‘पुणे दिल्ली पुणे’ हे डॉ. प्राची जावडेकर यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर व प्राची जावडेकर या दोघांच्या सहजीवनाचा प्रवास आहे. या पुस्तकात लेखिकेने ओघवत्या शैलीत आपलं बालपण, शिक्षण आणि सहजीवनाचा प्रवास, आपला सभोवताल मांडला आहे. पुणे ते दिल्ली आणि पुन्हा पुणे असा त्यांचा जीवनप्रवास वाचताना, एका ज्येष्ठ नेत्याची, मंत्र्याची पत्नी हा आव कुठेही दिसून येत नाही. आपल्या आयुष्याचा पट मांडताना अगदी साध्या सोप्या, कठीण प्रसंगांतल्या मांडणीतला प्रामाणिकपणा जाणवत राहतो. प्रकाश जावडेकर यांनी त्यांना ‘टीम बिल्डर’म्हटलंय.
प्राची यांनी मंत्र्याची पत्नी या छायेत न वावरता त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. लेखिकेचा उद्योजक म्हणून कन्सल्टन्सी फर्म सुरू करण्याचा निर्णय आणि तो यशस्वीपणे राबविण्याचा प्रवास वाचनीय आहे. प्रकाश जावडेकर केंद्रात मंत्री झाल्यावर त्यांच्या सहकार्यांशी, त्यांच्या आप्तांविषयी लिहिताना एक प्रकारचा ऋजू भाव जाणवतो. ते वर्णन वाचताना माणसांच्या नात्यांमधला ओलावा वाचकालाही भावतो. अनेक मान्यवर राजकारण्यांचं व्यक्तिचित्र वाचकासमोर उभं राहतं. राजकारण्याची पत्नी म्हणून लोकांमध्ये असलेल्या धारणांविषयी काही गमतीशीर अनुभव त्या सांगतात. दिल्लीतील त्यांच्या वास्तव्याविषयी त्या भरभरून लिहितात. वाचकाला दिल्ली आणि दिल्लीकर यांची ओळख करून देतात. साधी-सोपी कथनशैली, जीवनातील प्रसंग सहजपणे मांडण्याची हातोटी, संपूर्ण पुस्तकातला लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वातला साधेपणा, राजकारणाकडे अलिप्तपणे पाहण्याची दृष्टी वाचकाला जाणवते. राजकारणातल्या अनुभवांशी एक सामान्य व्यक्ती म्हणून सामोरे जातानाचा हा सहज सुंदर प्रवास आहे. लेखिकेची सभोवतालच्या माणसांकडे, वास्तूंकडे आपलेपणाने पाहण्याची वृत्ती दिसते. नोकरी, दोन मुलांचा सांभाळ याबरोबरच पक्षाचे कार्यकर्ते, राजकीय नेते… ही बाजूही त्यांनी समर्थपणे सांभाळली. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आयुष्याविषयीचं एक निर्मळ कथन असंच म्हणावं लागेल.
‘पुणे दिल्ली पुणे’, डॉ. प्राची जावडेकर, उन्मेष प्रकाशन,
पाने-२०७, किंमत-३०० रुपये.