महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांची आज (१२ जून) पुण्यतिथी.. त्यानिमित्ताने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात पुलंचे सुहृद आणि ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी केलेलं भाषण पुनर्मुद्रित करीत आहोत..

गेले दोन दिवस मोहन वाघांच्या ‘चंद्रलेखा’ने सादर केलेले ‘वाऱ्यावरची वरात’ आणि ‘बटाटय़ाची चाळ’चे प्रयोग तुडुंब भरलेल्या रसिकांनी हशा आणि टाळ्यांची प्रचंड दाद देताना मी पाहिले त्यावेळी मला विलक्षण अनुभव येत होता. हे कार्यक्रम होत होते पुलंच्या पुण्यतिथीनिमित्त. ‘पुण्यतिथी’ हा शब्द मृत्यूचा सूचक आहे. पण काल हे दोन प्रयोग बघत असताना आणि दाद अनुभवत असताना मला जाणवलं ते असं की, पु. ल. देशपांडेंसारखी अशी माणसं क्वचितच जन्माला येतात, की ज्यांच्या बाबतीत ‘पुण्यतिथी’ हा शब्द खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण असतो. आमच्या लहानपणी सांगत की, दान दिलं की पुण्य लागतं. कोणी जलदान करी. कुणी अन्नदान करी. कुणी धनदान करी. त्याने पुण्य लागतं, गोष्ट खरी आहे. पण अन्न शेवटी खाऊन संपतं. पाणी पिऊन संपतं. धन खर्च करून संपतं. पण पुलंनी जे आपल्याला दान दिलंय ‘आनंदाचं’- ते कितीही खर्च केलं तरी पुन:पुन्हा आपण ते अनुभवू शकतो.

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

एक प्राचीन ऋषी एके दिवशी पहाटे उठला, त्याने सृष्टीचं सौंदर्य पाहिलं आणि तो विलक्षण आनंदाने थरारून गेला, भारावून गेला आणि चटकन् म्हणाला की, ‘पश्य देवस्य काव्यं, न ममार न जीर्यते’.. अरे, हे देवाचं काव्य पाहा. याला न मृत्यू, न याला वार्धक्य. पुलंनी जे आनंदाचं दान दिलं ते बघून तुमच्या-आमच्यासारख्या प्रत्येक माणसाच्या मनात जो ऋषी असतो, तो रसिक म्हणून पटकन् दाद देतो की, ‘पश्य पुलस्य काव्यं, न ममार न जीर्यते’.. याला नाही वार्धक्य, नाही मरण. आणि ज्याला मरण नाही आणि जरा नाही अशा पुलंच्या मृत्यूची तिथी मी म्हणालो त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने पुण्यतिथी आहे. पुलंबरोबर मी तीन वर्ष काम केलं ऑल इंडिया रेडियोमध्ये. एका खोलीत टेबलाला टेबल लावून काम केलं. पुलंचं कर्तृत्व आणि बहुरंगी, बहुढंगी व्यक्तित्व जेव्हा मी बघतो तेव्हा झाडाचं रूपक माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. आपण अनेक झाडं बघतो. प्रत्येक झाड म्हणजे एखाद्या डान्सरने घेतलेली नृत्याची पोझ आहे असं मला वाटतं.

