताना कुरिअरनं आलेल्या गमतीबद्दल सांगितलं आणि निषादचे डोळे एकदम चमकले. ‘‘काय गंमत. कसली गंमत सांग ना?’’ शंभर प्रश्न विचारत आईला त्यानं वाटेतच थांबवलं तेव्हा… ‘‘अरे हो हो… आधी घरी तर जाऊ या. मग तू तुझ्या हातानं पार्सल उघडून बघ. आधीच सांगितलं तर सरप्राइज कसं राहणार, सांग पाहू? फक्त एक क्लू देते हं- ती गंमत उल्कामावशीनं पाठवलीय. ओळख पाहू?’’ चालता चालता निषादला आठवलं, मागे त्यानं मावशीला अमेरिकेत मिळणार्‍या कारच्या मॉडेल्सबद्दल विचारलं होतं.

‘‘येस्स… कार… मावशीनं त्या कार्स पाठवल्यात ना आई?’’ ‘‘अरे, अत्ताच मी तुला सांगितलं ना की मी ते पार्सल मुद्दाम उघडलेलं नाही म्हणून. मला खरंच माहीत नाही.’’ निषाद आईचा हात सोडून आता जवळपास उड्या मारतच घराकडे निघाला. लिफ्टमधून बाहेर पडून आई दार उघडेपर्यंत त्याची दाराशी चुळबुळ चालली होती. दार उघडताक्षणी सोफ्यावर दप्तर फेकून तो पार्सल शोधायला धावला. ‘‘अरे निषाद, किती धांदल. जरा धीर धर, बूट काढ, हातपाय धू.’’ बोलता बोलता आईला लिफ्टचे दार नीट बंद न झाल्याच्या सूचना ऐकू आल्या, कारण निषादने घाईत ते व्यवस्थित बंद केलंच नव्हतं.

इकडे निषादला पार्सल कुठे दिसेना म्हणून आईला शोधत दाराशी आला, पण तेवढ्यात ‘‘धा…ड’’ आवाजानं तो दचकला. वार्‍यानं घराचं दार बंद झालं होतं. ‘‘निषाद…’’ लिफ्टशी गेलेल्या आईचा आवाज त्यानं ऐकला. ‘‘दार उघड बाळा… लॅच नवीन आहे. नीट उघड. जमेल ना तुला?’’ बाहेरून आईच्या सूचना. गेल्याच आठवड्यात बाबानं दाराचं लॉक बदललं होतं. पण निषादवर ते उघडायची कधीच वेळ आली नव्हती. आता त्यानं घाईघाईनं पाय उंचावून ते उघडायचा प्रयत्न केला.

पटकन उघडेना म्हणून त्यानं ते उलटसुलट फिरवून उघडायचा प्रयत्न केला, तरीही जमेना म्हणून आतून छोटं स्टूल आणून त्यावर चढून पुन्हा प्रयत्न केला. पण आता त्याचं गोल फिरणंच बंद झालं. आता मात्र निषादची घाबरगुंडी उडाली. डोळ्यात पाणी जमायला लागलं. दारापासच्या त्या स्टूलावर त्यानं बसकण मारली. काहीच सुचेना. समोरच्या टेबलावर एक पार्सल दिसलं बहुतेक तेच मावशीनं पाठवलेलं असावं. त्याच्याच मुळे तर हे पुढचं रामायण घडत होतं. त्याच्या बाजूलाच फुग्यांची पाकिटं वगैरे त्याच्या उद्याच्या वाढदिवसासाठीचं सामान पडलं होतं.

