या लेखातील कल्पना, सर्जकता उत्तम आहे. थेंबाला थेंबुटा (ज्ञानेश्वर महाराजांच्या मते) म्हणत त्याचे गुणगौरव, त्याची उपलब्धता याबद्दल एवढी स्तब्ध करणारी कल्पना पहिल्यांदाच वाचनात आली. नदीचे वाहणे, तिला वाटेत डोंगर आणि वृक्षांनी येथेच थांब असे म्हणणे आणि त्यावर नदीचे निर्भीड बोलणे- त्यातील भावार्थ, कशाकशाची प्रशंसा करायची? शब्द अपुरे पडतात. आणि शेवटी थेंबुट्याचे आदरातिथ्य कसे करायचे, थेंबुट्याला अंग पुसायला टॉवेल द्या, त्याला कॉफीचा पेला द्या, तो थांबणारच आहे. त्यांच्याशी निवांत गप्पा मारा… किती छान कल्पना आहे. हा सुंदर लेख सुरुवातीपासून अखेरच्या शब्दापर्यंत वाचताना मनसोक्त आनंद मिळाला.
– वसंत खेडेकर, बल्लारपूर
बालपणीचा काळ आठवला
हा लेख छानच जमून आला आहे. लेखातील अनेक वाक्ये कधी हळवं करून जातात तर कधी माणसाला समजविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उपनिषदातील दृष्टांत तर इतका अप्रतिम आहे की तो पुन: पुन्हा वाचला तरी मन काही भिजत नाही! ‘थेंबुटा’ हा शब्द ज्या लोभसपणे ज्ञानेश्वरीत योजला आहे त्याप्रमाणे लेखकानेही तो शब्द इतका योग्य प्रकारे वापरला आहे की, प्रत्येक वेळी तो शब्द वाचताना बालपणीची आठवण येत राहिली. या उशिरा येणार्या थेंबुट्यांना आपणच जबाबदार आहोत, हे लेखकाने कोणालाही न दुखावता व्यक्त केले आहेच, शिवाय त्याच्या उशिरा येण्याची तुलना ऑफिसमधून उशिरा येणार्या माणसाशी करून एक सुंदर अनुभव वाचकांना दिला आहे. शेतकर्यांची आत्महत्याही अत्यंत संयत शब्दांत व्यक्त केली आहे. लेखाचा शेवटचा परिच्छेद तर अगदी कमाल वाटला आणि हेही वाटले की इतक्या सुंदर लेखाचा शेवटही असाच हवा होता.
– धनंजय तडवळकर, पुणे</strong>
कल्पक आणि रमणीय
हा ललित लेख वसुंधरेच्या उन्हाळ जखमा भरत येणार्या रिमझिम सरीइतका भावकोवळा झाला आहे. ‘थेंबुटा’ हा ज्ञानदेवांचा शब्द वाचला आणि येऊ घातलेल्या पावसाच्या सरींमध्ये मधले सारे पावसाळे वाहून गेले. मी पुन्हा एकदा लहानगा पोर झालो- पावसाच्या पाण्यात यथेच्छ भिजणारा, कागदाच्या होड्या सोडणारा आणि पावसात भिजलो म्हणून आईचा पोटभर मार खाणारा. बालसुलभ निरागसता, कल्पकता आणि रमणीयता या गुणांनी नटलेल्या या ललित लेखाने अपार आनंद दिला.
– प्रदीप आवटे
दीर्घ काव्यच!
हा केवळ गद्य लेख नसून दीर्घ काव्यच आहे. निसर्गकिमया, मानवी स्वभाव, नदी- डोंगर- सागर यांचे नातेसंबंध वाचताना, थेंबुटा हा शब्द वाचताना शब्दातीत आनंद मिळतो आणि ‘जे न देखे रवि ते देखे कवी’ याचा प्रत्यय येतो!
– मधुकर घारपुरे, सिंधुदुर्ग
सुंदर रूपक, अप्रतिम वर्णन
हा लेख म्हणजे घामाच्या धारांचा मुकाबला करीत असताना आलेली वार्याची आल्हाददायक झुळूक! उपनिषदातला दाखला निव्वळ अप्रतिम! पावसाबद्दलची समज या लिखाणातून वाढली. ‘थेंबुटं’ या शब्दाने एक वेगळीच अनुभूती मिळाली. सुंदर रूपक आणि अप्रतिम वर्णन यामुळे या लेखाला चार चाँद लागले आहे.
– राजेश अशोक कोरे, जळगाव
मन शांतावलं
लेख वाचताना नकळत मन थबकलं. शब्दबद्ध केलेला अनुभव हा केवळ एका प्रसंगाचा उल्लेख राहत नाही; तो जीवनाकडे पाहण्याची एक संवेदनशील दृष्टी देऊन जातो. आजच्या काळात आपण सतत काहीतरी शोधत असतो, पण आपल्या सभोवती घडणार्या अशा साध्या, सुंदर आणि अर्थपूर्ण गोष्टींकडे पाहणं मात्र विसरत चाललो आहोत, याची जाणीव लेखाने करून दिली. लेख वाचून संपला, पण त्यातील ओलावा मनात राहिला आहे. हा लेख वाचून मात्र एक वेगळीच शांतता मिळाली.
– अदिती देशपांडे
