१ मेच्या ‘लोकरंग’मध्ये गिरीश कुबेर यांचा ‘शतखंडित महाराष्ट्र!’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखावरील काही निवडक प्रतिक्रिया..

‘शतखंडित महाराष्ट्र!’ या गिरीश कुबेरलिखित लेखात वैचारिक क्षेत्रातील कप्पेबंदी, वैचारिक वादाला आलेले असहिष्णु व हिंसक स्वरूप आणि वैचारिक क्षेत्राचा ढासळत गेलेला दर्जा याविषयी ऊहापोह करून त्याची कारणमीमांसादेखील केली गेली आहे. एकूणच विचारक्षेत्राचे राजकीयीकरण होणे हे हानीकारक आहे. राजकारण हा मानवी जीवनाचा अविभाज्य आणि आवश्यक भाग आहे. असे असले तरी त्याची व्याप्ती व परीघ किती वाढू द्यायचा याचा विचार सध्याच्या काळात सुटलेला आहे असे वाटते. जीवनातील प्रत्येकच गोष्ट आपण राजकारणाशिवाय बघू शकत नाही. राजकारण आवश्यक असले तरी पुरेसे नाही. आणि वैचारिक क्षेत्रात राजकीय तत्त्वज्ञान सोडल्यास ती एक अडचणच आहे. जोनाथन हैद्त या मानसशास्त्रज्ञाने काढलेला निष्कर्ष असा- ‘एकूण जगात धर्माचा प्रभाव आणि म्हणून धार्मिक कारणाने होणारी हिंसा ही कमी होत आहे, पण त्याची जागा आता राजकीय विचारधारांनी घेतली आहे आणि विविध राजकीय विचार हे धर्माचे स्वरूप घेत आहेत. या विचारधारांचे अनुयायी धार्मिक अनुयायांसारखेच कमालीचे असहिष्णु आणि हिंसक बनत आहेत!’
धर्मात एकच कोणती गोष्ट जर आक्षेपार्ह असेल तर ती आहे त्यातील अपरिवर्तनीयता. कुठल्याच बदलाला नकार देण्याने जो बंदिस्तपणा धर्माला येतो, तो आपल्या विचारविश्वालाही आला तर धर्मात आणि वैचारिक/ राजकीय दृष्टिकोन यांत फरक तो काय?
शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, कला, कलासमीक्षा अशा सर्वच क्षेत्रांत राजकीय अभिनिवेश आपल्याला नडत आहे. राजकारणात सर्वानाच कल्याणकारी राज्य करायचे आहे. पण माझ्याच मार्गाने ते शक्य आहे असे एकमेकांना पांगळे करणारे राजकारण सध्या सुरू आहे. सारेच देवाच्या दर्शनाला निघालेले आहेत, पण डावीकडून जायचे की उजवीकडून, याच भांडणात अडकून पडले आहेत.
सगळेच विचारविश्व असे राजकारणभारित होणे यात प्रसारमाध्यमांनीही चोख भूमिका बजावली आहे. गेली पन्नास वर्षे एकाच विचारसरणीतील विचारवंतांचे प्राबल्य प्रसारमाध्यमांवर होते. यापेक्षा वेगळे बोलणाऱ्यांची जागा माध्यमांतून हळूहळू आकसत गेली आणि सगळीच माध्यमे पूर्वग्रहयुक्त होत गेली. यामुळेही वैचारिक क्षेत्रात थिजलेपण, साचलेपण येत गेले. ‘लोकसत्ता’ आणि अन्य काही सन्माननीय अपवाद वगळता अजूनही ‘हा आपला- याला पुढे आणा, हा पलीकडला- याला अनुल्लेखाने मारा’ हे चालूच आहे. वृत्तवाहिन्यांवरील वैचारिक मारामाऱ्या बघितल्या की चक्क मळमळू लागते. टीआरपी वाढविण्यासाठी उठवळ विचारवंतांत साठमारी लावली जाते. त्यात कोणाचे प्रबोधन होते कोण जाणे! पण त्यातून मनोरंजनपण धड होत नाही. शिवाय सार्वजनिक कानगोष्टींचा (गॉसिप) दर्जाही घसरतो. आपल्याच कोषात पाठ करून फुरंगटून बसलेल्यांना सन्मुख करायची जबाबदारी म्हणून प्रसारमाध्यमांचीच आहे. प्रसारमाध्यमांनी ‘आपण आमचे वाचक का नाही आहात?’ असे सर्वेक्षण केले तर काही मार्ग निघू शकेल.
– अजय ब्रह्मनाळकर

