रघुनंदन गोखले

साठच्या दशकापासून भारतीय बुद्धिबळ संघाची कामगिरी लक्षणीय राहिली. सत्तरच्या दशकामध्ये फिशर-स्पास्की सामन्यांनी जगभरातील तरुणांना या खेळाकडे आकर्षित केले. मग भारत त्यात मागे कसा राहील? माहितीच्या क्रांतीनंतर बुद्धिबळाविषयीचा ज्ञानपसारा सहज उपलब्ध झाला. त्यानंतर प्रगतीचे टप्पे पार करीत देशभरात या खेळाचे नवे तारे तयार झाले. सांघिक स्पर्धामधील भारताचा यश-इतिहास सांगणारा हा लेख..

chess olympiad india strongest team in budapest to win gold medal
सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
What is the humanitarian crisis in Sudan
सुदानमधील लष्करी गटांतील संघर्षामुळे भीषण मानवतावादी संकट… पुढे काय होणार? भारताच्या हितसंबंधांना धोका?
increasing rate of unprotected sex among teenagers
पुणे : किशोरवयीन मुलांमध्ये असुरक्षित शारीरिक संबंधांत वाढ! जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील धक्कादायक निष्कर्ष
Loksatta vyaktivedh AG Noorani India and China border fence Constitutionalist Expert on Kashmir
व्यक्तिवेध: ए. जी. नूरानी
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
Vasai, BJP leader, vadhavan port, fishermen,
वसई : वाढवण बंदराच्या विरोधात भाजप नेत्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे मच्छीमारांमध्ये संभ्रम
Bhayandar, Shiv Sena Thackeray group, Clash Between Two Women Leaders, fight, viral video,
Video: भाईंदरमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

गेल्या काही लेखांमध्ये आपण ग्रँडमास्टर कोनेरू हंपी (भारताचे आशास्थान, ८ जानेवारी) आणि महाराष्ट्राची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख (उगवती तारांकिता, २ जुलै) यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारतानं ऑलिम्पियाडमध्ये कशी पदकं मिळवली याचं वर्णन वाचलं असेलच. पण ही कामगिरी ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये होती आणि त्या वेळी भारत सरकारच्या दृष्टीनं बुद्धिबळाला खास महत्त्व दिलं जात नसल्यामुळे भारतीय संघाची कामगिरी सरकार दरबारी दुर्लक्षित राहिली होती. नंतर महाबलीपूरम येथील ऑलिम्पियाडमध्ये भारतीयांनी आपल्या घरच्या मैदानात खेळताना पदकांची लयलूट केली. सुरुवातीपासून भारताचा सांघिक स्पर्धामधला चढता आलेख कसा राहिला, ते आज आपण बघू या.

भारताची प्रगती

१९४७ साली स्वतंत्र झालेल्या भारतानं १९५६ च्या मॉस्को ऑलिम्पियाडमध्ये पहिल्यांदा भाग घेतला. जरी चार खेळाडू आणि दोन राखीव यांना परवानगी असली, तरी पैशाच्या चणचणीमुळे राष्ट्रीय विजेते मुंबईकर रामचंद्र सप्रे, सांगलीचे भालचंद्र म्हैसकर, कानपूरचे रामदास गुप्ता आणि मद्रासचे वेंकटरमण असा चार जणांचा संघ मॉस्को येथे खेळून आला. त्यानंतर भारताला लाभलेले पहिले आंतरराष्ट्रीय मास्टर मॅन्युएल एरन यांच्या नेतृत्वाखाली अनेक संघ अधूनमधून ऑलिम्पियाड खेळत राहिले. पण १९७२ च्या फिशर-स्पास्की सामन्यांनी बुद्धिबळाचे जग बदलून गेलं आणि अनेक तरुण बुद्धिबळाकडे ओढले गेले. राजा रविशेखर, परमेश्वरन, रवीकुमार यांच्या बरोबर महाराष्ट्रातून अरुण वैद्य आणि प्रवीण ठिपसे यांनी भारतीय बुद्धिबळात चैतन्य आणलं. प्रवीण ठिपसे तर अनेक वेळा राष्ट्रीय विजेता झाला. पण सांघिकदृष्टय़ा भारत कमी पडत होता. कारण बुद्धिबळाचं वाङ्मय आपल्या खेळाडूंना इथं स्वस्तात मिळत नव्हतं. त्यामुळे मोजके खेळाडू तयार होत होते. विश्वनाथन आनंदच्या भारतीय बुद्धिबळातील उदयानंतर भारतीय बुद्धिबळानं जी गरुडझेप घेतली ती अजूनही कायम आहे. त्यात भर पडली कॉम्प्युटर क्रांतीची! यामुळे आधीच डोकेबाज असलेल्या भारतीयांना जगभरातील खेळज्ञान मुक्तपणे मिळू लागलं. आज तर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर तुम्ही साधा राष्ट्रीय खेळाडू होणं कठीण असतं इतका माहितीच्या जालानं उद्रेक घडवला आहे.

