गुणवत्तेचं साहित्य परदेशांतून आणून, भारतीय किमतीत त्यांच्या आवृत्त्या काढून, देशभर पोहोचवण्यात आणि इंग्रजीमध्ये लिहिलं जाणारं कसदार भारतीय साहित्य अतिशय देखण्या स्वरूपात जगभरात पाठवण्यात ‘पेंग्विन इंडिया’चं मोलाचं योगदान. पण तिथं हे सारं परिश्रमानं कुणी घडवलं?
कुठल्याही शहरातलं गणतीत घेण्याजोगं पुस्तकांचं दुकान वा वाचनालय डोळ्यासमोर आणून बघा, त्याच्या शेल्फवर नारिंगी, लालसर स्पाईन आणि त्यावर श्वेतश्यामल पेंग्विनचा लोगो असलेली पुस्तकं दिसतातच! देशाच्या उभ्या- आडव्या वैचारिक महावस्त्रात पुस्तकांचाही धागा जोडण्याची अद्भुत किमया घडवून आणणारे ‘पेंग्विन इंडिया’ चे शिल्पकार सुहृदांमध्ये असावेत हे माझ्यासारख्या किताबी किड्याचं भाग्यच!
१९८७ मध्ये पेंग्विन इंडियाच्या स्थापनेची अधिकृत बातमी आली आणि देशभर एक ताज्या उत्साहाची लहर पसरली. पेंग्विनचे जागतिक प्रमुख पीटर मेयर यांनी भारतासाठी निवडलेल्या टीममध्ये उच्चस्थानी एक त्रिमूर्ती होती. सुप्रसिद्ध लेखक पत्रकार खुशवंत सिंग, आधीपासूनच पेंग्विनचे भारतीय उपखंडातील वितरण सांभाळणारे महारथी झमीर अन्सारी आणि पेंग्विन इंडियाचे पहिले कर्मचारी तरुण पत्रकार, संपादक डेव्हिड देविदार या त्रयीने आपली टीम बांधून पेंग्विन इंडियाच्या यशासाठी, मजबूत पायाभरणीसाठी जे काही केलंय ते आता आठवताना ऊर अभिमानानं भरून येतो.
जागतिक गुणवत्तेचं साहित्य परदेशांतून आणून, भारतीय किमतीत त्यांच्या आवृत्त्या काढून, देशभर पोहोचवलं आणि इंग्रजीमध्ये लिहिलं जाणारं कसदार भारतीय साहित्य अतिशय देखण्या स्वरूपात आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं. या सुरुवातीच्या परिश्रमांनी पेंग्विन इंडियाची मुळं देशात घट्ट रोवली गेलीच, पण भारतीय लेखकांना केवळ लेखनाच्या गुणवत्तेच्या जोरावर, साक्षेपी संपादकीय मार्गदर्शन मिळालं आणि सुरुचिपूर्ण रूपांत बाहेर येणारं पुस्तक देशभरच नव्हे, तर परदेशीही पोहोचण्याची संधी!
या हाडाच्या पुस्तकप्रेमी त्रयीने प्रकाशनार्थ निवडलेले लेखक पुढे नोबेल, पुलित्झर, बुकर यांसारखे मानसन्मान कमावणारे ठरले. देशांतही क्रॉसवर्ड, साहित्य अकादेमीच नव्हे, तर राज्य पातळीवरले विविध पुरस्कार जिंकणारे ठरले. त्यांचे जागतिक भाषांत अनुवाद झाले आणि भारतीय इंग्रजी साहित्याचं सुवर्णयुग सुरू झालं. मागे वळून बघायची वेळ आलीच नाही आणि ‘पब्लिशिंग इज अ जंटलमन्स प्रोफेशन’ याचं उदाहरण निर्माण झालं.
