सार्वजनिक व्यासपीठावरून पद्मा सचदेव सगळ्यांनाच छोटे भय्या किंवा बडे भाई संबोधून आपलेपणा राखत. पण आम्हा अकादमीतल्या पोरी-सोरींमध्ये बोलताना मात्र लेखक मंडळींचे मसालेदार गॉसिप्स, किस्से, कहाण्यांमधून त्यांचा रोखठोक खोडकरपणा दाखवून देत. त्यांच्यातला ज्येष्ठपणा उडवून लावत. त्यांच्या जन्माच्या चित्तरकथेचे अंश चुरचुरीत विनोदी शैलीत त्यांच्याच तोंडून ऐकलं नसणारं बहुतेक कोणी नसणार संस्कृतीकर्मी गोतावळ्यात…

दिल्लीच्या सर्वभाषीय साहित्यिक जगतात एक सुंदर, सुहास्य मुद्रेची ‘दीदी’ही होती- डोगरी कवयित्री, लेखिका पद्मा सचदेव! आपल्या ‘मेरी कविता मेरे गीत’ या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणार्‍या पहिल्या डोगरी कवयित्री. गोर्‍यापान, कायम प्रसन्न चेहर्‍याच्या, मोठं कुंकू आणि काठापदराची साडी डोक्यावर व्यवस्थित घेतलेली, अनेक साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत आवर्जून हजेरी लावणार्‍या. डोगरी, हिंदी आणि उर्दूवर समान प्रभुत्व. चर्चासत्रं, बैठकांमध्ये वादविवादाचे प्रसंग उद्भवत तेव्हा मात्र त्या दृढ आवाजात मुत्सद्देगिरी दाखवून, अवघडपणा टाळत यजमानांच्या बाजूने प्रसंग सावरून घेत. सत्ताकेंद्रांशी सामिप्य ठेवण्याची व्यवहारकुशलता त्यांना अवगत होती. अटलजी ते प्रा. अनंतमूर्ती या सर्वांच्या दिवाणखान्यातच नव्हे, तर स्वयंपाकघरातही मुक्त संचार… सार्वजनिक व्यासपीठावरून सगळ्यांनाच छोटे भय्या किंवा बडे भाई संबोधून आपलेपणा राखत. पण आम्हा अकादमीतल्या पोरी-सोरींमध्ये बोलताना मात्र लेखक मंडळींचे मसालेदार गॉसिप्स, किस्से, कहाण्यांमधून त्यांचा रोखठोक खोडकरपणा दाखवून देत आणि त्यांच्यातला ज्येष्ठपणा उडवून लावत. त्यांच्या जन्माच्या चित्तरकथेचे अंश चुरचुरीत विनोदी शैलीत त्यांच्याच तोंडून ऐकलं नसणारं बहुतेक कोणी नसणार संस्कृतीकर्मी गोतावळ्यात.

त्यांचा एकंदर प्रवास बघता त्यांनी मिळवलेलं यश स्पृहणीय मानायला हवं. जम्मूमधल्या पुरमंडल गावातला जन्म. वडील प्रा. जयदेव बडू/ शर्मा संस्कृतचे विद्वान, अध्यापक. प्रतिष्ठित राजपुरोहितांचं घराणं असल्यानं घरात परंपरावादी वातावरण. वडील १९४७च्या फाळणीतील संघर्षात मारले गेले. खाऊन-पिऊन सुखी असलेलं मध्यमवर्गीय घर अचानक डळमळू लागलं, पण आईनं जमेल तसं सावरून धरलं. तेव्हा सगळ्यात मोठ्या पद्माजी फक्त सात वर्षांच्या होत्या, पाठीवर दोन लहान भाऊ. वडिलांकडून मिळालेली वाचनाची आवड आणि आईकडून मिळालेली डोगरी लोकगीतातली लय त्यांना लहानपणीच कवितेच्या वाटेवर घेऊन गेली. त्या लोकगीतांमध्ये आपली एक-दोन कडवी जोडून किंवा बदलून लिहायला सुरुवात झाली. वयाच्या सोळाव्या वर्षी गावातल्या मंदिरात चाललेल्या काव्यवाचनात आपली कविता आत्मविश्वासानं वाचणारी ही तल्लख, गोड पोरगी अचानक प्रकाशझोतात आली. ती कविता ‘संदेश’चे संपादक वेद पाल दीप यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात छापली, आणखीही काही छापल्या आणि नाव होत गेलं. त्याबरोबर त्याकाळी धीट मानावं असं प्रेमप्रकरण सुरू झालं. ध्येयवादी, कम्युनिस्ट, देखणे कवी वेद पाल आणि सुस्वरूप, बुद्धिवान नवकवयित्री पद्मा बडू. लवकरच लग्न झालं, पण पद्माजींना त्याकाळी असाध्य मानला जाणारा क्षय झाला. सॅनिटोरियममध्ये रहावं लागलं. नात्यात मिठाचा खडा पडला. पुढे त्या बर्‍या होऊन घरी आल्या, पण मतभेद वाढतच गेले आणि वाटा वेगळ्या झाल्या.

