स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत तीन शैक्षणिक धोरणे आणली गेली. यातील दुसरे शैक्षणिक धोरण १९८६ साली लागू झाले. २०१०-११पासून त्यात सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा अंतर्भाव केला गेला. हेतू हा की केवळ वार्षिक परीक्षेवर भर देऊन मूल्यमापन न करता वर्षभर मुलांचे सतत व विविध उपक्रमांतर्गत मूल्यमापन करता यावे. यात गृहपाठ, वर्ग कार्य, प्रकल्प, तोंडी परीक्षा, प्रश्नमंजूषा आणि प्रात्यक्षिके यांचा समावेश करण्यात आला. यातील एक घटक म्हणजे प्रकल्प. प्रकल्पावर आधारित अध्ययन-अध्यापन पद्धती ही अनेक देशांत स्वीकारली गेली. आपल्याकडेसुद्धा प्रकल्प पद्धतीचा अवलंब केला जातोच, पण तो केवळ हा घटक अभ्यासक्रमात समाविष्ट आहे म्हणून. यामुळेच त्याचा व्हावा तितका उपयोग होत नाही. तो उपयोगी ठरावा यासाठी शिक्षकांना व पालकांना मार्गदर्शक ठरेल असं पुस्तक म्हणजे ‘प्रकल्पवाटा : एक प्रभावी शिक्षण पद्धती’. जयश्री काटीकर यांनी या पुस्तकात प्रकल्पांचा अभ्यास अगदी उत्तम पद्धतीने सांगितला आहे.
प्रकल्प अभ्यास यशस्वी न होण्यामागे शिक्षकांची अनास्था, शोधक वृत्तीचा अभाव ही कारणं जरी असली, तरी या संदर्भात पुरेसे मार्गदर्शन न मिळणे व उपयुक्त साहित्य उपलब्ध न होणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. प्रकल्प म्हटला की एखादा विषय देऊन त्यावर तक्ते बनवणे, चित्रं काढणे, इंटरनेटचा वापर करून विशेष तसदी न घेता माहिती लिहून काढणे एवढ्यावरच हे सगळे काम पार पाडले जाते. शिवाय यात मुलांपेक्षा पालकांचा सहभाग अधिक असतो. यामुळे प्रकल्पांचा मुख्य हेतू साध्य होण्याऐवजी ते एक उरकून टाकण्याचे काम होते.
या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्पवाटा’ हे जयश्री काटीकरांचे पुस्तक उत्तम मार्गदर्शन करणारे ठरते. यातील मार्गदर्शक तत्त्वाचा वापर करून डोळसपणे जर प्रकल्प निर्मिती केली गेली तर बौद्धिक विकासाची उद्दिष्ट्ये साध्य होऊ शकतील. सोबतच मुलांना विषयाची गोडी लागेल आणि संशोधन कार्य करण्याची सवयही लागेल.
प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित अशा या पुस्तकात शिक्षणविषयक तळमळ, परिश्रम घेण्याची तयारी आणि विकास उद्दिष्टे साधण्यासाठी केलेली अव्याहत धडपड या गोष्टी प्रामुख्याने दिसतात. जोडीला प्रकल्पातून मुलांचा बौद्धिक विकास घडवण्यासाठी लेखिकेने केलेले प्रयत्नही दिसतात. पुस्तकात भाषाविषयक आठ प्रकल्पांचा समावेश केला असून ते स्वतंत्रपणे आठ प्रकरणात मांडले आहेत.
भाषेचा अभ्यास करताना पाठ, कविता, स्वाध्याय यांतून स्मरण, आकलन आणि उपयोजन या क्षमता वापरण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते, पण विश्लेषण, मूल्यमापन, नवनिर्मिती या उच्चबोधात्मक क्षमता वापरायची संधी तुलनेने कमी मिळते. या क्षमता विकसित होण्यासाठी जे विशेष प्रयत्न करावे लागतात ते करण्यासंबंधीचे मार्गदर्शन या आठ वर्ग प्रकल्पातून होताना दिसते.
यातील प्रत्येक प्रकरणाची मांडणी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी केली गेली आहे. वर्ग प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी करावयाच्या गोष्टी, विषय प्रवेश तक्ते, तांत्रिक बाबी, पूर्वतयारी, कृती सूचना, मूल्यांकन आणि गुणधर्माचे तक्ते, आवश्यक त्या नोंदी अशा स्वरूपात या प्रकल्पाचा सविस्तर आलेख प्रत्येक प्रकरणात मांडलेला आहे.
