prabodhankar keshav sitaram thackeray contribution in marathi drama zws 70 | Loksatta

कस्तुरीगंध : ‘टाकलेलं पोर’  आक्रमक वकिली युक्तिवाद

प्रबोधनकार ठाकरे यांची नाटकं म्हणजे त्यांनी केलेले प्रभावी युक्तिवादच आहेत. अशा युक्तिवादात त्यांनी ब्राह्मणी अहंमन्यता आणि जातीयता पार सोलून काढली आहे.

कस्तुरीगंध : ‘टाकलेलं पोर’  आक्रमक वकिली युक्तिवाद
1) कुंती आणि कर्ण- तिसरा अंक 2) ठाकरेंचे विनोदवीर : हिरडा, बेहडा आणि आवळकटी

प्रा. विजय तापस

एकोणिसाव्या-विसाव्या शतकातल्या अनेक नाटकांचं स्वरूप नाटककार वकिलांनी रयतेच्या न्यायालयात पेश केलेल्या खटल्यांसारखं आहे. कोर्टात एका पक्षकाराच्या बाजूने एखादा खटला लढवताना निष्णात वकील आपल्या युक्तिवादाने खटल्याला असा काही रंग देतात की त्यावेळी न्यायालयात हजर असलेल्या प्रत्येकाला तोच युक्तिवाद खरा असल्याचा भास होऊ लागतो. लोकमान्य टिळक हे अशा वकिलांचे आदिपुरुष वा दीपस्तंभ मानायला हवेत. लोकमान्यांच्या राजकीय-सामाजिक भूमिकांचं समर्थन करण्यासाठी, त्या भूमिकांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी किती नाटककारांनी आपली नाटय़प्रतिभा खर्ची घातली, हा हिशेब एकदा करून बघण्यासारखा आहे. अशाच जातकुळीच्या वकिलांपैकी एक नाटककार वकील म्हणजे केशव सीताराम ठाकरे! मात्र, त्यांनी नाटय़माध्यमातून वकिली केली ती टिळकपक्षाची नाही (ठाकरे यांचे लोकमान्य टिळकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असूनही!), तर दलित, पददलित व शोषितांच्या जीवनाची; त्यांच्या दु:ख आणि यातनांनी व्यापलेल्या आयुष्याची. ब्राह्मणपक्षाच्या तथाकथित महान तत्त्वज्ञानाचे वाभाडे काढत त्यांनी बाजू घेतली ती ब्राह्मणेतरांच्या पक्षाची. त्यांच्या सर्वच नाटकांत ही गोष्ट आढळते. शिवाय प्रत्येक नाटकात भाषेचा ‘ठाकरी ब्रँड’ एक मोठी निर्णायक भूमिका पार पाडतो यात संशय नाही. 

प्रबोधनकार ठाकरे यांची नाटकं म्हणजे त्यांनी केलेले प्रभावी युक्तिवादच आहेत. अशा युक्तिवादात त्यांनी ब्राह्मणी अहंमन्यता आणि जातीयता पार सोलून काढली आहे. असे युक्तिवाद रंगतदार, मेस्मराइज करणारे, हशा पिकवणारे, विचाराला प्रेरणा देणारे, कृतीच्या संदर्भात दिशादर्शक ठरणारे असतात यात शंका नाही. स्वाभाविकपणेच त्यात मैदानी सभेचा एक तीव्र सूरही लागतोच. मात्र, त्यात कधी टोकाचा अतिरेकीपणा, काही ओढूनताणून केलेले दावे, आवाजी वक्तृत्व, असभ्य वाटावी अशी शेरेबाजी, राणा भीमदेवी थाटाचा लखलखता भाषिक देखावा यांचाही भरणा असतो. केशव सीताराम ठाकरे हे मुळातच सडेतोड. जशास तसे, ‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’ वृत्तीचे आणि ‘शिवी हीच आमची ओवी’ या पंथाचे असल्याने त्यांचे नाटय़रूप युक्तिवाद तेव्हाच्या अभिजन वर्गाला पटोत वा न पटोत; मध्यम आणि निम्न मध्यम वर्गासकट आम नाटय़प्रेमींना नि:संशय रुचत आणि पटत होते. त्यांची अनेक नाटकं आणि त्यांचे प्रयोग या गोष्टीची सत्यता पटवून देणारे आहेत.

