कलकलाट, किचकिचाट, कुकुचकाट!
सभास्थानी जो ध्वनीकल्लोळ आहे त्याचे वर्णन करण्यास अन्य शब्द नाहीत.
ही गर्दी उसळली आहे. देशभरातून कुठून कुठून कार्यकर्ते आलेले आहेत. आंध्रातील कारी निर्भिक, मध्य lok01प्रदेशापासून राजस्थानपर्यंतच्या भागातून आलेले कारी श्यामा ऊर्फ कालामासी, उघडय़ा गळ्याचे हितकारी, उपकारी, झालेच तर मूळ निवासी अर्थात गावठी अशा विविध जातींचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने आल्याचे दिसत आहेत. परदेशातून ब्रॉयलर, लेयर अशा जातींचे प्रतिनिधीही आले आहेत.  
समोर कॉकपीटावर (पक्षी : व्यासपीठ) नेतमंडळींचे आगमन होऊ  लागले आहे.
त्यांच्या दर्शनाने उत्साहित होऊन एक तुर्रेबाज कार्यकर्ता तुतारीसारखी मान उंचावून आपला कंठ साफ करतो आहे. ‘कॉक्रेसचा विजय असो,’ अशी गर्जना करतो आहे. शतशत कंठ कुकुचकू निनाद करीत त्याला साथ देत आहेत. वातावरणात अवघे चैतन्य दाटले आहे.
‘समस्त कॉक-रेसवासी बंधूंनो आणि भगिनींनो,’
कॉकपीटावरून अ. भा. कॉक्रेसचे अध्यक्ष मा. श्री. अरुणचुड कुर्कुटे यांनी भाषणास प्रारंभ केला आणि सभेत अंडे फुटले तरी ऐकू येईल अशी शांतता निर्माण झाली.
‘आज या ठिकाणी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीच्या संबंधाने निकाल घेण्याच्या संदर्भात आपण जमलो आहोत. ही निवडणुकीची प्रचारसभा नाही. ही संसदेतली प्रचारसभासुद्धा नाही. (माफक हशा) तेव्हा मी येथे अन्य कोणत्याही पक्ष्याला टोचून, नख्या मारून, ओरबाडून रक्तबंबाळ करणार नाही. (टाळ्या) आम्हाला ते जमत नाही असे नाही. येथे आंध्र प्रदेशातून माझे काही निर्भिक बांधव आले आहेत. ज्यांची उभी हयात झुंजी खेळण्यातच जाते असे हे क्षत्रिय सुपर्ण. असील संकरीत म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांचा वारसा सांगणारे आपण झुंजीला घाबरत नाहीत. (टाळ्यांचा कडकडाट) पण आम्ही ते करणार नाही. कारण रक्त-मांसाचे शिंपण करून या देशातील शंभर कोटी जनतेची सेवा करण्याचे व्रत आम्ही स्वीकारले आहे. (टाळ्या)
पण आमच्या या परोपकारी वृत्तीला ते भेकडपणा समजू लागले आहेत. (शेम शेमचा कुकुचकाट) आम्ही ते कदापि सहन करणार नाही.’ (टाळ्याच टाळ्या)
अरुणचुडभाईंनी क्षणभर थांबून समोरचे चार दाणे टिपले. मस्तकावरचा तुरा उंचावला. मान फुलवली आणि ते पुढे बोलू लागले. आता त्यांचा स्वर कातर झाला होता..
‘किती किती अन्याय सहन करायचा आम्ही? आजवर तुमच्यासाठी आमच्या कोटी कोटी बांधवांनी आपल्या माना कापून घेतल्या. आमचे ब्रॉयलर बंधू त्याला साक्षी आहेत. आमच्या असंख्य मातांची मुले या जगात येण्याआधीच तुम्ही संडे असू दे नाही तर मंडे, त्यांची भ्रूणहत्या केली. त्यांना आपल्या पंखांची, मायेची ऊब द्यावी असे आमच्या लेयर भगिनींना वाटत नसेल का? त्यांना जीव नाही का? त्यांच्यात परमेश्वर नाही का? पण तुमच्या पापी पोटासाठी तुम्ही त्यांचे भक्षण केलेत. समस्त कॉक-रेसचे शोषण केलेत. आमची मागणी काय होती? आरक्षण नको होते आम्हाला. फक्त रक्षण हवे होते. पण जेव्हा तसा कायदा करण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही काय केले? आम्हाला त्यातून वगळले! (शेमशेम)
गाय तुम्हांला दूध देते आणि आम्ही अंडी देत नाही? गायीच्या शेणाचे खत बनते आणि आमच्या शिटाचे बनत नाही? आमच्यात असे काय कमी आहे की येथे केवळ गोवंश हत्याबंदी कायदा होतो आणि आम्हांला उकीरडय़ावर सोडले जाते?
तेव्हा बंधूंनो आणि भगिनींनो, समस्त कॉक-रेसच्या, कुक्कुट वंशाच्या वतीने आम्ही आज येथे या सरकारला इशारा देत आहोत, की तुमने अंडा देखा है, लेकीन डंडा नही देखा. मनात आणलं तर स्वत:ला डाल्याखाली असे काही झाकून घेऊ  की या पृथ्वीवर सूर्य उगवणार नाही! (टाळ्यांचा कडकडाट) या कुर्कुट जातीला देववाणीमध्ये कालज्ञ असेही म्हणतात, हे लक्षात ठेवा!
तेव्हा या सरकारकडे आम्ही मागणी करतो की, राज्यात कुक्कुटवंशहत्या विधेयक पारित झालेच पाहिजे! याशिवाय राज्यातील समस्त कोंबडय़ांना कायद्याने मातांचा दर्जा दिला पाहिजे. त्यासाठी आपणच यापुढे समस्त भगिनींचा उल्लेख कोंबडीमाता असा करायला सुरुवात केली पाहिजे. आम्हांला धार्मिक भावनांचे राजकारण करायचे नाही. पण त्यांना केवळ कोंबडीमाताच म्हटले पाहिजे असे नाही, तर त्यांच्या देहामध्ये छत्तीस कोटी देव वसतात असा जीआरही काढला पाहिजे. (टाळ्या) आर्थर रोड जेलमध्ये अंडासेल आहे. तो कोणी फोडला तर चालेल का? मग आमची अंडी का फोडता? (हशा) ही हसायची गोष्ट नाही. राज्यात अंडे फोडणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा मानला गेला पाहिजे.
आमच्या यंगब्रिगेडला आम्ही येथे आदेश देत आहोत, की नुसतेच तुरे उडवीत फिरू नका. यापुढे कोणत्याही टीव्हीवर ‘संडे हो या मंडे’ ही अश्लील आणि हिंसक जाहिरात लागली तर सरळ आपल्या चोचींनी त्या टीव्हींचे खळ्ळखटॅक करा.
सरकारला यासाठी आम्ही सूर्योदयापर्यंतची मुदत देत आहोत. त्या अवधीत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्यापासून आम्ही सूर्य उगवू देणार नाही, की राज्यात वारा वाहू देणार नाही. वातकुक्कुटांनी काम बंद केले तर वाराच काय, साधी झुळूकही येणार नाही हे लक्षात ठेवा.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
कॉक-रेसचा विजय असो!
कोंबडीमातेचा विजय असो!’    lr10