सातत्यपूर्ण सर्वंकष अभ्यास पद्धतीत प्रत्येक विद्याथ्र्याला वर्षाकाठी दोन प्रकल्प सादर करावे लागतात. यासाठी शिक्षकांनाही दरवेळी नवीन विषयांचा शोध घ्यावा लागतो. हा शोध घेत असताना शिक्षकांनी कशी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांना साहित्य कसे उपलब्ध करून द्यावे, प्रकल्प लिहिण्यासाठी आणि तो व्यवस्थित मांडण्यासाठी मुलांना मार्गदर्शन कसे करावे या सगळ्या घटकांचा, प्रत्येक प्रकरणात साकल्याने विचार केलेला आढळतो. हा विचार नुसता मांडलेला नाही तर प्रत्यक्ष कृतीतून तो कसा आकारास येऊ शकतो याचे उदाहरण समोर ठेवलेले आहे.
पाऊस या पहिल्याच प्रकरणात मुलांकडून पाऊस या विषयावर हस्तलिखित प्रकल्प कसा करून घेतला त्याविषयी सांगितले आहे. हे प्रकरण वाचताना संगतवार तक्ते आणि मुद्द्यांच्या आधारे ते आपल्या समोर उलगडत जाते. मुळात प्रकल्पाचा विषय कसा सूचला इथपासूनच लेखिकेने प्रकरणाची सुरुवात केली असून, ‘हा खेळ भावनांचा!’ ‘बालकुमार दिवाळी अंक’, ‘शब्दकोश’, ‘काव्य गंधाची रसयात्रा’, ‘समाज समजून घेताना’… अशी आकर्षक शीर्षके असलेली प्रकरणे आपल्या पुढे उलगडली आहेत.
जरी एखाद्या शोधनिबंधाच्या स्वरूपात ही प्रकरणे लिहिली असली तरी ती वाचताना अजिबात एकसुरीपणा येत नाही. याला कारण त्यात वापरलेली मुलांच्या हस्ताक्षरातील पाने. विषयांचे भरपूर वैविध्य असलेल्या या सर्वच प्रकल्पांमधून मुलांची फुलणारी सर्जनशीलता ठळकपणे दिसून येते.
पुस्तकाच्या कल्पक मुखपृष्ठापासून सुरू झालेला हा प्रकल्प प्रवास पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाशी पोहोचेपर्यंत आपल्याला समृद्ध करून जातो. मुलांनी केलेल्या कविता, संवादलेखन, लिहिलेली आत्मकथने, भावभावनांवर आधारित वाक्प्रचार, शब्द निवडून त्यावरून शब्दकोश निर्मितीची केलेली कृती या सगळ्या गोष्टी आपण वाचत जातो आणि नकळतच त्या अनुभवूही लागतो.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे क्यूआर कोड स्कॅन करून वाचता येणारे रसग्रहण. हे एवढं सगळं जरी असलं तरी हे पुस्तक कुठेही शब्दबंबाळ होत नाही, तर अतिशय नेटक्या रूपात आपल्यापुढे सादर होते. या लेखनाचा आणखी एक ठळक विशेष म्हणजे लेखिकेने नोंदविलेली मते, चिंतन आणि उणिवा. या सगळ्याचा ऊहापोह तिने पानाच्या एका बाजूला समासात अगदी नेमकेपणाने केलेला दिसतो. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच या पुस्तकाची उपयुक्तता अधिक ठरते.
शिकावं कसं हे शिकणं हे नवीन शैक्षणिक धोरणाचे साध्य आहे. त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्कीच मदत करतं. असं कितीतरी ज्ञान असतं जे पुस्तकात सामावणारं नसतं. मुलांना त्या ज्ञानाचा शोध घ्यायला जर शिकवायचं असेल तर यासारखं उत्तम पुस्तक हाताशी हवंच.
‘प्रकल्पवाटा : एक प्रभावी शिक्षण पद्धती’,
जयश्री काटीकर, ज्योत्स्ना प्रकाशन,
पाने- १७६, किंमत- २९० रुपये
mythreye.kjkelkar@gmail.com
