ऐसा चित्रकार होणे नाही..

रवी परांजपे.. एक ऋषितुल्य, आदरणीय व्यक्तिमत्त्व. विचारवंत चित्रकार. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मी जे. जे.मध्ये शिकत असताना ते आम्हाला ‘आमंत्रित प्राध्यापक’ म्हणून ‘इलस्ट्रेशन’ हा विषय शिकवण्यासाठी येत असत.

रवी परांजपे
रवी परांजपे ( प्रतिनिधिक छायाचित्र )

दत्तात्रय पाडेकर
रवी परांजपे यांचे कोणतेही स्केच, इलस्ट्रेशन किंवा अभिजात चित्र असो- ते उपजत सौंदर्य लेवूनच येत असे. त्यांच्या जाण्याने एक निखळ सौंदर्यवादी चित्रकार आपण गमावला आहे.

रवी परांजपे.. एक ऋषितुल्य, आदरणीय व्यक्तिमत्त्व. विचारवंत चित्रकार. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मी जे. जे.मध्ये शिकत असताना ते आम्हाला ‘आमंत्रित प्राध्यापक’ म्हणून ‘इलस्ट्रेशन’ हा विषय शिकवण्यासाठी येत असत. तेव्हा ते आम्हाला मॉडेलवरून पेन्सिल ड्रॉइंग आणि नंतर त्याचे काळ्या शाईने इलस्ट्रेशनमध्ये रूपांतर कसे करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवीत असत. त्यांचे अचूक मोजक्या रेषांतील ड्रॉइंग आणि ब्रशने काढलेल्या रेषांवरील प्रभुत्व पाहून आम्ही चकित होत असू. त्यावेळी त्यांनी केलेली इलस्ट्रेशन्स ते आम्हा विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी घेऊन येत असत. कॅलेन्डर, पोस्टर, बुकलेट, फोल्डर, कॅम्पेन किंवा अन्य जाहिरातींसाठी केलेली ती कृष्णधवल आणि रंगीत इलस्ट्रेशन्स असत. ती दाखवताना ते आम्हाला सांगायचे की, ‘ही दोन-तीन चित्रे आधी केलेली रफ स्केचेस आहेत.’ त्यांनी केलेली ती रफ स्केचेस पाहून आम्ही थक्क होत असू. मला प्रश्न पडे की, ते यांना रफ स्केचेस का म्हणतात? कारण रफ म्हणून केलेली ती चित्रेदेखील अप्रतिम इलस्ट्रेशन्स असायची. किंबहुना, ती स्केचेस मला फायनल इलस्ट्रेशनप्रमाणेच वाटायची. ती अधिक भावायची, कारण त्या चित्रांमध्ये ड्रॉइंग, कम्पोझिशन, रंगसंगती, रंगलेपन हे सर्व प्रकारच्या बारकाव्यांसहित उत्स्फूर्त व मुक्तपणे केलेले असायचे. एवढय़ा सुंदर, कलात्मक कामाला ते रफ का म्हणायचे याचे मला आश्चर्य वाटत असे. माझ्या दृष्टीने ती सर्व चित्रे (थंबनेल स्केचेस) छोटय़ा आकारांतील उत्तम कलाकृतीच होत्या.

रवी परांजपे यांची इलस्ट्रेशन्स ही त्यांनी निर्माण केलेली वैशिष्टय़पूर्ण, रेषाप्रधान, वास्तवदर्शी शैलीतील असत. परांजपे शैलीचा एक वेगळा ठसा त्यावर असे. सुमारे चार दशके जाहिरात क्षेत्रात एक प्रतिभावान इलस्ट्रेटर म्हणून रवी परांजपे यांनी वर्चस्व गाजवले. त्याकाळी त्यांच्या शैलीचा इतर चित्रकारांवर प्रचंड प्रभाव होता. अनेक चित्रकारांनी परांजपे शैलीचे अनुकरण करण्याचा प्रयत्नही केला; परंतु त्यांच्या शैलीतील सौंदर्याचे त्यांना अनुकरण करता आले नाही. अनेक एजन्सीज्मध्ये ‘आम्हाला परांजपे स्टाईलचे इलस्ट्रेशन हवे’ अशी मागणी असायची. मला वाटते, दीनानाथ दलाल यांनी जशी सर्वसामान्य लोकांमध्ये चित्रांसंदर्भात एक रसिकता निर्माण केली, तशीच रवी परांजपे यांच्या चित्रांनीही एक सार्वत्रिक अभिरुची निर्माण केली.