दहा आंब्यांची झाडं पाहिली तरी प्रत्येक झाडाची नृत्याची पोझ वेगळी असते. झाडाला फुलं येतात. फळं येतात. हिरवीगार पानं येतात. पक्षी येऊन त्यावर बसतात. हे सगळं झाडाचं सौंदर्य आपल्याला दिसतं, त्याचं वैभव दिसतं. तसं पुलंचं पेटीवादन असो, नाटक असो, गाणं असो, एकपात्री असो.. कलांचे नाना तऱ्हांचे आविष्कार असोत- झाडाची पानं, फुलं, फळं यांच्यासारखे ते आपल्याला दिसतात आणि आनंद देतात. पण झाडाचं जे चैतन्यकेंद्र आहे ते आपल्याला दिसत नाही. ते असतं झाडाचं ‘मूळ’.. जे जमिनीच्या खाली असतं. पुलंच्या व्यक्तित्वाचे जेव्हा मी अनेक सुंदर, आनंददायी आविष्कार बघतो तेव्हा माझ्या डोक्यात नेहमी विचार येतो की, पु. ल. देशपांडे नावाच्या इतके आविष्कार घडवणाऱ्या या माणसाचं हे मूळ- जे दिसत नाही, किंवा चैतन्यकेंद्र- जे त्यांचं आहे, ते नेमकं काय आहे? मी त्यांना पाहिलं होतं म्हणून सांगतो, की त्यांच्यामध्ये एक असं काहीतरी होतं की ज्याला सतत आनंद निर्माण करण्यासाठी सर्जनशील होऊन प्रकट होण्याची इच्छा होती. जशी झाडाला त्या मुळामध्ये आतून व्यक्त होण्याची, प्रकट होण्याची इच्छा होते, तशी ती पुलंच्या बाबतीतही होती. आमचं रेकॉर्डिग झालं की ‘पीएल’च्या भोवती नेहमी मैफली जमायच्या. मैफलींचा राजाच होता तो! ते नेहमी आनंद निर्माण करत असत. म्हणून मला नेहमी असं वाटतं की, ईश्वराला अनेक शब्द आपण वापरतो, त्यात एक ‘नटेश्वर’ हा शब्द आहे, जो मला फार आवडतो. नट जसा नाना तऱ्हांची रूपं घेतो- म्हणून तो ‘नटेश्वर’ आहे. हा ‘नटेश्वर’ कुठेतरी पुलंच्या आत होता. ते मैफलीत असोत, घरात बसून खोलीचं दार बंद करून लेखन करीत असोत, रंगमंचावर असोत, खासगी मैफलीत असोत.. पुलं कुठेही असोत, त्यांच्यातला ‘नटेश्वर’ सतत प्रकट होत असे.

मी ‘मैफली माणसं’ खूप पाहिली आहेत. दोन तऱ्हांची मैफली माणसं असतात. एक मैफली माणूस असा असतो, की ज्याला कामाची बैठक नसते. कुठलीही लेखनाची जबाबदारी घेऊ दे- कादंबरी लिहायची, पुस्तक लिहायचं तर पाच-पाच, सहा-सहा तास बैठक मारून बसावं लागतं.. महिनोन् महिने. ही बैठक ज्यांच्याकडे नसते अशी माणसं किस्से सांगतात, मैफलीत गोष्टी सांगतात आणि मैफली रंगवतात. त्या गोष्टींमध्ये ‘गॉसिप’चा भाग बराचसा असतो. तो पुलंच्या खासगी मैफलींमध्ये बिलकूल नसे. पण अशा मैफलींमधली किस्से रंगवणारी माणसं कुठलेही गड जरी चढत नसली तरी एक गड या असल्या मैफलीत चढत असतात. तो म्हणजे ‘भानगड’! ही माणसं एका अर्थाने आनंद देतात आणि घेतात. पण एका अर्थाने ती आयुष्याचे जे आपलं काही ऋण आहे त्याच्यापासून पळून जात असतात.

