गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात एक मोठा आणि अत्यंत सकारात्मक बदल घडून आला. आजचा मराठी वाचक आणि विशेषत: तरुण पिढी आपल्या खर्या इतिहासाबाबत अतिशय जागरूक झाली. आपला खरा इतिहास नक्की काय? तो कुणी लिहिला? तो कुठल्या संदर्भांच्या आधारे लिहिला गेला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची उत्सुकता आजच्या तरुणाईमध्ये निर्माण झाली. म्हणूनच केवळ ऐकीव माहितीवर किंवा समाजमाध्यमांवर फिरणार्या अपुर्या संदेशांवर विसंबून न राहता, अस्सल ऐतिहासिक पुस्तकांचा शोध घेऊन त्यातून खरेखुरे ऐतिहासिक तथ्य शोधण्यासाठी आजची पिढी बर्यापैकी जागरूक झालेली दिसते; परंतु याच जागरूकतेसोबत अलीकडल्या काही वर्षांत इतिहासाच्या मांडणीमध्ये अनेक मतप्रवाहदेखील तयार झालेले दिसतात. या मतप्रवाहांचे रूपांतर अनेकदा टोकाच्या मतभेदांमध्ये होते आणि इतिहासाकडे बघण्याचा निरनिराळा दृष्टिकोन असणारे गट आपल्या अवतीभोवती निर्माण झालेले दिसतात. अशा गढूळ वातावरणात, इतिहासाविषयी खर्या अर्थाने तटस्थ, चिकित्सक असणारे आणि तो शास्त्रीय पद्धतीने जाणून घेण्यासाठी उत्सुक असणार्या अभ्यासकांसाठी मूळ ‘ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ’ अतिशय महत्त्वाचे ठरतात. हे संदर्भ ग्रंथ म्हणजे इतिहासाकडे जाण्याचे खरे मार्ग असतात. परंतु दुर्दैवाने, मागील शतकामध्ये अत्यंत निष्ठेने लिहिले गेलेले अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ आणि पुस्तके बाजारात सहज उपलब्ध असल्याचे दिसत नाहीत. एखाद्या तरुण अभ्यासकाला या वाटेने जायचे झाल्यास, त्याला पुण्यासारख्या शहरातील विविध जुन्या ग्रंथालयांच्या वार्या कराव्या लागतात. धुळीने माखलेली, जीर्ण झालेली पाने अतिशय काळजीपूर्वक चाळून त्यातले संदर्भ शोधावे लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया बर्यापैकी किचकट आणि वेळखाऊ असते. त्यामुळे इच्छा असूनही अतिशय कमी इतिहास अभ्यासक या वाटेने जाण्याचे धाडस करतात. नेमकी हीच अडचण आणि हीच गरज अनुभवल्यामुळे, कालौघात इतिहासाच्या पडद्याआड गेलेली पुस्तके अत्यंत दर्जेदार निर्मितीमूल्यांसह नव्याने प्रकाशित करण्यासाठी आम्ही २०२१ मध्ये ‘प्राकृत प्रकाशन’ या संस्थेची स्थापना केली.
या प्रकाशनाची बीजे खर्या अर्थाने एका पुस्तक विक्री संस्थेमध्ये रोवली गेली होती. पुणे शहरातील ऑनलाइन पुस्तक विक्रीमध्ये अग्रगण्य ठरलेली ‘बुकविश्व’ ही संस्था माझे दीर अमोल कुटे आणि दिव्या कुटे यांनी स्थापन केली होती. त्यांच्या या व्यासपीठावर वाचकांचा आणि अभ्यासकांचा मोठा राबता असे. त्यांच्याकडे बर्याचदा अशा विविध जुन्या आणि दुर्मीळ पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असे. वाचक विचारणा करत, पण जुन्या काळामध्ये लिहिली गेलेली महत्त्वाची ऐतिहासिक पुस्तके आज बाजारात उपलब्धच होत नव्हती. ‘आऊट ऑफ प्रिंट’ या एका वाक्यामुळे अनेक वाचकांची निराशा होत होती. वाचकांची ही भूक आणि बाजारातील ही पोकळी ओळखून अमोल यांच्या संकल्पनेमधून आमची ही नवीन प्रकाशन संस्था उदयास आली.