हे ही वाचा >> कस्तुरीगंध : ‘समाजोन्नती’: एक अवनती-चित्र

राजकीय आणि सामाजिक प्रबोधन हाच लेखनाचा अजेंडा ठरवलेल्या ठाकरेंनी नाटकांखेरीज जे इतर लेखन केलं, त्याचंच एक्स्टेंडेड आणि एलव्हेटेड रूप आपल्याला त्यांच्या विशेष गाजलेल्या, लोकप्रिय ठरलेल्या ‘खरा ब्राह्मण’, ‘संगीत विधिनिषेध’, ‘संगीत सीताशुद्धी’ आणि ‘टाकलेलं पोर’ या नाटकांमधून अनुभवता येतं. प्रबोधनकार ठाकरे हे महात्मा फुले वैचारिक विद्यापीठाचे कट्टर आणि कडवे पदवीधर, पूर्णवेळ प्रचारक होते. (त्यासाठीच महात्मा फुले यांच्या निधनानंतर पुण्यात घर घेऊन ते राहू लागले होते.) फुले यांचा विचारवारसा आणि त्यांच्या चळवळी पुढे नेण्याचं, ब्राह्मणेतरांची चळवळ संघटित करण्याचं, ब्राह्मण जातीचं अहंमन्य राजकारण उघड करण्याचं, ‘भटशाहीची क्षुद्र वृत्ती’ (हे ठाकरेंचे शब्द!) अत्यंत निर्ममपणे ठेचण्याचं, टिळकपक्षाची राजकीय चलाखी आणि सनातनता बहुजन समाजाच्या लक्षात आणून देण्याचं कार्य हाच प्रबोधनकारांच्या सामाजिक कार्याचा नकाशा मानता येईल. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महात्मा फुले, गोपाळराव आगरकर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सत्यशोधक समाज हा केशवरावांचा आत्मभाव होता. त्यांची नाटकं हाच आत्मभाव आपलासा करतात, त्याच्याशी एकनिष्ठ राहतात आणि त्याचा प्रभावी प्रसारही करतात. हाच आत्मभाव आणि बहुजनांचा कैवार त्यांच्या ‘टाकलेलं पोर’ नाटकामधून साकार झालेला दिसतो.

हे नाटक लिहायला ठाकरे सरसावले ते शिवरामपंत परांजपे यांचं १९३० साली रंगभूमीवर आलेलं (पंतांचा मृत्यू १९२९ चा!) ‘पहिला पांडव’ हे नाटक पाहून जो संताप झाला, त्यातून. केशवरावांना पार बालवयापासून ‘राधेय’ किंवा ‘सुतपुत्र’ म्हणून हिणवल्या गेलेल्या कर्णाविषयी प्रचंड प्रेम आणि तेवढीच आस्था वाटत होती. कर्ण हा त्यांच्या दृष्टीने पुरुषोत्तमच! अशा कर्णाची जी केविलवाणी, दीनदुबळी आणि ‘मला कोणीतरी क्षत्रिय म्हणा हो..’ असा आकांत करणारी प्रतिमा ‘पहिला पांडव’ने  उभी केली होती, ते पाहून केशवरावांच्या अंगाचा तीळपापड झाला. ‘भटी’ दृष्टीने त्यांच्या मनोनायकाची विटंबना झाली. ही विटंबना पुढे चालू राहू नये, त्यास वेळीच पायबंद घालावा, या एकमात्र उद्देशाने प्रबोधनकारांनी ‘टाकलेलं पोर’चा गर्भ वाढवायला सुरुवात केली. ‘पहिला पांडव’ला दिलेलं सणसणीत उत्तर म्हणूनही आपण या नाटकाकडे पाहू शकतो. यात एक गोम अशी की, ‘पहिला पांडव’ला दिलेलं उत्तर हे खऱ्या अर्थाने वर्णश्रेष्ठत्वाच्या मानसिकतेला- म्हणजेच सनातनी टिळकपक्षाला दिलेलं उत्तर आहे. नाटकाच्या १९३९ च्या प्रस्तावनेत प्रबोधनकार म्हणतात, ‘‘ या नाटकात अपत्यहत्येचा प्रश्न तर प्रधान आहेच आहे, पण त्याहीपेक्षा मागासलेल्या नि पददलित समाजातील स्वाभिमानी उद्धारकांना आत्मोन्नतीचे शिखर गाठण्यासाठी कसकसल्या सामाजिक विकल्पांना नि अडचणींना तोंड देऊन आपला मार्ग आक्रमावा लागतो याचे दृश्य रंगवण्याचा कर्णाच्या मूळ कथेनुसार मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.’’

