श्रीनिवास बाळकृष्ण
जंगल फक्त टीव्हीवर पाहणाऱ्या माझ्या मित्रा, ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चे एपिसोड्स बघून तू कल्पनेतल्याच जंगलात गेलाएस. खरं ‘जंगल’ काय असतं ते मला विचार. तिथं जगायचं म्हटलं तर लै प्लॅनिंग लागतं. सतत एकत्र राहून काम करावं लागतं. नव्या कल्पना लढवाव्या लागतात. अनेक कौशल्यं (स्किल्स) यावी लागतात. नाहीतर ‘श्श! वी हॅव अ प्लॅन’ या क्रिस हॉटन याच्या पुस्तकासारखं होतं. अगदी साधी-सरळ आणि पाहायला शिकवणारी गोष्ट. कथा घनघोर जंगलातली असल्याने तिथं शब्दांची गरजच नाही. गोष्ट थोडक्यात अशी की- तीन मोठे आदिवासी आणि एक छोटा असे चार जण अन्नासाठी जंगलात शिकारीला निघालेत. हे तीन म्हणजे मोठे काका, मामा, आई-बाबा, दादा असे आपल्यावर डाफरणारे कोणीही असू शकतात. आणि छोटे तुझ्यासारखे.. गुमान ऐकून घेणारे! ते पहिल्यांदा एक पक्षी हेरतात. छोटय़ाकडे चांगला प्लॅन असतो, पण ते तर लिंबुटिंबु म्हणून चौथ्याला प्लॅनिंगमध्ये घेतही नाहीत. पुढे चित्रात दाखवल्याप्रमाणे मोठय़ांचे भारी प्लॅन फसतात. जुन्या अनुभवांतून काही न शिकल्याने शेवटपर्यंत ही फसण्याची मालिका चालूच राहते. शेवटी छोटू आदिवासी दुर्लक्षाला वैतागून स्वत:चा प्लॅन आखतो. पक्ष्याला जवळ करण्यात तो यशस्वी होतो. तितक्यात मोठे आल्याने काहीतरी बिनसतं. पुढं काय होतं ते चित्रात असल्याने मी लिहू शकत नाही. हे बघायची गंमत म्हणजे पुस्तक!
आता चित्राविषयी.. पुस्तक आकाराने मस्त मोठं चौकोनी आहे. निळा, जांभळा आणि पांढऱ्या रंगाने भरलेलं आहे. माणसांच्या त्वचेचा रंगही निळाच आहे. पेहेरावावरून व एकूणच थंड प्रदेशातली आदिवासी टोळी वाटते ही.
त्यातला एक आदिवासी हा अन्य तीन आदिवासींपेक्षाही छोटू असला तरी पुस्तक पाहता सर्वच बुटके का दाखवलेत? असं का? बाजूचा निसर्ग मोठा दिसावा म्हणून? ते निसर्गापेक्षा क्षुल्लक, वेगळे दिसावेत म्हणून? आजूबाजूला शिकारीची (अन्नाची) कमतरता दाखवण्यासाठी? की मुळात ही आदिवासींची बुटकी जमातच काढलीये? तुम्हीच ठरवा.
चित्र डिजिटल आहे. पण मित्रा, तू पोस्टर रंगाने हे करून पाहू शकतो. निळ्या रंगाच्या चार शेड्स बनव. एकमेकांवर लावून पाहा. कागदाचा कोलाज केल्यासारखा रंग लावला आहे. त्यामुळे त्यांची हालचाल ठोकळ्यासारखी भासते. त्या कमी कामातून आलेल्या साधेपणात गंमत आहे. सावली-प्रकाशाचा खेळ नाही. माणसाव्यतिरिक्त झाडं, पक्षी खूप कमी डिटेल्स करून काढली आहेत. क्रिसला मुलांचा आवडते चित्र कॉपी करण्याचा स्वभाव माहीत असावा का? असो.
पेज डिझाईनमध्ये कलर कॉन्ट्रास्टचा मस्त वापर केलाय. जिथं आपापसात प्लॅनिंग चाललंय तिथलं पान पांढरंशुभ्र, बाकीची निळी.
चित्रात पुढेमागे असणारी झाडं, पानं यांच्या फक्त आकारात फरक आहे, पण रंगात नाही. वास्तविक आपल्याला पुढली झाडं, डोंगर अधिक तजेलदार, ठळक रंगाची दिसतात आणि दूरचे पुसट!
या सर्व विस्तीर्ण निळ्यावर चटकदार लाल रंगाचा पक्षी जसा आपल्या चटकन् नजरेत भरतो तसाच शिकाऱ्याच्या नजरेतही भरत असावा. क्रिसनेही असाच विचार केला असेल का? कारण शेवटच्या पानावरचा खारूभाऊदेखील लाल रंगाचाच आहे.
बुटक्या टोळीतल्या माणसांचे डोळे शरीराच्या प्रमाणापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे त्यांचे चेहरे कपडे घातलेल्या बेडकासारखे वाटतात.
या पुस्तकात दिसणारी महत्त्वाची गंमत म्हणजे माणसांचा, परिसराचा आणि त्यासोबत असलेला ‘टेक्स्ट’चा आकार एकमेकाला साजेसा आहे. इंग्रजीत लिहिलं असलं तरी विशिष्ट फॉन्टने वाटतं की ती त्यांच्याच खास भाषेत बोलतायत. हे पुस्तक लेखकाच्या वेबसाइटवर चलत्चित्र स्वरूपात पाहता येईल आणि ऑनलाइनही मिळेल.
तू काही गोष्टी रचल्या असशीलच ना? म्हणजे त्यात वाघ असेल, एलियन किंवा झाड असेल तर ते कुठल्या भाषेत बोलतील? मराठीत किंवा इंग्रजीत बोलले तरी त्याचा फॉन्ट कसा असेल? एकदमच वेगळा असेल ना? तुझी फॉन्टची गंमत मला करून पाठव बरं!
shriba29@gmail.com