माध्यमांतर करून पाहण्याचा तो एक ‘प्रयोग’!

‘गगनिका’ हे सतीश आळेकर यांचे स्मरणरंजनात्म सदर मी नेहमी उत्सुकतेने वाचत आलेलो आहे.

0007‘गगनिका’ हे सतीश आळेकर यांचे स्मरणरंजनात्म सदर मी नेहमी उत्सुकतेने वाचत आलेलो आहे. अगदी आळेकर वाडय़ातल्या ‘काकडीच्या कोशिंबिरी’च्या बेताचा जो उल्लेख अगदी सुरुवातीच्या लेखात आला होता त्यापासून. ५ जुलैच्या अंकातल्या त्यांच्या लेखात माझा उल्लेख त्यांनी केलेला आहे, त्यानिमित्ताने हे पत्र लिहीत आहे.
विजय तेंडुलकरांची ‘ओळख’ आणि ‘काळोख’ ही दोन्ही नभोनाटय़े होती, हे खरेच आहे. पण त्या दोन्हीमध्ये मला एक दिग्दर्शक म्हणून रंगमंचावरचा प्रयोग दिसत होता. तेंडुलकर स्वत: अशा प्रयोगाला परवानगी देत नव्हते तरी हट्ट धरून मी त्यांची परवानगी मिळवली होती, हे संबंधितांना माहीत आहे. माध्यमांतर करून पाहण्याचा तो एक ‘प्रयोग’ होता आणि तो यशस्वीही झाला. शिवाय ‘तेंडुलकरांचे संवाद म्हणणे’ हा एक स्वतंत्र ‘एक्झरसाइज’ असणार होता. तालमीत आम्ही ते कसे कसून केले त्याची आठवण सतीश आळेकरांची त्या दोन्ही प्रयोगांतली सहअभिनेत्री कल्पना भालेरावने (आता देवळणकर!) एका लेखात सविस्तर लिहिले आहे.
स्पर्धेतल्या ‘ओळख’च्या त्या प्रयोगाचे एक परीक्षक होते वासुदेव पाळंदे. सतीशने जिथे उमेदवारी केली त्या ‘पीडीए’ या संस्थेतले एक प्रमुख नट व दिग्दर्शक. शिवाय त्या दोन्ही प्रयोगांना महाविद्यालयीन प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.. त्यावेळच्या मानाने एक धाडसी प्रणयदृश्य असूनही! हे सगळे माहीत असूनही प्रयोगाला ‘चक्क’ पारितोषिक मिळाले, असा काहीसा तुच्छतादर्शक सूर सतीश आळेकरांनी लावला आहे याचे आश्चर्य वाटले. काहींना तसे आश्चर्य वाटणार नाही. त्या दोन्ही एकांकिकांच्या रंगमंचीय स्वरूपाचे निर्णय दिग्दर्शक म्हणून मी घेत असताना सतीश आलेकर तिथे होतेच. नभोनाटय़ामधून सेंद्रिय अनुभव (organic) साकारणाऱ्या रंगमंचीय प्रयोगाची ती प्रक्रिया त्यांनी जवळून पाहिली होती. आता मागे वळून पाहताना त्यांनी ते सगळे आठवले असते तरी खूप झाले असते.
अंगावर धो-धो येऊन कोसळणारे जसे आळेकरी नाटक असते, त्याचबरोबर एखाद्या ख्यालाप्रमाणे वळणे-वळसे घेत धीम्या गतीने आणि  आपल्या तब्येतीने जाणारे तेंडुलकरांचे, एलकुंचवारांचे नाटक असतेच असते. तेंडुलकर म्हणजे केवळ ‘घाशीराम’-‘सखाराम’ नाहीत, हे तर खरे की नाही?
सतीश आळेकरांच्याच ‘सामना’चा अगदी पहिलावहिला प्रयोग मी केला, ती एकांकिका तरी कुठे खास रंगमंचासाठी होती? रंगमंचाचा एक कोपरा एवढाच अवकाश त्या प्रयोगाला होता आणि दोन म्हातारे अखंड बोलत होते. माझ्या त्या प्रयोगालाही आळेकर आले होते. तर मग त्याबद्दल काय? असो.
– माधव वझे

जुन्या आठवणींचा कॅलिडोस्कोप
‘गगनिका’ हे सतीश आळेकर यांचे सदर अतिशय वाचनीय असते. घरातल्या वडीलधारी व्यक्तीकडून जुन्या आठवणी ऐकतोय (अधूनमधून होणाऱ्या विषयांतरासकट!) असा भास हे सदर वाचताना होतो. आणि मुख्य म्हणजे आळेकर हे कोणतीही गोष्ट संदर्भासहित स्पष्ट करतात. त्यामुळे घटनेच्या सनावळी, जुन्या नाटककारांच्या कारकीर्दीचा कालावधी, पुस्तकांची नावे, इ. माहिती वाचता वाचता सहज मिळून जाते. या सर्वामुळे या सदराला एक उच्च संग्राह्यमूल्यही लाभले आहे. सतीश आळेकर यांच्या या रंजक आणि माहितीपूर्ण सदराबद्दल धन्यवाद!
– सत्यव्रत इंदुलकर, ठाकूरद्वार, मुंबई.

