– अलका गरुड
‘प्रश्नोपनिषद’ आणि ‘उत्तरायण’ ही ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांची अलीकडेच प्रकाशित झालेली पुस्तके. सामाजिक भान असलेले वैचारिक लिखाण करणारे लेखक अशी त्यांची ओळख मराठी वाचकांना आहे. समाजात प्रश्न विचारले गेले पाहिजेत, निरोगी व तर्कशुद्ध ता्त्विवक वादातून सत्य पारखले गेले पाहिजे, ही त्यांची धारणा या पुस्तकांमधूनही उघड होते.
धर्म की नीती, श्रद्धा की चिकित्सा, विकास की विनाश यांसारख्या द्वंद्वांसंदर्भात त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ते करतात. ईश्वरप्रामाण्याला काही अर्थ आहे का? ईश्वराचे अस्तित्व धर्मग्रंथातून सापडते, तत्पूर्वी तो कोठे होता? ज्ञानविज्ञानाच्या व तर्काच्या कसोटीवर न उतरणारी, विवेकाला मान्य न होणारी, इंद्रियगोचर नसणारी ईश्वर-कल्पना कशी वा का मानावी? याची सांगोपांग चिकित्सा श्रद्धा व तर्काच्या आधारे करतात.
ईश्वरप्रामाण्यावर समाजशास्त्र व तत्त्वज्ञानाच्या अंगाने चिंतन करून झाल्यावर श्रद्धा व ज्ञान यांनी फारकत का घेतली असावी याविषयी तर्काची जोड देऊन विचार मांडतात. पुढे ते राजसत्ता, अर्थसत्ता व धर्मसत्ता यांच्या लोकविरोधी युतीविषयी चर्चा करतात. भांडवलशाही शोषण करूनही का टिकते व बहरते हा प्रश्न उपस्थित करतात. वर्तमानाचे प्रश्न सोडविण्याचे बळ सत्ताधार्यांकडे नसते तेव्हा ते लोकांच्या श्रद्धा जागवून राजकीय स्वार्थासाठी कसा उपयोग करतात, हे सर्व देशाधर्मात कसे दिसते ते सोदाहरण स्पष्ट करतात. ग्रंथांतील शब्द – मग ते वेदोपनिषदातील असोत, बायबल वा कुराणशरीफा यावर विश्वास ठेवून ती कल्पना ग्राह्य व विश्वासार्ह ठरवणे ही भक्ती, श्रद्धा की अंधश्रद्धा? ही चिकित्सा करणार्या चार्वाकांना जाळले, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, प्लेटो यांना मारले, गॅलिलिओला तुरुंगात डांबले. अगदी आजचे वर्तमान पाहिले तर महाराष्ट्रात, कर्नाटकात विचारवंतांच्या हत्या झाल्या. ज्ञानविज्ञानाच्या काळात या अज्ञानाच्या झापडीची संगती कशी लावायची? असे मूलभूत, तार्किक प्रश्न ते उपस्थित करतात.
असे असले तरी प्रा. द्वादशीवार झापडबंद किंवा पूर्वग्रहदूषित चिकित्सा करत नाहीत. धर्म ही संस्था निरुपयोगी नसते, समाजाला काहीशी शिस्त व स्वास्थ्य लाभते. मीमांसेच्या पूर्वपक्ष – उत्तरपक्ष शैलीत धर्मांचा चांगुलपणा सांगतात व दुष्टावाही स्पष्ट करतात. भारतीय तत्त्वज्ञान श्रद्धेच्या व ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जाणारे, तर पाश्चात्त्य तत्त्वज्ञान वैज्ञानिक विश्वाचे भान असलेले आहे हा फरकही ते सोदाहरण सांगतात. धर्म अनादि नाही, अनंतही नाही. कारण त्यांच्या धर्मतारखा सांगता येतात. उलट ज्ञानविज्ञान, विचार व तर्काला शेवट नाही. ते अनंत आहे. असे सोप्या, संयत भाषेत पण ठामपणे सांगतात तेव्हा त्याचा प्रतिवाद करणे कठीण होते.
विज्ञानाच्या विकासाच्या, प्रश्न विचारण्याच्या व श्रद्धांचे पुरावे मागण्याच्या काळात धर्माची पीछेहाट होते आहे का असे विचारतात. उलटपक्षी सद्यकालीन घडामोडींचे विस्तार करत धर्मांचे मक्तेदार शक्तिशाली प्रतिक्रियांद्वारे कसा फास आवळत आहेत हेही सांगतात. (पूर्वपक्ष – उत्तरपक्ष.) विवेक आणि झुंडीचे मन यामधील अंतरावर टिप्पणी करतात.