कोणत्याही संस्थेचे नाव हे तिच्या उद्देशाचा आरसा असते. ज्या प्राचीन भाषेतून आपल्या समृद्ध मराठी भाषेचा उगम झाला, ती भाषा म्हणजे ‘प्राकृत’ भाषा. आमच्या या नव्या प्रकाशन संस्थेचा मूळ उद्देशच जुन्या काळातील, मुळाकडची पुस्तके आणि विचार पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर आणणे हा असल्याने, ‘प्राकृत’ हे नाव आम्हाला या कार्यासाठी अतिशय सुयोग्य आणि अर्थपूर्ण वाटले. आणि त्यातूनच खर्या अर्थाने ‘प्राकृत प्रकाशन’ उदयास आले.
मी आणि माझे पती तुषार कुटे, आम्ही दोघेही मुळातले इंजिनीयर. दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या आयटी हबमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स यांसारख्या तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देण्याचे कार्य आम्ही आमच्या ‘मीतू स्किलॉलॉजीज’ ( MITU Skillologies) या कंपनीद्वारे करत आहोत. आमचा व्यावसायिक व्याप मोठा असला, तरी आमचा आपल्या इतिहासाकडे पाहण्याचा जो तटस्थ आणि संशोधक दृष्टिकोन होता, त्यानेच प्राकृत प्रकाशन संस्थेला जन्म दिला. मला स्वत:ला पुस्तके वाचण्याची भयंकर आवड. पुस्तकांच्या दुनियेत रमणे हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काहीतरी भरीव आणि कायमस्वरूपी टिकणारे काम करण्याची ही सुवर्णसंधी मी दवडली नाही. ‘बुकविश्व’च्या भक्कम सहकार्याने आणि पाठिंब्याने मी आणि माझे पती या दोघांनी मिळून या नव्या प्रकाशन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
पुस्तक वाचनाचा भला मोठा अनुभव गाठीशी असला, तरी प्रत्यक्ष पुस्तक निर्मिती किंवा प्रकाशन नक्की कशा पद्धतीने केले जाते, याची आम्हाला त्या वेळी किंचितही माहिती नव्हती. ‘लेखक पुस्तक लिहितो आणि प्रकाशक ते छापतो,’ या ढोबळ कल्पनेपलीकडे प्रकाशनाच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये आणखी काही बारकावे असतील, याचा आम्ही त्यावेळी फारसा विचार केला नव्हता. सुरुवात कुठून करावी? असा प्रश्न समोर होता. सर्वप्रथम आपण जुन्या काळातली कोणकोणती पुस्तके पुन्हा प्रकाशित करू शकतो, याची एक सविस्तर यादी आम्ही बनवायला घेतली. यासाठी इतिहासाकडे पूर्वग्रहदूषित न पाहता, अत्यंत तटस्थपणे आणि पुराव्यांच्या आधारे बघणार्या इतिहासकारांची नावे शोधून काढली. या शोधामध्ये प्रामुख्याने ‘इतिहासाचे भीष्माचार्य’ म्हणून ओळखले जाणारे वा. सी. बेंद्रे आणि प्रसिद्ध इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांची नावे आमच्यासमोर प्रकर्षाने आली. वा. सी. बेंद्रे यांची बरीचशी पुस्तके इतिहासकार आणि इतिहास अभ्यासक आजही ‘अंतिम प्रमाण’ किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात. परंतु त्यातील काही अत्यंत महत्त्वाची पुस्तके अजूनही पुन्हा प्रकाशित झालेली नव्हती.
