नयन डोळे lokrang@expressindia.com
मराठीजनांना हल्ली मल्याळम्, तमिळ, तेलुगु, कन्नड या चारही दाक्षिणात्य भाषांमधले सिनेमे आवडू लागले आहेत. ‘ओटीटी’च्या उपलब्धतेमुळे आणि मोबाइल क्रांतीमुळे आज सिनेमा थेट प्रेक्षकाच्या हातातच आला आणि हे प्रमाण अधिकच वाढले. देशभरात ‘लॉकडाऊन’ असताना या सिनेमांनी मात्र आपापली राज्ये, भाषा यांच्या सीमा ओलांडल्या.. हे का घडले, याची मीमांसा करणारे अनुभवकथन..

‘सैराट’ बनवण्याचे धाडस मराठीत नागराज मंजुळे करू शकतात, तसेच धाडस धनुष तमिळ ‘कर्णन’मध्ये करतो. जातिव्यवस्थेतून होणाऱ्या अत्याचारांवर हे दोन्ही चित्रपट भाष्य करतात. धनुषच्या ‘असुरन’चादेखील हाच विषय. पण तो तुलनेत भडक. ‘असुरन’पेक्षा ‘कर्णन’ अधिक दाहक, भीषण, प्रतीकात्मक आहे. भारतात जातीच्या उतरंडीतील अत्याचार हे वर्गीय आणि जातीय असे दोन्ही असतात, त्याविरोधात वेळ पडली तर हिंसक संघर्ष करावा लागतो असे सांगताना ‘कर्णन’ कुठलीही अपराधीपणाची भावना मनात आणू देत नाही. मल्याळी प्रादेशिक सिनेमा तर प्रयोगांची खाणच आहे. या भाषेतील ‘मंडेला’ या सिनेमाच्या नायकाला नावच नाही. तो अतिमागास व अतिदलित समाजाचे प्रतिनिधित्व करतो. पोस्ट मास्तरीण त्याला ‘नेल्सन मंडेला’ बनवते. सरकारी दफ्तरातही त्याच नावाची नोंद करते. मग ग्रामपंचायत निवडणुकीत मंडेलाच्या एका मताला महत्त्व येते. लोकशाहीवर केलेली ही मिश्कील, उपहासात्मक टिप्पणी बघताना मजा येते. यापेक्षा निराळा, ‘सिनेमा बंडी’ हा तेलुगु सिनेमा. एका रिक्षावाल्याला कॅमेरा सापडतो. त्याच्या डोक्यात सिनेमा बनवण्याचे खूळ शिरते. गावातील सगळी फाटक्या खिशाची माणसे गोळा होतात. सगळ्या खटपटी लटपटी करून तो सिनेमा बनतोही. भारतात खरे तर प्रत्येकाच्या मनात, डोक्यात सिनेमा वास करून राहिलेला आहे, प्रत्येकाच्या आत सिनेमा सुरू असतो, याचे दर्शन ‘सिनेमा बंडी’ घडवतो! तमिळ भाषेतील विजय सेतुपती आणि त्रिशा कृष्णनचा ‘नाइन्टी सिक्स’ घ्या. शाळेतील प्रेम कित्येक वर्षांनी माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनात भेटते.. त्या एका दिवसाच्या भेटीची हुरहूर लावणारी चित्रपटकथा दक्षिणेतील अन्य भाषांमध्ये बनली, लोकांना भावली. निविन पॉली, साई पल्लवीच्या ‘प्रेमम’ची तर लोकांनी पारायणेच केली. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रेम बदलत जाते. प्रेमात पडणाऱ्या व्यक्तीही बदलत जातात. प्रेमाचा अर्थही बदलत जातो. मल्याळम्मधील ही प्रेमकथा मग तमिळ, तेलुगु, कन्नडमध्येही झाली. ‘ग्रेट इंडियन किचन’मध्येही कडव्या ब्राह्मणी परंपरेत भिनलेल्या पुरुषी अहंकारात एका मुलीच्या स्वयंपाकघरात घुसमटणाऱ्या श्वासांना दृश्यरूप देण्यात आले आहे. त्यातील अगदी छोटे छोटे प्रसंग भयानक टोचत राहतात. या सिनेमापासून कोणा पुरुषाची सुटका होऊच शकत नाही!

