चंद्रकांत पाटील

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ‘पॉप्युलर’ प्रकाशनाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन मराठी साहित्यातील गुणवत्तावान, कसदार आणि सशक्त लेखकांचे बहुआयामी साहित्य प्रकाशित करण्याचे वाण घेतलेल्या रामदास भटकळ यांच्या संपादन कारकीर्दीला येत्या दसऱ्याला सत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. प्रकाशन व्यवसायातील हा एक आगळावेगळा विक्रम ठरावा. यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध..

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

ज्या काळात पुस्तकांना वाचक होते, लोकांना पुस्तकांबद्दल प्रेम होते, त्याही काळात केवळ ललित वाङ्मयाचे प्रकाशन कठीण होते. ललित साहित्याची गुणवत्ता राखून दीर्घकाळ आणि सातत्याने प्रकाशन करणे तर त्याहूनही जास्त कठीण होते. असे महाकठीण आव्हान समर्थपणे स्वीकारणाऱ्या प्रकाशकांच्या यादीत रामदास भटकळ अग्रभागी आहेत. त्यांनी प्रकाशन व्ययवसायात सत्तर वर्षे पूर्ण केली आहेत. ही मराठी साहित्य-संस्कृतीच्या दृष्टीने एक सुखद घटना आहे. रामदास भटकळांच्या या दीर्घ प्रवासाबद्दल अनेकांनी लिहिले आहे. या प्रवासाला सुरुवात करताना भटकळांनी ज्यांची मदत घेतली त्या ‘मौज प्रकाशना’च्या श्री. पु. भागवतांपासून गेल्या तीस वर्षांहून जास्त काळ ‘पॉप्युलर प्रकाशना’च्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळणाऱ्या अस्मिता दुभाषींपर्यंत सगळ्यांनीच त्यांच्याबद्दल आत्मीयतेने लिहिले आहे. शिवाय खुद्द भटकळ यांनीही आपल्या आणि ‘पॉप्युलर’च्या जडणघडणीबद्दल अनेकदा लिहिले आणि सांगितलेले आहे. त्याची पुन्हा इथे उजळणी करण्यात काही मतलब नाही. तरी पार्श्वभूमीखातर काही गोष्टी सांगितल्याच पाहिजेत.
भटकळांनी महाविद्यालयात शिकत असतानाच- म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी १९५२ साली ‘पॉप्युलर’ प्रकाशनाचे काम बघायला सुरुवात केली. महाविद्यालयात असताना त्यांच्या घनिष्ट मित्र भालचंद्र (बी. के.) देसाईंसोबत मराठी साहित्यावर अखंड चर्चा चालत असत. (पुढे शासकीय सेवेत सचिव पदापर्यंत पोहोचलेल्या याच बी. के. देसाईंनी सर्वात अगोदर बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेवर सविस्तर लेख लिहिले होते, हे फारच थोडय़ांना माहीत असेल!) भटकळांना साहित्याची गोडी लागली आणि त्यांची साहित्यविषयक जाण वाढली ती महाविद्यालयीन जीवनातच! शिक्षण संपताच त्यांनी पॉप्युलरचा मराठी विभाग सुरू करण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांना श्रीपुंची मदत झाली. भटकळ विल्सन महाविद्यालयाचे विद्यार्थी. तिथेच वा. ल. कुळकर्णी मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचीही मदत झाली. पण लवकरच भटकळ स्वत:च पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात निर्णय घेऊ लागले. तो काळ मराठीत नवसाहित्याच्या उदयाचा होता. भटकळांनी नवकथेचे प्रणेते गंगाधर गाडगीळ आणि अरिवद गोखल्यांचे कथासंग्रह, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि पुढे सदानंद रेगे यांचे कवितासंग्रह प्रकाशित करून मराठी साहित्यात पॉप्युलर प्रकाशनाचे स्थान दृढ केले. लवकरच ‘पॉप्युलर’ची नाममुद्रा असलेली पुस्तके गुणवत्तेचे प्रतीक ठरत गेली.

