‘लोकरंग’मधील रघुनंदन गोखले यांचे ‘चौसष्ट घरांच्या गोष्टी’ या सदरात लेखकाने बुद्धिमत्ता अलौकिक करण्याचे सूत्र हा नवा विषय हाताळला आणि तो खूप छान परिणामकारक, प्रेरक रीतीने लिहिला आहे. पोलगार दाम्पत्याचा आणि त्यांच्या जिद्दीचा, परिश्रमाचा परिचय करून दिला. त्यामुळे बुद्धिबळ या खेळाचे महत्त्व अधारेखित झाले. या लेखाद्वारे खूपच छान नवी माहिती वाचायला मिळाली. हा विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. – डॉ. नागेश अंकुश, औरंगाबाद.

वाचनीय लेखमाला
‘लोकरंग’मधील रघुनंदन गोखले यांचे ‘चौसष्ट घरांच्या गोष्टी’ हे सदर खूप वाचनीय आहे. ‘शुरांचे पोवाडे शूरवीरांनी गावे’ ही म्हण किती यथार्थ आहे, याची प्रचीती दर रविवारी या लेखमालेतून येते. लेखकाने स्वत: हे सर्व अनुभवले असल्याने, इतरांचे मार्गक्रमण जवळून पाहिले असल्याने, निवेदनात नेहमीच आत्मीयता जाणवते. तो खेळाडू आणि त्याची शैली हे दोन्ही खूप साध्या, पण सुंदर भाषेत लेखक मांडतात. लहानपणी कधीतरी खेळलेल्या माझ्यासारख्या असंख्यांना तांत्रिक तपशील देऊन गांगरवणे हे या लेखनातून न दिसल्याने हे सदर जास्त आवडते. – प्रसाद जोग

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

‘ते’ लोक जबाबदार
‘लोकरंग’मधील (२६ फेब्रुवारी) ‘भाषेच्या खऱ्या वैभवासाठी’ या भूषण कोरगांवकर यांच्या लेखात प्रादेशिक बोली बोलणाऱ्यांना प्रमाण मराठी भाषकांबरोबर संवाद साधताना कसे लाजायला होते, याचे वर्णन केले आहे. परंतु प्रमाण मराठी भाषा नसेल तर प्रादेशिक बोलीत बोलणारे समूह एकमेकांच्या लकबी, सवयी, हेल आणि लहेजा, स्थानिक वाक्प्रचार न समजल्यामुळे गोंधळून जातील आणि त्यांच्या आदान-प्रदानामध्ये अडचण येईल. याकरिता प्रमाण भाषेची नितांत आवश्यकता आहे. कोणा एकाला ‘ण’ म्हणता येत नाही याचा दोष प्रमाण भाषा बोलणाऱ्यांवर ठेवून कसा चालेल? ‘भाषेचे खरे वैभव’ सांगण्याच्या प्रयत्नात एका विशिष्ट धर्मीयांना कशी वागणूक मिळते, याचेच वर्णन करण्यात लेखकाने जास्त रस दाखवला आहे. माझा एकच प्रश्न आहे. त्या विशिष्ट धर्मीयांनाच अशी वागणूक का मिळते? याचा कधी विचार केला का? इतर जैन, बौद्ध, शीख, पारशी, ज्यू या धर्माचे लोक मराठीत बोलले तर मराठी माणूस स्वागतच करतो; पण त्या विशिष्ट धर्माच्या लोकांबरोबर असे का वागतात याचा विचार करता का?
जर त्या विशिष्ट धर्मीयांची मातृभाषा चारशे-पाचशे वर्षांपूर्वी मराठीत होती, असा लेखकाचा दावा आहे (आणि तो योग्यदेखील आहे) तर या विशिष्ट धर्मीयातले लोक मुद्दाम जाणून-बुजून तोडकंमोडकं उर्दू बोलण्याचा का प्रयत्न करतात? ‘मेरे परडे मे (म्हणजे परसात ) तेरी शेरडी (म्हणजे शेळी) क्यू ओरडी?’ किंवा ‘फज्र को उठय़ा, वैरण लाने को गया, तो आज़् वैरण का बाजारच बंद. अब जनावरोंको क्या घालु खानेकू?’’ असं उर्दूमिश्रित मराठी बोलणारा हा विशिष्ट धर्मीय समाज गेल्या सत्तर वर्षांत जास्त कडवा धर्माध झाला आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून असेल कदाचित, पण त्या विशिष्ट धर्मीयांना अशी वागणूक मिळण्याचे कारण त्यांची धर्माधता हेच एक आहे. तेव्हा जर या विशिष्ट धर्मीयांना बहुसंख्याकांकडून चांगली वागणूक अपेक्षित करत असाल तर माध्यमकर्मीची ही जबाबदारी आहे की या अल्पसंख्याक समुदायाचे चांगले प्रबोधन करावे. त्यांच्यातला हा कडवटपणा आणि कडवा धर्माभिमान कमी झाला, तर आपोआप अनेक समस्या सुटतील. – शारंगधर बोडस