एखादे जुने पुस्तक आपल्याला छापायचे असल्यास सर्वप्रथम त्याचे कायदेशीर कॉपीराईट (प्रताधिकार) घ्यावे लागतील, याची माहिती आम्ही काढली. सध्या हे थोर लेखक हयात नसल्याने त्यांच्या वारसदारांशी संपर्क साधून त्यांच्यातर्फे कॉपीराईट घेण्याची कायदेशीर प्रक्रिया आम्ही जाणून घेतली. बेंद्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्यावर लिहिलेली लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण पुस्तके काही वर्षांपूर्वीच अन्य प्रकाशनाद्वारे पुन्हा प्रकाशित झाली होती. त्यामुळे ती पुस्तके वगळता, बेंद्रे यांच्या इतर अप्रकाशित पुस्तकांचा आम्ही शोध घेतला. त्या सखोल शोधातूनच ‘साधन चिकित्सा’, ‘जिंजीचा प्रवास’, ‘गोवळकोंड्याची कुतुबशाही’ आणि ‘विजापूरची आदिलशाही’अशी चार अत्यंत दुर्लक्षित, पण मोलाची पुस्तके गेल्या अनेक दशकांत परत कधीही प्रकाशित झाली नसल्याचे लक्षात आले.
या पुस्तकांच्या पुनर्प्रकाशनाचा निर्णय तर झाला, पण त्यांची मूळ प्रत मिळवणे हे एक मोठे आव्हानच होते. कारण मूळ प्रत असल्याशिवाय टायपिंग सुरू करणे अशक्य होते. अर्थातच पुण्यातील विविध प्राचीन ग्रंथ संग्रहांमध्ये याचा शोध घेणे आवश्यक होते. त्या दृष्टीने येरवडा भागातील प्रसिद्ध ‘डेक्कन कॉलेज’च्या अवाढव्य आणि ऐतिहासिक ग्रंथालयामध्ये आम्ही जाऊन आलो. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे, ही चारही दर्मीळ पुस्तके या ग्रंथालयामध्ये आम्हाला प्राप्त झाली. पाच ते सात दशकांपूर्वी पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या या पुस्तकांच्या प्रती कालौघात जीर्ण झाल्या असल्या, तरी त्या सुदैवाने व्यवस्थित आणि वाचनीय स्थितीत होत्या.
पुस्तकाच्या हस्तलिखितापासून ते त्याच्या अंतिम प्रकाशनापर्यंत बर्याच टप्प्यांमधून जावे लागते, याची पहिल्यांदा आम्हाला जाणीव झाली. मुद्रण, कागदाची निवड, बांधणी या तांत्रिक गोष्टी समजून घेण्यासाठी एखाद्या अनुभवी पुस्तक प्रकाशकाचीच मदत लागणार होती. यासाठी सिन्नरच्या ‘शिवसमर्थ सेवा प्रकाशना’चे अंकुर काळे यांच्याद्वारे पुस्तक प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया आम्हाला सविस्तर जाणून घेता आली.
आमच्या पुस्तकाचे हस्तलिखित नसल्याने आणि मूळ छापील प्रतच उपलब्ध असल्याने ‘टायपिंग’चा पहिला टप्पा लगेचच सुरू झाला. दुसरीकडे, या पुस्तकांच्या वारसदारांशी सातत्याने संपर्क ठेवून ती पुस्तके पुन्हा नव्याने प्रकाशित करण्याची अधिकृत परवानगीही आम्हाला मिळाली. खरं तर तोच ‘प्राकृत प्रकाशना’चा खरा ‘श्रीगणेशा’ होता.
संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून जुने पुस्तक नव्याने टाईप करून घेतले. यानंतर पुस्तकातील भाषेचे पावित्र्य राखण्यासाठी ‘मुद्रितशोधन’ (Proofreading) आणि आकर्षक मांडणीसाठी ‘टाईपसेटिंग’ (Typesetting) या दोन्हींची सखोल माहिती करून घेतली. त्याकरिता बाहेरील कुशल मनुष्यबळाचादेखील आम्ही शोध घेतला. या संपूर्ण प्रक्रियेत आम्हाला नवनवे आणि काहीसे कटू अनुभवही येत गेले.