‘पॉप्युलर’ने कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, ललित निबंध अशा अनेक साहित्यप्रकारांत उत्तमोत्तम साहित्यकृती प्रकाशित केल्या. ललित साहित्याला उंची गाठावयाची असेल तर त्या भाषेतील वैचारिक वाङ्मय समृद्ध असणे आवश्यक आहे हे जाणून भटकळांनी वैचारिक साहित्याच्या प्रकाशनाकडेही विशेष लक्ष पुरवले. शिवाय इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राजकारण, संस्कृती, संगीत, चित्रकला इत्यादी क्षेत्रांमधले ग्रंथही आवर्जून प्रकाशित केले. द. ग. गोडसे, स. मा. गर्गे, गो. स. सरदेसाई, गो. स. घुर्ये, धनंजय कीर अशा विविध क्षेत्रांतल्या अनेक विख्यात लेखकांची पुस्तके ‘पॉप्युलर’ने छापली आहेत. ह. वि. मोटे प्रकाशनाची जबाबदारी भटकळांनी घेतली नसती तर मराठी वाचक महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या ‘विश्रब्ध शारदा’सारख्या अप्रतिम ग्रंथांना पारखे झाले असते.

भटकळांचा हा दीर्घ प्रवास यशस्वी होण्यास बरीच कारणे आहेत. एक म्हणजे भटकळांचा नम्र, सौम्य, संयत, सुसंस्कृत आणि सतत आशावादी स्वभाव. त्यामुळे भटकळांनी आपल्या लेखकांना कधीच दुखवले नाही. उलट, त्यांच्यावर मनापासून प्रेमच केले. भटकळ आंतरराष्ट्रीय ग्रंथमहोत्सवाच्या निमित्ताने बऱ्याचदा परदेशात जात आणि जगभर प्रकाशन क्षेत्रात काय चालले आहे हे जाणून घेत. अशाच एका प्रसंगी त्यांना कवी ग्रेस यांनी त्यांची अति आवडती नटी इन्ग्रिड बर्गमनचे प्रकाशचित्र आणावयास सांगितले. भटकळांनी बराच प्रयास करून इन्ग्रिडची भेट घेतली, स्वत:च तिचे प्रकाशचित्र घेतले आणि ग्रेसना भेट दिले. ना. धों. महानोरांबद्दलही भटकळांना अतीव प्रेम आहे. फार पूर्वी दूरदर्शनच्या ‘सह्यद्री’ वाहिनीवर ‘प्रतिभा आणि प्रतिमा’सारखा संस्मरणीय कार्यक्रम सुरू करणाऱ्या सुहासिनी मुळगावकर त्यांची वर्गमैत्रीण. भटकळांनी मुळगावकरांना सांगून महानोरांची एक विशेष मुलाखत थेट महानोरांच्या गावीच- पळसखेडला घडवून आणली. मुलाखत घेणाऱ्यांत स्वत: भटकळ, डॉ. जब्बार पटेल आणि विजयाबाई राजाध्यक्ष होत्या. तो कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला, की तो अजूनही पुन्हा पुन्हा ‘सह्यद्री’वर दाखवला जातो! श्याम मनोहरांवरही भटकळांचे असेच प्रेम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्याम मनोहरांनी कादंबरी किंवा नाटक लिहून पूर्ण केले की भटकळांना फोन करायचा; आणि भटकळ आणि लैला (भटकळांच्या पत्नी) खास ते ऐकण्यासाठी मुंबईहून पुण्यात श्याम मनोहरांच्या घरी न चुकता हजर व्हायचे. मुंबईत श्याम मनोहरांच्या नाटकाची रिहर्सल असो की त्यांच्या हस्ते एखादा प्रकाशन समारंभ असो; भटकळ न चुकता तिथे असणारच. पण प्रेम केले म्हणून भटकळांनी व्यवहारात कधीच दुर्लक्ष केले नाही. लेखकाशी रीतसर करारपत्र करणे, वेळच्या वेळी मानधन देणे याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले आणि प्रकाशन व्यवहारात एक शिस्त आणली.