पण त्याचा आता मूडच गेला होता. भिंतीवरचे सुपरमॅन, स्पायडरमॅन, आयर्नमॅन, छोटा भीम, हनुमान त्याचे सगळे सुपर हिरो त्याच्याकडे बघून हसतायत असा त्याला भास झाला. तो तर त्यांना कायम दोस्त समजत होता. त्यांच्याकडल्या सुपर शक्तीमुळे ते काहीही करू शकतात असा त्याला विश्वास होता. पण निषाद आता अडचणीत आला तरी ते काहीच करत नव्हते. सर्व प्रयत्न त्याला स्वत:लाच करायचे होते. तेवढ्यात बाहेरून आईचा आवाज आल्यावर त्याला धीर आला. भिंतीवर लटकवलेली चावी ती खिडकीतून खाली टाकायला सांगत होती.

दाराजवळचे स्टूल ढकलत त्यानं भिंतीवर उंच अडकवलेली चावी काढली. पण खिडकीतून कशी टाकायची? कारण खिडकी जरा उंच होती ना! आता काय करायचं असा विचार करताना त्याला डायनिंग टेबलभोवतीच्या उंच खुच्र्या आठवल्या. तिथली खुर्ची ढकलताना त्याला टेबलावर झाकून ठेवलेल्या करंज्या दिसल्या. उद्याच्या ६ वर्षांच्या वाढदिवसासाठी आईनं करून ठेवल्या होत्या. एरवी त्यानं तिथल्या तिथे २-३ फस्त केल्याही असत्या, पण आत्ता त्याला कसलंच कौतुक नव्हतं.

घोटभर पाणी पिऊन त्यानं तिथली खुर्ची ढकलत खिडकीकडे नेली. चावी मात्र शर्टाच्या खिशात ठेवून तो खुर्चीवर उभा राहिला. खाली आई, त्याचा दोस्त ईशान शेजारचा जयदादा, वॉचमनकाका सगळे किल्लीची वाट बघत होते. आईला बघून त्याला खरं तर रडूच आलं, पण तोंडावर तसं काही दाखवलं मात्र नाही. ‘‘निषाद, चावी लांब फेकू नकोस. अगदी सरळ खाली टाक हं बाळा.’’ आईच्या आवाजानं तो भानावर आला. त्यानं टाकलेली चावी जयदादानं अलगद कॅच केली. ‘शाब्बास’ म्हणत सगळे लिफ्टकडे गेल्याचे पाहून निषाद उत्साहानं दाराकडे धावला. दाराबाहेर चावी लावल्याचा आवाज येत राहिला, पण दार मात्र उघडत नव्हतं. निषादनं सुरुवातीला घाईघाईनं लॅच उघडण्यासाठी उलटसुलट खूप झटापट केली होती.

त्यामुळे ते पारच अडकून गेलं होतं. बाहेरून चावीनंही दार उघडेना तेव्हा मात्र निषादचा धीर सुटला. एवढ्यात ‘‘निषाद, थांब हं आता थोडाच वेळ. जयदादा किल्लीवाल्याला अत्ता घेऊन येतोय. मग पटकन दार उघडेल हं. पाचच मिनिटं फक्त.’’ आईच्या शब्दांनी त्याला पुन्हा धीर आला. दाराशी येरझारा घालताना आपल्या धांदल-धडपडीमुळे बिचार्‍या आईला किती त्रास होतोय वाटून त्यानं मनातल्या मनात तिला ‘सॉरी’ म्हटलं. आता यापुढे शहाण्यासारखं वागायचं. आईला त्रास द्यायचा नाही असं काय काय मनाशी ठरवून टाकलं.

तेवढ्यात बाहेर ठाकठोक सुरू झाली आणि दोन मिनिटांत दार उघडून आत शिरलेल्या आईला बिलगताना निषादला एकदम रडूच आलं. तेव्हा लाडानं त्याच्या केसात हात फिरवत ‘‘अरे तू तर आमचा सुपर हिरो निषाद आहेस. एकट्यानं किती छान मॅनेज केलंस तू आतापर्यंत. हो की नाही रे जय?’’ त्यावर जयदादा, ईशान, समोरच्या आज्जी सगळ्यांनी ‘येस्स’ म्हणत टाळ्या वाजवल्या.