विचार लादण्यातून मूल्यऱ्हास
‘शतखंडित महाराष्ट्र!’ हा लेख महाराष्ट्र दिनाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्यांच्या मनाला चटका देणारा वाटला. चित्रपट वा नाटकावर अभिप्राय देताना तर्कसुसंगतीत थोडी चूकभूल माफ करता येऊ शकते, पण जिथे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारी विधानं केली जातात तिथे ‘ते’ आणि ‘आपण’ हा बाणा जरा बाजूला ठेवून साऱ्या राजकारणी नेत्यांनी आणि समाजघटकांनी एकमत दाखवणं आवश्यक आहे. मुळात ही शिकवण्याची गोष्टच नाही. टिळक-आगरकर, अत्रे-भावे यांच्याप्रमाणेच बाळासाहेब ठाकरे-शरद पवार यांच्यासारख्या वैचारिक मतभेद असलेल्या व्यक्ती एकमेकांच्या विचारांचा आदर करताना दिसतात.
स्त्रीशिक्षण, स्वातंत्र्य, जातपात, बालविवाह, कुमारीमाता, विधवाविवाह, केशवपन अशा अनेक संवेदनशील विषयांवर वैचारिक पातळीवर वाक्युद्ध झालं, पण त्यासाठी सर्वस्पर्शी अभ्यासावर आधारित आपापले विचार संयतपणे मांडले गेले. आज मात्र हा संयम सुटलेला दिसतो आहे.
अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची न होणारी तोंडमिळवणी, महागाईचे चटके, पावसाची अवकृपा, बेभरवशी शेती, उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा होत चाललेला ऱ्हास या सगळ्यामुळे पुन्हा एकदा जात, धर्म, पंथ यांवर आधारीत आपापल्या समाजघटकांनाच फक्त न्याय मिळाला पाहिजे, या आग्रही विचाराचा मारा मोठय़ा प्रमाणावर होऊ लागला आहे. त्यातून शिक्षण व नोकरीत आरक्षण, पाणी, वीज, शेतीयोग्य जमीन यांचा लाभ आपल्याच लोकांना मिळावा आणि बाकीच्या ‘त्यां’नी आपलं काय ते बघावं, ही वृत्ती फोफावू लागली आहे. यात पश्चिम महाराष्ट्र सरकारच्या कृपेचा सर्वात मोठा लाभार्थी आहे. म्हणून मग मराठवाडा, विदर्भ वेगळे केले जाऊन त्यांची स्वतंत्र राज्ये स्थापन केली जावीत, हा विचार प्रबळ होऊ लागला आहे. याला खतपाणी घालणारं वातावरणही तयार होत आहे. यात कळीची भूमिका निभावतात ती जलद दूरसंपर्क तसेच प्रसारमाध्यमं! इथं वेळ कुणाला आहे दुसऱ्याचे विचार समजावून घ्यायला आणि आपल्या विचारांच्या समर्थनार्थ तर्कशुद्ध मांडणी करायला? मग यावर जहाल उपाय शोधला जातो तो विरोधी विचार व्यक्त करणाऱ्यालाच संपवण्याचा! जो अंधश्रद्धेविरोधातील दाभोळकर आणि पानसरेंच्या बाबतीत क्रूरपणे अमलात आणला गेला.
महाराष्ट्राचं हे दुर्दैवी खंडन थांबवायचं असेल तर सर्वच अभिमान्यांनी संपर्कमाध्यमांच्या आहारी जाऊन ऐकीव माहितीच्या आधारे समाजातल्या दुसऱ्या घटकांवर हल्लाबोल करणं आणि प्रसारमाध्यमांच्या हाती कोलीत देऊन दुहीच्या आगी लावणं थांबवावे. आपले विचार सुसंगतपणे, बुद्धिप्रामाण्यानं मांडण्याचा आणि त्याआधी दुसऱ्यांचे विचार समजावून घेऊन त्यावर- त्यांच्या जागी आपण असतो तर कसे वागलो असतो, याचाही विचार प्रत्येकाने करायला हवा. समस्येवर चर्चेतून, वाद-संवादातून, वाटाघाटींतून मार्ग काढायला योग्य तेवढा अवकाश देणंही आवश्यक आहे.
– श्रीपाद कुलकर्णी

आज नैतिक अन् वैचारिक प्रगल्भतेची जरबच उरलेली नाही!
या लेखात म्हटल्याप्रमाणे परस्परांचा आणि समोरच्याच्या मताचा आदर राखून मुद्देसूदपणे आपले मत पटवून देण्यासाठी लागणारी बौद्धिक क्षमता असलेली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्यात झडलेले वाद यांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. परंतु आताची परिस्थिती बघितली तर पार निराशा होते. कारण अशी व्यक्तिमत्त्वे आता कुठेच आढळत नाहीत. दुसऱ्याच्या मताचा आदर करण्याची सहिष्णुताच लोप पावली आहे की काय, असे वाटते. आपल्या मुद्दय़ाला समोरच्याने विरोध केला की सरळ गुद्दय़ावर उतरून त्याचे तोंड बंद करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. एकूणच माणसातील असंस्कृतपणा आणि ‘माझे तेच खरे’ म्हणण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. पुरोगामी म्हणून ज्या महाराष्ट्राचा उदोउदो आपण सतत करत असतो, त्याची सध्याची वैचारिक आणि बौद्धिक पातळी लाज वाटावी एवढी खालावली आहे. कारण नैतिकता आणि वैचारिक प्रगल्भता असणाऱ्या माणसांची जी एक जरब असते, तिचीच आज वानवा आहे. त्यामुळे लोकांमध्ये नुसता उन्माद वाढतो आहे आणि त्यात महाराष्ट्राची नौका हेलकावे खाते आहे.
– उज्ज्वला सूर्यवंशी, ठाणे.