प्रश्नोपनिषदाची सांगता करताना ते म्हणतात, हे न संपणारे उपनिषद आहे. जगाचा इतिहास ही एक शोषणाची कहाणी आहे. ते स्पष्ट करताना अमेरिकी गुलामगिरी, अब्राहम लिंकनचे कार्य त्याविरुद्ध कॉन्फेडरेशनचा विरोध व युद्धाचा इतिहास वाचकांपर्यंत तपशीलवार पोहोचवतात. शोषितांचे नाइलाजाने गुलामी स्वीकारणे, युरोप – मध्य आशियात व भारतातही थेट विसाव्या शतकापर्यंत दिसते ते विविधांगाने स्पष्ट करतात. समाजातील शोषणाचे हे विदारक चित्र मार्क्सच्या शिकवणुकीने जगासमोर आले. ते देवांनी दाखवले नाही व धर्मांनी तर त्यावर पांघरूणच घातले. असे सांगून मार्क्सपूर्व काळातील परिस्थिती, मार्क्सप्रणीत क्रांती, तसेच फ्रान्सच्या क्रांतीच्या कारणांपासून, गांधींचे तत्त्वज्ञान ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमीवर साद्यंत वर्णन करतात. क्लिष्ट विषय सोपा करून त्याचे पैलू समोर ठेवून वाचकाला ज्ञान, श्रद्धा, विवेकाच्या आधारे विचार करण्यास उद्युक्त करतात.
‘उत्तरायण’ हा ‘प्रश्नोपनिषदा’च्या पाठोपाठचा लेखसंग्रह. तो अर्पण केला आहे ‘‘अज्ञाताच्या अंधाराला’’.
पहिल्या संग्रहात उभ्या केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न असावा का? ‘‘ज्ञान म्हणजे काय’’ याचा गुंता ‘‘ज्ञान म्हणजे काय नाही’’ हे टोक धरून सोडवण्याचा प्रयत्न ते करतात. ज्ञानाची सीमा, अन्यायाचे संघटन आणि मूल्यांची स्वप्ने याविषयांचे विवेचन करताना पहिल्या संग्रहातील विचारांना मुळाशी ठेवून विविध कोनांतून तेच विषय मांडले आहेत.
ज्ञान नक्की कसे आहे? ते अनंत आहे. परंतु ज्ञानवंतांना ते पूर्णत: आकळले नाही. ज्ञान मारले जाते, विचार हरवतो त्याची कारणे शोधताना प्रा. द्वादशीवार झुंडीपुढे व्यक्तीचा विवेक दुबळा पडतो हे पुन: या दुसर्या पुस्तकातही प्रतिपादन करतात. प्लेटो, ॲरिस्टॉटल ते गांधींपर्यंत जाऊन पहिल्या लेखसंग्रहातले तेच तपशील व तर्क समोर मांडतात. पुन: एकदा श्रद्धा व विज्ञानवादाचे द्वंद्व कान्टच्या तत्वज्ञानाचा आधार घेऊन सांगतात. सामाजिक संस्कार किंवा कथित धार्मिक श्रद्धा झुंडीचीच मानसिकता – मानसिक अंधश्रद्धा -असते.
धर्माचे विचार ज्ञानविरोधी, स्वातंत्र्यविरोधी व तर्कविरोधी का असतात? त्यांना चिकित्सा का मानवत नाही? स्थितीवाद कोठे व कसा संपतो आणि गतीवाद म्हणजे काय? या प्रश्नांचा पाठपुरावा ते वेगवेगळ्या संदर्भातून करतात. जागतिक इतिहासकालीन सामाजिक घटनांचा अन्वय लावतात. प्रा. द्वादशीवार यांचा तत्त्वज्ञान, इतिहास, आणि राजकारणाचा सखोल अभ्यास वाचकाला चिंतनासाठी बैठक करून देतो. इतिहासाचा आरंभ केव्हा झाला, देवधर्म कधी जन्माला आले या प्रश्नांना उत्तरे नाहीत, असे ते मानतात. पण शोषित, गुलाम, वंचित लोक त्यांचे आयुष्य बरे करण्यासाठी काहीच का करत नाहीत? हा प्रश्न त्यांना सतावतो. अन्यायाविरोधात संघटन होत नाही ही तळमळ व्यक्त करतात. कमीअधिक फरकाने आधीच्या लेखातलेच बरेचसे संदर्भ व तत्त्वज्ञान वाचकाला सांगत राहतात.
दोनही ग्रंथांमध्ये देव-धर्म, न्याय-अन्याय, स्वातंत्र्य-समता व सामान्यांचे शोषण या विषयांची घुसळण आहे. प्रश्न उभे करून पूर्वपक्ष उत्तरपक्ष मांडणी ते करतात. त्यातून पुन: नवे प्रश्न समोर येतात. गांधीवादी विचार, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्ये, इ. त्यांना भिडणार्या विषयांवर ते आग्रहाने व्यक्त होतात. त्यामुळे द्विरुक्ती, पुनरुक्ती होताना दिसते. दोन्ही पुस्तके वाचताना वाटते, त्यांचे प्रश्न वा निष्कर्ष वाचकाला पटोत वा न रुचोत, ता्त्विवक चर्चेसाठी एक नेटके प्रारूप उपलब्ध करून दिले आहे. प्रश्न विचारले जायला हवेत, ‘‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’’ हे स्वीकारणारा निरोगी समाज निर्माण होण्याचे स्वप्न ते पाहात असावेत का?
‘प्रश्नोपनिषद’ , ‘उत्तरायण’,
सुरेश द्वादशीवार, अनुक्रमे पाने- १८४, १६६
किंमत-२५० रुपये. दोन्ही
ualakagarud@gmail.com