रफिक खान आणि दिव्येंदु बारुआ..

उदरनिर्वाहासाठी सुतारकाम करणाऱ्या भोपाळच्या रफिक खान या प्रतिभावान बुद्धिबळपटूनं कोलकातामध्ये १९७६ साली झालेल्या ‘राष्ट्रीय ब’ स्पर्धेचं अजिंक्यपद १५ पैकी तब्बल १३ गुण मिळवून अभूतपूर्व कामगिरी केली. एवढंच नव्हे तर पुढच्या वर्षी रफिक खान भारतीय अजिंक्यवीर बनला. देशभरातील वृत्तपत्रांनी या प्रतिभावंतांची हलाखीची परिस्थिती जगभर केली. त्यानंतर तत्कालीन उद्योगमंत्री (आणि मूळचे कामगार पुढारी) जॉर्ज फर्नाडिस यांच्या कानावर ही गोष्ट गेली. फर्नाडिस हे वेगळंच व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी भोपाळ दौऱ्याच्या वेळी रफिक खानला विमानतळावर भेटायला बोलावलं आणि त्याला ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल’मध्ये सन्मानाची नोकरी दिली. मग रफिकचा खेळ बहरला. १९८० सालच्या माल्टा ऑलिम्पियाडनं भारतीय संघाला खरीखुरी चालना दिली. अशिक्षित रफिक खाननं भारतीय संघातर्फे खेळताना १३ पैकी १० गुण करून चक्क रौप्य पदक मिळवलं. हा माणूस किती साधा होता याची एक गंमत सांगतो. काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये एक स्पर्धा झाली होती. तेथे उद्घाटन समारंभात मी व्यासपीठावरून प्रेक्षकांत नजर टाकली तर रफिक खान शेवटच्या रांगेत बसले होते. मी उतरून त्यांना हाताला धरून व्यासपीठावर आणलं. अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यामुळे रफिक खानना कोणीही ओळखत नव्हतं.आयोजक मिलिंद कुलकर्णीनी या प्रतिभावंताचा यथोचित सन्मान केला, पण खानसाहेब पार अवघडून गेले होते.

या पदकविजेत्या कामगिरीनंतर तब्बल १० वर्षांनी दिब्येन्दू बारुआनं १९९० च्या नोवी साद येथील ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळवलं. दिब्येन्दू जर ४० वर्षे उशिरा जन्माला आला असता तर आजच्या तरुण खेळाडूंना त्यानं टक्कर दिली असती, असं त्याच्या अलौकिक प्रतिभेकडे बघून वाटतं. वयाच्या बाराव्या वर्षी त्यानं त्या वेळच्या जागतिक दुसऱ्या क्रमांकाच्या व्हिक्टर कोर्चनॉयला लंडनच्या लॉईड्स बँक मास्टर्समध्ये पाणी पाजलं होतं. असो. बारुआच्या या महापराक्रमामुळे भारतीय संघानं नोवी साद ऑलिम्पियाडमध्ये १० व्या क्रमांकाची अभिमानास्पद कामगिरी केली.

