‘लोकसत्ता गप्पा’मधील सई परांजपे यांच्या मुलाखतीचे ‘सर्जनात स्त्री-पुरुष भेद कशाला?’ या शीर्षकाखालील शब्दांकन (२६ ऑगस्ट) वाचले. परांजपे यांचे विचार वाचकांना अंतर्मुख करावयास लावणारे आहेत. नाटय़, चित्रपट आणि नभोवाणी या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या परांजपेंना सध्याच्या टीव्ही वाहिन्यांवरील मराठी मालिका पाहाव्याशा वाटत नाहीत. शिवाय इंग्रजी मथळे असलेली नाटके त्यांना पाहावयास आवडत नाहीत. त्यांचा मराठीचा आग्रह बिनतोड आहे. चित्रपट आणि नाटय़ क्षेत्रात काम करणाऱ्या तमाम कलाकारांनी त्यांचा हा इशारा ध्यानात घ्यायला हवा.

– नारायण खरे, पुणे</strong>

‘संस्कृती’ हा शब्द योग्यच!

‘लोकरंग’मधील (२६ ऑगस्ट) ‘धारणांचे धागे’ या हेमंत राजोपाध्ये यांच्या सदरातील ‘नव्या वळणांकडे जाण्यापूर्वी..’ हा भारदस्त भाषाशैलीतील लेख आणि त्यावरील २ सप्टेंबरच्या अंकात ‘पडसाद’ सदरातील जया नातू यांचे पत्रही वाचले. ‘संस्कृती हा शब्द मूळचा भारतीय नव्हे’ हे नातू यांनी काही संदर्भाचा आधार घेऊन सांगितले असले तरी ते योग्य वाटत नाही.

‘सम् + कृ’ या धातूपासून ‘संस्कृत’ आणि ‘संस्कृती’ हे शब्द तयार झालेले आहेत. ‘सम्’ उपसर्ग असताना ‘कृ’ धातूला ‘स्’ (सुट्) असा आगम होतो. याविषयी अधिक विवेचन हवे असल्यास ‘सिद्धान्त कौमुदी’तील पुढील सूत्रे पाहावीत- ८/३/५, ८/३/२, ८/३/४, ६/१/१३७, ८/३/३४.

दुसरे असे की, ‘A Sanskrit English Dictionary By M. Monier Williaml’ या शब्दकोशात ‘संस्कृत’ आणि ‘संस्कृती’ हे दोन्हीही शब्द आले आहेत. या शब्दकोशाची प्रथमावृत्ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने इ.स. १८९९ मध्ये काढली होती. तेव्हा इतिहासकार राजवाडे यांनी ‘कल्चर’ या शब्दाचा ‘संस्कृती’ हा अनुवाद केला तो योग्यच आहे.

– डॉ. गीता पेंडसे

संस्कृत आणि ‘संस्कृती’ 

‘पडसाद’ सदरात जया नातूंचे ‘संस्कृती हा शब्द मूळचा भारतीय नव्हे’ या शीर्षकाचे पत्र वाचून मनात काही विचार उपस्थित झाले, ते इथे मांडतो.

१) पत्रलेखिका म्हणतात, ‘संस्कृती हा शब्द मूळचा भारतीय नव्हे. संस्कृत वाङ्मयात किंवा शब्दकोशांतही हा सापडायचा नाही.’ परंतु हा शब्द वेदांपासून अनेक प्राचीन संस्कृत ग्रंथांत आणि त्यामुळे अर्वाचीन शब्दकोशांतही सापडतो. उदा. ‘शुक्लयजुर्वेदा’तील मंत्रात (७.१४) सोमावर करायच्या संस्काराला (प्रक्रियेला) उद्देशून ‘संस्कृति’ असा शब्दप्रयोग केलेला आहे.

२) संस्कार शब्दाचे ‘प्रगल्भ-चोख बनवणे, उजळवणे, गुणवर्धन करणे, शिक्षण देणे, शुद्ध-पावन करणे, तयार-सज्ज-सिद्ध करणे, अलंकृत-सुशोभित-सजावट करणे, (अन्न) शिजवणे-सजवणे, मन-बुद्धी-स्मरणशक्ती यांच्यावरील ठसा-छाप-परिणाम’ इत्यादी अर्थ आहेत. संस्कृती म्हणजे ‘संस्कार करण्याची क्रिया’ आणि संस्कृत म्हणजे ‘संस्कार केला गेलेला’! ‘धर्मसंस्कार’ या शब्दाबद्दल तर अनेक धर्मग्रंथांत असंख्य चर्चा झालेल्या आहेत.

३) पाश्चात्त्यांची ‘कल्चर’ ही संकल्पना मात्र आपण शंभर-दीडशे वर्षांपूर्वी स्वीकारली. या संकल्पनेसाठी मराठीत रूढ झालेला ‘संस्कृती’ हा शब्द रवींद्रनाथ टागोरांना इतका आवडला, की त्यांनी आपण वापरत असलेला ‘सभ्यता’ हा शब्द बाजूला सारून ‘संस्कृती’ हा शब्द वापरणे सुरू केले, असे त्यांनी स्वत:च म्हटल्याचे मी वाचलेले आहे.

