पराग कुलकर्णी

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. सर्वोत्कृष्ट अशा तीन खेळाडूंना शेवटी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकं मिळतात. आपली अनेक वर्षांची मेहनत फळाला आली, याचा आनंद यातील प्रत्येकालाच होतो. पण हा आनंद त्यांना मिळणाऱ्या पदकाच्या प्रमाणात असतो का? म्हणजे जर का, आनंद मोजायचाच झाला तर सुवर्ण पदक जिंकलेल्याला सगळ्यात जास्त आनंद, रौप्य पदक  मिळालेल्याला त्यापेक्षा थोडा कमी आणि कांस्य पदक  जिंकलेल्या खेळाडूला अजून कमी आनंद होतो असे म्हणता येईल काय? कदाचित आपला विश्वास नाही बसणार, पण यावरही एक संशोधन झालं आहे. त्यानुसार, सुवर्ण पदक आणि सर्वात जास्त आनंद हे जरी जुळत असलं तरी त्यानंतर दुसरा नंबर मात्र रौप्य पदकाचा न लागता कांस्य पदकाचा लागतो! म्हणजेच कांस्य पदक विजेता रौप्य पदक विजेत्यापेक्षा जास्त आनंदित होतो! हे कसं शक्य आहे? अर्थातच याचं उत्तर आपण आजच्या संकल्पनेतून शोधणार आहोत- ‘प्रॉस्पेक्ट थिअरी’ (Prospect Theory).

Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्या संगमातून विकसित झालेल्या एका नव्या विषयातील (Behavioral  Economics) ही संकल्पना. डॅनियल काहनमन आणि अमोस तेव्हस्र्की यांच्या मत्रीतून आणि अनेक वर्षांंच्या संशोधनातून या विषयाचा पाया रचला गेला. अनेक पर्याय (प्रॉस्पेक्ट्स) असताना आपण त्यातून एक पर्याय कसा निवडतो आणि ही निवड करताना त्यावर आपल्या विचारांचा, भावनांचा कसा प्रभाव असतो (बायसेस) हे प्रॉस्पेक्ट थिअरी आपल्याला दाखवते. २००२ सालचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार डॅनियल यांना त्यांच्या याच योगदानासाठी मिळाला आहे. काय आहे ही प्रॉस्पेक्ट  थिअरी- चला बघू या.

समजा, तुम्हाला एक मित्र म्हणाला की उद्या सकाळी मी तुला ९००/-  खात्रीने मिळवून देऊ शकतो (पर्याय १), पण जर तू संध्याकाळपर्यंत थांबू शकलास तर ९०% शक्यता आहे की तुला १०००/- मिळतील आणि अर्थात त्यात १०% शक्यता आहे की काही मिळणारही नाही (पर्याय २). तुम्ही यातला कोणता पर्याय निवडाल? हातचे सोडून पळत्याच्या मागे का धावायचे? असा विचार करून आपण सर्वच पहिला पर्याय निवडू. जोखीम टाळून (Risk Aversion) खात्रीने मिळणारा आणि थोडा कमी असला तरी चालणार फायदा मिळवण्याकडे आपला कल असतो हे प्रॉस्पेक्ट थिअरी सांगते. सामान्य परिस्थितीमध्ये कोणत्याही नव्या बदलाला विरोध करून परिस्थिती जैसे थे (Status quo) ठेवण्यामागेही हाच विचार असतो. जे चालले आहे त्याचे फायदे आपल्याला आधीच माहिती असतात, मग गोष्टी बदलून कशाला उगीच जोखीम घ्या, हा विचार त्या मागे असतो. पण मग आपण नेहमीच जोखीम घेणं टाळतो का?

आता समजा काही दिवसांनी तो मित्र पुन्हा भेटला आणि म्हणाला की, अरे आपल्या व्यवहारात तोटा होतो आहे. उद्या सकाळी ९०० रुपयांचं नुकसान सहन करून आपण त्यातून बाहेर पडू शकतो (पर्याय १). पण जर आपण संध्याकाळपर्यंत थांबलो तर ९०% शक्यता आहे की १००० रुपयांचं नुकसान होईल, पण १०% शक्यता आहे की काहीच नुकसान होणारही नाही (पर्याय २). काय करायचं? या वेळेस बहुतांश लोक दुसरा पर्याय निवडतील, का? कारण कमीत कमी तोटा व्हावा असे आपल्याला वाटत असते (Loss Aversion) आणि त्यामुळे जेव्हा सगळे वाईट, नुकसानकारकच पर्याय समोर असतात तेव्हा अशी जोखीम घेण्यास, असा जुगार खेळण्यास आपण तयार होतो. म्हणजेच इतर वेळी जोखीम टाळणारे आपण वाईट परिस्थितीत मात्र जोखीम घेणारे होतो. पशांची गरज असणारे लोक लॉटरी, जुगार जास्त खेळतात, नेहमीच्या उपचारांना गुण येत नसताना लोक नवीन उपचारपद्धतीचा, अंधश्रद्धांचा ‘प्रयोग’ स्वत:वर करण्यास तयार होतात.. ही याचीच काही उदाहरणे. आपण असेही म्हणू शकतो, का या दोन्ही उदाहरणात जी १०% शक्यता होती- पैसे न मिळण्याची किंवा मिळण्याची- त्याचे मूल्यमापन आपण दोन्हीही परिस्थितीत वेगळ्या प्रकारे केले. नुकसान टाळणे (Loss Aversion) आणि त्यासाठी जोखीम टाळणे (Risk Aversion) हे आपल्या बहुतांश निर्णयाला प्रभावित करणारे बायसेस आहेत हेच प्रॉस्पेक्ट थिअरी आपल्याला सांगते.