जनतेची स्वकेंद्री वृत्तीच ऱ्हासाचे कारण!
२८ जूनच्या ‘लोकरंग’मधील डॉ. माधव गोडबोले यांचा  ‘सुटाबुटातली गुन्हेगारी!’ हा लेख वाचला. ‘राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे या प्रश्नाला आपण हात घालू शकलो नाही..’ हे त्यांचे विश्लेषण अपूर्ण वाटते. व्यक्तिगत पातळीवर जर बहुसंख्य लोकांना गुन्हेगारीची खरंच चीड असेल तर त्याचे प्रतिबिंब राजकीय इच्छाशक्तीमध्ये का पडत नाही? याची कारणे दोन असू शकतात. एक म्हणजे बहुसंख्य लोकांना स्वत:ला त्रास होणारी गुन्हेगारी नको असते; पण ‘इतरांना’ त्रास होणारी गुन्हेगारी मात्र ‘चालते.’ त्यामुळे जनमताचा रेटा निर्माणच होत नाही. (या तात्कालिक स्वार्थ पाहण्याच्या वृत्तीपायीच आज इतरांना होणारा त्रास उद्या माझ्या दारात येणार आहे याची जाणीवच लोकांना नसते. किंवा ‘तेव्हाचे तेव्हा पाहू’ अशी तरी त्यांची धारणा असते.) आपला दीर्घकालीन स्वार्थ नक्की कशात आहे, याची परिपक्व समज जोपर्यंत लोकांमध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत या स्थितीत बदल होणे कठीण आहे. दुसरे कारण म्हणजे आपल्या लोकशाहीतील काही कमतरतांमुळे जास्तीत जास्त लोकांच्या एकत्रित इच्छेचा ‘मसावि’ काय आहे, हे मतपेटीतून व्यक्तच होत नाही. आपल्याकडच्या मतदान पद्धतीमुळे मतदारांमध्ये अनेक प्रकारे फूट पाडून आपला त्यातला त्यात मोठा गट उभा केला की खरे बहुमत (५०% पेक्षा जास्त मते) नसतानाही पक्षाला विजयी होता येते. डझनावारी राष्ट्रीय (?) राजकीय पक्ष असणाऱ्या आपल्या देशात या मतदान पद्धतीमुळे लोकशाहीचा फक्त आभास निर्माण होतो.
केवळ तात्कालिक स्वार्थ पाहण्याची लोकांची वृत्ती आणि जोडीला मतदारांचा त्यातल्या त्यात मोठा गट बांधून निवडून येण्याची संधी यांच्या मिलाफामुळे ही भयानक कोंडी निर्माण झाली आहे. ज्या इंग्लंड-अमेरिकेची  उदाहरणे आदर्श म्हणून लेखात दिली आहेत, तेथील लोकांची स्वार्थाची जाण आपल्यापेक्षा खूप सखोल व परिपक्व आहे. त्यामुळे ते नानाविध अस्मितांच्या हिंदोळ्यांवर भाबडेपणाने झुलत राहत नाहीत. त्यामुळेच असेल कदाचित, पण तेथे दोनच प्रमुख राजकीय पक्ष आहेत, हेही यासंदर्भात विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखे आहे. स्वत:कडे वळलेली तीन बोटे ओळखून आपण कधी सुधारणार, यावर सर्व काही अवलंबून आहे.
   – प्रसाद दीक्षित, ठाणे.

