बायकोशी घटस्फोट घेऊन पीटर मग्यार यांनी देशप्रेमाला सर्वोच्च स्थान दिल्याचे दिसते. ओर्बान यांच्या प्रचारासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष उतरले. त्यामुळे परदेशी हस्तक्षेपाचा मुद्दा प्रभावी ठरला. लोकांनी मतदानही उत्साहाने केलेले दिसते. आपल्याकडे असा कोणी पीटर मग्यार निर्माण होणार नाही. आपली संस्कृती लोकशाहीला पोषक दिसत नाही. भूतकाळातील वैभवशाली इतिहासात आपले लोक रममाण झालेले दिसतात. वर्तमानात लढण्याचे शौर्य त्यांच्याकडे दिसत नाही. गुलामीच्या खुणा आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या खुणा यातला फरक त्यांना समजत नाही. देशप्रेम आणि लोकशाहीप्रेमामुळे पीटर मग्यार देशाच्या सार्वभौमत्वासाठी लढला आणि सत्ताधारी झाला. रेवडी संस्कृतीत पीटर मग्यार निर्माण कसा होणार? – युगानंद गुलाबराव साळवे, पुणे

अभ्यासपूर्ण विश्लेषण

बुडापेस्टच्या निमित्ताने केवळ एका देशाचे पर्यटन किंवा भूगोल न मांडता, तिथल्या सत्तांतराचा आणि लोकशाही प्रक्रियेचा जो विश्लेषणात्मक धांडोळा लेखकाने घेतला आहे, तो अतिशय अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणारा आहे. लेखकाने ज्याप्रकारे डॅन्यूब नदीचे वर्णन केले आहे, ते मनमोहक आहे. एखाद्या नदीला मानवी भावभावनांशी जोडून, तिची तुलना मीनाकुमारी आणि मधुबाला यांच्याशी करणे, हे लेखकाच्या लेखणीचे वेगळेपण अधोरेखित करते. मात्र लेख तिथून राजकीय विश्लेषणाकडे वळतो तेव्हा त्याची गंभीरता अधिक जाणवते. हंगेरीच्या जनतेने एका प्रस्थापित सत्ताधीशाला- ज्याने १६ वर्षे सत्ता उपभोगली, अशा विक्टर ओर्बान यांना लोकशाही मार्गाने सत्तेतून पायउतार केले, हे दृश्य जगातील सर्व लोकशाहीवादी देशांसाठी प्रेरणादायी आहे. या लेखातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीटर मग्यार यांचा उदय. राजकीय वारसा नसलेला, नवीन दमाचा तरुण जेव्हा प्रस्थापित राजवटीला आव्हान देतो, तेव्हा तो केवळ शपथविधी सोहळ्यात डान्स करत नाही, तर तो आपल्या आचरणातून आणि ध्येयातून जनतेशी संवाद साधतो. त्यांनी निवडलेला पेहराव (पांढरा टी-शर्ट आणि जीन्स) हा केवळ दिखावा नसून, तो सामान्य जनतेशी असलेल्या त्यांच्या नात्याचे प्रतीक आहे, हे विश्लेषण पटले.

भारतीयांच्या संदर्भात बोलायचे झाले तर आजच्या काळात जेव्हा आपण नेते आणि जनता यांच्यातील दुरावा वाढत असल्याचे पाहतो; तेव्हा हंगेरीतील हे सत्तांतर अनेक प्रश्न उपस्थित करते. सत्ता मिळवण्यासाठी परकीय शक्तींचा हस्तक्षेप नको, असा ठाम पवित्रा पीटर मग्यार यांनी घेतला होता, हे त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे लक्षण आहे. तसेच लोकशाहीत सरकारी माध्यमांचा वापर सत्ताधार्‍यांच्या लांगूलचालनासाठी केला जातो तेव्हा त्याचा विरोध कसा करावा, याचे उत्तम उदाहरण पीटर यांनी त्या लाइव्ह मुलाखतीत दिले.