पुलंची मैफल ही वेगळ्या तऱ्हेची होती. म्हणजे असं की, पुलं कष्टाला कधी भ्यायले नाहीत. पुष्कळ लोकांना असं वाटतं की ते हसणारे, विनोद करणारे, थट्टामस्करी, मैफिली करणारे होते. पण पुलंसारखा कष्टाळू दुसरा माणूस मी पाहिलेला नाही. इतकं सगळं साहित्य.. तुम्ही त्यांची पुस्तकं बघा- ती उतरवून काढायलाच एक आयुष्य पुरायचं नाही, इतकं त्यांनी लिहिलंय. शिवाय त्यांचं स्टेजवरचं काम.. हे विलक्षण कष्ट घ्यायची ताकद असल्याशिवाय किंवा बैठक असल्याशिवाय शक्यच नाही. पण याचं कारण मी आपल्याला सांगितलं, की पीएल मैफलीमध्ये जेव्हा असत- मग ती रंगमंचावरची असो, खासगी असो.. मैफलीत असताना पुष्कळशी माणसं मैफलीच्या बाहेर उभी असतात, तसे पीएलही मैफलीच्या बाहेर तुमच्यासमोर उभे असत. पण पीएल खऱ्या अर्थाने बाहेर उभे नसत, तर ते आपल्या आत उभे असत. मला कुमार गंधर्वाशी याबाबतीत पीएलच्या व्यक्तिमत्त्वाचं फार साम्य जाणवतं. कुमारलासुद्धा गाणंबिणं संपलं की गप्पा मारायला.. मैफलींची अतिशय आवड होती.

एके दिवशी आम्ही असे बसलो होतो आणि गप्पा चालल्या होत्या. आनंदाने हसणं, खेळणं.. तसं विशेष काही गंभीर चाललेलं नव्हतं. एकदम बोलता बोलता कुमार म्हणाले, ‘‘हं, क्या बात है!’’ मी चमकलो. ‘‘क्या बात है? दाद कशाला दिलीत म्हटलं कुमार..?’’ ‘‘नाही, आत एक जागा सापडली.’’ मी तुम्हाला सांगतो, बाहेर जागा शोधणारे आणि ती जागा सापडणारे आणि टाळ्या घेणारे पुष्कळ लोक असतात; पण ज्याला आत जागा सापडली आहे असा पु. ल. देशपांडे किंवा कुमार गंधर्व यांच्यासारखा माणूस क्वचितच असतो. आणि ज्याला आत जागा सापडली आहे त्याची ती जागा कधीच जात नाही.

आमच्या कोकणामध्ये एक सोयरोबा नावाचे संतकवी होऊन गेले. त्यांच्या फारच सुंदर दोन ओळी आहेत.. ‘आम्ही न हो पाचातले, न हो पंचाविसातले, सर्वी असुनी आम्ही असर्वातले हो, आम्ही आतलें हो आतलें!’ अशा आयुष्याच्या नाना रंगांत पुलं रंगले. ते सगळे रंग आणि ढंग त्यांनी साहित्यातून व्यक्त केले. पण ते ‘सर्वी असून आम्ही असर्वातले’ होते. मैफलींत असूनसुद्धा ते मैफलीच्या बाहेर होते, कारण ‘आम्ही आतलें हो आतलें..’ कुमारांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना एक आत कुठेतरी जागा सापडली होती. मी पीएलच्या अनेक मैफिली.. खासगी मैफिली बघितल्या आहेत. मला असं वाटायचं की, एखादं नाटक करण्याच्या अगोदर नट मंडळी एकत्र येऊन जशी रिहर्सल करतात ना, तशी प्रत्येक खासगी मैफल ही त्यांची कुठेतरी ‘रिहर्सल’च होती. त्या मैफलीत ते कुठल्यातरी एका मोठय़ा नाटकाची रंगीत तालीम सतत करत होते हे आता जाणवतं.