माझं सुदैव की या तिघांबरोबर कामाची संधी मिळाली आणि त्यांच्यातलं माणूसपण अनुभवायला मिळालं. खुशवंत सिंगांवर वेगळं लिहिणार आहे, आत्ता झमीर भाई आणि डेव्हिडबद्दल. पेंग्विन इंडियाआधी १५ वर्षं पेंग्विनचं भारतीय उपखंडातील वितरण उंचे -पुरे झमीरभाई अत्यंत समर्थपणे सांभाळत होते. कामाला वाघ, पुस्तकं आणि माणसं दोघांचाही शौक, भारतभरच नव्हे तर जगभर मित्रांचं जाळं. फ्रँकफर्ट किंवा लंडन पुस्तक मेळ्यात फिरताना ते अगदी खुशीत दिसत- होम ग्राऊंडवर खेळणार्या खेळाडूसारखे. दिवस अपॉईंटमेंट्सनी भरलेले आणि संध्याकाळच्या पाट्र्या. मद्य जाणकाराच्या आस्वादाने घेणारे. अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ व्यवहार, इंग्रजी तसेच उर्दू साहित्याचा दांडगा व्यासंग आणि अतिशय मोठं मन! पेंग्विनचीच नव्हे तर ब्लूम्सबरी, रँडम हाऊस, हार्पर कॉलिन्सची पुस्तकं विकत घेऊन मित्रमैत्रिणींना वाटणं. अधिकार आहे म्हणून कधी कोणाला फुकट पुस्तकं देत नसत.
पेंग्विन इंडियात काम करणार्या पोरीबाळींचा घरातल्या ज्येष्ठावर असावा तसा त्यांच्यावर जीव. पुढे झमीरभाई अरविंदच्या मैत्रीमुळे स्कोलॅस्टिक इंडियात आले. लवकरच त्यांच्या अतिशय लोभस पत्नी कमर आमच्या भाभी बनल्या आणि मग फक्त कार्यालयात एकदिलाने काम करणारे सहयोगी नव्हे, तर आम्ही चौघे घट्ट मित्र बनलो. अनेकदा त्यांच्याकडे झाकीर बागमध्ये किंवा आमच्याकडे गुडगांवमध्ये जेवणं होत. त्यांचं पुस्तकांचं कलेक्शन राजधानीतल्या सोली सोराबजी आणि नटवर सिंग या नामवंत पुस्तकप्रेमींपेक्षा मोठं होतं. माझा त्याच्यावर कायम डोळा असायचा. ते कमर भाभींना म्हणायचे, ‘‘सुदैवाने हिला उर्दू वाचता येत नाही म्हणून आपली ती तरी पुस्तकं सुखरूप आहेत.’’
स्कोलॅस्टिकची वर्षं जशी व्यावसायिक आव्हानं आणि विजय यांनी रंगलेली, तशीच या दोघांच्या आणि आमच्या कॉमन मित्रमैत्रिणींच्या अथांग स्नेहाने भरलेली. झमीरभाईंची ऑस्ट्रेलियात आणि दुबईमध्ये असलेली दोन्ही मुलंही आमच्या घरची झाली. ऑस्ट्रेलियात पुस्तक व्यवसायात असलेल्या टुटूबरोबरही ऑस्ट्रेलियन पुस्तकांच्या लायसनिंगचे सहयोग केले, जे उभयपक्षी फायद्याचे ठरले. बोलणी करताना मात्र झमीरभाई निक्षून तिथे थांबत नसत, त्यांचा सपोर्ट असलाच तर तो स्कोलॅस्टिक आणि मला असे.
एकदा अरविंद आणि झमीर भाईंना एका बिझनेस लंचसाठी मौर्या शेरेटनच्या बुखारामध्ये जायचं होतं. हे ठिकाण माझ्या आवडीचं. पण मला आमंत्रण नव्हतं. मला त्याचं काही वाईट वगैरे मुळीचंच नव्हतं वाटलं. पण झमीरभाईंना माझ्याशिवाय तिथे जायला उगीचच अवघडल्यासारखं वाटत होतं. येताना ते तिथल्या बुकशॉपमधून माझ्यासाठी ‘पातशहानामा’ची अतिशयच सुंदर प्रत, (कलेक्टर्स आयटम) घेऊन आले होते. ती मी एखाद्या अलंकारासारखी सांभाळून ठेवली आहे. त्यांनी भेट दिलेल्या पुस्तकांची गणती मी विसरले आहे. झमीरभाईंनी माझं उर्दू शायरीवरील प्रेम मीरनी समृद्ध केलं. लंडन, आमच्या मर्मबंधातली ठेव! कबीर, हुसेनसाब, स्टेफी ग्राफ, फेडरर, पिकासो आणि फ्रिडा काहलो हेही!