‘ललित’ आणि ‘शब्द रुची’चा विसर!
‘लोकरंग’ पुरवणीतील (२६ फेब्रुवारी) पंकज भोसले यांनी ‘वाचनवाहकांची स्थिती’ या लेखातून एका महत्त्वाच्या, पण दुर्लक्षित विषयावर लिहिले हे खूप चांगले झाले; पण त्यांना साहित्यिक घडामोडीला वाहिलेल्या आणि ‘ठणठणपाळ’मुळे प्रसिद्ध झालेल्या, पण ‘ठणठणपाळ’ बंद होऊन पन्नास वर्षे झाली तरीही लोकप्रियता व दर्जा कमी न झालेल्या अशा ‘ललित’ मासिकाचा तसेच अप्रतिम विशेषांक सातत्याने देणाऱ्या ‘शब्द रुची’ या मासिकांचा विसर पडलेला दिसतो. याशिवाय मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘साहित्य’ या अत्यंत दर्जेदार त्रमासिकाचेही विस्मरण झालेले दिसते. दर्जा आणि आर्थिक गणित ज्यांना सांभाळता आले ते बाजारात टिकून आहेत. मूठभर लोकांनी आपला अंक वाचला तरी समाधान मानायचे असल्यास हरकत नाही; पण खप वाढवणे, नवीन तरुण वाचकांना आकर्षित करणे हेच मोठे आव्हान मानले पाहिजे असे वाटते!- दीपक ओढेकर, नाशिक

