लोकांच्या शाहीचा गं बाई गोंधळ मांडला
गोंधळ मांडिला न् द्येवा गोंधळाला यावं
मंडळी, या.
नवरात्रोत्सवाच्या या महन्मंगल पर्वामध्ये येथे लोकशाहीचा महागोंधळ मांडला आहे. युती, आघाडी आणि बाकीचे सगळे असे तिकाटणे उभे केले आहे. दिवटय़ा तर केव्हाच पेटविल्या आहेत. दिवटे मैदानात यायची वाट पाहात होतो! आता तेही आले आहेत! संबळ चढवला आहे. जागावाटपाचे, उमेदवारीचे तुणतुणे.. ते सुरूच आहे. आमच्या नेत्यांचे भगतगणही टाळ घेऊन सज्ज आहेत. तेव्हा चला मंडळी, (फाल्गुनीबाई (की भाई?), झालेच तर प्राची आणि प्रीतीताई यांचा रास जर्रा बाजूला ठेवून.. अवघड आहे. पण जमेल!) आपली आराध्य दैवते, ग्रामदैवते यांना साग्रसंगीत आवाहन करू या.. गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे..
मातोश्री गडा गोंधळा यावे
दिल्लीच्या नमोपती गोंधळा यावे
नागपूरच्या फडनिसा, कोंकणच्या ईनोदा,
मुंबैच्या राऊता तुम्ही गोंधळा यावे
गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे

बारामती शिद्धा गोंधळा यावे
सांगलीच्या आबा गोंधळा यावे
रायगडच्या निळोबा, ठाण्याच्या जितोबा,
नाशिकच्या बाहुबळा गोंधळा यावे
गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे

कराडच्या बाबा गोंधळा यावे
शिंधुदुर्ग नारोबा गोंधळा यावे
नागपुरी माणिका, सोनसळच्या पतंगा,
बाळोबा, विखोबा तुम्ही गोंधळा यावे
गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे
आयाराम गयारामा गोंधळा यावे
संतप्त बंडोबा गोंधळा यावे
रेल्वेच्या इंजिना, उगवत्या सूर्या, केरसुण्या,
अपक्षा गोंधळा यावे
-हायल्या सायल्या पक्षां तुम्ही गोंधळा यावे
गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे
जेनेटिक प्रॉब्लेम तरी गोंधळा यावे
मला सर्कार हवे म्हणत गोंधळा यावे
आरक्षण दिले आता गोंधळा यावे
वारशाच्या हक्काने गोंधळा यावे
सत्तेच्या सिंचनाला गोंधळा यावे
गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे
उदे उदे उदे उदे.
लोकशाहीच्या नावानं गोंधुळ
मांडला
गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला
यावे
अहो सेवेच्या नावानं गोंधुळ
मांडिला
गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळा यावे

आम्ही गोंधळी गोंधळी
न् आम्ही सत्तेचे गोंधळी
होऊ दे सर्व दिनी मंगळ
वाजवतो ट्विटरी संबळ
फुगवतो दंडाची बेटकुळी
आम्ही सत्तेचे गोंधळी..
 
उदे उदे उदे उदे..

सत्ते कारणं खुर्ची कारणं गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावे
लेका कारणं लेकी कारणं गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावे
काका कारणं पुतण्या कारणं गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावे
सत्तास्वामिनी पूज्य देवता गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावे
जुडय़ाजुडय़ानं राज्य करावं गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावे
जागावाटपी तंटे करून गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावे
मित्रपक्षांना घंटा देऊन गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावे
चोळी पातळ भांडी वाटप गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावे
निळ्या प्रतीचा स्वप्नास्वप्नांचा
गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न् द्येवा
गोंधळाला यावे
आश्वासनांच्या इंद्रधनुचा गोंधुळ
मांडला
गोंधळ मांडला न् द्येवा
गोंधळाला यावे

आम्ही गोंधळी गोंधळी
न् आम्ही सत्तेचे गोंधळी

आम्ही करतो जिथे गोंधळ न् उडते
लोकांच्या डोळी धूळ
उडते लोकांच्या डोळी धूळ न् विसरती
प्रश्न समस्या मूळ
विसरती प्रश्न समस्या मूळ न् लागे
सोशल मीडियाचे खूळ
लागे सोशल मीडियाचे खूळ न् होते
तथ्यांची तारांबळ
होते तथ्यांची तारांबळ न् येते आरोपांना
बळ
येते आरोपांना बळ न् जाते नासून सारी
नीळ
जाते नासून सारी नीळ न् सारा
पंचवार्षिक खेळ
सारा पंचवार्षिक खेळ न् हा निवडणूक
गोंधळ

हा गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला
यावे..
उधं उधं उधं उधं..

प्रचारसभांचा.. उधं
मीडियाकक्षांचा.. उधं
विकावूवार्ताचा.. उधं
निवडणूक तंत्राचा.. उधं
आश्वासन मंत्राचा.. उधं
नोटांच्या गड्डय़ांचा.. उधं
त्याला भुलणाऱ्या गध्ध्यांचा.. उधं
उधं उधं उधं उधं..