डॉ. क्षमा सतीश वळसंगकर यांचे ‘पार्किन्सन्सवर बोलू काही…’ हे पुस्तक पार्किन्सन्स या आजाराची सर्वांगांनी माहिती देणारं आहे. पार्किन्सन्स या आजाराचा सकारात्मक विचार करायला लावणारं हे पुस्तक. पार्किन्सन्स हा मेंदू आणि चेतापेशींशी संबंधित आजारांपैकी एक आहे. हा आजार अतिशय जटिल असून, यामध्ये चेतासंस्था हळूहळू कमकुवत होत जाते. या आजाराच्या सुरुवातीला जी लक्षणे असतात ती इतकी सौम्य असतात की ती रुग्णाच्या लक्षातही येत नाहीत. पण हा आजार हळूहळू रुग्णाचा पूर्ण ताबा घेऊन त्याचे रोजचे जीवन असह्य करून टाकतो. या आजारात रुग्णाबरोबर त्याच्या कुटुंबीयांची कसोटी लागते.

विशेषत: रुग्णाची पत्नी किंवा पती यांची या पुस्तकात पार्किन्सन्स या आजारातील वैद्यकीय, शारीरिक आणि मानसिक अवस्था तसेच या आजारासोबत जगणे कसे सुसह्य करायचे याची सविस्तर माहिती लेखिकेने दिली आहे. लेखिका डॉ. क्षमा वळसंगकर या स्वत: वैद्यकीय डॉक्टर आहेत. त्यांचे पती डॉ. सतीश हे पार्किन्सन्स या आजाराचे रुग्ण आहेत. डॉ. सतीश हे सोलापूरमधील नामांकित सर्जन आहेत. सुरुवातीपासूनच त्यांनी हा आजार अतिशय सकारात्मकतेने स्वीकारला. डॉ. क्षमा यांनी पती डॉ. सतीश यांची सर्वतोपरी काळजी घेत असताना या आजाराचा सांगोपांग अभ्यास केला. इतर रुग्णांचे अनुभवही ऐकले. लेखिकेने मिळवलेल्या या ज्ञानाचा उपयोग पार्किन्सन्सच्या इतर रुग्णांना मार्गदर्शक व्हावा म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्तीही प्रसिद्ध झाली आहे.

पुस्तकातील सर्व प्रकरणांची आखणी अतिशय सूत्रबद्ध व आटोपशीर असून, प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक समर्पक आहे. सर्व प्रकरणे लहान, पण माहितीपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी उदाहरणांचा व चित्रांचा वापर केल्याने विषय समजणे सोपे झाले आहे. क्लिष्ट वैद्यकीय विषय असूनही ही माहिती सर्वसामान्यांनाही सहज समजेल अशाच साध्या सोप्या शब्दांत दिली आहे. प्रचलित इंग्रजी शब्दांचा अर्थ चांगला समजावून सांगितला आहे. अपरिचित वैद्यकीय संकल्पनाही उदाहरणांसह उलगडून सांगितल्या आहेत. प्रत्येक प्रकरणात त्याच्या शीर्षकाप्रमाणे पार्किन्सन्ससंबंधी अतिशय बारीकसारीक गोष्टींची संदर्भासहित माहिती मिळते. आजाराची सुरुवातीची लक्षणे, त्यात हळूहळू होत जाणारे बदल, औषधोपचार, आहार, व्यायाम, इजा होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, रुग्णांचे छंद, कुटुंबातील सदस्यांच्या समस्या इत्यादी गोष्टींची दिलेली सखोल माहिती मार्गदर्शक आहे. शेवटी दिलेल्या संदर्भसूचीवरून लेखिकेच्या पार्किन्सन्स या आजाराच्या अभ्यासाची व्याप्ती लक्षात येते.