अल्पशा आजारानं कमर भाभी गेल्या आणि झमीरभाईंच्या आयुष्याची रयाच गेल्यासारखं झालं. अतिशय प्रेमळ मुला-नातवंडांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. ऐंशीवर वय, प्रकृतीच्या अनेक तक्रारी होत्या म्हणून त्यांना दोघांकडे हवं तसं राहावं असं मुलांनी ठरवूनच टाकलं. भाईंना प्रवास आवडे, पण देशाबाहेर दीर्घ मुक्कामात ते तगमगत असत. मायदेशी निदान ८-१५ दिवस तरी परतण्याची संधी सोडत नसत. तुमच्याबरोबर मला पहाडांत घेऊन चला म्हणत. पण तीन वर्षांपूर्वी सगळंच संपलं… झमीरभाईंना डेव्हिडनं फार संयत, सुंदर श्रद्धांजली लिहिली होती. माझ्यावर ती वेळ येईल हे मी कधी कल्पिलं नव्हतं.
डेव्हिड देविदार इतका उत्तम संपादक आणि अष्टपैलू प्रकाशक सीईओ अभावानेच पाहायला मिळतो. इंग्रजीत लिहिणार्या गुणी भारतीयच नव्हे, तर काही जागतिक लेखकांसाठी ते एक वरदानच! जणूकाही जन्मजातच लाभलेलं भाषेवरचं प्रेम आणि असामान्य प्रभुत्व त्यांच्या सुरुवातीच्या पत्रकारितेतल्या लेखांमध्ये दिसत असे. खुशवंत सिंग, व्ही. एस. नायपॉल, रस्किन बॉन्ड, अरुंधती रॉय, झुम्पा लाहिरी, अमिताव घोष, देवदत्त पट्टनायक, विक्रम सेठ, अरविंद अडिगा, रामचंद्र गुहा, ए. पी. जे अब्दुल कलाम यांसारखे असंख्य लेखक त्यांनी पेंग्विनला मिळवून दिले. त्यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानांनी भारतीय लिखाणाकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं.
इतकंच नव्हे तर टागोर, इस्मत चुगताई, मंटो, तस्लिमा नसरीन, अमृता प्रीतम यांसारख्या अनेक भारतीय उपखंडातल्या लेखकांचे इंग्रजीमध्ये दर्जेदार अनुवाद प्रसिद्ध करून, अतिशय देखण्या रूपात प्रकाशित करून त्यांना जागतिक स्तरावर उपलब्ध करून दिलं. अजोड कामगिरीइतकाच महत्त्वाचा त्यांचा विनय आणि निगर्वी, सुसंस्कृत वागणूक आहे. ‘चांगल्या संपादकाचं कामच बोलतं’ म्हणणारे डेव्हिड स्वत:बद्दल फार कमी आणि पुस्तकं वा लेखकांबद्दलच अधिक बोलतात. अमुक एका लेखकाला आपण कसं घडवलं, हिर्याला पैलू कसे पाडले याचे अनेक किस्से- कहाण्या या सुजाण जोहर्याच्या अनुभवांच्या कोशात असणार, पण त्या कधीही दुनियेसमोर स्वत:चं महत्त्व सिद्ध करायला, त्यांनी अगदी आडवळणानेही मांडलेल्या नाहीत.
पेंग्विन म्हणजे डेव्हिड असं समीकरण रूढ झालं होतं. ते गेलेच कधी सोडून तर त्यांची जागा घेणार्याला बॅकलिस्टच इतकी ताकदीची मिळणार होती की पुनरावृत्त्यांच्या बळावर पुढली काही वर्षं विक्री व्यवस्थित चालणार होती, असं बोललं जायचं आणि ते खरंही ठरलं. २००४ मध्ये पेंग्विनने त्यांना वेगळ्या धावपट्टीवर खेळायला पाठवलं- कॅनडाचं नेतृत्व करायला. तिथे सहा वर्षं त्यांनी पेंग्विन इंटरनॅशनलचं नेतृत्व केलं.