पुलंच्या विनोदाच्या बाबतीत मला एक थोडं सांगायला पाहिजे. पुलंचा विनोद हा अत्यंत निर्विष आणि निर्मळ होता. कुठल्याही अर्थाने त्यांचा विनोद हा खालच्या पातळीवर कधीच उतरलेला नाही. विनोद अनेक तऱ्हांनी व्यक्त होतो. त्याची मीमांसा करण्याचं हे स्थळ नव्हे. पण मला नेहमी असं वाटतं की, काही जातींचा एक विनोद असतो, त्यामध्ये माणसाकडे तुच्छतेने पाहिलेलं असतं, माणसाची कींव केलेली असते. लहानपणी कोकणात आमच्याभोवती बरीच पोरं जमत. आणि हातात काडी घेऊन किडा असला की त्याला आम्ही खेळवायचो. आजूबाजूची पोरं मोठमोठय़ाने हसायची. माणसाला किडय़ासारखं समजून विनोदाच्या काडीने माणसं त्या किडय़ाशी खेळतात. त्याला तुम्ही-आम्ही हसून दाद देतो. पण त्यात माणसाविषयीची तुच्छता, माणसाविषयीची कींव कुठेतरी असते. पुलंच्या कुठल्याही लेखामधला किंवा प्रयोगामधला तुम्ही विनोद पाहा.. त्यात माणसाची थट्टा केलेली आहे, माणसाच्या बावळटपणाची गंमत केलेली आहे, माणसाचा दंभ, माणसातले सगळे गुणदोष दाखवलेले आहेत, पण ती सगळी मुळात माणसंच आहेत.

‘बटाटय़ाची चाळ’ असो, नाहीतर ‘वाऱ्यावरची वरात’- हे सगळं पुलंनी पाहिलेलं आहे. पण हे सगळं बघत असतानासुद्धा त्यांनी माणसाला कधी किडय़ासारखा वापरलेलं नाही. माणसाकडे कधी तुच्छतेने पाहिलेलं नाही. पुलंनी माणसांवर प्रेम केलं. पुलंची थट्टा, उपहास, उपरोध हे आई जसा प्रेमाने पाठीवर धपका देते तसे धपके पुलंनी दिलेत. पण त्यांच्या विनोदात कुठेतरी आईची माया आहे. जीवनाचं जे विकल चित्र आहे- जे मर्ढेकरांनी ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ या कवितेत रंगवलं आहे- त्याची उत्तम जाणीव पीएलना होती. धडपडून धडपडूनच ते वर आले होते. अत्यंत संवेदनशील अशी नजर त्यांच्याकडे होती. पण इतकं असूनसुद्धा मर्ढेकरांनी जसं म्हटलंय, की माणसाची अवस्था कशी असते तुमच्या-आमच्यासारख्या.. ‘जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे..’ पुलंनी त्याच्यापुढे आणखी एक ओळ लिहिली नाही, पण त्यांचं साहित्य वाचताना असं वाटतं की ते म्हणताहेत, ‘होय, मला माहिती आहे माणसाची ही अवस्था. जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे..’ पुलंची पुढची ओळ होती- ‘हसायची पण शक्ती आहे.’ पुलंच्या विनोदाला तुम्ही दाद देता, त्यांच्या गाण्याच्या सुरांना तुम्ही दाद देता, पेटीला दाद देता.. आणि त्यांच्या मृत्यूच्या दिवशी- म्हणजे ‘पुण्यतिथी’च्या दिवशी इतक्या प्रचंड हशा आणि टाळ्यांनी एक आनंद साजरा करता.. याचं कारण जगायची पण सक्ती आहे. तुमच्या-आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात ज्या कटकटी आहेत, त्या कोणालाही चुकलेल्या नाहीत. पण पुलंबरोबर आपण आनंदघोष करत म्हणतो आहोत, ‘हसायची पण शक्ती आहे.’ ही हसायची शक्ती ज्यांनी आपल्या मनात जागी केली त्या पुलंप्रतिची कृतज्ञता शब्दांत व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात असं मी मानतो.


