scorecardresearch

पं. नेहरू : द्रष्टे लोकशाहीवादी!

भारताचे द्रष्टे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल सध्या हेतुत: विषाक्त वातावरण निर्माण केले जात असताना त्यांच्या लोकशाहीवादी, विकासाभिमुख व समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचा नव्याने ओळख करून देणारा लेख.

पं. नेहरू : द्रष्टे लोकशाहीवादी!
घरी येणारी माणसं तो फोटो पाहून माझ्या भाग्याचा हेवा करीत. नेहरूंच्या थोरवीबद्दल बोलत.

डॉ. न. गो. राजूरकर – ngrajurkar@rediffmail.com

भारताचे द्रष्टे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल सध्या हेतुत: विषाक्त वातावरण निर्माण केले जात असताना त्यांच्या लोकशाहीवादी, विकासाभिमुख व समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचा नव्याने ओळख करून देणारा लेख.

माझ्या घरी बैठकीच्या खोलीत पंडित नेहरूंबरोबर काढलेला माझा फोटो आहे. २७ ऑक्टोबर १९६० रोजी तो काढण्यात आला होता. आदल्या दिवशी त्यांच्या कचेरीत मी त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. त्यावेळी ते होते जागतिक कीर्तीचे नेते आणि मी होतो तिशीच्या उंबरठय़ावरचा तरुण! घरी येणारी माणसं तो फोटो पाहून माझ्या भाग्याचा हेवा करीत. नेहरूंच्या थोरवीबद्दल बोलत. पण आता काळ किती बदलला आहे याची अत्यंत क्लेशकारक जाणीव काही दिवसांपूर्वी झाली. माझ्या पत्नीला भेटण्याकरता आलेल्या एका बाईने तो फोटो पाहिला आणि काहीशा तिरस्कारयुक्त स्वरात ती म्हणाली, ‘या अशा माणसाबरोबर तुमच्या नवऱ्याने फोटो कसा काय काढून घेतला?’ हल्ली दिवस-रात्र पं. नेहरूंबद्दल जी गरळ ओकली जाते आहे त्याचा जनमनावर किती भयंकर परिणाम होत आहे याचा प्रत्यय त्या बाईंच्या प्रतिक्रियेतून आला.

नेहरूंना जाऊन आज ५६ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. असे असले तरीही सातत्याने त्यांच्यावर तोफ का डागली जात आहे आणि त्यांचे चारित्र्यहनन का करण्यात येत आहे, हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. नेहरूंच्या प्रागतिक विचारांचा जो अमीट ठसा भारतीय जनमानसावर आहे, तो पुसून टाकण्यासाठी त्यांची प्रतिमा डागाळण्याचा त्यांच्या विरोधकांचा मनुसबा आहे. हिटलरचा प्रचार मंत्री डॉ. गोबेल्स म्हणत असे की, ‘If you utter a falsehood hundred times, it becomes a truth.’ नेहरूंच्या बाबतीत नेमके हेच घडते आहे!

परंतु ज्या पिढीशी माझा संबंध आहे, त्या पिढीच्या लोकांवर ज्या दोन लोकोत्तर पुरुषांच्या विचारांचा गाढ ठसा उमटला, त्या व्यक्ती होत्या- महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल नेहरू! स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं दुसरं नाव होतं. कारण टिळक-गोखल्यांपासून ते गांधी, नेहरू, पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत जवळजवळ सर्वच नेत्यांचा काँग्रेसशी संबंध होता. काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनांना त्याकाळी अतिशय महत्त्व होते. कारण त्यांत मांडल्या गेलेल्या ठरावांना प्रातिनिधिक स्वरूप असे. १९२० ते १९४७ या काळात नेहरूंनी काँग्रेसच्या निरनिराळ्या अधिवेशनांत जे ठराव मांडले आणि मंजूर करून घेतले, त्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या काळात देशाला स्वतंत्र करण्याकरता कोणते मार्ग अवलंबावेत यावरच बहुतेक पुढाऱ्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. मात्र, स्वातंत्र्य हे साध्य नसून भारताच्या सर्वागीण प्रगतीचे ते साधन आहे, हे लक्षात घेऊन स्वतंत्र भारताला कोणत्या मार्गाने वाटचाल करावी लागेल याचा खोलवर विचार नेहरूंनी केला होता आणि त्या अनुषंगाने काँग्रेसच्या अधिवेशनांत विविध ठराव मांडले होते. भारत स्वतंत्र होण्याच्या वीस वर्षे आधीच- म्हणजे १९२७ मध्ये मद्रास येथील काँग्रेसच्या अधिवेशनात नेहरूंनी स्वतंत्र भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूलभूत तत्त्वांवर आधारित असेल याबाबतचा ठराव मांडला होता. आजही त्या तत्त्वांवरच भारताची वाटचाल सुरू आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा ठराव ‘Fundamental Rights and Economic Programme’ या नावाने ओळखला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या नागरिकांना कोणते मूलभूत हक्क देण्यात येतील आणि भारताचे आर्थिक धोरण काय असेल याबाबतचा हा ठराव आहे. संविधानाद्वारे जे मूलभूत हक्क मान्य केले गेले आहेत, ते या ठरावाशीच निगडित आहेत. हा ठराव काँग्रेसच्या कराची येथे (मे १९३३) भरलेल्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला. गांधीजींनी मांडलेल्या या ठरावाचा मसुदा नेहरूंनी तयार केला होता. जमीनदारी आणि तत्सम सरंजामी पद्धती नष्ट करण्याबाबतचा ठराव नेहरूंनी काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात (१९३६) मांडला होता. अशा सर्व ठरावांवरून स्वातंत्र्यपूर्व काळातही नेहरूंनी भारतासमोर असलेल्या समस्यांचा किती खोलवर विचार केला होता हे दिसून येते.