गुजरात कुठे आणि आपण कुठे!
१९८५ साली माझे अहमदाबादला वास्तव्य होते. त्यावेळी तेथील अग्रगण्य दैनिकांमध्ये गुजरातची दुर्दशा व महाराष्ट्रातील संपन्नतेवर लेख प्रसिद्ध झालेले मी वाचले होते. तेव्हा मला खरोखरच माझ्या महाराष्ट्र राज्याचा अभिमान वाटला होता. कारण त्यावेळी गुजरात दंगलीत होरपळत होते. आज मात्र मला लाज वाटते आहे. महाराष्ट्रात परप्रांतीयांनाच फक्त नोकऱ्या मिळतात. स्त्रिया मद्य कंपन्यांचे समर्थन करतात. डान्सबारला छुपा पाठिंबा मिळतो. आज गुजरात कुठे आहे आणि आपण कुठे!
– सी. डी. देशपांडे

विचार करायला वेळ आहेच कुठे?
लेखात वर्णिल्याप्रमाणेच सध्याचे वातावरण आहे. परंतु आजच्या तरुणाईला दिशादर्शन करेल असे नेतृत्वच दृष्टिपथात नाही. लेखात सध्याची परिस्थिती निर्माण होण्यास जी कारणे चर्चिली आहेत, ती योग्यच वाटतात. हल्लीच्या अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीत पालकांना आपल्या मुलांवर संस्कार करायला वेळच नसतो. तसेच कुटुंब छोटे झाल्यामुळे घरातल्या एखाद् दुसऱ्या असलेल्या मुलांचे सर्व लाड पुरवले जातात. कुठल्याही गोष्टीला नकार ऐकण्याची त्यांना सवयच लागत नाही. त्यामुळे त्यांचा स्वभाव आत्मकेंद्री बनतो. अशांना जराही विरोध करणारा लगेचच शत्रुपक्षात जमा होतो. हे लोण मग व्यक्तिगत स्तरावरून सामाजिक स्तरावर वेगाने पसरते. वैचारिक साहित्य- वाचनाचा अभाव, विषय समजून न घेताच ‘बोअर’ होण्याची वृत्ती, आसपासची भुरळ घालणारी चंगळवादी संस्कृती या साऱ्याचा एकत्रित परिणाम व्यक्तीवर आणि पुढे समाजावर होताना दिसतो आहे. तशात मनोरंजन आणि फालतू विचारांची देवाणघेवाण करणाऱ्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’सारख्या साधनांचा प्रच्छन्न वापर होताना दिसतो. या सगळ्यांतून स्वतंत्र विचार वा मनन करायला वेळ आहेच कुठे?
– केशव काळे

..तरच शतखंडितता संपेल!
लेखातील सर्व विवेचन मान्य होण्यासारखे आहे, तरीही त्यातून नैराश्याची भावना जागृत झाली. कारण लेखात काही ठळक उणिवा आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
शतखंडित मानसिकतेचे विवेचन करताना ‘असे का होते आहे’ आणि ‘यावर उपाय काय?’ याचा या लेखात उल्लेख नाही. ‘शतखंडित’ अवस्था भारतात आणि जगात फार पूर्वीपासूनच आहे. ही मानसिकता समाजमाध्यमांमुळे सेन्सॉरची कात्री न लागता प्रसिद्ध होऊ लागल्याने आज ती जास्त जाणवते. खरे तर ‘ते’ आणि ‘आपण’ ही मानसिकता मानवी स्वभावातील जन्मजात दोष आहे आणि तो शिस्तबद्ध प्रशिक्षणातून दूर होऊ शकतो. उदा. जपानमध्ये चालू लोकलमध्ये उसवलेली सीट शिवताना एका जपानी सहप्रवाशाला भारतीय प्रवाशाने पाहिले आणि त्याने उत्सुकतेपोटी प्रश्न केला- ‘आपण प्रवासी असूनही सीट का शिवता?’ तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘ही लोकल देशाची- म्हणजे माझी संपत्ती आहे. आणि फाटलेल्या सीटचा कुणाला त्रास होऊ नये म्हणून मी सीट शिवतो आहे.’
ही एकमयता बालपणीच्या संस्कारांतूनच येऊ शकते. विशिष्ट ध्येयाने शिक्षणात आमूलाग्र बदल करून व भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवून नव्याने भ्रष्टाचार होणार नाही याची खबरदारी घेतल्यास शतखंडिततेची वेळच येणार नाही.
– राजीव नागरे, ठाणे