त्याकाळी अनेक जाहिराती वैशिष्टय़पूर्ण, वेगळ्या, सुंदर आणि आकर्षक वाटायच्या त्या केवळ रवी परांजपे यांच्या इलस्ट्रेशन्समुळेच! त्यांनी केलेल्या एका इलस्ट्रेशनला ‘कॅग’चा उत्कृष्ट इलस्ट्रेशनचा पुरस्कार मिळाला होता. ‘कॅग’तर्फे ‘हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कारदेखील त्यांना पुढे मिळाला.
अनेक उत्तमोत्तम अमेरिकन इलस्ट्रेटर्सनी इलस्ट्रेशन्सच्या क्षेत्रात जागतिक ठसा उमटवला आहे. बॉब पेक, मार्क इंग्लिश, रॉबर्ट हॅन्डल, बार्ट फॉर्ब्स, बर्नी फूक्स, एन. सी. वायथ, नॉर्मन रॉकवेल यांसारखे अनेक थोर चित्रकार ‘इलस्ट्रेटर- पेन्टर’ होऊन गेले. रवी परांजपे हे मला त्या परंपरेतील जागतिक दर्जाचे चित्रकार वाटतात. त्यांचे काम जगप्रसिद्ध चित्रकार आल्फान्सो मूचा आणि गुस्ताव क्लिम्ट यांच्या तोडीचे आहे.

‘सुंदर ते वेचावे, सुंदर करोनि मांडावे, स्व-इतरांसाठी’ हे त्यांचे ब्रीद होते. या ब्रीदाप्रमाणेच त्यांची चित्रे सौंदर्यपूर्ण असत. त्यांची अभिजात चित्रे खास परांजपे शैलीतली आहेतच, शिवाय त्यात भारतीयत्वही जाणवते. त्यांनी भारतीय मिनिएचर शैलीचा अभ्यास करून स्वत:ची अशी एक अलंकारिक शैली निर्माण केली. सपाट रंगलेपन, लयदार रेषा, अॅतक्रेलिक व तैलरंगांसारखे माध्यम वापरून त्यांनी मोठय़ा आकाराची चित्रे साकारली. त्यांनी त्यांत अनेक प्रयोग केले. त्यामुळे त्यांच्या चित्रांमध्ये विविधता जाणवते. रेषाप्रधान चित्रांतून त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रेषांचा वापर केला. नाजूक, जाड, बारीक, ठसठशीत, लयदार- रेषा कशीही असो- त्यांच्या रेषेत सौंदर्य, गोडवा हे तत्त्व असतेच. मग ते वठलेले झाड असो किंवा पडलेल्या काटक्या!

त्यांची चित्रे रेषाप्रधान आहेत, तशीच रंगप्रधानही. त्यांनी तैलरंगात अनेक प्रयोग करून सुंदर चित्रनिर्मिती केली आहे. चित्रविषय कोणताही असो; त्यातील सौंदर्य हा त्या चित्राचा महत्त्वाचा गाभा असतो. अचूक, उत्तम ड्रॉइंग हा चित्रकलेचा मूळ पाया मजबूत असल्यामुळे त्यांच्या चित्रांमध्ये कोणतेही घटक असोत- त्यात त्यांचा अभ्यास जाणवतो. चित्रविषयातील लय, डौल, त्यातील बारकावे त्यांनी अचूक टिपलेले दिसतात. प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधून ते चित्ररूपात साकारण्याची क्षमता ही त्यांना मिळालेली निसर्गदत्त देणगी होती.

रवी परांजपे यांच्या चित्रांमधील रंगसंगती आणि कम्पोझिशन्स ही फार प्रभावी गोष्ट असे. सुंदर रंगसंगतीमुळे त्यांची चित्रे नेहमीच आनंददायी, उल्हसित करणारी, तरुण, ताजी वाटतात. त्यांच्या चित्रांमध्ये अनेक सुसंवादी रंगांची उधळण असे. त्यात एक सुसंगतता असते, तशीच रंगांची ‘मेलडी’ही असते. अनेक ठिकाणी ब्राइट रंग वापरून चित्राचा तोल सांभाळणे ही फार अवघड गोष्ट आहे; पण परांजपे ती लीलया साधत.