महात्मा गांधींनी १९२० नंतर केलेले देशाचे नेतृत्व असामान्य असेच होते. पण त्यांच्या नेतृत्वाला विशिष्ट अशा मर्यादा होत्या. गांधींच्या राजकीय चळवळीला आंतरराष्ट्रीय परिमाण नव्हतं- जे नेहरूंनी पुरवलं आणि त्याद्वारे त्यांनी ही चळवळ अधिक प्रभावी केली आणि साऱ्या जगाचे लक्ष या चळवळीकडे वेधून घेतलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर गांधींच्या कार्याची आणि नेतृत्वाची इतक्या योग्य तऱ्हेने नेहरूंनी बाजू मांडली की, ‘Nehru is Gandhi’s Western face’- म्हणजे ‘नेहरूंमुळे गांधी आम्हाला समजले’ असं पाश्चात्य देशांतील विचारवंत म्हणू लागले.

नेहरूंनी भारतीय स्वातंत्र्य ही एक पम्ृथक चळवळ नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर साम्राज्यशाहीविरुद्ध चाललेल्या विराट चळवळीचे ते एक अंग आहे असं वारंवार प्रतिपादन करून आशिया आणि आफ्रिकेतील इतर परतंत्र देशांशी दुवा साधला. नेहरूंच्याच शब्दांत सांगावयाचे तर.. ‘India’s movement for freedom is not an isolated phenomenon, it is a part of a wider movement against colonialism and imperialism.’

याच काळात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाहीप्रधान शासन देशात निर्माण करण्यास राष्ट्रीय सभा वचनबद्ध आहे, ही बाब नेहरूंनी वारंवार स्पष्ट केली आणि त्यायोगे लोकशाहीप्रधान राष्ट्रांची भारतीय स्वातंत्र्य चळवळीला सहानुभूती मिळविली. खुद्द इंग्लंडमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जो पाठिंबा मिळाला त्यास आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याकरता जे प्रयत्न केले त्याला मुख्यत: नेहरूंची भारतीय स्वातंत्र्याबाबतची ही भूमिकाच जबाबदार होती याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.

लोकशाहीची चौकट कोठेही खिळखिळी होऊ न देता भारताला प्रगतीपथावर नेण्याचा आणि भारताची सर्वागीण उन्नती साधण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न पंतप्रधान नेहरूंनी केला. भारतीय राज्यघटनेचं पावित्र्य त्यांनी अबाधित ठेवलं. न्यायालयं आणि न्यायाधीशांची बूज त्यांनी राखली आणि लोकशाहीच्या वास्तूला कोठेही तडा जाऊ न देण्याची खबरदारीही त्यांनी सातत्याने घेतली. बट्र्रान्ड रसेल नेहरूंबद्दल बोलताना एकदा म्हणाले होते- ‘मी नेहरूंना एक थोर नेता मानतो, कारण हुकूमशहा बनण्याकरता लागणारी अफाट लोकप्रियता असतानादेखील त्यांनी लोकशाहीचा मार्ग स्वीकारला. भारताची प्रगती लोकशाहीद्वारे साधण्यातच भारताचे कल्याण आहे, हे समजण्याकरता लागणारे शहाणपण आणि ऐतिहासिक दृष्टी नेहरूंजवळ आहे. म्हणूनच मी त्यांना एक द्रष्टा पुरुष मानतो.’

