– शुभांगी पासेबंद
संजीव वसंत फडके यांनी लिहिलेले ‘प्रभात टॉकीजसमोर’ हे पुस्तक म्हणजे एक ललित लेखसंग्रह. खरे तर ही कुटुंबातील तीन-चार पिढ्यांची सांस्कृतिक आणि भौगोलिक स्मृतियात्रा आहे. अतिशय वेगवान पद्धतीने ती आपल्यासमोर एखाद्या चित्रपटासारखी उलगडत जाते.
ठाणे शहराच्या परिसरात लेखकाचे आयुष्य घडले, त्यामुळेच या ललित लेखसंग्रहाचे ‘प्रभात टॉकीजसमोर’ हे शीर्षक समर्पक वाटते. सुजाण वाचकांना, विशेषत: ज्येष्ठांना जवळचे वाटेल. तरुण पिढीला गतकाळाची ओळख करून देणारे ठरेल.
पहिल्याच प्रकरणात लेखक आठवणींचे दप्तर उघडून बालपणात प्रवेश करतात. बालपणीच्या आठवणी, भुताखेतांच्या गोष्टी, सार्वजनिक नळावर पाणी भरणे, एकत्र कुटुंब, कौटुंबिक प्रश्न, आजार, बेकारी, नोकरी शोधणे, घर शोधणे हे सगळे शहरी प्रश्न तसेच तत्कालीन ठाण्यातील राजकारण हेही यात येते. अनेक नोकर्या करून मग टी. जे. एस. बी. बँकेत नोकरी. नोकरीत केलेली प्रगती, नवीन तंत्रज्ञान याचा ऊहापोह लेखकाने केला आहे.या पुस्तकातील भाषेत माधुर्य आणि सौंदर्य आहे. एकूण ७५ लेखांचा समावेश असलेल्या या पुस्तकात मानवी आयुष्यात भावनांचे महत्त्व अधोरेखित करणारे भावनिक प्रसंग, विचार आहेत. पाऊस, माणसांची सोबत, निसर्ग, बालपण, नोकरी यांबद्दल विविध लेख आहेत.
लेखकाला पत्नीचा मृत्यू ‘मृत्यू एक अटल सत्य आहे’ हे शिकवून जातो. शरीराचे अस्तित्व संपले तरी स्मरणगाथेत ती व्यक्ती उरते.
लेखक छान भावसमृद्ध आयुष्य जगले आहेत हे या पुस्तकातून जाणवतं राहतं. शब्दांच्या फापटपसार्यात व शब्दजंजाळात वाचकाला न अडकवता अगदी साधी सरळ, सोपी व ओघवती भाषा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. मानवी व्यवहारांमधील साधेपणाची ताकद या पुस्तकात प्रकर्षाने जाणवते. सोप्या शब्दांत अतिशय प्रांजळ व मोकळेपणाने केलेले लेखन वाचकाला भावते.
ठाण्याच्या तलावपाळीजवळचा परिसर, प्रभात चित्रपटगृहाची पूर्वीची इमारत, टॉकीज, ती गर्दी, प्रभातला पिंजरा सिनेमाचे लावलेले पोस्टर यांची अप्रतिम रंगसंगती असलेले, रंगीत मुखपृष्ठ अतिशय सुंदर आहे.
‘प्रभात टॉकीजसमोर’,
संजीव वसंत फडके, ग्रंथाली,
पाने- ३२०, किंमत- ५०० रुपये.
