सक्काळ सक्काळी मोबाइलने बांग दिली की आधी चारदा त्यास स्नूझावे. पाचव्यांदा उठावे. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हणावे. तद्नंतर व्हाटस्यापवरील शुभ सकाळ संदेश चेक करावेत. त्यातील काही नेमाने फॉरवर्डावेत. (त्यातील एक कचेरीतील साहेबांस!) मग चादरीची घडी घालोनी खाटेखाली ठेवावी. शौचमुखमार्जनादी आन्हिके उरकोनी खाटेवरी बसोनी योगाकडे वळावे.
अनुभवाने सांगतो, सक्काळ सक्काळच्या योगामुळे मन कसे प्रसन्न होते! अंगी असा उत्साह साठूनी येतो. मात्र त्याकरिता मराठीऐवजी हिंदी वृत्तच्यानेलेच लावावीत. तेथे अधिक प्रेक्षणीय योगा असतो. (आस्था वगैरे नको. तेथे रामदेवबाबाजी उदर घुसळण करीत असतात.) एकीकडे असे योगावलोकन सुरू असतानाच पहिल्या धारेचे वृत्तपत्र आलेले असते. ते घ्यावे. काल च्यानेली पाहिलेल्या बातम्यांच्या पुन:प्रत्ययाचा वाचनानंद चाळावा.
तितक्यात समोरच्या स्टुलावर काहीतरी आदळल्यासारखे आपणास जाणवते. तो चहाचा कोप व पोळीची ताटली असते. एकदा ते अन्नब्रह्म चापले की आपण पुढील जीवनसंघर्षांस मोकळे!
हा आमुचा हरेक अच्छ्य़ा दिनाचा प्रथमोध्याय. त्यात अगदी ऐतवारीसुद्धा बदल नाही. फरक नाही. खंड नाही. अपवाद एकच- राष्ट्रीय सणांचा! २६ जानुआरी व १५ ऑगस्टचा.
त्यात १५ ऑगस्ट म्हणजे तर राष्ट्रीय सण मोठा, नाही आनंदा तोटा! कां की या दिवशी देश स्वतंत्र झाला. अहाहा! स्वातंत्र्य!!
तुम्हांस सांगतो, कोणी तरी कधी तरी परदास्याच्या श्रृंखला झुगारून स्वतंत्र होऊ  शकते ही गोष्टच आम्हांस परम नवलाईची, कौतुकाची व आनंदाची वाटते. स्वतंत्र होणे का इतके सोपे असते? अनुभवाने सांगतो, नसते! तेव्हा स्वातंत्र्यदिन म्हणजे आमुच्यासाठी सर्वसुखाचे आगरच!
आमुच्यासाठी या सणाचा प्रारंभ होतो तो क्रांतिदिनी. स्वातंत्र्याच्या समरवेदीवर आपुल्या सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांस मनोमन प्रणिपात करून आम्ही त्या दिवसापासून देशप्रेमामध्ये दंग होतो. त्याकरिता सर्वप्रथम आम्ही स्वातंत्र्याच्या दुसऱ्या (की तिसऱ्या?) लढाईच्या वेळी घेतलेली (काळ्या बाजारात!) अण्णाटोपी शोधून ठेवतो. आमुचा सफेद सदरा व पाटलूण भट्टीस देतो. सदऱ्यावर लावण्याकरिता नवा कोरा तिरंगी बिल्ला घेतो. (तो लवकर आणून ठेवलेला बरा. १५ ऑगस्टला महाग पडतो!) मोबाइलवर ‘सारे जहाँ से अच्छा’ची रिंगटोन लावून ठेवतो.
याच काळात आमुच्या हिचा वेगळाच हिशेब चाललेला असतो. तिने क्यालेंडरी १५ ऑगस्टला जोडून आलेल्या सुटय़ा व परवडणारे सहल ठिकाण असे गणित मांडलेले असते. मात्र आम्ही त्याकडे साफ दुर्लक्ष करतो. वर हेही ऐकवतो की, ‘हे अर्धागिनी, सर्व राष्ट्र स्वातंत्र्याचा उत्सौ साजरा करीत असताना, लाल किल्लय़ाच्या प्राचीरवरून महामहीम प्रधानमंत्री राष्ट्र के नाम संदेश देत असताना आम्ही पिकनिकीस जावे? कदापि नाही. हा देशद्रोह आमुचे हातून होणे नाही!’ आणि गंमत सांगू? ती ऐकते!! (स्वातंत्र्यदिन चिरायु होवो!)
येणेप्रकारे सर्व पूर्वतयारी झाली की आम्ही देशप्रेमास सज्ज होतो. आणि मग एके दिवशी प्रात:समयी शेजारील सोसायटीतील डीजेवरून आपल्या कानावर ते मंगलध्वनी पडतात- येमे..रे..वतन्केलो..गोराया..दकरो..कुर्बानी.. की समजावे आला राष्ट्रीय सण! मग त्या दिवशी आम्ही हाथरूणात उन्हे येण्याची वाट पाहातच नाही. सरळ उठतो. आवरतो.
या दिवसास अन्य रंग म्याच होत नाहीत. तेव्हा पांढरे खमिस, पांढरी पाटलूण घालतो. खमिसास जास्त छिद्रे पडणार नाहीत या बेताने तिरंगा लावतो आणि दूरचित्रवाणी संचासमोर बसतो.
बाहेरून ‘जहाँ डाल डाल’ पासून ‘ये मेरा इंडय़ा’पर्यंतची फोर्टीएट नॉनस्टॉप देशभक्तीपर गीते कर्णसंपुट भेदून येतच असतात. ती मनोभावे ऐकून वर्षांचा कोटा पूर्ण करूनच घेतो.
तोवर लाल किले की प्राचीर से महामहीम प्रधानमंत्र्यांच्या शुभहस्ते परमपूजनीय राष्ट्रीय ध्वज उभारला जातो. त्यास मनातल्या मनात आम्हीही राष्ट्रीय सलामी देतो आणि मग या दिवसातील महत्त्वाचा क्षण उगवतो. राष्ट्र के नाम महामहीम प्रधानमंत्र्यांचा संदेश. तो ऐकणे हे आम्ही आमचे फंडामेन्टल कर्तव्य समजतो.
त्या भाषणांतील त्या विकासाच्या योजना, त्या घोषणा, ते पडोसी राष्ट्रास दिलेले इशारे, ते २०२० पर्यंत महासत्ता बनण्याचे वायदे.. हे सारे सारे ऐकले ना की आमचे ऊर कसे राष्ट्रभक्तीने ५६ इंचाचे होते!
तुम्हांस सांगतो, १६ ऑगस्टच्या सक्काळ सक्काळी मोबाइल बांग देतो. चारदा आम्हा त्यास स्नूझ करतो. पाचव्यांदा उठतो. वृत्तपत्रातल्या बातम्या वाचतो. तोवर ते ५६ इंच असेच कायम असतात!
पुढे मग पुन्हा ऊर फुटेपर्यंत धावायचेच असते. २६ जानुआरीपर्यंत..
अप्पा बळवंत -balwantappa@gmail,com

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Make Home Made Gudi Padwa special Instant Sevai Kheer Note the Tasty Recipe
गुढीपाडव्या निमित्त बनवा स्पेशल स्वादिष्ट ‘शेवयाची खीर’ ; नोट करा रेसिपी
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…