भूतकाळातील किंवा वर्तमानकाळातील सर्व चांगले अथवा वाईट अशी अतिरेकी भूमिका नेहरूंनी कधीही स्वीकारली नाही. भूतकाळात गुरफटून राहणं राष्ट्राला जितकं घातक असतं, तितकंच वर्तमानकाळातील सगळं चांगलं आणि प्राचीन परंपरा सगळ्या वाईट ही विचारसरणीही देशाच्या प्रगतीला हानीकारक ठरते असं नेहरूंचं मत होतं. असं जरी असलं तरीही भारताच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक समस्यांच्या संदर्भात देश आधुनिकतेच्या पथावर जितक्या झपाटय़ाने वाटचाल करील तितके चांगले असे नेहरूंना वाटे. ही वाटचाल करत असताना काही महत्त्वाच्या प्राचीन भारतीय परंपरांचं आपण विस्मरण होऊ देता नये असंही त्यांना वाटे. आर्थिकदृष्टय़ा समृद्ध आणि सामाजिकदृष्टय़ा प्रगत असा भारत विज्ञाननिष्ठा आणि औद्योगिकरणातूनच निर्माण होऊ शकेल अशी त्यांची श्रद्धा होती. पंतप्रधान म्हणून त्यांनी या मार्गावर जी पावलं टाकली त्याबद्दल मुद्दाम तपशीलवार काही सांगण्याची आवश्यकता नाही. देशात विविध क्षेत्रांत त्यांनी निर्माण केलेल्या अनेक महत्त्वाच्या संस्था याच त्याची जितीजागती निशाणी आहेत.

नेहरू रूढार्थाने जरी समाजसुधारक नव्हते तरी समाजात मूलभूत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने त्यांनी आपली धोरणं आखली होती आणि त्या धोरणांना मूर्त स्वरूप देण्याचा खंबीरपणाही त्यांनी दाखविला. याबाबतचं सवरेत्कृष्ट उदाहरण म्हणजे हिंदू कोड बिल! पक्षात प्रचंड विरोध असताना त्यांनी हिंदू कोड बिल मंजूर करून घेतलं. त्यावेळी त्यांनी या विषयावर पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती!

लोकशाहीवरील विश्वास आणि धर्मनिरपेक्ष राज्याच्या संकल्पनेवर असलेली त्यांची अविचल निष्ठा हे त्यांच्या आधुनिक मनाचे महत्त्वाचे पैलू होत. भारताच्या संदर्भात बोलावयाचं झाल्यास लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मृत्यूच्या काही महिने आधी ‘धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना भारतीय संस्कृतीच्या चौकटीत कशी बसवावी याबद्दल माझे विचार चालू आहेत,’ असे अर्थपूर्ण उद्गार नेहरूंनी काढले होते. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तर ते शिल्पकारच मानले जातात. त्यांच्या या धोरणात राष्ट्रीय हित आणि जागतिक शांतता, तसंच ध्येयवाद आणि व्यवहारवादाचा सुरेख संगम होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या काही बदलांमुळे या धोरणाचा काही भाग जरी पुढे अनावश्यक ठरला असला तरीही ‘तिसऱ्या जगातील राष्ट्रे’ आजही या धोरणानुसार वागण्यात आपलं हित मानतात, ही या धोरणाच्या यशाला मिळालेली पावतीच होय.

नेहरू आदर्श संसदपटू होते. लोकशाहीशी निगडित प्रथा-परंपरांचं पालन करण्यात यावं याबद्दल ते अतिशय दक्ष असत. विरोधी पक्षातील एखाद्या सभासदाने चांगलं भाषण केलं तर नेहरू त्याचं मोठय़ा मनाने अभिनंदन करीत असत. लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळणकर यांच्याविरुद्ध विरोधी पक्षाच्या सभासदांनी जेव्हा अविश्वासाचा ठराव मांडला तेव्हा नेहरू विलक्षण अस्वस्थ झाले होते. त्या अस्वस्थतेचं कारण होतं- ठरावातील अस्पष्ट आणि संदिग्ध आरोप. ठरावावरील चर्चेला उत्तर देताना नेहरूंनी मावळणकरांचं समर्थन करण्यात फार वेळ न घालवता खासदारांनी लोकशाही परंपरा कशा पाळाव्यात, अविश्वासाचा ठराव केव्हा मांडावा, स्पष्ट आणि नेमके आरोप कसे करावेत या गोष्टींवर अधिक भर दिला होता. लोकशाहीचे संकेत काटेकोरपणे पाळले जावेत आणि योग्य तेच पायंडे पाडले जावेत असं नेहरूंना तीव्रतेनं वाटे. त्यांनी त्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले.