हेही वाचा

लेखाच्या उत्तरार्धात उल्लेख केल्याप्रमाणे, निवडणुकांमध्ये मतविभाजन टाळण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणे, ही लोकशाही वाचवण्याची पहिली पायरी आहे. हंगेरीच्या या राजकीय प्रवासामुळे हे सिद्ध होते की, लोकशाही कितीही संकटात असली तरी ती संपत नाही, ती केवळ योग्य नेतृत्वाची वाट पाहत असते. लेखकाची शैली उपरोधिक आणि तितकीच वस्तुनिष्ठ आहे. बुडापेस्टच्या पार्लमेंट इमारतीचे वर्णन असो किंवा तिथल्या सुरक्षारक्षकांचा संयम – लेख पूर्ण वाचताना आपण त्या वातावरणात पोहोचल्याचा भास होतो. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषण मराठी वाचकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्याला जागतिक घडामोडींकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन मिळतो. हा लेख वाचकांसाठी नक्कीच एक वैचारिक मेजवानी ठरला आहे.- प्रवीण डोईबळे, अंबरनाथ

वारसा जपणे महत्त्वाचे

युरोपने आपला इतिहास आणि वारसा खूप चांगल्या प्रकारे जपून ठेवला आहे. प्रागसारख्या शहरात शेकडो वर्षांपूर्वीच्या वास्तू आजही चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे त्या शहराची ओळख आणि सौंदर्य कायम राहिले आहे. आपल्याकडे मात्र अनेकदा जुन्या वास्तूंकडे दुर्लक्ष केले जाते. विकास महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर इतिहास जपणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. कारण इतिहास नष्ट झाला तर आपली ओळखही हळूहळू हरवते. लेख फक्त प्रवासाचे वर्णन करत नाही, तर एक महत्त्वाचा संदेश देतो. आपल्या गावातील, शहरातील आणि देशातील ऐतिहासिक ठेवा जपला तरच पुढच्या पिढ्यांना त्याचा अभिमान वाटेल. वारसा जपणे ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.- फ्रॅंक मिरांडा, वसई

चीनची प्रगतिशील वाटचाल

हा लेख मध्य युरोपातील हंगेरी या देशाची नितांत रमणीय सफर घडवून आणतो आणि त्याचबरोबर शांततामय मार्गाने हंगेरीतील अलीकडील सत्तापालटाची रोमहर्षक कहाणी कथन करतो. पूर्वीच्या सोव्हिएत महासंघात कम्युनिझमचा कडवा डोस प्राशन करून अजीर्ण झालेल्या हंगेरीने कात टाकून खुल्या लोकशाहीला आणि उदारमतवादाला कसे कवेत घेतले आहे याचे सुरेख दर्शन या लेखातून होते. ‘भाकरी फिरविली नाही तर ती करपते तसेच सत्तेचे आहे’ या उक्तीला हंगेरीतील सत्तापालटातून दुजोरा मिळतो. व्हिक्टर ओर्बान यांची १६ वर्षांची एककल्ली एकाधिकारशाही पीटर मग्यार या तुलनेने तरुण आणि अननुभवी नेत्याने निर्णायकरीत्या लोकशाही मार्गाने उलथवून टाकली ही बाब त्यामुळे उल्लेखनीय ठरते. हंगेरीतील वास्तव्यात चीनच्या ‘सॉफ्ट पॉवर’चे दर्शन लेखकाला झाले. याचे कारण हंगेरियन शाळांमध्ये चिनी तत्त्वज्ञ कन्फ्युशियसचे तत्त्वज्ञान शिकविले जाते. याचाच अर्थ चीन अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात शक्तिशाली महासत्ता होण्यासाठी जगभरात ‘हार्ड पॉवर’बरोबर ‘सॉफ्ट पॉवर’ही जोपासताना दिसतो.-डॉ. विकास इनामदार

विविधांगी रोचक प्रवासवर्णन

गिरीश कुबेर यांचे प्रवासवर्णन ओघवते, रंजक तसेच फार बोजड माहिती न देतादेखील त्या ठिकाणाच्या प्रेमात पाडणारे असते. ‘अन्यथा’ या सदरातून ‘युरोपचे धडे’ या शीर्षकाखाली त्यांनी युरोपचं सौंदर्य शब्दबद्ध केलं. तसंच नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘साहेबाच्या देशात’ आणि ‘साहेबी जगात’ या पुस्तकांमधून ते त्यांच्या नजरेतला युरोप दाखवत आहेत. अधूनमधून तिथल्या उत्तम व्यवस्थेच्या उदाहरणांमधून आपल्या व्यवस्थेला हलके चिमटे काढण्याची शैली वाखाणण्याजोगी तसेच तुलनेमुळे विदारक परिस्थितीची जाणीव करून देणारी.

