अतिसामान्य वर्गाचे जगणे टिपणारी कादंबरी | Novel Depicting the life of the upper class Tishyamu Paper Novel amy 95 | Loksatta

अतिसामान्य वर्गाचे जगणे टिपणारी कादंबरी

टिश्यमू पेपर म्हणजे एक अडगळीतली आणि निरुपद्रवी, तकलादू गोष्ट; जी तुम्हाला चकचकीत मॉलच्या टॉयलेटमध्ये, रेस्टॉरंट, बारपबमधे किंवा जेवणाच्या टेबलावर दिसून येईल.

अतिसामान्य वर्गाचे जगणे टिपणारी कादंबरी

वर्जेश ईश्वरलाल सोलंकी

टिश्यमू पेपर म्हणजे एक अडगळीतली आणि निरुपद्रवी, तकलादू गोष्ट; जी तुम्हाला चकचकीत मॉलच्या टॉयलेटमध्ये, रेस्टॉरंट, बारपबमधे किंवा जेवणाच्या टेबलावर दिसून येईल. ती जितकी निरुपद्रवी मात्र तितकाच तिचा प्रचंड उपयोग व अपव्यय. टिश्यमू पेपरला सार्वत्रिक चुरगाळलं जातं, चेहऱ्यावरल्या तमाम घाणीचा स्रोत त्याने पुसला जातो आणि तातडीने कचरापेटीमध्ये रवानगी केली जाते. त्यानंतर त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं जात नाही. त्याच्या अस्तित्वाचा पाठपुरावा केला जात नाही. त्याचं पुनरुत्थान किंवा रिसायकलही होत नाही. असाच काही आगळा विषय घेऊन रमेश रावळकर हे ‘टिश्यमू पेपर’ कादंबरीतून व्यक्त होतात. मुखपृष्ठावरून या कादंबरीचा विषय काय, असा प्रश्न विचारला, तर पटकन तुम्ही बोट वर करून म्हणाल की, हे हॉटेल किंवा बारसंस्कृती विषयावर आहे. तर आपला कयास अगदी बरोबर ठरेल. फारसा कुणी स्पर्श न केलेल्या विषयावर ही कादंबरी आहे. हॉटेल हा मोठा उद्योग आहे. येथे सतत माणसांची ये-जा होते. कुठलाही समारंभ, लग्नसराई, बारसं, सेमिनार, वेलेंटाईन डे, थर्टी फस्र्ट आदी गोष्टी या ठिकाणी घडतात. लाखो-करोडो रुपयांचा चुराडा व व्यवहार होतो. येथे कॉर्नर मीटिंग होतात. देव-घेवीचे व्यवहार होतात, जमीनजुमला आणि वाममार्गी कामे प्याला उंचावून होत असतात. हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांना प्रचंड अडीअडचणींना सामोरे जावे लागते. तेथे दिवसातले चौदा तास काम करावे लागते. समजा नाइटला कोणी आला नाही तर डेवाल्याला नाइट करावी लागते. तासन्तास उभे राहून ग्राहकाच्या दिमतीला उभे राहावे लागते, भटारखान्यातली मोठमोठी भांडी, खरकटी, टेबल साफ करावे लागतात. हॉटेल बंद करताना बीयरचा हिशोब द्यावा लागतो, बाटली फुटली तर शेठ पगारातून कापून घेतो. अशा बऱ्याच दहशतींचा सामना तिथल्या कामगाराला करावा लागतो. कोणी कस्टमर टाइट होऊन शिव्यांची लाखोली कधी वाहेल किंवा सप्पकन् कुणाच्या कानाखाली कधी वाजवेल किंवा हत्याराने खुनापर्यंतही मजल जाऊ शकते असे विविधांगी अनुभव लेखक धारदारपणे मांडतो.

