कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ज्यांना ‘जनकवी’ या उपाधीने गौरविले, त्या पी. सावळाराम यांचे जन्मशताब्दी वर्ष ४ जुलैपासून सुरू झाले. आपल्या तरल, भावपूर्ण गीतांनी आणि समाजकार्याने त्यांनी महाराष्ट्रीय जनमानसात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचा हा वेध..पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.. ‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे.’पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत.भारतीय संस्कृतीत आई, बहीण, भाऊ, मुलगा, वडील, पती-पत्नी यांच्या नात्याला विशिष्ट अर्थ आहे. त्याचबरोबर या नातेसंबंधातील जन्म, बारसे, मौजीबंधन, प्रेम, विवाह या घटनांनाही अनन्य महत्त्व आहे. पी. सावळाराम यांचे वैशिष्टय़ असे की, या समाज, संस्कृती, मूल्यविचार आणि आचरणरीतीला त्यांनी आपल्या काव्यात मुखरित केले आहे. त्याकरता त्यांच्यापाशी नेमकी, अचूक आणि अर्थपूर्ण, नादानुसारी शब्दकळा आहे आणि तो-तो प्रसंग आविष्कृत करताना त्यांनी व्यक्तिचित्राचा ठळक वापर केला आहे. त्यांच्या भाववृत्ती त्यांनी समर्थपणे रंगवल्या आहेत. याशिवाय रामायण आणि महाभारतातील लोकमानसात स्थिरावलेल्या व्यक्ती, घटना व प्रसंगांची प्रत्ययकारी चित्रे त्यांनी आपल्या गीतांमधून काढली आहेत. स्वाभाविकच त्यांच्या या भूमिकेमुळे लोकमानसाला ते चटकन् स्पर्श करू शकले. उदाहरणार्थ- ‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. तिथे जातपात, गरीब-श्रीमंत हे भेद उरत नाहीत. ज्या घरात दीर, भावजय वगैरे असायच्या अशा एकत्र कुटुंबातील त्या मुलीबद्दलचे प्रेम आणि ती विवाह होऊन पतिगृही जाणार, आपल्याला दुरावणार म्हटल्यावर होणारे दु:ख अतिशय अल्पाक्षरी, पण अर्थपूर्ण शब्दांत त्यांनी साक्षात् उभे केले आहे. म्हणूनच त्यातली भावना कुणा एका ‘क्ष’ आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीताच्या या सामर्थ्यांमुळेच ते बृहन्महाराष्ट्रात अजरामर झाले आहेत.याबरोबरच सावळाराम यांचा आणखीही एक विशेष दिसून येतो. तो म्हणजे संतसाहित्याचे, लावणी-पोवाडय़ांचे, लोकगीतांचे त्यांनी केलेले परिशीलन होय. त्यामुळे त्यांची रचना ग्रांथिक, विद्वज्जड वा क्लिष्ट न वाटता ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. उदाहरणार्थ, ‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. इथे संतांबद्दलचा अतीव जिव्हाळा आणि सगुण उपासनेचे मर्म ते सहज पकडतात. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात.सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. लता मंगेशकर-आशा भोसले यांच्या सुरेल सुरांमध्ये ती ध्वनिमुद्रित झाल्याने घराघरात पोहोचली.खरे तर सावळाराम हे काही त्यांचे पाळण्यातले नाव नाही. त्यांचे खरे नाव- निवृत्ती रावजी पाटील. वि. स. पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील सावळ्या तांडेल या पात्रावरून त्यांना प्रेमाने दिलेले ते नाव! सावळारामांनी ते आयुष्यभर स्वीकारले. ४ जुलै १९१४ हा त्यांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तेव्हा त्या कॉलेजात माधव ज्यूलिअन शिकवत असत. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी ‘सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली. ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती. सावळारामांपाशी विलक्षण प्रतिभा होती. पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले.१९४३ साली सावळाराम ठाणे येथे वास्तव्यास आले. प्रारंभी रेशिनग खात्यात त्यांनी नोकरी केली. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले. वसंत प्रभू, माधव शिंदे व दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता. आणि तेव्हा ‘आकाशवाणी’नेही आपला चांगला जम बसवला होता. त्याकाळी ‘एचएमव्ही’सारखी संस्था मराठी गाण्यांच्या रेकॉर्डस् काढत असे आणि त्यांचा खपही लक्षणीय होता. गावोगावी काही धनिकवणिकांकडे रेडिओ आले होते. सत्यनारायणाची महापूजा असो किंवा लग्न-मुंजीसारखे कार्यक्रम असोत, लाऊडस्पीकर्सवरून ही गाणी वाजवली जात होती. जिथे चित्रपटगृहे होती, तिथे प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांतून पी. सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली होती. परंतु पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा- म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती.त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. म्हणून ते १९६२ साली ठाणे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९६४-६५ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. शिक्षकांच्या पगारात त्यांच्याच काळात वाढ झाली. ६३-६४ साली ते शिक्षण समितीचे सभासदही राहिले. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञतेने या कॉलेजने ‘पी. सावळाराम गौरवग्रंथ’ प्रकाशित केला.सावळारामांनी गद्यलेखनही केले. आकाशवाणीच्या ‘कामगार सभे’साठी ‘सहज सुचलं म्हणून’ कार्यक्रमात त्यांनी संहितालेखन केले. ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाचे लेखन, ‘माणसा आधी हो माणूस’ व ‘मंगल कलश’ हे लघुपट व एस. टी.वर ‘सारे प्रवासी घडीचे’ हे वार्तापत्र त्यांनी लिहिले. याशिवाय त्यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या.१९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. परंतु पुरस्कारांपेक्षा त्यांनी लोकांच्या हृदयसिंहासनावर दीर्घकाळ आपले नाव कोरले. हे त्यांचे यश असाधारणच म्हटले पाहिजे.