‘साधन चिकित्सा’ हे आमचे पहिले पुस्तक ठरले. इतिहासाची साधने कशी तपासावीत, हे सांगणारे हे पुस्तक इतिहासकारांसाठी आणि संशोधकांसाठी खर्या अर्थाने इतिहासाची ‘गीता’च जणू! या पुस्तकाला साजेसे, छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असणारे एक अत्यंत आकर्षक आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ आम्ही तयार करून घेतले. आणि अखेरीस हार्डबाऊंड स्वरूपातील आमचे पहिले देखणे पुस्तक आमच्या हाती आले. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच वा. सी. बेंद्रे यांची ‘जिंजीचा प्रवास’ आणि ‘गोवळकोंड्याची कुतुबशाही’ ही दोन्ही पुस्तकेही छापून तयार होऊन आली. पुणे शहरातल्या एका मध्यवर्ती सभागृहामध्ये शेकडो इतिहासप्रेमींच्या उपस्थितीमध्ये आणि विविध मान्यवरांच्या हस्ते आमच्या या पहिल्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा झाला.
पुस्तक विक्री करता ‘बुकविश्व’च्या माध्यमातून एक विश्वासार्ह ब्रँड आमच्या पाठीशी उभा होताच. याशिवाय आम्ही पुणे शहरातल्या अन्य नामांकित पुस्तक विक्रेत्यांपर्यंतदेखील स्वत: जाऊन पोहोचलो. कदाचित त्याचमुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून आमची पुस्तके वेगाने वाचकांपर्यंत पोहोचू लागली. एक प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाला होता, तोच पुढील टप्पा म्हणून थोर इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांच्या पुस्तकांवरही आम्ही काम सुरू केले. पगडी यांची इतिहासावर आधारित तब्बल आठ पुस्तके आम्ही नव्याने प्रकाशित केली. या पुस्तकांचे महत्त्व ओळखून हा प्रकाशन सोहळा आम्ही थेट तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजित केला- ज्याला उदंड प्रतिसाद मिळाला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील आद्य चरित्रकार मानले जाणारे कृष्णराव केळुसकर यांचे ‘शिवचरित्र’ देखील आम्ही प्राकृत प्रकाशनाच्या माध्यमातून अत्यंत देखण्या स्वरूपात प्रकाशित केले.
फक्त इतिहासावरच न थांबता, आम्ही तंत्रज्ञानाकडेही वळलो. इतिहासावरील पुस्तके पुन्हा प्रकाशित करत असतानाच, मराठी भाषेतून आधुनिक तंत्रज्ञान शिकवणारी दर्जेदार पुस्तके प्रकाशित करावीत, जेणेकरून ‘मराठी’ ही केवळ संवादाची किंवा साहित्याची भाषा न राहता ती ‘ज्ञानभाषा’ म्हणून आजच्या या प्रगत तंत्रयुगामध्ये टिकून राहील, हा आमचा मुख्य उद्देश होता. याच उद्देशाने तंत्रज्ञानावरील पुस्तकांचादेखील मागोवा घ्यायला आम्ही सुरुवात केली.
इतिहासकार आणि तंत्रज्ञानासोबतच गेल्या शतकात आपल्या लेखणीने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारे लोकप्रिय रहस्य कथाकार गुरुनाथ नाईक यांच्या सर्व पुस्तकांचे अधिकृत कॉपीराईटही आम्ही मिळवले. त्यातील सहा थरारक पुस्तके प्रकाशित झाली असून, अजून चार पुस्तके पुन्हा नव्याने प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. अनेकदा आम्ही जेव्हा ज्येष्ठ इतिहासकारांना किंवा अभ्यासकांना भेटतो; तेव्हा त्यांच्याकडूनच विविध दुर्मीळ पुस्तकांची विचारणा होते. ‘तुम्ही हे अमुक पुस्तक का प्रकाशित करत नाही?’ असा आग्रहाचा प्रश्न आम्हाला विचारला जातो. जुनी आणि दुर्लक्षित पुस्तके नव्याने प्रकाशित करण्याचे आमचे हे उद्दिष्ट आता बर्यापैकी विविध अभ्यासकांपर्यंत पोहोचले आहे. ‘जुनी पुस्तके जुनीच राहू नयेत, ती नव्या पिढीला नव्या रूपात मिळावीत’ या दृष्टिकोनातून चाललेल्या आमच्या या प्रामाणिक कार्याला समाजातील विविध स्तरांतील लोकांकडून जे प्रोत्साहन मिळते, त्याचे आम्हाला मोठे समाधान वाटते.
prakrutprakashan@gmail.com