फ्रेंच कलावंत मार्सेल मार्सो जो होता तो पीएलचा अत्यंत लाडका कलावंत होता. तो ‘माइम’ म्हणजे मूकाभिनय करत असे. त्याच्या कार्यक्रमात त्याचा जो शेवटचा आयटम असे तो मुखवटय़ांचा होता. माणसाचे नाना अनुभव- हास्य, दु:ख, एकाकीपण, असहायता, मूकपणा.. तऱ्हातऱ्हांचे माणसाचे मुखवटे असतात. ते घालून तो स्टेजवर येतो आणि त्यांचं दर्शन तुम्हाला त्या मुखवटय़ांतून तो तुम्हाला देतो. एक मुखवटा काढून टाकायचा, दुसरा मुखवटा काढून टाकायचा, तिसरा मुखवटा.. मुखवटा म्हणजे तुमचे आमचे नाना तऱ्हांचे अनुभव हे इथे लक्षात घ्या. शेवटी सगळे मुखवटे काढून टाकल्यावर आणखी एक मुखवटा तो काढून टाकायचा प्रयत्न करतो. तो त्याचा चेहराच असतो. चेहरा निघणार कसा? त्या प्रयत्नांत तो थकतो, खाली पडतो आणि मरण पावतो.. असा तो आयटम आहे. पुलंचाही हाच धंदा होता. ‘हसवण्याचा माझा धंदा’ असंच म्हणत असत ते! किती तऱ्हातऱ्हांचे मुखवटे त्यांनी तुमच्यासमोर लेखनातून, एकपात्री प्रयोगांतून तुमच्यासमोर त्यांनी काढले. पण मार्सेल मार्सोसारखा त्यांनी स्वत:चा चेहरा कधी उपटण्याचा प्रयत्न केला नाही. याचं कारण असं की, मुखवटय़ाला चेहरे असतात; पण मुखवटय़ाला डोळे नसतात. पीएलला ठाऊक होतं, की आपला हा जो मुखवटा आहे- ज्याला चेहरा म्हणून मार्सेल मार्सो उपटायला लागतो, त्याला डोळे आहेत. तो बघू शकतो. हे जे बघणं आहे, ही सगळी पीएलची शक्ती होती. तुमच्या आमच्या साध्यासुध्या, नाना तऱ्हांच्या अनुभवांकडे पीएल मोठय़ा गमतीने बघत असत.

त्यांचे गुडघे फार सुजलेले होते. पुष्कळ वेळा मी मुंबईहून फोन करी. आपलं काय असतं, की आपली दु:खं आपण सारखी ‘रँ रँ रँ’ करून इतरांना सांगत असतो. काही लोक आपल्या आजाराची इतकी वर्णनं करून सांगतात, की ऐकताना आपणच आजारी पडल्यासारखं आपल्याला वाटतं. पण पीएलना जर फोन केला तर, ‘‘काय? पीएल कसं काय चाललंय? गुडघे काय म्हणतायत?’’ ‘‘काय पाडगांवकर, काय सांगू तुला.. यांच्यासमोर मी अक्षरश: गुडघे टेकलेयत.’’

कधी कधी त्यांच्या ट्रस्टच्या कामासाठी त्यांना अनेक फॉम्र्स भरावे लागत. पीएल तसा कष्टाळू माणूस होता; पण कारकुनी कामाचा अर्थातच कंटाळा असे त्यांना. स्वाभाविकच आहे. पण अनेक सरकारी कायदेकानूंचे अनेक फॉम्र्स भरावे लागत. हा फॉर्म भर, तो फॉर्म भर.. मी त्यांना फोन केला. म्हटलं, ‘‘काय चाललंय तुमचं?’’ म्हणाले, ‘‘काय सांगू तुला, हा फॉर्म भर.. तो फॉर्म भर.. कंटाळलोय. लोक सारखे फोन करतात आणि विचारतात, काय पीएलसाहेब, काय चाललंय? मी त्यांना सांगतो, पीएलसाहेब सध्या फॉर्मात आहेत.’’ म्हणजे आपली गुडघ्याची सूज असो किंवा कंटाळवाणं कारकुनी काम असो, त्याच्याकडे त्यांचं जे बघणं होतं तेच हसणं होतं. आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की, हा चेहऱ्याचा मुखवटा मार्सेल मार्सोसारखा फाडण्याचा पुलंनी कधी प्रयत्न केला नाही. कारण त्या मुखवटय़ाला नुसता चेहरा नव्हता. आपल्या कंटाळवाणेपणाकडे, आपल्या दु:खाकडे, आपल्या सुजलेल्या गुडघ्याकडे बघणारे त्यांचे एक वेगळेच डोळे होते आणि त्या बघणाऱ्या डोळ्यांकडे एक तऱ्हेची अलिप्तता होती.. ‘आत उभं राहून’ प्रकारची. आणि त्यातूनच पुलंचा विनोद निर्माण झाला होता. शेवटची एक गोष्ट सांगतो.. ज्या विलेपाल्र्यात पुलंनी आपलं सगळं बालपण आणि तरुणपण घालवलं त्या ठिकाणी पुलंचा सत्कार होता.. ७५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने. त्यांना पार्किन्सन झालेला होता. हात कापत. आणि पुलं बोलतील की नाही याची शंका होती. पण पाल्र्याच्या माणसांनी तुडुंब गर्दी केली होती. पीएलना लहानपणापासून पाहिलेले म्हातारे लोकसुद्धा आले होते. मी पीएलना अनेकदा स्टेजवर जाताना पाहिलं आहे.