रवी परांजपे यांचे सर्वच माध्यमांवर प्रभुत्व होते. ग्राफाइट पेन्सिल, रंगीत पेन्सिल, पेस्टल रंग, पारदर्शक व अपारदर्शक जलरंग, ॲक्रेलिक, तैलरंग.. माध्यम कोणतेही असो- त्यातून ते त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण शैलीत सुंदर कलाकृती निर्माण करीत. ही सर्व माध्यमं त्यांनी चाकोरीबाह्य, नावीन्यपूर्णतेने हाताळली. त्यांच्या ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चा ‘रूपधर’ हा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

रवी परांजपे यांचे कलेच्या प्रांतात आणखीन एक महत्त्वाचे योगदान म्हणजे ‘आर्किटेक्चरल रेंडिरग’ हा वेगळा चित्रप्रकार त्यांनी निर्माण केला. त्याआधी कोणी असे कलात्मक, दर्जेदार ‘आर्किटेक्चरल रेंडिरग’ केले नव्हते. नंतरही तसे कलात्मक काम कोणी करू शकलेले नाही. ते ‘प्लान आणि एलिवेशन’वरून संपूर्ण गृहसंकुलाचे मोठय़ा आकाराचे कलात्मक चित्र पोस्टर कलरमध्ये साकारीत असत. ‘प्लान आणि एलिवेशन’वरून परस्पेक्टिव्ह ड्रॉइंग करण्याची सोपी पद्धत त्यांनी स्वत: शोधून काढली होती.. तीही छायाप्रकाशासहित! त्यांची ही गृहसंकुलाची चित्रं प्रत्यक्ष गृहसंकुलापेक्षा सुंदर, कलात्मक आणि स्तिमित करणारे असे. ही चित्रे म्हणजे जणू अभिजात कलाकृतीच असत. त्यांच्या कामाचा प्रचंड आवाका आणि छायाप्रकाशासहित बारीकसारीक तपशील पाहून अचंबित व्हायला होतं. त्यांचे कोणतेही स्केच, इलस्ट्रेशन किंवा अभिजात चित्र असो- ते उपजतच सौंदर्य लेवूनच येत असे. त्यांनी केलेले सर्व काम सौंदर्यवादी, अलंकारिक, नावीन्यपूर्ण, चाकोरीबाह्य आणि आश्चर्यकारक आहे.

रवी परांजपे यांनी चित्रकलेसंबंधी खूप लेखनही केले. ड्रॉइंग, कृष्णधवल तसेच रंगीत इलस्ट्रेशन्स, अभिजात चित्रकला या विषयांवर त्यांनी चित्रमय पुस्तके लिहिली. कलेचे विद्यार्थी, कलाशिक्षक आणि रसिकांसाठी ती मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली. ‘शिखरे रंगरेषांची’ हे जागतिक चित्रकारांवरचे त्यांचे पुस्तक. त्यात त्यांनी थोर चित्रकार आणि त्यांच्या कलाकृतींचे चित्रकाराच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले आहे.

त्यांनी चित्रकलेवरची पुस्तके लिहिली तशीच वैचारिक आणि चिंतनात्मक पुस्तकेही लिहिली. ‘तांडव हरवताना’, ‘निलधवल ध्वजाखाली’ तसेच ‘अभिजाततेच्या दृष्टिकोनातून भारत काल, आज आणि उद्या’ ही त्यांची या प्रकारातली पुस्तके. त्यांचे ‘ब्रश मायलेज’ हे आत्मचरित्र अप्रतिम आहे. त्याला भैरुरतन दमाणी पुरस्कार लाभला. त्यांचे बाळासाहेब ठाकरे, पं. भीमसेन जोशी, रोहिणी भाटे, प्रभा अत्रे, सुरेश तळवलकर, उस्मानखॉंसाहेब अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी मैत्रीचे संबंध होते.

त्यांनी कलेच्या बांधिलकीतून उत्तम चित्रकारांना वडिलांच्या नावे ‘के. आर. परांजपे गुणीजन पुरस्कार’ देऊन गौरविले. तसेच गुणी तरुण चित्रकारांनाही ‘रवी परांजपे युवा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. मला वाटतं, एखाद्या चित्रकाराने इतर गुणी चित्रकारांना पुरस्कार देऊन गौरविण्याचे हे अपवादात्मक उदाहरण असावे. रवी परांजपे यांची विपुल चित्रसंपदा हा महाराष्ट्राचा मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. त्यांच्या या चित्रसंपदेचे उत्तम संग्रहालय उभारल्यास ते त्यांचे खरेखुरे स्मारक ठरू शकेल!
dattapadekar@hotmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Painter sketch ravi paranjape illustration personality thoughtful painter amy

Next Story
मराठीप्रेमाचा चिरतरुण आविष्कार
फोटो गॅलरी