scorecardresearch

भाषेची ताकद

वेगवेगळ्या बोलीभाषेच्या वैभवाची आणि समृद्धीची ओळख या सदरातून गेले काही महिने करून दिली जाते आहे. त्या अनुषंगाने भाषेची ताकद नेमकी काय असते आणि त्याचा कसा वापर केला जातो, असा वेगळा दृष्टिकोन या लेखात मांडला आहे. यातून भाषेचे सुप्त सामथ्र्य जाणून घेता येते आणि परिणामी भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अधिक नेटका होऊ शकतो.

भाषेची ताकद

वेगवेगळ्या बोलीभाषेच्या वैभवाची आणि समृद्धीची ओळख या सदरातून गेले काही महिने करून दिली जाते आहे. त्या अनुषंगाने भाषेची ताकद नेमकी काय असते आणि त्याचा कसा वापर केला जातो, असा वेगळा दृष्टिकोन या लेखात मांडला आहे. यातून भाषेचे सुप्त सामथ्र्य जाणून घेता येते आणि परिणामी भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अधिक नेटका होऊ शकतो.

भाषेची स्थिती नेहमीच ‘अतिपरिचयात.. ’ अशी असते. प्रत्येक माणसाला बहुधा एकतरी भाषा अवगत असतेच. माणूस अगदी बालवयात म्हणजे बाळ असतानाच भाषा शिकायला सुरुवात करतो. सभोवतीच्या जगाची आणि प्रथम भाषेची ओळख आपल्याला एकदमच होत असते.

प्रथम भाषा आपण विनासायास शिकलो आहोत, असेच प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे मोठे झाल्यावर शाळेत किंवा महाविद्यालयात औपचारिकरीत्या ती शिकण्याची गरजच काय आहे, अशी सर्वसाधारण धारणा असते. भाषेविषयी असा दृष्टिकोन निर्माण होण्यामागे मुख्य दोन कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे भाषा शिकण्याच्या प्रक्रियेशी आपण प्रामुख्याने फक्त व्याकरण आणि वाङ्मय या दोन संकल्पनांची सांगड घालतो; आणि दुसरं म्हणजे भाषा या साधनाच्या प्रचंड ताकदीविषयी आपण पूर्णपणे अनभिज्ञ असतो किंवा त्या ताकदीची आपल्याला पुरेशी कल्पना नसते.

खरेतर भाषा घडवण्याची आणि वापरण्याची एक उपजत क्षमता माणसाजवळ असते. इतर प्राण्यांपासून मानवाचे वेगळेपण दाखवून देणारे हे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. आपण फक्त विचार मांडण्यासाठी किंवा अभिव्यक्तीसाठीच नाही तर प्रामुख्याने विचार करण्यासाठीही भाषेचा वापर करतो. कोणत्याही भाषेचा आधार न घेता आपण विचार करू शकू का, याचा विचार करून बघा. आपण काही फक्त प्राथमिक गरजांसाठी- म्हणजे प्रेम, भीती, दु:ख भूक- केवळ भाषा वापरत नाही तर अतिशय गुंतागुंतीचे विचार, प्रणाली, तत्त्वज्ञान, प्रवाह यांच्या अभिव्यक्तीसाठी आपण भाषा वापरतो.

ज्ञानाची निर्मिती, ग्रहण, साठवण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानाचे पिढय़ान्पिढय़ा हजारो वर्षे चालत आलेले हस्तांतरण हे भाषेच्या प्रगल्भ वापराखेरीज संभवतच नाही. ज्ञानाच्या केवळ हस्तांतरणामुळेच प्रगती संभाव्य आहे, नाहीतर एका पिढीने मिळवलेले ज्ञान तिथेच थिजून, विरून स्थगित झाले असते आणि पुढच्या पिढीला परत पहिल्यापासून सुरुवात करायला लागली असती. आज मागच्यांनी केलेल्या प्रगतीच्या पायावर पुढे जाऊ शकतो. विचार करून बघा की, भाषेच्या वापराखेरीज हे शक्य झाले असते का? कंदमुळे न खाता स्वत: लागवड करून पिकवून खाणे, गुहेत न राहता घरे बांधून राहणे, चाक, अग्नी, पशुपालन इथपासून वाफ, वीज, यंत्रसामग्री, संगणक यांची निर्मिती आणि मानवाच्या गरजेप्रमाणे त्यांचे उपयोजन या गोष्टी विचारांच्या देवाणघेवाणीखेरीज शक्य झाल्या असत्या का किंवा विचारांची ही देवाणघेवाण भाषेखेरीज शक्य आहे का? मानवाची बौद्ध्रिक क्षमता महत्त्वाची आहेच, पण तिचे प्रगतीसाठी केले गेलेले उपयोजन हे प्रामुख्याने भाषेच्या माध्यमातूनच शक्य झाले आहे.