हेही वाचा

पार्किन्सन्स या आजाराबद्दलची माहिती जगभरातील वैद्यकीय क्षेत्राला जेवढी ज्ञात आहे ती फक्त हिमनगाचं वरचं टोक आहे असे लेखिकेला दिसून आले. पार्किन्सन्स या आजाराबद्दल बरेचजण अनभिज्ञ असतात. विशेषत: ज्येष्ठांमध्ये या आजाराची सुरुवातीची लक्षणे संभ्रमात टाकणारी असतात. ती लक्षणे वृद्धत्वामुळे दिसत असतील असे वाटल्याने डॉक्टरांकडे जाणे टाळले जाते. ग्रामीण भागातील परिस्थिती तर याहूनही वाईट असते. सुरुवातीला दुर्लक्ष केल्याने हा आजार त्याचा पुढील टप्पा लवकर गाठतो. त्यामुळे उपचार करणार्या डॉक्टरांना आणि कुटुंबातील सदस्यांना ते एक आव्हान बनते. हा आजार जसा वाढत जातो तसा रुग्णाच्या जीवनशैलीत बदल होत जातो. त्याच्या कामाची गती कमी होते, इतरांबरोबरचा संवाद कमी होतो, तसेच परावलंबित्व आल्याने नैराश्यही येते.

रुग्णांनी व कुटुंबातील सदस्यांनी सकारात्मक राहिल्यास या आजाराचे व्यवस्थापन नीट करता येते हा लेखिकेचा स्वानुभव आहे. यामध्ये रुग्णाच्या सपोर्ट ग्रुपचाही वाटा मोठा असतो. औषधोपचाराबरोबर आहार, व्यायाम, विश्रांती, करमणूक आणि छंद यांमुळे रुग्णाचे जीवन सुसह्य होण्यास मदत होते हे लेखिकेने छान समजावून सांगितले आहे. लेखिकेच्या अभ्यासातून त्यांना असे आढळून आले आहे की, पार्किन्सन्स या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जगातील या रुग्णांच्या सध्याच्या संख्येबद्दल आणि भविष्यात ती किती वाढेल यांबद्दलही त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. पार्किन्सन्स हा आजार वृद्धांबरोबर तरुणांमध्येही दिसून येत आहे हेही लेखिकेने नमूद केले आहे.

बदलती जीवनशैली, संतुलित आहाराचा व व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव, कीटकनाशकांचे व इतर घातक पदार्थांचे प्रदूषण ही पार्किन्सन्स या आजाराची प्रमुख कारणे लेखिकेने अधोरेखित केली आहेत. पार्किन्सन्स या आजाराची लक्षणे दिसून येण्यापूर्वीच त्याचे निदान करता आले तर तो रोखण्यासाठी किंवा तो वाढत जाण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी जगभर चालू असलेल्या संशोधनाची ओळखही डॉ. क्षमा यांनी ‘वेध भविष्याचा’ या प्रकरणात करून दिली आहे. यामध्ये निदान करण्याच्या नवीन पद्धती, औषधे व इतर उपचारांमधील बदल याबद्दलची माहिती विशद करून आशादायी चित्र दाखवले आहे. पुस्तकाचा शेवट त्यांनी स्वरचित ‘प्रारब्ध’ या कवितेने केला आहे. ज्यामध्ये ‘आपल्याच बाबतीत हे का घडावं’ हा विचार मांडला आहे.

‘पार्किन्सन्सवर बोलू काही…’ हे पुस्तक पार्किन्सन्सचे रुग्ण, त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांच्यासाठी मार्गदर्शक आहे. वैदयकीय शाखेतील विद्यार्थ्यांनाही ते उपयुक्त ठरू शकेल. समाजात पार्किन्सन्सबद्दल असलेले गैरसमज दूर करणे तसेच या आजारावरील नवीन उपचारपद्धती… ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. ही दोन्हीही उद्दिष्टे या पुस्तकाने साध्य केली आहेत. या आजाराच्या सुरुवातीच्या धोक्याच्या घंटेचा आवाज ऐकणे व त्याची वेळीच दखल घेणे किती आवश्यक आहे हा महत्त्वाचा संदेश या पुस्तकात मिळतो. ‘पार्किन्सन्सवर बोलू काही…’ या पुस्तकाच्या रूपाने डॉ. क्षमा वळसंगकर यांनी या आजाराबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम केले आहे. सर्वांनी आवर्जून वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे.

‘पार्किन्सन्सवर बोलू काही…’
लेखिका व प्रकाशिका :
डॉ. क्षमा सतीश वळसंगकर,
पाने-११४, मूल्य- २०० रुपये

anaghashiralkar@gmail.com