‘टाकलेलं पोर’चा पहिला प्रयोग ८३ वर्षांपूर्वी- म्हणजे ५ मार्च १९३९ रोजी मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये ‘चित्तरंजन नाटय़ समाज’ या संस्थेने सादर केला. हे नाटक सादर होण्यात ठाकरेंवर निस्सीम प्रेम करणाऱ्या अनेकांचा हातभार लागला. प्रयोगाच्या दिवशीच नाटक पुस्तकरूपानेही साकारलं. ‘नाटकात हवी तर पदे घालावीत वा गद्य प्रयोग करावा’ अशी मुभा नाटककाराने दिली होती. त्यानुसार पहिला प्रयोग पदांसह झाला. ‘ठाकरेंचे नाटक म्हणजे चाबकाचे टणत्कार गर्जणार’ ही सर्वसामान्यांची जी एरवीची अपेक्षा असायची तसेच टणत्कार पहिल्या प्रयोगात उठले. या नाटकावर ब्राह्मण-ब्राह्मणेतर आपापल्या शैलीत गरजले-बरसले. तो काळ लक्षात घेता हे ‘स्वभावाला धरून झाले’ असंच म्हणायला हवं. नाटकात दहा पात्रं- ज्यात कुंती आणि दासी आवळकटी या दोन स्त्रिया! गंमत म्हणजे दहाही भूमिका पुरुषांनी केलेल्या.

‘टाकलेलं पोर’ या नाटकाच्या कथानकात सगळा रोख कर्णावर असावा ही सामान्य अपेक्षा झाली. पण प्रबोधनकारांना ते मान्य झालेलं दिसत नाही. त्यांच्या कथानकाचा संबंध जरी कर्ण या व्यक्तिरेखेशी असला तरी नाटककाराचा रोख कर्णावर अन्याय करणाऱ्या विविध व्यक्तिरेखांवर अधिक आहे. नाटकाचा पहिला अंक याची साक्ष देतो. पहिल्या अंकात एक तीव्र स्वरातला संघर्ष आहे. हा संघर्ष आपल्याला १९३०-१९४० या दशकातल्या ब्राह्मण-ब्राह्मणेतरांमधल्या आक्रस्ताळ्या, ‘अरेला कारे’ बाजाच्या आणि काहीशा शिवराळ वादांची आठवण करून देतो. महात्मा फुले यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यावर प्रहार करताना जी प्रमेयं वापरली, त्याच आधारे इथे कर्ण आणि दुर्योधन बोलताना दिसतात. भाषेच्या अशा चलनातून ब्राह्मणेतरांची सामाजिक-मानसिक भूमिका स्पष्ट होते आणि भाषेच्या तथाकथित सुसंस्कृततेचा नक्षा उतरवला जातो. ठाकरेंना भाषेची ग्राम्य शैली निषिद्ध नाही हे पहिल्या अंकात इतक्या उघडपणे प्रबोधनकारांनी दाखवून दिलं आहे, की आपण थक्क व्हावं. इथे व्यासांचा उल्लेख ‘पोटाळ पंडित’, कृष्णाचा उल्लेख ‘पाताळयंत्री डोंबारी’, ‘घोडेहाक्या’, ‘दगलबाज’, ‘नाटकी’, ‘चेटक्या’ असा शेलकेपणाने होतो. त्या काळातल्या इतर अनेक नाटकांमधून महाभारतीय कथानक आणि पात्रे वावरली. तशा नाटकांतून संस्कृताळलेल्या मराठी भाषेचा जो वापर होत होता त्याला पूर्णपणे नकार देऊन पिटातल्या समाजाला सहज कळेल (आणि भावेल) अशा रांगडय़ा मराठीचा वापर कुणाचीही पत्रास न ठेवता प्रबोधनकार नेटाने करतात. महाभारतीय पात्रांना ‘आपली भाषा’ उच्चारायला लावून नाटककार सूतपुत्र म्हणून जगावं लागलेल्या कर्णाला १९४० मधल्या वास्तवात घेऊन येतो. ब्राह्मणेतर पक्ष राजकीय, सामाजिक किंवा जातीविशिष्ट स्वरूपाची जी जी आग्र्युमेंटस् तेव्हा करत होता किंवा या समाजाचा ब्राह्मणी सत्ता, ब्राह्मणी कावा याविरोधात जो काही थिसीस होता, जो एल्गार होता, त्याचेच प्रतिध्वनी या नाटकातून आपल्याला ऐकू येतात. मला आज ठाकरेंचं नवल वाटतं ते एका बाबतीत. ती गोष्ट अशी की, नाटकात द्रौपदीच्या संदर्भात जे जे बोललं गेलं आहे- विशेषत: ती पाच पुरुषांची पत्नी आहे यासंदर्भात- ते स्त्रियांचा कमालीचा अधिक्षेप करणारं, तिला पूर्णपणे अपमानित करणारं, हास्यास्पद करणारं आहे. ती अत्यंत प्रबळ अशा पुरुषप्रधान सत्तेचा बळी होती हे प्रबोधनकार जणू इथे साफ विसरलेले दिसतात. असाच प्रकार कर्ण आणि कुंती यांच्या भेटीच्या दरम्यान घडला आहे. तिथे कर्ण कुंतीची यथासांग निर्भर्त्सना करताना तिला पाच पांडव कसे झाले याबद्दल जे बोलतो- म्हणजेच ज्या शैलीत तो बोलतो, ती शैली कोणत्याही काळाचा विचार केला तरी कणमात्रही सभ्यतेची म्हणता येणार नाही. ‘प्लेइंग फॉर द गॅलरी’चं हैवानी भूत ठाकरेही झिडकारू शकले नाहीत याला काय म्हणावं? स्त्रीवादी समीक्षकांनी या नाटकाची समीक्षा केलीय का कुणास ठाऊक. असो.