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

हे अलीकडच्या काळातील दक्षिणेतील सिनेमे आहेत. असंख्य विषय, त्यांची नवनवी हाताळणी त्यांत आहे. हे सिनेमे ‘ग्लोकल’ आहेत. तिथल्या तिथल्या संस्कृतीत मुरलेले.. तरीही ती भाषा न येणाऱ्या कोणालाही ते समजू शकतील, आपले वाटू शकतील असे! म्हणून तर ते दिग्विजयी ठरताहेत.. अन्य राज्यांमध्येही पाहिले जाताहेत. लोकांना त्यांच्या विषयांतील नावीन्य आकर्षित करत आहे. मराठी सिनेमाच्या तुलनेत मराठी नाटकामध्ये अधिक नावीन्य दिसत असे; आणि दिसते, तसेच ते दक्षिणेकडील सिनेमांमध्ये पाहायला मिळते. म्हणूनच कदाचित हल्ली दक्षिणेतील चारही भाषांमधील सिनेमे मराठी माणसे आवडीने पाहतात. ते मराठी नाटक-सिनेमावर जशी चर्चा करतात, तशीच हिरीरीने मल्याळम् वा तमिळ सिनेमांवरही बोलतात. अगदी रजनीकांतच्या ‘एन्दिरण’ वगैरेपर्यंत आपण हिंदीत ‘डब’ केलेले सिनेमे पाहायचो. पण आता त्यांच्याच भाषेत ‘सब-टायटल्स’सह ते बघतो. हा केवढा मोठा दर्जात्मक फरक पडला आहे! त्यात पुन्हा पाहण्याची पद्धतही बदलली. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सिनेमे प्रत्येकाच्या ‘हातात’ आले. हे हातातील सिनेमे पाहण्याचा वेग गेल्या वर्षीच्या पहिल्या ‘लॉकडाऊन’मध्ये प्रचंड वाढला. या विविध कारणांनी असेल, पण आता दाक्षिणात्य सिनेमांना मराठीजनांची मिळणारी पसंती नजरेत भरतेय. एकमेकांना मल्याळी, तमिळ सिनेमांची शिफारस करणाऱ्या मराठीभाषकांची संख्याही वाढतेय.

हे दाक्षिणात्य सिनेमे केवळ ‘कलात्मक’ नाहीत, तर ते तिथल्या सामान्य प्रेक्षकांनाही आकर्षित करणारे आहेत. प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये जाऊन हे सिनेमे बघतात. यातल्या बहुतांश सिनेमांनी नफा कमावलेला आहे. मराठीत पहिल्यांदाच ‘सैराट’ने ९० कोटींचा व्यवसाय केला, कारण प्रेक्षकांना हा सिनेमा प्रचंड आवडला. ‘असुरन’ जातीय संघर्ष मांडतो. या सिनेमानेही १०० कोटींचा गल्ला गोळा केला आहे. मल्याळम्मध्ये ‘बंगलोर डेज्’, ‘उस्ताद हॉटेल’ हे चित्रपट अत्यंत वेगळे विषय असूनही यशस्वी ठरले आहेत. दक्षिणेकडील वर उल्लेख केलेले सगळे सिनेमे हे त्यांच्या मातीतील आहेत. मातीतील म्हणजे ग्रामीण नव्हे. मुंबईच्या मातीतील सिनेमा हा शहरीच असेल. समीर विद्वांस दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे, अंकुश चौधरी अभिनित ‘डबल सीट’ हा खास मुंबईचा सिनेमा आहे. चाळकरी मुंबईकरांच्या घराच्या समस्येशी भावनिक नाते जोडणारा हा उत्तम सिनेमा आहे. ‘कर्णन’, ‘असुरन’, ‘मंडेला’ हे सिनेमे अस्सल प्रादेशिक आहेत. लुंगी नेसलेली, काळीसावळी, पोट पुढे आलेली सामान्य माणसे दक्षिणेतील या सिनेमांतून दिसतात. ‘मंडेला’तील नेल्सन मंडेला तंतोतंत असाच आहे. हा सिनेमा कृत्रिम असूच शकत नाही. मग भाषा कोणतीही असो; कुठल्याही प्रेक्षकांची त्यांच्याशी नाळ जुळणारच! दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मल्याळी सिनेमा हा सर्वाधिक प्रयोगशील. केरळमधील साक्षरता कदाचित या गोष्टीस कारणीभूत असेल. टाळेबंदीच्या काळात १४ दिवसांत चित्रित झालेल्या ‘सी यू सून’मध्ये सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या मुलीच्या प्रेमाची, तिच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांची कथा मांडली आहे. हा सिनेमा पूर्ण दूरसंवादाच्या तंत्रावर आधारित आहे. यातील कलाकार एकमेकांसमोर येतच नाहीत. ते ऑनलाइन एकमेकांना बघतात, बोलतात. तरीही हा सिनेमा कुठेही अडखळलेला, तुटलेला वाटत नाही. ‘जोजी’मधील शारीरिक, मानसिक पातळीवर दुबळा असलेला फहाद फासील बाप व भावाची हत्या करतो, स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. ‘मॅकबेथ’चे कथाबीज घेऊन ‘जोजी’ बनवला आहे. ‘कुंबलंगी नाइट्स’मध्ये सामान्य माणसाच्या पुरुषी अहंकाराचे रूप दिसते. ‘अनायम रसुलम’मध्ये मुस्लीम-ख्रिश्चन प्रेमकथेतील संघर्ष दिसतो. मल्याळी सिनेमा अधिक प्रगल्भ झाला आहे. तो प्रेक्षकांचीही अभिरुची विकसित करतो आहे.

सेतुपतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘‘सुपर डिलक्सच्या पहिल्या शॉटसाठी मी ५२-५४ रीटेक्स दिले, तेव्हा कुठे मला माझ्या पात्राचे मन कळले. मी त्याला ओळखू लागलो.. मला पात्र उमगलेच नाही तर मी ते साकारणार कसे?’’ कुठल्याही अभिनेत्याला हा प्रश्न पडायलाच हवा. पाय इतके जमिनीवर ठेवून सेतुपती सिनेमात काम करतो.

आपल्याला दक्षिणेतील सिनेमामधील वास्तवदर्शनाची आवड लावली ती कमल हसनच्या ‘नायगन’ने! दिग्दर्शक मणिरत्नम आणि सिनेमॅटोग्राफर पी. सी. श्रीराम यांची ही जादू. नंतर मणिरत्नम यांनी ‘रोजा’, ‘अलैपायुथे’, ‘काट्रु वेळियिदई’, ‘रावणन’, ‘ओ काधल कनमणि’ असे एकामागून एक सरस सिनेमे दिले. छायाप्रकाश, संगीत, वेगवान कथानक यांचा अफलातून खेळ करून दाखवला. ‘नायगन’मधील धारावीतील मारामारी खरीखुरी वाटली, तशी ती हिंदीत कित्येक वर्षांनी ‘सत्या’मध्ये वाटली. लोकल स्टेशनच्या पुलावर लोकांच्या डोळ्यांदेखत होणारा तुफान गोळीबार.. मुंबईकरांनी असे टोळीयुद्ध खरोखरच पाहिलेले आहे! आधी इळैयराजा, नंतर ए. आर. रेहमान यांच्या संगीताने रसिकांना वेड लावले. तसेच रजनीकांत, अजित, नागार्जुन, चिरंजीवी, अलीकडे प्रभास, महेशबाबू वगैरे अनेकांचे नायकप्रधान ‘मसाला’ सिनेमेही आपण आवडीने बघत आलो आहोत. हे अतिरंजित, बटबटीत, अतिभावुक सिनेमे आपले मनोरंजन करत होते. तेलुगु सिनेमे हिंदीत डब होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यांचे हिंदी संवाद मजेशीर असतात. मोकळ्या वेळेत कधीही विरंगुळा म्हणून दक्षिणेकडील सिनेमे आपण पाहिले आहेत. पण आता आपण हे सिनेमे केवळ विरंगुळा म्हणून पाहत नाही. ‘कर्णन’ आपल्या मनातून जात नाही. ‘ग्रेट इंडियन किचन’ प्रेक्षकाला अंतर्मुख करतो. ‘सिनेमा बंडी’ पाहिला की वाटते, आपल्यालाही सिनेमा बनवायचाय. फहाद आणि विजय सेतुपतीचा नवा सिनेमा कोणता येणार आहे, याची आपण आतुरतेने वाट पाहतो. अभिनेत्री सावित्रीवर बनलेल्या ‘महानटी’ने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. सावित्री साकारणाऱ्या कीर्ती सुरेशसारख्या अभिनेत्री नायिकाप्रधान सिनेमा करत आहेत. तिथेही कोणी विद्या बालनसारखा स्त्रीकेंद्रित भूमिकांचा आग्रह धरू लागले आहे.