हंगेरीतील चीनच्या व आपल्या राजदूताच्या कल्चरल बजेटमधील प्रचंड मोठी तफावत पाहून आपल्या विश्वगुरू इत्यादींच्या वल्गनांवर हसू आले आणि ‘सामना’ चित्रपटातील ‘मास्तर तुमचा पगार किती, तुम्ही बोलताय किती?’ हा संवाद आठवला. क्रोएशियातलं महानगरातील निरभ्र आकाश असो अथवा एडिंबरातलं लेखकांसाठीचं रायटर्स म्युझियम असो, तसेच कॉट्सवल्डमधील नेत्यांचे पोस्टर विरहित रस्ते किंवा हंगेरीमधील पीटर मग्यार यांचे पत्नीच्या विरोधात जाऊन वैयक्तिक संसारापेक्षा देशाला महत्त्व देणे असो… आणि सत्ता मिळाल्यावर देश तसेच लोकशाही हिताचे निर्णय घेणे असो; हे सर्व आपल्याकडच्या नागरिकांना स्वप्नवत वाटेल असे आहे. प्रवासवर्णन म्हणजे फक्त त्या देशाच्या अथवा शहराच्या सौंदर्याचे वर्णन नसून, ती चालवणार्‍या व्यवस्थेचे तसेच ते सौंदर्य जपणार्‍या व जोजवणार्‍या नागरिकांचेदेखील असते हे लेखकाच्या लेखांमधून उमगते. –विवेक इंगळे, परभणी.

एखाद्या कथेची जणू सुंदर ्क्रिरप्टच!

हा लेख लालित्य आणि खुमासदार कथाकथन याचा छान संगम वाटला. हंगेरीमधील अगदी ताजी राजकीय घडामोड, आपल्या देशातील घडामोडीत सामान्य वाचकांच्या सहज नजरेत न येणारीच. पीटर मग्यार महाशय तिथे पंतप्रधान कसे झाले याचे मार्मिक वर्णन आणि विश्लेषण खुमासदार वाटले. हंगेरी-बुडापेस्ट-डॅन्यूब या मनोहर पार्श्वभूमीवर घडलेली रोचक, नाट्यपूर्ण घटना जणू एखाद्या चित्रपट कथेची मस्त ्क्रिरप्टच!- व्ही. एस. अवटी, छ. संभाजीनगर.

विचारपूर्वक प्रतिसाद

गिरीश कुबेर यांची लेखणी नेहमीच भारतीय राजकारणाला आंतरराष्ट्रीय घटनांचा आरसा कुशलपणे दाखवते. हंगेरीतील सत्तांतराचे निमित्त साधत त्यांनी जे सूचित केले, ते सुजाण वाचकाला लगेच उमगते. मात्र या लेखनशैलीची एक मर्यादाही आहे – अप्रत्यक्ष तुलना करताना संदर्भ सोडवले जाऊ शकतात, आणि वाचक स्वत:चा कल त्या तुलनेत मिसळून टाकतो. म्हणजे कौतुक करणारा अधिकच कौतुकाने, तर टीकाकार अधिकच टीकेने वाचतो. ही शैली प्रभावी असली तरी तिची निष्पक्षता वादाची राहू शकते. हंगेरीतील घटनांचे भारतावरील संभाव्य परिणाम -हंगेरीत व्हिक्टर ओर्बान यांच्या फिडेझ पक्षाने वर्षानुवर्षे संस्थात्मक यंत्रणा, न्यायव्यवस्था, माध्यमे, निवडणूक आयोग हळूहळू आपल्या बाजूने वळवल्या. पीटर मग्यार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी एकत्र येत नुकताच जो धक्का दिला, तो लोकशाहीच्या पुनरुज्जीवनाचा संदेश देतो.

आता भारताच्या संदर्भात हे महत्त्वाचे का ठरते?
पहिला मुद्दा- संस्थात्मक शरण जेव्हा एखाद्या देशात निवडणूक यंत्रणा, तपास संस्था किंवा माध्यमे एकाच दिशेने झुकल्यासारखी वाटतात, तेव्हा लोकशाहीचे स्वरूप शाबूत राहिले तरी आत्मा क्षीण होतो. भारतात अशा प्रश्नांची चर्चा सुरू आहे, ती निखळ आणि पुराव्यानिशी व्हायला हवी, केवळ राजकीय सोयीनुसार नव्हे.दुसरा मुद्दा- बहुमताचा अर्थ- हंगेरीने दाखवले की विधिमंडळातील प्रचंड बहुमत म्हणजे लोकशाही नव्हे; जनतेची खरी इच्छाशक्ती वेगळी असू शकते. भारतातही बहुमताला लोकमताचे अंतिम प्रमाण मानण्याची घाई न करणे श्रेयस्कर.