तारायंत्राचे कडकट्ट, दिव्यांची उघडझाप, मुक्या-बहिऱ्यांची हातवाऱ्यांची भाषा, पक्ष्यांचा चिवचिवाट, गायीचं हंबरणं याही सगळ्या भाषाच आहेत; पण आपण वापरत असलेल्या मानवनिर्मित भाषा खूपच जास्त सजर्नशील आणि लवचीक आहेत. कमीतकमी सामान-साधनातून शब्दश: अनंत रचना करायला समर्थ अशा आहेत. खूप भाषांमध्ये सर्वसाधारणपणे ४५ ते ५० मूळ स्वरांतून लक्षावधी वाक्ये तयार करता येतात. आपल्या भाषांच्या या क्षमतेमुळेच अतिगुंतागुंतीचे प्रश्न, विचार, तत्त्वप्रणाली मांडणे शक्य झाले आहे. आजच्या युगाला आपण संज्ञापनाचं युग म्हणतो. या युगात भाषण आणि संभाषणकौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या विषयातल्या नैपुण्याखेरीज आज सॉफ्ट स्किल्सला फार महत्त्व आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संभाषण कौशल्य मोडते. बहुतेक परीक्षांसाठी आणि नोकरीसाठी, तोंडी परीक्षेसाठी, मुलाखती, गटचर्चा आणि संबंधित विषयावरील सादरीकरण या गोष्टी आता निकडीच्या आणि सवयीच्या झाल्या आहेत. तुम्ही मुलाखतीच्या वेळी स्वत:ला कसे सादर करता याला प्राधान्य देण्यात येते. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा योग्य ठसा उमटावा, म्हणून फॉर्मल ड्रेस वगैरेबरोबर संभाषणचातुर्य असणे जरुरीचे आहे. हे म्हणजे एक प्रकारे आपले स्वत:चे व्यक्तित्व एक प्रॉडक्ट म्हणून विकण्याचाच प्रकार असतो आणि विक्रेत्याच्या यशाची मेख बहुतांशी त्याच्या बोलण्यात असते.

माणसाने बोलण्यासाठी तोंड उघडले की, त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक बाजूंचे, पैलूंचे दर्शन होते. तुमच्या अभिव्यक्तीतला अस्खलितपणा हा तुमच्या सलग आणि स्वच्छ विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. तुमचा आत्मविश्वास, ज्ञान, विचारातला पारदर्शीपणा तुमच्या संभाषणातून व्यक्त होतो. तुम्ही कोणत्या शब्दाची निवड करता, तुमचे उच्चार कसे आहेत, तुम्ही आघात कोणत्या शब्दावर देता, वाक्यरचना कशी करता यातून तुमची शैक्षणिक आणि वैचारिक पाश्र्वभूमी स्पष्ट होऊ शकते. तुम्ही स्पष्ट, सलग, अस्खलित, योग्य आवाजात बोललात तर तुमची छाप चांगली पडते. आदब, मृदूपणा, उर्मटपणा तसेच तुमचा अ‍ॅटिटय़ूड वागण्यापेक्षा बोलण्यातून पटकन कळतो. देहबोली महत्त्वाची आहे, पण आपण वापरलेले शब्द दुसऱ्या माणसाच्या जास्त लक्षात राहतात. संभाषण युगात मार्केटिंग हा एक मुख्य परवलीचा शब्द आहे. चपखल शब्दाचा वापर हा तर्कसुसंगत मुद्दा मांडताना अतिशय आवश्यक ठरतो. तुमचे म्हणणे समोरच्या माणसापर्यंत कसे पोहोचवता, त्याला आपला मुद्दा पटवून देऊ शकता का, यावर मार्केटिंगचे यश अवलंबून असते.

संभाषणाचा समग्र विचार करताना संभाषण हे एक कौशल्य आहे, असे लक्षात घेणे जरूर आहे. म्हणजेच संभाषणकौशल्य हे एक आयुध आहे आणि ते पारजून त्याचा जास्तीतजास्त प्रभावी उपयोग करणे ही शिकता येण्यासारखी गोष्ट आहे. भाषाक्षमता माणसाला उपजत मिळाली असली तरी जन्मत: भाषा अवगत असू शकत नाही तर भाषा आणि तिचा वापर शिकावा लागतो. तो शिकता येतो. पोहणे, अभिनय करणे, सायकल चालवणे ही जशी कौशल्ये आहेत तसेच भाषेचा सुयोग्य वापर हेही एक कौशल्य आहे. ते मिळवता आणि आत्मसात करता येते आणि त्याचा कस सरावाने वाढवताही येतो.

भाषा आणि संभाषणकौशल्याच्या बळावर केवळ सभाच नाही तर निवडणुका आणि राज्येही जिंकली गेली आहेत. ग्रीक राजकारण्यांपासून ते आपल्या सध्याच्या पक्षप्रवक्त्यापर्यंत आणि न्यूज अँकपर्यंत १ं३१८ आणि १ँी३१्री२ चे महत्त्व सगळ्यांना आहे. चाणक्यापासून ते विवेकानंदापर्यंत आणि लोकसभासद बॅ. नाथ पैंपर्यंत अनेक पुढाऱ्यांच्या भाषण आणि संभाषण कौशल्याचे किस्से सांगितले जातात. अब्राहम लिंकन ते बराक ओबामापर्यंत अनेकांनी आपल्या भाषणांतून लोकांची मने जिंकली आहेत. आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप जनमानसावर पाडली आहे. वक्तृत्वनैपुण्य हे केवळ सार्वजनिक क्षेत्रात असलेल्यांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आवश्यक गुण आहे. म्हणून भाषेचा आवाका आणि तिची ताकद याची जाणीव आपल्याला असली पाहिजे.

मराठीतील सर्व मायबोली बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2013 at 12:07 IST

संबंधित बातम्या