पहिलं सांघिक पदक आणि अर्थमंत्र्यांकडून जगज्जेती पराभूत

भारतीय संघाला पहिलं पदक मिळवण्यासाठी २०१४ साल उजाडावं लागलं. नॉर्वे मधील ट्रॉम्सो येथील ऑलिम्पियाडमध्ये परिमार्जन नेगी, सेथुरामन, शशिकिरण, आधिबान आणि ललित बाबू यांच्या संघानं कांस्य पदक मिळवलं आणि तेही रशियन संघाला मागे टाकून! सर्व जण ग्रॅण्डमास्टर्स असलेला भारतीय संघ इतका तडफेनं खेळत होता की करुआनाशी झालेला परिमार्जन नेगीचा पराभव वगळता आपल्या संघातील प्रमुख खेळाडू अपराजित राहिले. गेल्या आठवडय़ात राष्ट्रीय विजेतेपद जिंकलेला सेथुरामन, शशी किरण आणि आधिबान या ग्रँडमास्टर त्रिकुटानं तर एकही डाव गमावला नाही. खरोखरच संघवृत्तीनं खेचून आणलेलं हे पदक होतं. त्यानंतर भारताच्या दोन्ही संघांनी सुंदर कामगिरी करूनही २०१६ सालच्या बाकू (अझरबैजान) येथील ऑलिम्पियाडमध्ये त्यांना पदकांनी हुलकावणी दिली. पुरुषांनी चौथा तर महिलांनी पाचवा क्रमांक मिळवला. या ऑलिम्पियाडचं वैशिष्टय़ म्हणजे लॅटव्हिया महिला संघाकडून पहिल्या पटावर खेळताना त्या देशाची अर्थमंत्री डॅना रिझनीस -ओझोला हिनं केलेला जगज्जेत्या हू यिफानचा पराभव. अर्थात डॅना ही महिला ग्रँडमास्टर आहे आणि वेळात वेळ काढून २०१६ पर्यंत कमीत कमी ऑलिम्पियाडमध्ये तरी खेळत असे.

२०१८ साली विश्वनाथन आनंदने भारतीय संघातर्फे खेळायचा निर्णय घेतला आणि त्याचप्रमाणे महिला संघात कोनेरू हम्पीनं पुनरागमन केलं. परंतु दोन्ही संघांना अनुक्रमे ६ आणि ८ या क्रमांकांवर समाधान मानावं लागलं, पण आपल्या संघांनी पहिल्या दहांत क्रमांक टिकवून ठेवला हेही नसे थोडके.

करोनाकाळातील यश..

२०२० साली करोना विषाणूमुळे जगभर हाहाकार उडाला आणि संपूर्ण जगाचे सर्व व्यवहार बंद पडले. परंतु घरात अडकून पडलेल्या लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून बुद्धिबळ खेळता येऊ लागलं. अचानक यूटय़ूबवरून प्रक्षेपण करणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढली. एवढंच नव्हे तर http://www.chess.com किंवा lichess.org या ऑनलाइन व्यासपीठावर खेळणाऱ्या लोकांमध्ये कमालीची वाढ झाली. २०२० साली जगभरातील लोकांना भयग्रस्त केलं होतं. त्यात बुद्धिबळ ऑलिम्पियाड तर दूरची गोष्ट!

अशा वेळी जागतिक बुद्धिबळ संघटनेनं इंटरनेटच्या प्रसाराचा फायदा घेऊन ऑनलाइन ऑलिम्पियाड घेण्याचा निर्णय घेतला! या स्पर्धेसाठी दोन पुरुष, दोन महिला, एक जुनिअर मुलगा आणि एक जुनिअर मुलगी असा एकत्रित संघ ठरवण्यात आला. यामध्ये १६३ संघांनी भाग घेतला.

भारतानं उपांत्य फेरीपर्यंत आरामात धडक मारली होती. मात्र उपांत्य फेरीत त्यांनी आणि पोलंड संघानं १-१ सामना जिंकल्यामुळे टाय ब्रेकर म्हणून दोन्ही संघांमध्ये चिठ्ठी टाकून खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यामध्ये मोनिका सोक्को विरुद्ध कोनेरू हंपी अशा चिठ्ठय़ा आल्या. हा सामना जगातील सर्वात जास्त प्रेक्षकांनी बघितलेला विद्युतगती सामना असावा. २००हून अधिक देशांतील बुद्धिबळ रसिक हा सामना श्वास रोखून बघत होते. हंपीने बाजी मारली आणि भारत अंतिम फेरीत आला.