या नाटकात आपल्याला परिचित असलेलीच कर्णकथा आली आहे. फरक इतकाच, की इथला कर्ण दयनीय नाही, कातर मनोवृत्तीचा नाही. तो बेधडक बोलणारा, स्वत:वरच्या अन्यायाचा जाब विचारणारा, बराचसा उग्रतेने बोलणारा आणि स्वाभिमानी आहे. त्याला वर्णव्यवस्थेचा तिटकारा आहे. आणि या व्यवस्थेत सत्तापिपासू राजकारण गुंतलेलं आहे याची त्याला जाणीव आहे. नाटकात हिरडा, बेहडा, आवळकटी ही पात्रं म्हणजे बहुजनवर्गाचा आवाज आहे आणि विनोदाची आयती सोयही आहे. (हिरडा, बेहडा, आवळकटी  हे तिन्ही पदार्थ कोठा साफ करण्याचं काम करतात!) केशव सीताराम ठाकरे यांनी द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, विदुर यांच्या जन्माच्या कहाण्या नाटकात गुंफून महाभारतातल्या वर्णव्यवस्थेबद्दल काही लक्षणीय निरीक्षणं नोंदवली आहेत. अश्वत्थामा हा नाटकातला एकमेव ब्राह्मणवादी. त्याला जितकं कर्मठ, खूनशी, टोकाचा वर्णश्रेष्ठत्ववादी दाखवता येणं शक्य होतं तेवढं नाटककार ठाकरेंनी आनंदाने दाखवलं आहे. या नाटकाचं दोन-चार वेळा वाचन केल्यावर मी या निष्कर्षांला आलोय, की हे नाटक लिहिण्यामागे शिकारीवृत्तीच्या नाटककाराचे तीन मुख्य हेतू असावेत. एक : ब्राह्मणशाहीला विवस्त्र करून त्यांची सत्तापिपासा आणि त्यांचा सर्वागीण दांभिकपणा उघड करणं. दोन : जन्मत: ब्राह्मण नसलेल्या क्षत्रियादी वर्णीयांनी मानसिक-सामाजिक पातळीवर ब्राह्मणी मानसिकता स्वीकारून जी गुलामी व्यक्त केलीय ती स्पष्ट करणं, आणि तीन : ब्राह्मण-ब्राह्मणेतर रणकंदनात सहभागी होऊन समाजाच्या हितार्थ ब्राह्मणेतरांना ‘आपला आवाज’ प्राप्त करून देणं. ‘टाकलेलं पोर’ नाटकाने प्रबोधनकारांचे तीनही हेतू सफळ संपूर्ण केले यात कणमात्र संशय नाही. अर्थात त्यातून कर्णाच्या बाजूने- म्हणजे दलितांच्या बाजूने- लोकमत किती बदललं, मुळात बदललं तरी का, हा प्रश्न आहेच. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक लाभ प्राप्त होऊन ज्या पददलितांनी स्व-कर्तृत्वाच्या जोरावर आपलं आयुष्य उन्नत करून घेतलं त्यांची मानसिकता तरी ‘जातमुक्त’ झालेली दिसते का, हाही दखलपात्र प्रश्न आहे. आपल्याला या प्रश्नाला कधीतरी भिडावं लागेलच. आज प्रबोधनकार असते तर त्यांनी हे दोन्ही प्रश्न विचारले असते, हे नि:संशय!

vijaytapas@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
प्लास्टिक.. उपयुक्तता ते बंदी!

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नोटाबंदीबाबत मूकदर्शक बनणार नाही!; सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले
गोवर लसीकरण मोहीम दोन टप्प्यांत
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; ६६० बस फेऱ्यांवर परिणाम
मुंबईतील हवा ‘अत्यंत वाईट’; धुरक्याच्या प्रमाणात वाढ
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक वर्षांपासून; उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे निर्देश