टिश्यमू पेपरमधला नायक अर्जुन याची ही आत्मकथा किंवा कहाणी आहे. लहान लहान प्रसंगांतून ती तो विशद करतो. ही एक नावीन्यपूर्ण कादंबरी आहे. लेखकाची त्याची अशी भाषा आहे. खूप काही आत्मनिवेदनात्मता तीत येत नाही. तो काही तत्त्वज्ञान सांगत बसत नाही. संवादातून तिचा पिसारा फुलत राहतो. जे काही पाहिलं, ऐकलं त्याची ही दास्तान. जी काही आतली भळभळ आहे ती एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवून सहजगत्या त्याने मांडलेली आहे. तीत कुठलाही मुलाहिजा नाही. अनेक कथनांतून, पात्रप्रसंगांतून तिचा विस्तार झालेला आहे. ही कादंबरी काही कापुसकोंडय़ाची गोष्ट नाही. ती रटाळवाणी कहाणी नसून, ती एक भळभळती जखम आहे. कितीतरी वर्षांपासून लेखक ती आपल्या तळहातावर घेऊन वावरत आहे. दीक्षेत नेमका अंगठाच मागावा किंवा धारदार शस्त्राने नाक कापून अवहेलना व्हावी अशा बऱ्याच घटना या कादंबरीतून दिसून येतात. लेखक या कादंबरीतून नदीसारखा वाहत राहतो. परिस्थितीच्या शिखरावर ज्वालामुखीसारखा आतल्याआत खदखदत राहतो मात्र तो फाटत नाही.

एका लहानशा खेडय़ातून औरंगाबादसारख्या महानगरात या कादंबरीचा नायक जेव्हा प्रवेश करतो; तेव्हा उपजीविकेचे साधन व शिक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून हॉटेलमध्ये नोकरी धरतो. येथे कोणीच त्याच्या ओळखीचं नाही. लांबची बहीण आहे, पण तिचा ठावठिकाणा त्याच्याकडे नाही. मात्र हॉटेलमध्ये नोकरी करणं ही काही म्हणावी तेवढी सोपी गोष्ट नाही, हे त्याला हळूहळू समजून येतं. तिथले हेवेदावे, चित्रविचित्र कस्टमर, त्यांच्या मागण्या, दारू पिण्याच्या पद्धती पाहून तो चक्रावून जातो. या कादंबरीतून लेखकाने कामगार उभा केलेला आहे. त्याला वाटतं हॉटेलमध्ये काम केल्यावर आपल्याला चांगलचुंगलं खायला मिळेल. मात्र तेथलं मिळणारं कदान्न पाहून त्याचा भ्रमनिरास होतो.

पगार तुटपुंजा असला तरी तिथल्या वेटरची टीपवर नजर असते. अशा वेळी आलेल्या ग्राहकाला सांभाळणं हे वेटरचं कौशल्य असतं. होयबा व नायबा इतकंच करायचं असतं. बारमध्ये कामाला लागल्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी अर्जुनच्या लक्षात येऊ लागतात. त्याचा स्वभाव गरीब. तो शेतकरी कुटुंबातला. भटारखान्यातला वस्ताद, कामवाल्या बाया, त्याच्यासोबत काम करणारे इतर वेटर यातून ही कादंबरी भट्टीतल्या ठिणगीसारखी फुलते. कधी त्याची राख आपल्या डोळय़ात जाते, तर कधी तिच्या धगीने आपण तापले जातो. काहीही झाले तरी आपण टीप घ्यायची नाही यावर अर्जुन ठाम असतो. आपली ही संस्कृतीच नाही म्हणून तो स्वत:ला समजावत राहतो. तो शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याचा हा स्वभाव पाहून इतर चक्रावून जातात व त्याला याविषयी खिजवत राहतात. तू बुळय़ा आहेस, हा मानसिक आजार आहे, टीप हा आपला धर्म आहे, हक्क आहे असं त्याला सारखं बजावत राहतात. मात्र अर्जुन हा आपल्या निश्चयावर ठाम राहतो. कुणाचे काही सामान किंवा वॉलेट जरी कोणी विसरून गेला तर तो मॅनेजरला देऊन मोकळा होतो.
या सर्व कोलाहलात अर्जुनची फरपट सुरू आहे. स्वत:शी एक अनामिक झगडा चालू आहे. एका हॉटेलमागून दुसरे हॉटेल नंतर तिसरे पुन्हा त्याच पूर्वीच्या हॉटेलात. असे एक वर्तुळ तो पूर्ण करताना दिसतो. पुन्हा वेगळी माणसं, ग्राहक यांचा सामना करावा लागल्यानंतर पुन्हा त्याच वेगाने जुन्या माणसांशी, व्यवहाराशी तो भिडताना दिसतो. मात्र तो डगमगत नाही. या संक्रमणात विविध मोह त्याला भिववितात. कामवाल्या बाईची शारीरिक लगट, त्याच्या मॅनेजरच्या बायकोला हवे असलेले शारीरिक सुख, या दिव्यांतून कसाबसा निसटतो. तो जेव्हा ही बाब त्याच्या सहकाऱ्याला सांगतो तेव्हा नामर्द म्हणून त्याच्यावर आरोप होतो. आपण आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही म्हणून चक्रम कसे, असा त्याला प्रश्न पडतो. या कादंबरीतला नायक कितीतरी वेळा नोकरीतून पायउतार होतो. नव्या शिडय़ा चढतो. नव्या नोकरीसाठी पायपीट करतो. विवश होतो. मात्र तो डगमगत नाही. आलेल्या वाटेतूनच काही वहिवाट निघेल म्हणून मार्गक्रमण करताना दिसतो.