रेडियोवर असताना आमचं पहिल्या मजल्यावर ऑफिस होतं आणि वरच्या मजल्यावर स्टुडिओ होता. एकसारखं चढउतार करताना इतक्या चपळ सरसर सरसर चढणाऱ्या पीएलना मी पाहिलेलं असल्यामुळे आता कंपवातामुळे त्यांचे हात कापत होते आणि कोणीतरी हात धरून त्यांना स्टेजवर आणून बसवलं. मला ते अगदी बघवेना. मी त्यावेळी एक वक्ता होतो- पीएलवर बोलणारा. मला इतकं असह्य झालं, की माझे डोळे अक्षरश: भरून आले. मी बोलताना एक आठवण सांगितली.. गोिवद वल्लभ पंतांची. मी वाचलेली. खरी-खोटी मला माहिती नाही. गोिवद वल्लभ पंतांना स्वातंत्र्याच्या चळवळीत पोलिसांच्या लाठीमारात मणक्यावर लाठीचा फटका बसल्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांचे हात थरथर कापत. ते जेव्हा पार्लमेंटमध्ये भाषण करायला उभे राहिले.. होम मिनिस्टर होते ते.. तर हातातला कागद- नोट्ससाठी घेतला होता तो- असा थरथर कापायला लागला.. तर ज्यांना माहीत नव्हतं त्यांना वाटलं की, पहिलं भाषण करायचंय तेव्हा स्टेज फ्राइटमुळे गोिवद वल्लभ पंत घाबरलेत. आणि एकदम पाच-दहा माणसं हसली. ते गोिवद वल्लभ पंतांच्या कानी आलं. त्यांनी थरथरणारा कागद हातात धरला आणि म्हणाले, ‘My hands tremble, but my decisions don’t.’ ‘‘माझे हात थरथर कापतात, पण होम मिनिस्टर म्हणून मला देशाच्या अनेक संदर्भातले निर्णय घ्यायचे आहेत, ते ठाम असतात.’’ ‘My hands tremble, but my decisions donlt.’’ तसं मी म्हटलं की, ‘‘आज पीएलचे hands tremble, पण त्यांनी लिहिलेलं साहित्य हे tremble होणारं नाहीए.. ते अढळ ध्रुवाच्या ताऱ्यासारखं आहे. आणि तुमच्या-आमच्या अनेक पिढय़ांना युद्धामुळे, जातीयतेमुळे, आर्थिक समस्यांमुळे थरथर कापणाऱ्या (आपल्याला.. सामान्य माणसांना कायमचाच पार्किन्सन झालेला असतो.) ते आधार देत राहील.’’
(सौजन्य : पुलंचे भाचे दिनेश ठाकूर यांच्या संग्रहातून)