भटकळ नेहमी नव्याचे स्वागत करत गेले, नवेनवे लेखक शोधत राहिले आणि त्यांचे गुणात्मकदृष्टय़ा सरस व सकस लेखन प्रकाशित करीत राहिले. मात्र, असे करत असताना त्यांनी आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. उच्च नैतिकता पाळूनच त्यांनी प्रकाशन व्यवसाय केला. त्यांनी कुठल्याही नव्या लेखकाकडून पैसे घेऊन त्याचे साहित्य प्रकाशित केले नाही. खास ‘पॉप्युलर’चा म्हणून लेखकांचा गट तयार केला नाही. आपण प्रकाशित केलेल्या पुस्तकाला उठाव मिळावा म्हणून राजकारण केले नाही. परीक्षणे छापून आणण्यासाठी खटाटोप केला नाही. आपल्या पुस्तकांना शासनाचे, साहित्य अकादमीचे किंवा इतर पुरस्कार मिळावेत म्हणून प्रयत्न केले नाहीत. विद्यापीठात पुस्तके लावून घ्यावीत म्हणून लेखकांना प्रलोभने दाखवली नाहीत. पुस्तक त्याच्या गुणवत्तेनेच उभे राहावे हीच त्यांची कायम भूमिका होती. म्हणूनच ज्ञानपीठ मिळवणाऱ्या मराठीतल्या चार लेखकांपैकी तीन लेखक ‘पॉप्युलर’ प्रकाशनाचे आहेत!

प्रकाशन व्यवसायात भटकळांनी नेहमीच कल्पकता दाखवली. एकूण मराठी साहित्यावर चर्चासत्रे घेतली. नव्या लेखकांच्या शोधासाठी स्पर्धा ठेवल्या. साहित्यिक मेळावे घेतले. कवितेविषयी आस्था निर्माण व्हावी म्हणून समग्र कवितांच्या श्रेयस आवृत्त्या काढल्या आणि त्यांना खास प्रस्तावना लिहून घेतल्या. आतापर्यंत या योजनेत बालकवी, पु. शि. रेगे, विंदा करंदीकर, इंदिरा संत, दिलीप पुरुषोत्तम चित्रे या महत्त्वाच्या कवींच्या समग्र कविता प्रकाशित झाल्या आहेत. आताही त्यांना अरुण कोलटकरांच्या समग्र कवितेची श्रेयस आवृत्ती काढायची तीव्र इछा आहे. अर्थात ते अशक्य असल्याचे त्यांना माहीत आहे, तरीही ते आशावादी आहेत! पूर्वी जेव्हा अनुवादांना प्रतिष्ठा नव्हती तेव्हा त्यांनी अनेक महत्त्वाच्या पाश्चात्त्य नाटककारांची नाटके मराठीत अनुवादित करून घेतली आणि प्रकाशित केली. वा. ल. कुळकर्णी यांच्या संपादनाखाली ‘नवे कवी : नवी कविता’ ही मालिका सुरू करून त्यात ग्रेस, ना. धों. महानोर, केशव मेश्राम, सुरेश मथुरे, वसंत सावंत यांच्यासारख्या तेव्हाच्या नव्या कवींच्या संग्रहांसोबतच या मालिकेत जुने कवी अनुराधा पोतदार आणि पुरुषोत्तम पाटील यांचेही संग्रह छापले. ‘नवी दिशा’सारखे कसदार प्रायोगिक नियतकालिक काढले. ‘समीक्षा’सारखे अल्पायुषी नियतकालिकही काढून पाहिले. भटकळांना प्रकाशन व्यवसायात येताना कल्पनाही नसेल की मराठी वाङ्मयीन आणि सांस्कृतिक पर्यावरणात त्यांच्या हातून मोलाची भर पडणार आहे!

प्रखर आशावादी असलेल्या रामदास भटकळांना आता ८८ वे वर्ष चालू आहे आणि अजूनही त्यांचा उत्साह कायम आहे. त्यांना शतायुषी होण्याच्या शुभेछा..