‘लोकरंग’मधील (१० जून) रवींद्र पांथरे यांचा ‘नाटय़निर्माते व्यावसायिक कधी होणार?’ हा लेख वाचला. व्यावसायिकाचे खरे काम त्याच्या गिऱ्हाईकाचे हित जपण्यापासून सुरू होते. नाटय़निर्मात्यांनी प्रेक्षकांचे हित जपायला हवे. प्रेक्षकांशी संवाद साधून त्यातून प्रेक्षकाला काय हवे, ते द्यायला पाहिजे. जे उपक्रम राबविले जातील ते काळानुसार अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि नावीन्यपूर्ण असायला हवे. त्यासाठी प्रेक्षकाकडून घ्यायचे पैसे हे प्रेक्षकाला आणि निर्मात्यालाही ‘रास्त किंमत’ म्हणता येईल इतके असावेत. नाटय़निर्मात्याने एखाद्या प्रयोगातून येणारे उत्पन्न आणि त्यासाठीचा खर्च याचे गणित आधीच मांडायला हवे, हा पाथरे यांचा आग्रह योग्यच आहे. नाटय़व्यवसायात काळ्या पैशाचे प्राबल्य कमी करण्यासाठी ‘कॉर्पोरेटायझेशन’चा मार्ग हा योग्य असून त्यामुळेच प्रेक्षकाचे हितसंवर्धनही साधेल. नाटय़निर्मात्यांनी आणि त्यांच्या संघानेही सरकारी अनुदानासारख्या कुबडय़ा घेऊन चालणे थांबवावे; व्यावसायिकाला ते शोभत नाही. शिवाय अशा कुबडय़ांचा आधार घेऊन चालल्यामुळे कोणताही व्यावसायिक आपल्या क्षमता विसरायला लागतो. नाटय़निर्माते आणि त्यांचा संघ सध्या या विसराळूपणाच्या पातळीवर आहेत.

नीतितत्त्वे असलेली नियमावली तयार करणे व ती कठोरपणे अमलात आणणे ही संबंधित संस्थांच्या शिखर संस्थेची जबाबदारी असते. चार्टर्ड अकाऊंटंट, कॉस्ट अकाऊंटंट, डॉक्टर अशा व्यावसायिकांना जाहिरात करून गिऱ्हाईकाला आकर्षित करण्यास मनाई करणारे नीतितत्त्व त्या-त्या संघटनांच्या नियमावलींमध्ये आहे. नाटय़निर्माता संघाने अशी नियमावली तयार करून ती कठोरपणे राबवली पाहिजे. असे झाले तर निर्माता संघही प्रेक्षककेंद्रित बनेल. प्रेक्षककेंद्रित संघही मग व्यावसायिक म्हणता येईल इतपत बदलेल.

व्यावसायिक बनलेल्या निर्माता संघाला नाटय़व्यवसायातील इतर ठिकाणचे (अगदी परदेशातीलही) नाटय़विषयक उपक्रम अभ्यासावे लागतील. व्यावसायिकाला असा अभ्यास करून नेहमीच ‘अपडेट’ राहावे लागते. बाहेरच्या जगात नवीन होणारे नाटय़विषयक उपक्रम लक्षात घेऊन निर्माता संघाला प्रेक्षकहितासाठी आपल्या सभासदांना- म्हणजे नाटय़निर्मात्यांना सकारात्मक सूचना द्याव्या लागतील. यामुळे संघातील भांडणे, तट-गट आणि कुरघोडीचे प्रकार हळूहळू थंडावतील. हा त्यांचा व्यावसायिकतेकडे जाण्याचा मार्ग असेल. नाटय़निर्मात्यांनाही ते दिशादर्शक ठरेल. याचा परिणाम प्रेक्षक हितसंवर्धनात होईल.

– विलास वाडकर

 

रोखठोक आणि अचूक भाष्य

‘नाटय़निर्माते व्यावसायिक कधी होणार?’ हा रवींद्र पाथरे यांचा लेख वाचला. नाटय़निर्माते आणि त्यांची तथाकथित व्यावसायिकता यावर अचूक भाष्य करणारा हा लेख छानच झाला आहे. नाटय़निर्मात्यांनी मराठी रंगभूमीची खरंच रया घालविली आहे. ते लेखात रोखठोकपणे मांडले आहे. हे हल्ली कोणी करेनासे झाले आहे. या लेखाच्या निमित्ताने ते झाले आहे.

– विजय घोरपडे