श्रीनिवास बाळकृष्ण
माझ्या मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या वयाच्या अनेक मुलांकडून महत्त्वाचे शोध लागत असतात. कोणते ते नंतर सांगतो, पण आता मी शाळेत असताना जो शोध लावला त्याबद्दल सांगतो. गणिताच्या वह्यांचे कोरे कागद फाडून बारीक तुकडे करून त्या तुकड्यांचा ढीग वरच्या खिडकीतून खाली सोडून मुंबईत भर दुपारी बर्फाचा पाऊस पडण्याचा प्रयोग करायचो. सर्वांना तो पाहायला मजा यायची. पण आमचा आनंद शाळेला पाहवला नाही. वह्यांची अचानक कमी झालेल्या पानांची तक्रार पालकांपर्यंत पोहचली आणि पुढे काय झालं ते… असो.

मग मी घरातली जुनी मासिकं, लग्नपत्रिका किंवा जाहिरातींची पत्रकं शोधून पाऊस पाडू लागलो. कागदी पावसाचा पूर पाहून पुन्हा घरी तक्रार गेलीच. आणि पुढे काय झालं ते… असोच.

आज मी तुम्हाला या कठीण प्रयोगाचं सोपं सूत्र सांगणार आहे, असा पाऊस पाडून तुमचीही कॉलर टाइट होईल.
घरातील जुन्या मासिकाचे किंवा ओरिगामी पेपरचे बारीक तुकडे करा. हे सगळे तुकडे उडून जाऊ नयेत म्हणून वाटीत ठेवा. वेगवेगळ्या रंगांचे तुकडे वेगवेगळे ठेवले तर चांगलंच. रंगीत बर्फाचा पाऊस.

काही तुकडे लांबट होतील, काही गोलसर, काही तर इतके विचित्र असतील की त्यांना कोणतं नाव द्यावं हे सुचणारही नाही! तुकडे फाडताना तम्हाला अचानक एखादा ओळखीचा आकार होताना दिसेल. एखादा तुकडा माशीसारखा दिसेल, दुसरा मुंगीसारखा; पण सध्या त्याकडे दुर्लक्ष करा. आता जरा जाड मोठा पांढरा कागद घ्या. पुठ्ठा नकोय. त्याच्या एका बाजूनं फेविकॉल किंवा कुठल्याही गमनं अंघोळ घाला.

हा कागद खाली जमिनीवर अंथरा. खोलीतील फॅन चालू करा. स्टूल किंवा बेडवर उभं राहून वरून हा रंगीत तुकड्यांचा पाऊस पाडा. त्या तुकड्यांना जसं उडायचं, झुलायचं, पडायचं तसं पडू देत. प्रयत्न करा की कागदावरच पडू देत. कुठेही, कसेही, कोणावरही…

लक्षात ठेवा, इथे आपल्याला कुठलाही आकार मुद्दाम करायचा नाही. आपोआप काय गंमत होतेय ते नुसतं पाहायचं आहे. ‘बरोबर’ किंवा ‘चूक’ असं काहीच नाही. एखादा निळा तुकडा हिरव्या तुकड्यावर पडेल, लाल तुकडा पिवळ्याशी गट्टी करेल. तर काही ठिकाणी कागद मोकळा राहील. पाऊस पडलेल्या त्या कोरड्या जागेचीही गंमत आहे. चित्रामध्ये रिकामी जागासुद्धा चित्राचा महत्त्वाचा भाग असतो.

पाऊस संपल्यावर कागद मस्त वाळू देत. न चिकटलेले तुकडे उडून जाऊ देत. काय दिसतंय? एखादं शहर? जंगल? समुद्र? की फक्त रंगांची मस्ती? गंमत म्हणजे घरच्या प्रत्येकाला वेगळं काहीतरी दिसेल आणि त्या सगळ्यांची उत्तरं ‘बरोबर’ असतील!

काही कलाकार तर अशी चित्रं तयार करून प्रदर्शनात लावतात. त्यामुळे तुम्ही स्वत:कडे त्या नजरेनं पाहा. कदाचित तुमच्या हातून तयार झालेला एखादा साधा कागदाचा तुकडा एका महान कलाकृतीचा भाग असेल! तर कुणी आत्ताच विकत घेतेय का पाहा. या चित्रासोबत आणखी एक गोष्ट घडली. ती म्हणजे तुम्ही घरभर उडवलेले रंगीत तुकडे- ते तसेच राहू देत. महान कलाकार झाडू मारत नसतात मित्रा. मला मिळाला तसा थोडा ओरडा तुम्हालाही मिळू देत, हीच तुमच्या पालकांच्या चरणी प्रार्थना.

तुमचा चित्रमित्र,
श्रीबा
शिक्षक आणि पालकांसाठी…

काही मुलांना कागद फाडताना संकोच वाटतो. तर काहींना ‘योग्य आकार’ शोधण्याची घाई असते. मात्र या उपक्रमात अनियमितपणाच सौंदर्य निर्माण करतो. फाडलेले तुकडे मुलांना आकार, रचना, रंगसंगती आणि निर्णयक्षमता यांचा अनुभव देतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मुलांना परिपूर्णतेच्या ओझ्यातून मुक्त होऊन खेळकरपणे सर्जनशील होण्याची संधी मिळते.