‘लोकरंग’मधील (३० सप्टेंबर) कल्पना लाजमींवरील ‘‘कल्पना’तीत : चित्रपट आणि जीवनही!’ या लेखात अरुणा अन्तरकर यांनी स्त्री-दिग्दर्शकांची भारतात होणारी परवड नेमक्या शब्दांत मांडली आहे. अर्थपूर्ण चित्रपटांपेक्षा गल्लाभरू आणि चमत्कृतीपूर्ण, अनाकलनीय चित्रपटांची चलती कशा प्रकारे होते, हे त्यांनी ‘शोले’ सिनेमाचा दाखला देऊन सांगितले. पुढे त्या असेही म्हणतात, की ‘शोले’ हा ‘मेरा गाव मेरा देश’वरून सही सही उचलला आहे. खरं आहे हे! ‘मेरा गाव मेरा देश’मध्ये जयंत (अमजदखानचे वडील) यांना लष्कराचे निवृत्त अधिकारी दाखवले होते. त्यांना एकच हात असतो. गावकऱ्यांवर जुलूम करणाऱ्या (देखण्या) विनोद खन्नाचे नाव ‘जब्बर सिंग’ असते. धर्मेद्र इथेही दारू पिणारा व नायिकेला प्रेमजाळ्यात ओढण्यासाठी विनोदी अंगविक्षेप करणारा एक भुरटा चोर दाखवला होता. जयंत इथे त्याचा उपयोग जब्बर सिंगला संपवण्यासाठी करतो. ‘शोले’त एक अधिकचा नायक, अधिकची नायिका म्हणून विधवा सुनेचे पात्र, पोलिसातल्या संजीवकुमारचा अधिकचा एक हात गेलेला, त्यासाठी अधिकचा नोकर आणि ‘जब्बर’ऐवजी ‘गब्बर’ सलीम-जावेद जोडीने आणला. परंतु अशा चौर्यकथेचा इतिहास पार हॉलीवूडपर्यंत जातो. १९५४ मध्ये प्रदर्शित झालेल्या जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावाच्या ‘सेव्हन सामुराई’ या अभिजात चित्रपटावर अनेकांनी आपला उदरनिर्वाह केला आहे. १९६० चा हॉलीवूडपट ‘मॅग्निफिसन्ट सेव्हन’ हा त्यावर हुबेहूब बेतला होता. आपल्याकडे त्यावर ‘चायना गेट’ हा असफल सिनेमा आला होता. त्याअगोदर वरील दोन हिंदी सिनेमांव्यतिरिक्त ‘काला सोना’, ‘प्रतिज्ञा’, ‘थानेदार’ असे चित्रपट कथेत व पात्रांत थोडाफार फरक करून आले. बऱ्यापैकी यशस्वीही झाले. कारण बुऱ्यावर भल्याचा विजय करणे हे सामान्य माणसांना वास्तवात जमत नाही. मग ते पडद्यावरच्या असल्या नायकांना कवटाळून बसतात. समाजातले विकट सत्य दाखवणारा आरसा कुणालाच नको असतो. भयानक, विद्रूप, विनोदी, पारलौकिक व आभासी प्रतिबिंबाचे आकर्षण नेहमीच असहाय दर्शकांना असते. जोपर्यंत भारतीय प्रेक्षकांची मनोवृत्ती अशा प्रकारची असणार आहे तोपर्यंत दर्जेदार सिनेमांची वानवा आपल्याला भासणार आहे, हे नक्की!

– सुभाष अंतू खंकाळ, नवी मुंबई</p>