विरोधी पक्षांसाठी लेखकाचा संदेश- लेखकाने थेट न सांगताही स्पष्ट केले आहे की, विखुरलेला विरोध हा खरा विरोध नसतो. हंगेरीतील विरोधकांनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे धाडस दाखवले आणि त्याचा परिणाम झाला. भारतातील विरोधी पक्षांसाठी हा धडा महत्त्वाचा आहे. ‘इंडिया’ आघाडी अनेकदा आपापल्या राज्यातील हिशेबात गुंग राहिली; राष्ट्रीय आव्हानाला राष्ट्रीय उत्तर देण्याची तयारी अजूनही अपुरी दिसते. त्याचबरोबर एक प्रामाणिक प्रश्नही विरोधकांनी स्वत:ला विचारायला हवा- पर्यायी दृष्टिकोन काय? केवळ ‘ते चुकीचे आहेत’ हे सांगणे पुरेसे नाही. मग्यारने ओर्बानविरोधात उभे राहताना ठोस कार्यक्रम मांडला. भारतातील विरोधकांनी केवळ विरोधाची भाषा सोडून रचनात्मक पर्याय मांडला तर जनता अधिक गांभीर्याने घेईल.

सत्ताधार्‍यांनी कोणत्या चुका टाळाव्यात? – एक- संस्थांवरील विश्वास- ओर्बान यांच्या अस्ताला एक महत्त्वाचे कारण म्हणजे जनतेचा संस्थांवरील विश्वास उडालेला होता आणि त्याचे खापर सत्ताधार्‍यांवर फुटले. भारतात सत्ताधार्‍यांनी संस्था बळकट असल्याचे केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीने सिद्ध करणे आवश्यक आहे.दोन- आर्थिक असमतोल- हंगेरीतील नाराजीचे एक मूळ कारण आर्थिक विषमता होते. भारतातही विकासाच्या गोष्टी होत असताना ग्रामीण-शहरी दरी, बेरोजगारी आणि महागाई या प्रश्नांना उत्तर न मिळाल्यास मतदार शांत राहणार नाहीत.

तीन- अतिआत्मविश्वास टाळावा- प्रदीर्घ सत्तेनंतर येणारा अतिआत्मविश्वास हा सगळ्यात मोठा धोका असतो. ओर्बान याच सापळ्यात अडकले. भारतातील सत्ताधार्‍यांनी जनमताला गृहीत धरणे टाळावे.मतदारांसाठी सर्वात महत्त्वाचा धडा- शेवटी लोकशाहीचा कणा मतदार असतो; पक्ष, नेते किंवा माध्यमे नव्हेत. हंगेरीतील जनतेने जे केले ते साधे, पण महत्त्वाचे आहे. त्यांनी मतदानाची शक्ती ओळखली आणि ती वापरली. भारतीय मतदारांनीही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात की, जात, धर्म आणि भावनिक मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या काळात येणार्‍या आश्वासनांची तुलना मागील कार्यकाळातील कामगिरीशी करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे.

माध्यमसाक्षरता- हा आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचा लोकशाही गुण आहे. कोण काय सांगतो, कशासाठी सांगतो, हे जाणण्याची सवय ठेवली तर फसवणूक कठीण होते.आणि सर्वात महत्त्वाचे- मतदान न करणे हे एक राजकीय विधान असते, पण ते सत्ताधार्‍यांच्या पथ्यावर पडते. हंगेरीतील बदल घडला कारण सामान्य माणूस घराबाहेर पडला.

हा लेख हे एक सुजाण आरसे-दर्शन आहे. (ते नेहमीच तसे असते असे म्हटले तर वावगे होणार नाही). हंगेरी बघताना भारत दिसतो, हे त्यांचे कौशल्य. मात्र आरशात दिसणारी प्रतिमा कधी वाकडी दिसते हे विसरता येत नाही. लेखाची दिशा स्पष्ट असली तरी वाचकाने स्वत:चे डोळे उघडे ठेवून, सर्व बाजूंचा विचार करत, भारतीय लोकशाहीचे भवितव्य घडवण्यात सक्रिय सहभाग घेणे, हाच या लेखाला खरा प्रतिसाद ठरेल.-मिलिंद दाते