तिबेट, चीन आणि काश्मीरबद्दलच्या नेहरूंच्या धोरणांबद्दल सतत टीका केली जाते. परंतु त्याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याची तसदी मात्र त्यांचे टीकाकार कधीच घेत नाहीत. तिबेटला संरक्षण देण्याबाबत भारताने त्याकाळी प्रयत्न केले होते, परंतु इतर राष्ट्रांचा पाठिंबा भारताला मिळू शकला नव्हता. वेगवेगळ्या कारणांनी ब्रिटन आणि अमेरिका या प्रश्नात गुंतू इच्छित नव्हते. चीनला रशियाचा पूर्ण पाठिंबा होता. तिबेटच्या संरक्षणासाठी भारतीय फौजा पाठवता येतील काय याबद्दलही तपशिलाने विचार झाला होता; परंतु त्यावेळचे सरसेनापती जनरल करिअप्पा यांनी ते शक्य नसल्याचं नेहरूंना स्पष्टपणे सांगितलं होतं. अशा परिस्थितीत भारताला तिबेटबाबत काही करता येणं शक्य नव्हतं.

चीनबाबत भारत सरकार आणि नेहरू बेसावध कधीच नव्हते. चीनचा कावा नेहरू ओळखू शकले नाहीत आणि ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या मंत्राचा जप करत राहिले असं जे समजलं जातं त्याला वास्तवात काहीही आधार नाही. चीनने भारतावर केलेल्या हल्ल्याच्या दहा र्वष आधीच- म्हणजे १९५२ मध्ये गुप्तहेर खात्याला ‘Treat China as India’s potential enemy number one’ या शब्दांत नेहरूंनी सावध केलं होतं. नेहरू जरी जाहीररीत्या भारत आणि चीन यांच्यातील मित्रत्वाच्या संबंधांवर वारंवार भर देत असले तरी त्यांना चीनपासून भारताला असलेल्या संभाव्य धोक्याची पूर्ण कल्पना असल्याचे इतरही भरपूर पुरावे आहेत. पत्रकार मंकेकरांच्या ‘दि गिल्टी मेन ऑफ १९६२’ (The Guilty Men Of  1962) या पुस्तकातही चीनबाबत नेहरू गाफील नव्हते, या म्हणण्याला पुष्टी देणारे कित्येक परिच्छेद आहेत. १९५४ मधील चीनच्या दौऱ्यात नेहरूंनी त्यांच्यासोबत गेलेल्या भारतीय पत्रकारांपाशी (ज्यात मंकेकरही होते!) खाजगीत व्यक्त केलेले विचार त्यांनी नमूद केले आहेत. मंकेकर लिहितात : ‘During a stimulating discussion the prime minister observed that some day or other these two Asian giants are bound to come into conflict and that we should strive hard to avert.’ मंकेकर पुढे लिहितात :

‘that statement indicated Nehru’s acute awareness of the Chinese threat to India as early as 1954.’ (पृष्ठ ११०) लष्करीदृष्टय़ा चीनने भारतावर हल्ला केल्यास आपण त्याला तोंड देऊ शकणार नाही, असं भारताच्या सरसेनापतींनी नेहरूंना त्यावेळी सांगितलं होतं आणि त्याला अनुसरूनच नेहरूंनी आपलं धोरण आखलं होतं. दुर्दैवाने विरोधी पक्षांच्या सदस्यांना नेहरूंचं चीनबाबतचं धोरण कचखाऊ आणि त्यांच्या भोळेपणाचं व स्वप्नाळू वृत्तीचं द्योतक वाटलं आणि त्यांनी नेहरूंवर टीकेची झोड उठवली. या टीकेची धार बोथट करण्याकरता नेहरूंनी काहीसा आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि त्यातूनच चीनला भारतीय हद्दीत घुसण्याकरता हवं असलेलं निमित्त मिळालं. नेहरूंनी चीनबाबत तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात योग्य तेच धोरण स्वीकारलं होतं असंच या विषयावरील अभ्यासकांचंही मत आहे.