भारत-रशिया अंतीम फेरीला सुरुवात झाली आणि cloudflare servers¨च्या बिघाडामुळे जगातील अनेक इंटरनेट जाळी बंद पडली. त्यामध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश होता. अशा वेळी जागतिक बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आणि रशियाचे माजी उप पंतप्रधान अर्काडी डॉरकोविच यांच्यातील राजकारणी जागा झाला आणि त्यांनी भारत आणि रशिया या दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून जाहीर केलं.

२०२१ साली कांस्यपदक

कोरोनाचा जोर कमी होत नसल्यामुळे २०२१ साली पुन्हा एकदा ऑनलाइन ऑलिम्पियाड घेण्याचं ठरलं. २०२० मध्ये भारतीय खेळाडू अनेक वेळा वीज गेली, इंटरनेट बंद पडलं अशा आपल्या जीवनातील दैनंदिन समस्यांमुळे घायकुतीला यायचे. गोव्यातून खेळणारी भक्ती कुलकर्णी तर एकदा १५ मिनिटांच्या डावातील पाच मिनिटे इंटरनेट बंद पडल्यामुळे शेवटच्या खेळय़ा पटापट खेळून कशीबशी जिंकली होती. भारतीय संघाचा न खेळणारा कर्णधार श्रीनाथ यानं तर विश्वनाथन आनंदच्या बंगल्याबाहेर वीज मंडळाचे खास तंत्रज्ञ बसवले होते. त्यामुळे २०२१ साली भारतीय बुद्धिबळ संघटनेनं चीनचा कित्ता गिरवून सर्व खेळाडूंना एका ठिकाणी बोलावलं. चेन्नईमधील एका पंचतारांकित हॉटेलनं एका वेळी दोन वेगवेगळी इंटरनेट बसवली (एक बंद पडलं तर दुसरं) म्हणून तेथून भारतीय संघ खेळेल असं ठरवण्यात आलं.

उपांत्य फेरीपर्यंत तरी भारतानं छान खेळ केला होता. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघानं अमेरिकेचा ५-१ असा दणदणीत पराभव केला. आता निव्वळ बरोबरी केली की झालं असे भारतीय संघाचे चाहते मनात मांडे खात होते. पण झालं भलतंच. अमेरिकन संघानं ४-२ अशी मात देऊन टाय ब्रेकपर्यंत मजल मारली. विद्युतगती टाय ब्रेकरमध्ये अचानक सर्व भारतीय खेळाडू गडगडले आणि द्रोणवली हरिकाचा विजय वगळता सगळय़ांची हार झाली आणि भारत बाहेर फेकला गेला. भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

भारताची पदक लयलूट..

रशियावर पाश्चात्य देशांनी निर्बंध घातल्यामुळे ऐनवेळी मॉस्को येथे ठरलेलं २०२२ सालचं ऑलिम्पियाड कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला, पण तामिळनाडू सरकार अखिल भारतीय बुद्धिबळ संघाच्या मागे उभं राहिलं आणि २०२२चं ऑलिम्पियाड महाबलीपूरम येथे घेण्याचं ठरलं. वेळ कमी होता आणि केंद्र सरकारनंही मदतीचा हात दिला. व्हिसा नियम शिथिल करण्यात आले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी तर आपली सर्व यंत्रणा ऑलिम्पियाडसाठी उभी केली. भारताला यजमान म्हणून दोन संघ उतरवता आले होते पण अखेरच्या क्षणी तांत्रिक बाबींमुळे अजून एक संघ उतरवण्याची परवानगी मिळाली. अशा रीतीनं भारताचे एकूण ६ संघ खुल्या आणि महिला गटात खेळत होते.

या घरच्या मैदानावर खेळताना आपल्या खेळाडूंचा खेळ बहरला आणि खुल्या गटात ‘भारत ब’ आणि ‘महिला अ’ संघांनी कांस्य पदकं मिळवून भारतीय बुद्धिबळाला उभारी दिली. आपल्या अनेक खेळाडूंनी वैयक्तिक पदकं मिळवली. या सर्वाच्या देदीप्यमान कामगिरीला न्याय देण्यासाठी मला वेगळा लेख खास महाबलीपूरम/ चेन्नई ऑलिम्पियाडवर लिहिणं योग्य वाटतं. त्यासाठी वाचकांना फक्त एक आठवडा वाट बघावी लागेल.

gokhale.chess@gmail.com