तेलुगुमधील विजय देवरकोंडाच्या ‘अर्जुन रेड्डी’चे समर्थन करता येत नाही. हा सिनेमा देशभर झालेल्या ‘मी टू’ चळवळीवरील अत्यंत वाईट प्रतिक्रिया म्हणता येईल. पुरुषी हिंसक प्रेमाला खुले आमंत्रण देणारा हा सिनेमा तरुणांना मात्र भुरळ पाडून गेला. पण त्याचवेळी मल्याळी भाषेत अभिनेत्री पार्वतीने अ‍ॅसिड हल्लय़ातून वाचलेल्या तरुणीची भूमिका साकार करणारा ‘यूयारे’ हा सिनेमा केला. पार्वती ‘अर्जुन रेड्डी’ मनोवृत्तीच्या सिनेमांना कडाडून विरोध करते. त्यासाठी धाडसाने पुढे येऊन वाद अंगावर घ्यावे लागतात, भूमिका घ्यावी लागते. सतत सत्तेच्या उबेपाशी राहून असा विरोध करता येत नाही. मल्याळी सिनेमांत ही व्यवस्थेविरोधातील मांडणी होताना दिसते. आपल्याकडे आत्ता कुठे हिंदीत ‘छपाक’, ‘थप्पड’, ‘आर्टिकल १५’सारखे सिनेमे बनू लागले आहेत. सिनेमांच्या माध्यमामधून असो वा कुठल्या अन्य मार्गाने- ही सजगता वाढू लागली आहे.. लोक याचे स्वागत करत आहेत. जाता जाता.. दक्षिणेत चांगले सिनेमे का बनतात याचे आणखी एक रहस्य : ‘नाइन्टी सिक्स’मधील छायाचित्रकार, ‘सुपर डिलक्स’मधील तृतीयपंथी किंवा ‘विक्रम-वेध’मधील गुंड- या तिन्ही भूमिका साकारणारा सेतुपती प्रत्येक वेळी वेगळा वाटतो. एखाद्या अभिनेत्याने किती चतुरस्र असावे, हे सेतुपती त्यातून दर्शवतो. सेतुपतीची तुलना बॉलिवूडमध्ये कदाचित नसीरुद्दीन शाह यांच्याशी होऊ शकते. सेतुपतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘‘सुपर डिलक्स’च्या पहिल्या शॉटसाठी मी ५२-५४ रीटेक्स दिले, तेव्हा कुठे मला माझ्या पात्राचे मन कळले. मी त्याला ओळखू लागलो.. मला पात्र उमगलेच नाही तर मी ते साकारणार कसे?’’ कुठल्याही अभिनेत्याला हा प्रश्न पडायलाच हवा. पाय इतके जमिनीवर ठेवून सेतुपती सिनेमात काम करतो. मल्याळम्मध्ये फहाद फासील हा मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, नवाझउद्दीन सिद्दीकी यांच्या तोडीचा अभिनेता आहे; पण सेतुपतीइतकाच साधा. त्यानेही मल्याळम्मध्ये ओळीने हिट् सिनेमे दिले आहेत. गेल्या वर्षी फहादने ‘सी यू सून’ बनवला. करोना असल्याने चित्रीकरण त्याच्या कोचीमधील घरी झाले. त्याला चहा हवा होता. फहादची पत्नी नाझरिया (हीदेखील मल्याळी अभिनेत्री) म्हणाली, ‘‘दूध संपलेय. खाली जाऊन दुकानातून आणलंस तरच चहा मिळेल!’’ फहादने दुकानात जाऊन दूध आणले. मग पुन्हा चित्रीकरण सुरू झाले. त्याच्या जगण्यात आणि सिनेमात कुठेही ‘हिरोपण’ नाही!