पद्माजी दिल्लीला येऊन आकाशवाणीत डोगरीच्या उद्घोषक बनल्या. नंतर मुंबईत येऊनही आकाशवाणीत काम केलं. इस्मत चुगताई, लता मंगेशकर आणि कुटुंबीय, धर्मवीर आणि पुष्पा भारती, अली सरदार जाफरी, कृष्ण चंदर वगैरे लेखक कलाकार मंडळींत उठबस सुरू झाली आणि वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्यांच्या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. महत्त्वाकांक्षी आणि धाडसी स्वभावाच्या पद्माजींना मागे वळून बघावं लागलं नाही. जम्मू आकाशवाणीतच त्यांना पुढच्या आयुष्याचा जोडीदार ठरणारे सुरिंदर सिंग भेटले. प्राप्तिकर विभागातील अधिकारी सुरिंदर सिंग म्हणजे शास्त्रीय गायक सिंग बंधूंपैकी एक.

एकमेकांशी खुमासदार समीकरण असलेलं हे जोडपं चारचौघांतही अतिशय अकृत्रिमपणे वागत, एकमेकांची थट्टा करत, लहानथोरांत मिसळत असे. दर्यादिल, हजरजबाबी सुरिंदर सिंग (सरदारजी) आणि इस्मत आपांच्या हक्कानं चिडवाचिडवीचे किस्से पद्माजींच्या रसिल्या शैलीत ऐकायला मजा येई. त्यातला सर्वांत प्रसिद्ध म्हणजे आपा पहिल्यांदा या दोघांच्या घरी आल्या तेव्हा त्यांना दरवाजा उघडून स्वागत करत असलेल्या सरदारजींकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं, पद्माजींनी सांगूनसुद्धा! आणि फटकळपणे विचारलं, ‘‘ये फ्लॅट किसका है?’’ पद्माजी म्हणाल्या, ‘‘यांचाच आहे.’’ तर आपा आत बसलेल्या लेखक पाहुण्यांच्या देखत म्हणाल्या, ‘‘फ्लॅट समेत आया है, तो बुरा नही है!’’ आत हास्याचे फवारे उडाले. पद्माजींना इस्मत आपा ‘मेरी हराम की औलाद’ म्हणत- लग्नाआधी झालेली. पद्माजींना इस्मत आपांनी एक किस्सा सांगितला होता म्हणे. इस्मत आपांच्या रोखठोक वाटणार्‍या कहाण्यांनी मुस्लीम वाचकांच्या दुनियेत एक जबरदस्त भूकंप झाल्यासारखं झालं होतं. इतकं की लग्न जुळेना. खैर, परस्परांशी भरपूर चर्चेनंतर, चित्रपट कथालेखक शाहिद लतिफ यांच्याशी लग्न झालं. काही दिवसांनी खानदानी कुटुंबाच्या किंवा सामाजिक दडपणामुळे शाहिद भाईंनी त्यांना सुचवलं, ‘‘देखो बेगम,अब तुम्हारा नाम-वाम तो होही गया है, अब लिखना बंद कर दो तो ठीक रहेगा.’’ इस्मत आपांनी फट्कन उत्तर दिलं, ‘‘आप का तो कोई नाम-वाम भी अभी हुआ नहीं है, आप ही लिखना छोड दें, तो क्या ठीक ना होगा?’’ पद्माजींवर बंडखोर इस्मत आपांचा प्रभाव जाणवायचा : ‘तुनकमिजाजी तो मैंने शादी के बाद सीखी है, जब तक जम्मू की अदब में थी, बहुत सीधी- सादी थी.’ असं त्या म्हणत.