दुर्लक्षित राहिलेली नियतकालिके
पंकज भोसले यांचा ‘वाचनवाहकांची स्थिती’ हा लेख वाचला. आठ-साडेआठ कोटी मराठी भाषक वाचक असलेल्या या महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच मराठी नियतकालिके अजूनपर्यंत तगून असावीत, ही शोचनीय स्थिती कशामुळे ओढविली असेल याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कदाचित या नियतकालिकातील मजकूर सर्वसामान्य वाचकांना आकर्षित करणारे नसतील किंवा या नियतकालिकांच्या किमती वा वार्षिक वर्गणीचे दर ग्रामीण भागात राहणाऱ्या इच्छुक वाचकांना परवडणारे नसतील वा इंटरनेट, पीडीएफसारख्या आधुनिक तंत्रज्ञान सुविधांमुळे पैसे देऊन नियतकालिके विकत का घ्यावीत, ही मानसिकता बळावत असेल.
याचबरोबर वाचनवाहकाच्या आढाव्यात महाराष्ट्रातील निरनिराळय़ा चळवळींसाठी सातत्याने प्रकाशित होणारी मुखपत्रं पूर्णपणे दुर्लक्षित राहिलीत असे तीव्रतेने वाटत आहे. साठ-सत्तरच्या दशकात जेव्हा महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात वेगवेगळय़ा प्रकारच्या जनआंदोलनाचे व चळवळीचे जाळे पसरलेले होते तेव्हा मराठीत प्रकाशित होणाऱ्या चळवळीच्या नियतकालिकांची संख्याही कमी नव्हती. ‘माणूस’सारखे साप्ताहिक तर चळवळीचे मुखपत्र असल्यासारखे होते. आता बदलत्या चळवळीच्या स्वरूपाप्रमाणे मुखपत्रही बदललेले जाणवत आहे. आजकालच्या चळवळीच्या मुखपत्रात चळवळीच्या प्रतिबिंबाबरोबरच कार्यकर्त्यांचे व वाचकाचे प्रबोधन करणाऱ्या लेखांनासुद्धा स्थान असते.
डाव्या पक्षाचे ‘युगांतर’, ‘जीवनमार्ग’, नर्मदा बचाओ चळवळीचे आंदोलन वा केवळ मुद्रित आवृत्तीचे प्रकाशन करणारे पुरोगामी ‘जनगर्जना’ हे मासिक, ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ इ. स्टॉलवर मिळत नसल्यामुळे मुख्य प्रवाहातील नियतकालिकांत गणना होत नसावी; परंतु ही नियतकालिके वाचलीच जात नाहीत, हा समज चुकीचा आहे. उदाहरणार्थ, सुमारे सहा हजार वर्गणीदार असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ गेली तीस वर्षे सातत्याने प्रकाशित होत आहे. हे मासिक फक्त कार्यकर्ते वाचत नसून त्यांचे सर्व कुटुंबीय व मित्रमंडळी वाचत असतात. त्यामुळे वाचकांचे प्रबोधन करणाऱ्या लेखांनासुद्धा या मासिकात स्थान असते. गेल्या ३०-३२ वर्षांच्या अंकावर एक धावती नजर टाकल्यास आपल्याला हे नक्कीच जाणवेल. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘वार्तापत्रा’ची डिजिटल आवृत्ती वाचण्यासाठीसुद्धा लाखाहून जास्त वाचकांनी ‘वार्तापत्रा’च्या संस्थळाला भेट दिली आहे. ‘वार्तापत्रां’नी अनेक लहानमोठय़ा शेकडो कार्यकर्त्यांना लिहिते केले आहे. वेगवेगळय़ा विषयांवर, चळवळींच्या उपक्रमांवर हजारो पाने लिहिलेली आहेत व ते वाचलेही जातात आणि हे सर्व लिहीत असताना ते कधीच घाबरले नाहीत की कोर्ट- खटल्याच्या भीतीने डगमगले नाहीत. ‘वार्तापत्रा’ने कदाचित मराठी साहित्यात चमकणाऱ्या ताऱ्यांची भर घातली नसेल वा या मासिकात लिहिणाऱ्यांना मोठमोठे पुरस्कारही मिळाले नसतील. मात्र ‘वार्तापत्र’ हे केवळ कार्यकर्त्यांसाठी नसून या चळवळीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मदत करणारे, सहानुभूतीने या चळवळीकडे बघणारे यांच्यासाठीही आहे. ‘वार्तापत्रा’च्या वाचकांमध्ये सर्व स्तरांतील, वेगवेगळय़ा व्यवसायांतील, वेगवेगळय़ा वर्गातील वाचक आहेत. त्यामुळे या सर्वाना कळेल, त्यांची वैचारिक पातळी थोडी तरी वाढेल, अशा प्रकारचे लेख ‘वार्तापत्रा’त असतील याची दखल संपादक मंडळ नक्कीच घेत असते.

‘सत्यकथा’, ‘आजचा सुधारक’ (मुद्रित आवृत्ती), ‘अनुभव’, ‘अंतर्नाद’ यांसारख्या (केवळ) उच्चभ्रू वर्गाला एके काळी आवडणारी मासिके अस्तंगत झालेली आहेत. कथा, कविता, कादंबरी यांसारखे साहित्य प्रकाराबद्दलचे आकर्षण आटत असताना चळवळीची मुखपत्रे (सामान्य) वाचकांना वैचारिक खाद्य पुरविण्यात यशस्वी होत आहेत, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. त्यामुळे या मुखपत्रांनासुद्धा वाचनवाहक दर्जा देण्यात गैर काही नाही, असे वाटते. – प्रभाकर नानावटी, पुणे</strong>