ही सगळी पदं केवळ गुणवत्ता आणि मेहनतीने कमावलेली. कॅनडाच्या इनिंगमध्ये डेव्हिड यांनी अमेरिकेचे खळबळजनक कादंबरीकार फिलीप रॉथ, खालेद हुसैनी, स्वीडनचे स्टिग लार्सन, नादिन गोर्डिमर, एलीस मन्रो, बेनझीर भुत्तोंची भाची फातिमा भुत्तो, झेडी स्मिथ, लंडनस्थित हिशम मटार, जोसेफ बॉयडन, जॉन रॅलस्टोन सॉल, जपानी कॅनेडियन पत्रकार, राजकारणी एड्रियन लुईस क्लार्कसनसारख्या बड्या नावांना आपल्या प्रकाशन यादीत आणलं होतं. वेगवेगळ्या संस्कृतीतले लेखक हेरून त्यांना आपल्यासाठी लिहायला जोडून घेणं हा त्यांचा हातखंडा! आम्ही पेंग्विनबरोबर कुमारांसाठी ७-८ पुस्तकांवर काम केलं, तोही सुखद अनुभव.
एकदा असं झालं की, आम्ही ‘स्कोलॅस्टिक रायटिंग अवॉर्ड्सचा वार्षिक समारोह आयोजित केला होता, डेव्हिड प्रमुख पाहुणे. सहज-सुंदर वक्ता असणार्या अरविंदला ऐनवेळी न्यू-यॉर्कला जावं लागलं. वक्तृत्व फारसं कधी जमलेलं नसल्यानं लेखक, चित्रकार, मुलं, शिक्षक आणि पालक बहुसंख्येत असणार्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या गच्च भरलेल्या सभागृहांचं मला दडपणच आलं. मी डेव्हिडना बाजूला घेऊन तसं सांगितलं. ‘काही नको घाबरूस’ असं म्हणून फक्त ओळख करून देण्याचं काम माझ्यावर सोपवून, त्यांनी झमीरभाईंच्या साथीनं व्यासपीठाचा ताबा घेतला आणि ‘पाहुणे’ न राहता लेखकांचे, पुस्तकांचे किस्से सांगत मुलांशी मस्तच संवाद साधला. लेखन कसं करावं, काय वाचावं यावर टिप्स दिल्या. बालसाहित्य तसा डेव्हिड यांचा प्रांत नसूनही त्यांनी तो समारंभ एक सुंदर अनुभव करून टाकला.
केरळच्या पार्श्वभूमीवरली डेव्हिडची पहिलीच कादंबरी ‘हाऊस ऑफ ब्लू मँगोज’ आम्हा मूठभर मित्रांना त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’पेक्षा आवडलेली. त्यानंतरही त्यांनी दोन कादंबर्या लिहिल्या. भारतात परतून त्यांनी ‘अलेफ बुक्स’ नावाने प्रकाशन सुरू केलंय आणि पेंग्विनच्या जादूचा पुनर्प्रत्यय येऊ लागलाय. त्यांनी काढलेल्या पुस्तकांपैकी ‘अ केस ऑफ इंडियन मार्व्हल्स’ हा भारतीय कथांचा संग्रह संग्राह्य आहे. अनेक भारतीय भाषांतील लेखनाचे अनुवाद ते इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करत आहेत. त्यांनी परममित्राकडून म्हणजे शशी थरूर यांच्याकडून लिहून घेतलेला लेखसंग्रह ‘अ वंडरलँड ऑफ वर्डस्’ तर भाषांवर प्रेम करणार्या प्रत्येकासाठी आनंदाचा ठेवाच. ‘डेव्हिड देविदार इज द बेस्ट थिंग टू हॅपन टू पेंग्विन अँड टू इंडियन रायटिंग इन इंग्लिश’ हे खुशवंत सिंगांचं मत सर्वांनाच पटण्यासारखं!
uarundhati.deosthale@gmail.com
