गेल्या दोन लेखांत तू आनंद आणि राग या मनातील भावनांना कागदावर आणले. आणि ती चित्रे पाहताना माझं मनही शांत शांत होत गेलं.
तुझं मन कधी शांत होतं? संध्याकाळचा वारा अनुभवताना, समुद्रकिनारी लाटांचे शांत आवाज ऐकल्यावर, कपडे धुताना, हिवाळ्यात सकाळच्या उन्हात पडून चिमण्यांची चिवचिव ऐकताना, लाइट गेल्यावर पेटती मेणबत्ती पाहताना, शांतपणे वाजणारी बासरी ऐकताना, शेवटचा परीक्षा पेपर देऊन आल्यावर…

हे सर्व करून झाल्यावर आपल्या मनात एक नाजूक, मऊ, हळुवार भावना येते. यालाच आपण साधारणपणे शांतता म्हणतो. जेव्हा मन त्रासात नसते, ओरडत, धावत उड्या मारत नाही, आपणच आपल्याला प्रश्न विचारत नाही, कुणाशी स्पर्धा करत नाही, चिंता करत नाही. सर्व विचार शांत सौम्य होत जातात, मन गोगलगाय सारखे हळूहळू चालते.

आज आपण याच शांततेला चित्रात आणणार आहोत. कदाचित तुझ्याकडे आकाशी, हिरवा, जांभळा, राखाडी, पांढरा रंग येईल. मोठे ब्रश, पक्ष्याचे पीस, कापूस असे टोकदार काटे नसलेले ब्रश येतील. नाजूक वळणदार रेषा कागदावर अशा येतील- जशा निर्मनुष्य किनार्‍यावर झिरपत जाणार्‍या समुद्राच्या लाटा.

Painting
कियारा शाह, वय- १२ वर्षे

शांत समुद्रातल्या लाटा किती आल्हाददायक येतात ना! तसाच तुझा ब्रश कागदावरही फिरेल. गरुड जसा पंख पसरून उंच आकाशात दिसतो, तसा तुझा मोठाला ब्रश विस्तीर्ण कागदावर विहार करेल. समुद्रात जेलिफिश जसे निवांत पोहतात तसाच कागदावर आकार, रंग फिरतील.

डोळ्यांना खुपणारी तीक्ष्ण, धारदार रंग रेषा नको असेल तर मऊ, शांत रंग निवडून एकमेकांत हळूहळू मिसळू द्यावा. त्यातही तू मोठा किंवा जाड ब्रश निवड. ते नसतील तर बाबांचा दाढीचा ब्रश किंवा पक्ष्याचे पीस, कापूस असेही वापरता येईल.

काम करताना मनात एक मोठा श्वास घे, सोबतीला शांत संगीत लाव किंवा युट्यूबवर समुद्राच्या लाटांचा, पावसाचा आवाज असणारे सलग व्हिडीओ/ ऑडिओ लावू शकतोस. ते डोळे बंद करून किमान १० मिनिटे ऐक. मगच चित्र काढायला सुरुवात कर. आज कागदावर तुझ्या मनातलं चित्र नव्हे, तर मनातील शांतता येऊ देत. तुझ्या मनातील शांततेचा रंग गडदही असू शकतो. पण तो तू कागदावर सोडताना मनातल्या शांततेशी मात्र प्रामाणिक राहा. चित्र काढताना किंवा काढल्यानंतर तुला शांतता दिसली की थांब. उगाच कुणाला काही दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस.

Painting
नंदिता अभिषेक सुळे, वय- १२ वर्षे

शिक्षक आणि पालकांसाठी…

१. मुले मागतील ते रंग, हवा तो आकाराचा कागद आणून द्या.

२. अशा प्रकारची चित्रं कदाचित पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारी नसतात, त्यामुळे मुलांकडून आणखी दहा कागद वाया जाण्याची तयारी ठेवा.

३. काही मुले शांततेसाठी जाड गडद आकार किंवा गोंधळ घालणार्‍या रेषा काढतील तेही ठीक! त्यांची शांतता वेगळ्या पद्धतीची असू शकते.