नुकसान किंवा तोटय़ाबद्दल प्रॉस्पेक्ट थिअरी अजून एक खूपच महत्त्वाची माहिती सांगते. आपल्या नुकसानीचे भावनिक मूल्य हे तितक्याच फायद्यापेक्षा काही पटीने जास्त असते. म्हणजे समजा आपल्याला ५००० रुपयांचा फायदा झाल्याने जेवढा आनंद होतो त्यापेक्षा काही पटीने (खरं तर एका आकडेवारीनुसार दीड ते अडीच पट) जास्त वाईट वाटतं- जेव्हा आपलं ५०००रुपयांचं नुकसान होतं. थोडक्यात, नुकसान, तोटा आपल्यावर जास्त परिणाम करतो नफ्यापेक्षा. पण फायदा करणाऱ्या संधींपेक्षा होऊ घातलेल्या नुकसानीच्या संकटाला जास्त महत्त्व देणे ही भावना आपल्या उत्क्रांतीतून आलेली आहे. माणूस म्हणून आज आपलं अस्तित्व टिकवण्यामागे संकटं ओळखून, ती टाळण्याच्या आपल्या वृत्तीचा मोठा हात आहे. आजही आपला विमा घेण्याचा निर्णय हा आपल्या भीतीवर जास्त अवलंबून असतो, सांखिकीदृष्टय़ा ती घटना घडण्याच्या शक्यतेवर नाही.

आपला फायदा-नुकसान आपण आपल्या अपेक्षांच्या संदर्भात (Reference  Point) मोजत असतो. १०% पगारवाढीचा आनंद तोपर्यंतच टिकतो, जोपर्यंत तुमच्या सहकाऱ्याला २०% पगारवाढ झाल्याचं तुम्हाला कळत नाही. त्यानंतर तुम्हाला १०% नुकसान झाल्याचं दु:ख होतं- याचं कारण बदललेल्या अपेक्षा आणि त्याचा संदर्भ. पगारवाढ, लॉटरी, नव्यानं आलेली श्रीमंती याचा आनंदही फार काळ टिकत नाही याचं कारण हा आनंद बदलाच्या ‘प्रमाणावर’ असतो आणि केवळ बदललेल्या ‘परिस्थितीवर’ अवलंबून नसतो. काही काळाने आपल्याला या नव्या संदर्भ बिंदूची (Reference  Point) सवय होते आणि त्याचा परिणाम क्षीण होतो. यालाच हॅबिच्युएशन (Habituation) किंवा अर्थशास्त्रात ‘लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटीलिटी’ (Law of diminishing Marginal Utility) असंही म्हणतात.

सुरुवातीला बघितलेल्या पदक विजेत्या खेळाडूंच्या बाबतीत काय होत असेल याचा आपण आता अंदाज लावू शकतो. रौप्य पदक जिंकणारा ‘सुवर्ण पदक हरलो’ या दु:खात असतो आणि त्याचा परिणाम त्याच्या आनंदावर होतो. त्या उलट कांस्य पदक जिंकलेला हा काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी हाती लागलं याच्याच आनंदात असतो. थोडक्यात, नफा-तोटा, जय-पराजय या अवस्थांच्या मागे आपला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. आपला हा दृष्टिकोन, त्यातून आलेल्या भावना आपल्या निर्णयांना कसं प्रभावित करतात, तर्कसंगत (Rational’) विचारसरणीपासून कसं दूर ढकलतात हे ‘प्रॉस्पेक्ट थिअरी’ आपल्याला शिकवू पाहते. त्यामुळेच हा निर्णयांचा, पर्यायांचा आणि त्याच्या शक्यतांचा जुगार खेळण्यासाठी त्यातील खाचखळगे माहीत करून देणारी ‘प्रॉस्पेक्ट थिअरी’ माहिती असणं उपयुक्त ठरतं, नाही का?

parag2211@gmail.com