‘दीपावली’ अंक आणि रॉय किणीकर
प्रतिभावंत चित्रकार दीनानाथ दलाल यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाल्याच्या निमित्ताने  गोपाळ नांदुरकर यांच्या ‘सौंदर्यसौष्ठवाचे ध्यासपर्व’ या लेखाच्या संदर्भातील वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे..
नांदुरकर लिहितात, १९४५ साली दीनानाथ दलालांनी ‘दीपावली’ या वार्षिकाची सुरुवात केली. खरं तर या विधानाची प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्यांनी आधी समजावून घ्यायला हवी होती.
दीनानाथ दलाल यांच्या कन्या प्रतिभा वैद्य ‘निवडक चिन्ह’ या अंकातील आपल्या ‘दलाल’ या लेखात पहिल्याच परिच्छेदात म्हणतात : ‘‘दीपावली’शी बाबांचे ऋणानुबंध जुळले ते रॉय किणीकरांमुळे. किणीकर संपादक होते आणि बाबा चित्रकार. साहित्यात त्यांना अधिक रस वाटू लागला तो किणीकरांमुळेच. काही कारणांमुळे नंतर किणीकर ‘दीपावली’त राहिले नाहीत.
‘दीपावली’च्या १९५६ च्या दिवाळी अंकात दीनानाथ दलाल हे स्वत:च लिहितात : ‘संपादक होण्याची महत्त्वाकांक्षा मी कधीच बाळगली नव्हती. साहित्याशी माझा संबंध केवळ वरवरचा! पण मला या क्षेत्रात ओढून आणण्याचे श्रेय रॉय किणीकरांचे. त्यांनीच माझा हात धरला आणि बळेच मला आपल्याबरोबर या क्षेत्रात ओढून आणले. किणीकरांसारख्या बुद्धिमान, कल्पक आणि रसिक लेखकाचे सहकार्य मला सतत नऊ वर्षे लाभले. संपादन हा अनेक अर्थानी माझ्या आयुष्यातला अपघात! किणीकरांच्या सहकार्यामुळेच मला तो सुसह्य़ झाला.’  (आधी केले; मग सांगितले!)
तर रवींद्र पिंगे ‘माणूस’च्या ६ फेब्रुवारी १९७१ सालच्या अंकात लिहितात : ‘‘दीपावली’ची मूळ शक्कल रॉय किणीकरांची. बाळ सामंत त्यावेळी संपादकीय साहाय्याला होते. मग खांदेपालट खूप झाला. ग. रा. कामत, विजय तेंडुलकर, गोपाळकृष्ण भोबे, प्रभाकर अत्रे आगेमागे येऊन गेले.’
‘दीपावली’ची सुरुवात १९४५ साली दलालांनी केली, असे जे लेखकाने म्हटले आहे ते खरे नाही. ‘दीपावली’ची सुरुवात १९४४ साली रॉय किणीकर यांनी केली. आणि हा १९४४ सालचा हा ‘दीपावली’ अंक माझ्या संग्रही आहे. रॉय किणीकर १९५३ पर्यंत त्याचे संपादक होते. त्यापैकी सात अंक माझ्याकडे आहेत. १९५३ साली हिंदीमध्ये ‘दीपावली’चा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला, त्याचे संपादकही रॉय किणीकरच होते.
तसा दीनानाथ दलाल आणि रॉय किणीकर यांचा दोस्ताना चालू राहिला होता. ‘दीपावली’च्या एका दिवाळी अंकात ‘मी एक कलंदर माणूस’ हा लेख दलालांनी किणीकरांकडून आवर्जून घेतला होता. १९६३ साली रॉय किणीकर यांचे ‘ये गं ये गं विठाबाई’ हे राज्य पारितोषिकप्राप्त नाटक प्रकाशित झाले. त्याचे कव्हर किणीकरांनी दलालांकडूनच आपलेपणाने घेतले होते. (या नाटकाचा एक अंक ‘रंगीत पाळणा’ नावाने ‘दीपावली’ मासिकात प्रसिद्ध झाला होता, हेही आठवते.)
१९७१ साली दलालकाकांचे अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने बाबा (रॉय किणीकर) दु:खी झाले होते. खिन्न झाले होते. त्यावेळच्या विमनस्क मनोवस्थेत त्यांनी ‘रात्र’ हा कवितासंग्रह लिहिला होता आणि तो त्यांनी आपले ‘हृदयस्थ’ मित्र दीनानाथ दलाल यांनाच अर्पण केला होता. दलालकाकांना आदरांजली वाहताना ‘रात्र’च्या सुरुवातीलाच किणीकरांनी कविता लिहिली होती..
केशवराव कोठावळे यांनी ‘दीपावली’ घेतल्यावर त्यांना मी पुण्यातील ‘मॅजेस्टिक’मध्ये भेटलो होतो. त्यांना मी वस्तुस्थिती सांगितली होती आणि संस्थापक म्हणून दीनानाथ दलाल यांच्याबरोबरच रॉय किणीकर यांचेही नाव प्रसिद्ध करावे, असे म्हणालो, तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमचा करार जसा झाला आहे, त्याप्रमाणे मी छापले आहे.’’ रॉय किणीकर माझा हा अनुभव ऐकून म्हणाले होते, ‘‘कोठावळेंना तू उगाच भेटलास. एक चांगले काम माझा दलाल हा मित्र पुढे चालवत होता, हेच मला मोठे समाधान होते.’’
५ सप्टेंबर १९७८ रोजी रॉय किणीकर यांचे निधन झाले.
– अनिल किणीकर, पुणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readers response

ताज्या बातम्या