काश्मीर प्रश्न हा ज्या विशिष्ट मानसिकतेतून भारताची फाळणी अटळ ठरली त्याच मानसिकतेतून जन्मलेला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे लिहिल्या गेलेल्या काश्मीर प्रश्नावरील काही पुस्तकांमुळे या प्रश्नासंबंधीचा गोंधळ अधिकच वाढलेला आहे. तशात आज राजकीय सोयीनुसार या प्रश्नाबाबत जे बोललं जातं त्यामुळे या गोंधळात आणखीनच भर पडली आहे. जी. एन. मल्लिक (हे त्यावेळी भारतीय गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.) यांच्या पुस्तकात आणि इतर काही पुराव्याधारित पुस्तकांतून नेहरूंनी काश्मीरबाबत जे धोरण स्वीकारलं होतं आणि जी पावलं उचलली होती त्याबद्दलचा तपशील आला आहे; जो नेहरूंना खचितच न्याय देणारा आहे. सरदार पटेलांनाही जिथे कलम ३७० ला मान्यता द्यावी लागली त्यावरून काश्मीरमध्ये परिस्थितीने किती गंभीर स्वरूप धारण केलं होतं याची कल्पना यावी. काश्मीरमध्ये जे काही घडलं आणि घडत आहे त्याला केवळ नेहरू जबाबदार नव्हते. जबाबदार होती आणि आहे ती विशिष्ट मानसिकता- जिला महमद अली जिना यांनी खतपाणी घातलं होतं!

श्री. छागला (जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि नंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री होते.) यांनी आपल्या उत्कृष्ट आत्मचरित्रात (‘Roses in December’) नेहरूंच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं वर्णन पुढील शब्दांत केलं आहे : ‘Nehru never left his table till about one or two in the morning. Every file which was placed before him was disposed of and every letter that had to be replied to was dictated to the stenographer before lights were switched off. I wrote several letters to him and I always found that the reply was  dictated the day he received the letter. People do not realise that he was a first class administrator. He gave his full mind to the problem in hand, made his decisions and put it out of his mind and turned to another, which was also dealt with, with the same vigour and  precision.’

नेहरूंमध्ये राजकीय व्यक्तींमध्ये अभावानेच आढळणारे कित्येक गुण होते. त्यातून त्यांची अनेक रूपं डोळ्यांसमोर उभी राहतात. टाळ्यांच्या गजरात आणि जयजयकाराच्या निनादात सभास्थानी येऊन जनतेला अभिवादन करणारे अत्यंत देखणे नेहरू, निसर्गाच्या सान्निध्यात स्वत:ला हरवून बसणारे नेहरू, तुरुंगात असताना कुत्र्याच्या एका आजारी पिलाची शुश्रूषा करण्याकरता रात्रीतून कित्येकदा उठणारे नेहरू, साहित्यनिर्मितीसाठी सर्वथा अयोग्य अशा तुरुंगातील वातावरणात विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिणारे नेहरू, दिल्लीतील जातीय दंगलींच्या वेळी बेभान झालेल्या लोकांच्या जमावात घुसून लुटालूट आणि अत्याचार करणाऱ्या समाजकंटकांच्या हातून हत्यारे हिसकावून घेणारे धाडसी नेहरू, फॅसिझम आणि नाझीझमबद्दल तिटकारा असल्यामुळे मुसोलिनी आणि हिटलर यांची इच्छा असूनसुद्धा त्यांची कटाक्षाने भेट टाळणारे नेहरू, १९३६ मध्ये स्पेनमध्ये झालेल्या यादवीत लोकशाही पक्षाचा पराभव झाल्याचं ऐकून अश्रू ढाळणारे नेहरू.. ही आणि अशी कितीतरी रूपं! टागोरांनी एकदा नेहरूंचा उल्लेख ‘He was greater than his deeds and truer than his surroundings’ या शब्दांत केला होता. भारताचे एक महान नेते सी. राजगोपालचारी यांनी नेहरूंच्या मृत्यूनंतर आपल्या शोकसंदेशात त्यांचा उल्लेख ज्या शब्दांत केला होता ते शब्द होते : ‘He was the most civilized among us all, when many of us are not even civilized.’

सी. डी. देशमुखांचं आमच्या कॉलेजात एकदा भाषण होतं. कार्यक्रमानंतर झालेल्या चहापानाच्या वेळी प्राचार्यानी त्यांच्याशी माझी ओळख करून देताना नेहरूंवर मी केलेल्या लिखाणाचा उल्लेख केला, तेव्हा त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया मी कधीही विसरू शकणार नाही. नेहरूंचा उल्लेख त्यांनी ‘Mount Everest’ या शब्दात केला आणि पुढे म्हणाले, ‘sadly, the days of Mount Everest are over!’

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pandit jawaharlal nehru dd70