कवी सुधीर शेरे यांचा ‘ओव्या दिनांच्या’ हा कवितासंग्रह नुकताचा प्रसिद्ध झाला आहे. कवीच्या अध्यापन कौशल्याच्या जोरावर प्रत्येक ओवी उमलली, फुलली, बहरली. या कवितांना अष्टाक्षरी, पाच कडव्यांची मर्यादा घालून घेऊनसुद्धा अभिव्यक्तीला कुठे मर्यादा पडलेल्या जाणवत नाहीत. शब्द आशय, विषय, गाभा याबरोबर शब्दाशी मांडलेला खेळ मनोरंजनाच्या पलीकडे जातो. वाचक कवीच्या भाव विश्वाशी नाते जोडता जोडता वास्तवाशी समरस कधी होतो हे कळतदेखील नाही. मात्र हे साधत असताना विचारी, अभ्यासू, सूक्ष्मात डोकावणाऱ्या वाचकाबरोबरच सामान्य वाचकालाही विषयाच्या उंचीचा अंदाज येतो.
भूतदया रुग्णसेवा
हाची परिचर्या धर्म
रात्रंदिन रुग्ण ध्यास
किती उदात्त हे कर्म
कवीने हाताळलेल्या सर्वच ओव्या मनाशी नाते जोडतात, कारण कवी केवळ दिनविशेष सांगत नाही तर त्या दिनविषेशाच्या पलीकडे असलेला मानव धर्म, माणूस धर्म सांगता सांगता सुदृढ समाज रचनेचं बाळकडू पाजायला विसरत नाही. हे तर खऱ्या हाडाच्या शिक्षकाचे कार्य असते आणि ते कवीने आपल्या ओव्यातून आदर्श पद्धतीने पार पाडलेले आहे.
क्षती, थैली, यज्ञ, बेगमी, ऊर्जादायी, व्यसनांधता, तस्करी, अवनी, कैक, एकसंध, कृषीवल, हिरावले, काया, रुणाईत यांसारखे शब्द कधीमधी दृष्टीस पडतात. मात्र कवीने आपल्या बुद्धी कौशल्याने त्या साऱ्यांना चपखलपणे कवितांमध्ये पेरल्यानेे त्या शब्दाबरोबरच ओवीचे सौंदर्य वाढवले आहे हे सतत जाणवत राहते.
ओरबाडलेली पृथ्वी
कशी धरील हो तग
नष्ट होऊन जाईल
सारे सजीवांचे जग
ही कविता वाचताना सध्याची परिस्थिती डोळ्यासमोर येते. सध्या निसर्गाची होत असलेली हानी मन विषण्ण करणारी आहे. या कवितांमध्ये काही ठिकाणी इंग्रजी शब्द- चेंज, स्पीड बँक, कौशलिंग, बुक- सहजपणे येतात. विशेष म्हणजे या शब्दांनी मराठी शब्दाशी छान हातमिळवणी केल्याने ते कवितांमध्ये अर्थवाही झालेले आहेत.