पद्माजींना वेळोवेळी मिळालेल्या सन्मानांमध्ये पद्मश्री, मध्य प्रदेश सरकारचा कबीर सन्मान आणि के. के. बिर्ला फाऊंडेशनचा सरस्वती सन्मानही सामील होते. विशेष म्हणजे लताजींकडून त्यांनी त्यांची चार डोगरी गीतं गाऊन घेतली होती. ती डोगरी समाजात खूप लोकप्रिय झाली होती. लताजींना मित्रमैत्रिणी फार कमी असत म्हणून पद्माजींची ही जवळीक खरंच मोलाची. लताजींबरोबर त्यांनी अमेरिकेची एक टूरही केली होती, त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत. लताजींच्या सुचवण्यावरून त्यांना दोन-तीन हिंदी चित्रपटात गाणी लिहायचं काम मिळालं होतं. मी मराठी असून एकदाही लता मंगेशकरांना (दीदी) भेटलेले नाही याची त्यांना खरोखर खंत वाटे. अशी शक्यता माझ्या मनात कधी डोकावलीसुद्धा नव्हती (वो कहाँ, हम कहाँ!) पण का कोणास ठाऊक, पद्माजींना ते अगदी लागून राहिलं होतं. मी तुला एकदा माझ्याबरोबर त्यांच्या घरी घेऊनच जाईन असं त्या सारख्या म्हणायच्या आणि मी म्हणायचे, ‘‘उनको सुनना मेरे लिए काफी हैं. उनकी मसरूफीयत भी मैंने सुन रखी है. आपको मिले उनके प्यार-दुलार से मुझे वही खुशी मिलती है.’’ पण पद्माजींच्या आणि टंडनजींच्या आग्रहावरून अरविंद आणि मी ‘साहित्य सहवास’मध्ये पुष्पा भारतींना भेटून आलो होतो ते खूप आनंदाचं ठरलं. त्यांच्या आणि धर्मवीर भारतींच्या समृद्ध सहजीवनाबद्दल, लेखनाबद्दल, वृक्षवल्लींच्या प्रेमाबद्दल भरभरून ऐकायला मिळालं.

जम्मू शहर आणि तिथली संस्कृती यांच्यावर पद्माजींचं अक्षरश: अपार प्रेम! ‘‘बहुत बार इस शहरनेही बाप की तरह मेरे सिरपर हात रखा है.’’ हे त्यांचं विधान मला खूप भावलेलं, या भावनेची गहिराई सर्वांनाच जाणवेल असं नाही, कारण ती अनुभवावी लागते. शहराकडूनही जन्मदात्या बापाइतकंच मायेनं घडवणारं मिळतं काही लोकांना, असं आश्वासक, उत्कट आपलेपणाचं नातं असतं एखाद्याच ठिकाणाशी. ते कधी घर असतं किंवा कधी शहर, त्याच्यापासून दूर गेलं की तीव्रतेनं जाणवणारं, परत येताच मायेनं जवळ घेणारं. जम्मूबद्दल पद्माजी भरभरून लिहीत. अशा शैलीत की शहराचे त्यांच्याशी बंध वाचकांनाही जाणवावेत. एका कवितेत त्या लिहितात :
वो शहर जिसे जम्मू के नाम से जाणते हैं आप,
वो शहर तो मेरा है, जिस्मो जान अभी भी
गलियों में फिरते रहते हैं यादों के काफिले
मेरी है जगह-जगह को पहचान अभी भी

फकिरीच्या मस्तीत मलिका पुखराज यांनी गायलेली डोगरी लोकगीतं, जम्मूचा राजमा-भात (डोगरीमध्येही भातच म्हणतात), रंगीबेरंगी गोंडे आणि बांगड्यांनी सजलेले बाजार, नाकात चमचमती लौंग घालणार्‍या सुंदर्‍या, पारंपरिक बसोहली शैलीतली चित्रं, बायकांनीच पुढ्यात घेतलेल्या ढोलकीच्या थापावर घरोघरी अंगणात रंगणारी नाच गाणी!! पद्माजी पारंपरिक डोगरी गाणी सुरेल गात. काश्मीरच्या १६व्या शतकातल्या प्रसिद्ध कवयित्री हब्बा खातून यांची भक्तिगीतं त्यांनी आम्हाला गाऊन ऐकवली होती. सुरेल आवाजात रेशमी गोडव्यापेक्षा एक डोगरी नमकीन खुरदुरेपण होतं, लोकगीतांत असतं तसं… जसं त्यांच्या स्वभावात होतं तसं.

जम्मूच्या सुविख्यात शिवमंदिरात श्रावणी पौर्णिमेला विशेष पूजेचा मान, परंपरेनं राजपुत्र डॉ. करण सिंग यांचा. डॉ. फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री झाल्यावर त्या प्रसंगी बागेतून स्वहस्ते तोडलेली शुभ्र सुवासिक फुले घेऊन गेले होते. करण सिंग शिवलिंगासमोर हात जोडून स्तोत्र म्हणत होते आणि त्यांच्या हातून घंटा घेऊन फारुख अब्दुल्ला स्तोत्र पूर्ण होईपर्यंत शांतपणे वाजवत उभे होते असंही पद्माजींना आठवतं. मुख्य म्हणजे हे मनातून घडत असे, राजकीय उद्देशाने नव्हे. आपला देश खरा असाच आहे, होता… आणि व्हायला हवाय. आठवणींची अशी सुंदर मोरपिसं त्यांच्या मनांत कायम विहरत असत आणि गद्यातही!
uarundhati.deosthale@gmail.com