‘लोकरंग’ (२९ जानेवारी) मधील भारत सासणे यांचा ‘अवध्य- सत्य’ आणि शफी पठाण यांचा ‘छुप्या दडपशाहीचे वर्तुळ’ हे दोन्ही लेख वाचले. शफी पठाण यांचा लेख वाचून खूप चीड आली. त्यात नमूद एतद्देशी साहित्यिक हे सरकारी कार्यकर्ते असल्यासारखे सरकारचे वर्तन असल्याचे चपखल जाणवले. शरीरातील ऊध्र्व भागाचा – मेंदूचा वापर करून समाजाला योग्य दिशा देणारे, माणूस बनवणारे; तरीही प्राप्त परिस्थितीत लाचार, पंगू होऊन सरकारचे आश्रित वा नोकर असल्यासारखे.. २००८ पासून सातत्याने साहित्यिकांना जाणीव करून देणारे सरकार कोणती क्रांती प्रतिक्रांती घडवून आणत आहेत ते सरकारी धुरीणांनाच ठाऊक. अशी परिस्थिती निर्माण होण्याला कारण साहित्यिकच! सरकारी कडबा खाऊन हा किंवा तो पुरस्कार पदरात पाडून सरकारची हाजी हाजी करण्यात मश्गूल असणारे सरकार शरण झाले तर नवल नाही.
बरे, हे साहित्यिक सासणे यांच्यासारखे तळागाळात जाणे पसंद करत नाहीत. सर्व काही बिदागी, येण्या-जाण्याचा खर्च इ. गणितात गुंतलेले हे बिच्चारे. मग सरकार अशा लोकांना मोजून पैजाऱ्या मारणार नाहीत कशावरून. सरकार हे चलाख. त्यांना यांचे बारकावे ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांना ‘मम’ म्हणण्यापलीकडे तूर्तास उपाय नाहीत. एखादा का जीव सरपटायला लागला की त्याची पुरती विल्हेवाट लावण्याचे शिल्लक राहते. या लेखात नमूद स्वावलंबित्व येईल तेव्हा येईल, नव्हे तो सुदिनच! पण तूर्तास साहित्यिकांनी कंबर कसून कामाला लागणे हे केव्हाही श्रेयस्कर. – अॅड. किशोर रमेश सामंत
अवध्य कोण? असा प्रश्न उरतोच!
‘लोकरंग’ (२९ जानेवारी) मधील भारत सासणे यांचा ‘अवध्य सत्य’ हा लेख वाचला. अवध्य म्हणजे वध करण्यास योग्य/ शक्य नसलेले या अर्थाने असेलही, पण सत्य बोलणारा महात्मादेखील सत्याचे वेगळे दर्शन झालेल्यांच्या गोळीचा सहज बळी होतो. सामान्यांचे आळीपाळीने पाडगावकरांच्या ‘सलाम’ कवितेतल्या निवेदकासारखा सलाम करत जगणे चालू राहते! – गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर
या लेखकांच्या धाडसीपणाला दाद
‘लोकरंग’ (८ जानेवारी) मधील ‘‘अकादमीस्टां’ चा आत्मशोध’ अंतर्गत प्रवीण बांदेकर यांचा ‘बाहुल्यांच्या खेळाची खेळी’ व पवन नालट यांचा ‘अस्तित्वाच्या कोवळय़ा देठासाठी’ या दोन लेखांमध्ये एक समान धागा दिसून आला. सामान्य माणूस इथल्या संस्कृतीशी, समाजकारणाशी व अर्थकारणाशी झुंजत आहे. या सामान्य लोकांचे प्रश्न वेगळे आहेत, तसेच त्यांच्या समस्याही वेगळय़ा आहेत. असे असतानादेखील समाजातील बुद्धिवंतांनी स्वत:ला संकोचून घेतल्याचे दिसून येते. पूर्वी शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत यांनी त्या त्या काळातल्या वास्तवाचे भान जाणून लोकांचे प्रबोधन केले. तसेच त्यांच्या समस्यांवर परखडपणे आपली मते वर्तमानपत्रातून, जाहीर सभांमधून व्यक्त केली. अलीकडच्या काळात अशा लोकांची संख्या विरळ झाली असून, जे कोणी अशाप्रकारचे धाडस करतात त्यांना अनेक प्रकारच्या टीकेला तोंड द्यावे लागते. किंवा त्यांना बेदखल केले जाते. या दोन्ही लेखकांनी त्यांच्या लेखनामधून समाजाचे वास्तव चित्र उभे केले आहे. त्यांच्या धाडसीपणाला सर्वानी दाद द्यायला हवीच. – प्रा. अनिता साळुंखे, कराड</p>
पालकांच्या डोळय़ांत अंजन घालणारी गोष्ट
‘बालमैफल’मधील ‘नवे साल नवा अंदाज’ ही मेघना जोशी यांची गोष्ट सुंदर होती. आमच्यासारख्या कित्येक पालकांच्या डोळय़ांत अंजन घालणारी होती. आजकाल पालकांना आपल्या मुलांकरिता द्यायला वेळ खूप कमी असतो. त्यात मोबाइलचा अतिवापर ही एक समस्याच झाली आहे. अशावेळी पालकांनी छोटय़ाछोटय़ा गोष्टींतून मुलांसमोर कसा आदर्श ठेवायला हवं; ते समर्पकपणे या गोष्टीत सांगितलं आहे. कुठलीच गोष्ट वाईट नसते; परंतु तिचा वापर कोण कसा करतो यावर तिचा बरे-वाईटपणा ठरतो. या कथेतला मुलगा खूपच समंजस आहे. आपल्या आजीने वापरलेले शब्द जिवंत ठेवण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे. आजही मराठी अथवा बोलीभाषेतले अनेक शब्द काळाच्या ओघात नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत. त्यांना वाचविण्याची जबाबदारी आपलीच आहे आणि तरंच आपली भाषा जिवंत राहील. – मंदार सांबारी
lokrang@expressindia.com