ही कादंबरी म्हणजे सोशिक व शोषण होणाऱ्या कामगार वर्गाची आहे. सामान्य माणूस कसा तुडवला जातो, नामोहरम केला जातो. एक व्यवस्था आहे, प्रणाली आहे तिच्या नियमावलीतच राहावं लागतं, तिचे कायदेकानू मान्य करावे लागतात. तिच्या विरोधात गेलं तर खातमा झालाच. सिनियर-ज्युनियर हा वाद आपल्या प्रणालीत जुनाच आहे. या कादंबरीतून लेखक ते अधिक ठळकपणे मांडतो.

जसजसं औरंगाबाद महानगर होत गेलं, औद्योगिकता वाढीस आली. नवीन वसाहती निर्माण झाल्या, माणसांकडे पैसा आला, त्याच्या गरजा बदलल्या, शौक व चवी बदलल्या, महानगराच्या कडेला डान्सिंग बारची रौनक वाढली, बांगलादेश व इतर ठिकाणांहून फितवून, त्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन दलाल मुलींना विकत घेऊ लागले आणि धंद्याला लावू लागले. त्याला एक गोंडस नाव दिलं बारबाला. लेखक त्यांचीही कहाणी मांडतो. त्यांना जसं शरीर आहे तसं मनसुद्धा आहे. त्याचा कोणीच फारसा विचार करताना दिसत नाही. एक क्रयवस्तू म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जातं. तिचं एकदा वय झालं की टाकाऊ माल म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. सर्व बाबींचा ऊहापोह लेखक करताना दिसतो. ही एका वेगळय़ा आशयाची कादंबरी म्हणून अभ्यासकांना नोंद घ्यायला जागा आहे.

अर्जुनने इतकीच अपेक्षा ठेवलेली आहे की आपलं जीवन सुसंस्कृत असावं. याच उद्देशाने तो नॉन ग्रॅन्टेड महाविद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करतो. मात्र तेथे पगारच नसल्यामुळे तो हॉटेलमध्ये पार्ट टाइमची नोकरी धरतो. बारमध्ये आपल्याच विद्यार्थ्यांना पाहून त्याची त्रेधातिरपीट उडते. तो स्वत:ला कैकदा लपवू पाहतो तर कधी धीटपणे सामोरा जातो.

‘लेखक अतिसामान्यांचे गूढ विश्व ‘टिश्यमू पेपर’ या कादंबरीत आपल्यासमोर ठेवतो,’ असं कौतुक विख्यात कादंबरीकार राजन गवस जेव्हा करतात तेव्हा या कादंबरीचं महत्त्व उंचावर जातं.

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 01:50 IST
Next Story
स्त्रीवादी भूमिकेतून विभावरी शिरुरकर यांची चिकित्सा