४) ‘प्राकृत’ अशी कुठलीही एक भाषा नाही. प्राचीन काळी बोलल्या जाणाऱ्या विविध ठिकाणच्या स्थानिक बोली म्हणजे प्राकृत भाषा! एकमेकांपासून दूरवरच्या प्रदेशांतील स्थानिक प्राकृत भाषा परस्परांहून खूपच वेगळ्या असतात. संस्कृत-प्राकृत भाषांचे संबंध म्हणजे काहीसे हल्लीची एखादी प्रमाण भाषा आणि तत्संबंधित त्या भागातील बोली भाषा यांच्यामधील संबंधाप्रमाणे म्हणता येतील. दोन्हींमध्ये सतत गरजेप्रमाणे शब्दांची देवाण-घेवाण होत असते आणि त्यातून त्या परस्परांना संपन्न करत असतात. प्राचीन संस्कृत नाटकांत काही पात्रे संस्कृतमध्ये बोलतात तर काही प्राकृतात. यावरून समाजातील सर्वानाच दोन्ही भाषा नीट कळत होत्या, हे स्पष्ट होते.

५) वैदिकांनी आपल्या भाषेला संस्कृत भाषा असे नाव दिल्याचा संदर्भ वैदिक साहित्यात कुठेही सापडत नाही. शिवाय पूर्वीच्या काळी अशी नामकरणाची पद्धतही नव्हती. २५०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या पाणिनि मुनींनी तत्कालीन भाषेच्या संबंधात ‘भाषायाम्’ असे, तर वेदांमधील भाषेच्या संबंधात ‘वेदे’, ‘छन्दसि’, ‘मन्त्रे’ असे सूचक शब्द वापरलेले आहेत. त्या भाषांचा संस्कृत भाषा असा कुठेही उल्लेख केलेला नाही. मात्र, पाणिनि यांनी ‘संस्कृत’ असा शब्द ‘अद्भि: संस्कृतम्।’ (४.४.१३४) आणि ‘संस्कृतं भक्षा:।’ (४.२.१६) या सूत्रांमध्ये ‘उत्तम प्रकारचे, सुसंस्कारित अन्नपदार्थ’ या अर्थाने वापरलेला आढळतो. आचार्य पाणिनिंनी व्याकरणाचे चोख नियम सांगून सुव्यवस्थित केलेल्या भाषेला ‘संस्कृत’ असे संबोधन पुढील टीकाकारांनी आदर आणि कौतुकाच्या भावनेतून दिलेले आढळते. भरतमुनींचे ‘नाटय़शास्त्र’, दण्डीचा ‘काव्यादर्श’, मम्मटाचा ‘काव्यप्रकाश’ आणि अशा पुढील काळातील अनेक भाषेसंबंधातील ग्रंथांत संस्कृत भाषेचा उल्लेख आढळतो. म्हणजे भाषेबद्दलचे ‘संस्कृत’ असे उल्लेख आधी विशेषणात्मक होते; परंतु तो शब्द पुढे कधी तरी विशेषनाम म्हणूनच रूढ झाला.

६) पाणिनिय ‘अष्टाध्यायी’ ग्रंथात सांगितलेल्या ‘संपरिभ्यां करोतौ भूषणे। (६.१.१३७) आणि ‘समवाये च’ (६.१.१३८) अशा दोन सूत्रांद्वारे ‘कृ’ धातूला ‘सम्’ किंवा ‘परि’ हे उपसर्ग लागून ‘भूषवणे, गुणवर्धन करणे, एकत्र आणणे’ अशा अर्थाचे शब्द तयार होत असताना त्या धातूला आधी ‘सुट्’ (स्) असा आगम लागतो. त्यातूनच संस्कार, संस्कृत, संस्कृती, संस्करण, तसेच परिष्कार, परिष्कृत, परिष्करण, इत्यादी शब्द सिद्ध होतात. ही सूत्रे पाणिनिंनी तेव्हाच्या रूढ भाषेचे निरीक्षण करूनच सांगितलेली आहेत. त्यासाठी ओढूनताणून कुठलाही नवीन नियम करायची त्यांना गरज नव्हती. कारण त्या काळी त्यांच्या भाषेला वा त्यांच्या बऱ्याच आधीच्या वैदिक भाषेला उद्देशून ‘संस्कृत’ असे नाव कुणीही वापरलेले नव्हते.

७) ‘कृ’ (दीर्घ कृ) या धातूला ‘सम्’ हा उपसर्ग लागून ‘ॠदोरप्’ (३.३.५७) या सूत्रानुसार पुढे संकर, संकृत, संकरित, इत्यादी शब्द सिद्ध होतात. संस्कृत शब्दातील ‘कृ’ (८ उ.प.) आणि संकर शब्दातील ‘कृ’ (६ प.प.) हे स्वतंत्र धातू असून त्यांची विविध शब्दरूपेदेखील भिन्न-भिन्न आहेत. त्या धातूंमध्ये गल्लत होऊ  देता कामा नये.

८) पत्रलेखिकेने ज्यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे, ते डॉ. आ. ह. साळुंखे स्वत: संस्कृत भाषेचे विद्वान प्राध्यापक आहेत. त्यांनी या विषयावर अधिकृतपणे प्रकाश पाडून सर्वाच्या शंकांचे निराकरण करावे, असे वाटते.

– सलील कुळकर्णी

‘संस्कृती’ हा मराठीत रुळलेला शब्द

जया नातू यांचे ‘संस्कृती हा शब्द मूळचा भारतीय नव्हे’ या शीर्षकाचे पत्र वाचले. त्यांनी यासाठी दुर्गाबाई भागवत आणि डॉ. आ. ह. साळुंखे या विचारवंतांच्या साक्षी काढल्या आहेत. परंतु ‘संस्कृती’ हा मराठीत रूळलेला  शब्द आहे, मग तो प्रतिशब्द म्हणून उपयोजिलेला का असेना! म्हणजे तो भारतीय आहे. ‘कल्चर’ ही संकल्पना कदाचित अभारतीय असू शकेल, पण त्याचा मराठी वा संस्कृत प्रतिशब्द भारतीय नाही हे म्हणणे योग्य वाटत नाही.

– डॉ. विजय आजगांवकर