अर्चना आंगणे

२०१९ मध्ये वर्षभर ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीतून ‘सदू धांदरफळे’ हा सॅबी परेरांचा मानस-चिरंजीव घरोघरी पोहोचला होताच. ‘टपालकी’द्वारे सुरू केलेली आणि लोकप्रियता लाभलेली मिश्कील टोलेबाजी त्यांनी नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘तिरकस चौकस’ या पुस्तकातही यशस्वीपणे पुढे सुरू ठेवली आहे. ‘तिरकस चौकस’ हे पुस्तक म्हणजे पुष्पा सिनेमामधील अल्लू अर्जुनसारखं तिरकस चालीत येऊन वाचनानंदाच्या बाबतीत ‘रुकेगा नही साला’ अशी वाचकांना दिलेली शाश्वतीच आहे.

‘तिरकस चौकस’मधील बरेचसे लेख सदर रूपात इतरत्र प्रकाशित झालेले असले तरीही त्यांचा एकत्रित संग्रह म्हणजे निखळ विनोदावर प्रेम करणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे.सुतावरून स्वर्ग गाठणे ऐकलं होतं, पण इथे लेखक एक छोटासा विषयाचा धागा पकडून कल्पनाविस्ताराचे मजल्यांवर मजले रचतात आणि तेही कुठेही रटाळवाणा न होता. विषयाला फाटे फोडून, तिरकस झालर लावून राजकीय, सामाजिक, टपल्या मारल्यायत आणि विनोद पेरत, खुलवत लेखाचा जो माहोल बनवलाय तो अगदी कमाल बेमिसाल! व्यक्तींवर नव्हे तर प्रवृत्तीवर टिप्पणी करणे ही सॅबी परेरांची खासियत. त्यांच्या या दुसऱ्या पुस्तकातही ही खासियत आपल्याला जाणवते. सामान्य माणसाच्या नेहमीच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवरही लेखक ज्या खुबीने व्यक्त होतात ते वाचून प्रश्नच पडतो की कुठे मिळत असेल हा सॅबी परेरांचा उलटा चष्मा?

परिस्थितीचे अचूक वर्णन करणारी ‘घर का बोकड पनीर बराबर’ यासारखी जागोजागी पेरलेली चुरचुरीत वाक्ये- ‘जिच्याशी ब्रेकअप झालाय अशा प्रेयसीच्या लग्नात लज्जतदार जेवण ओरपून आलो की प्रेमाचा लगेच विसर पडतो’ असे नव्या पिढीने उगीचच क्लिष्ट करून ठेवलेल्या आयुष्यावर केलेले भाष्य आणि ‘नवऱ्याने बायकोसमोर मांडलेले मत, म्हणजे टो करून नेत असलेल्या गाडीचे स्टीयिरग फिरवण्यासारखे आहे.’ यासारखी चालू काळातील उदाहरणे वापरून वैवाहिक जीवनावर केलेली मल्लिनाथी लेखकाच्या लेखणीतून झिरपते आणि आपल्याला पानोपानी वाचायला मिळते तेव्हा वाचक हास्यकल्लोळात लोटपोट झाल्यावाचून राहत नाही.

‘निंदकाचे घर’ या शीर्षकाचा अतिशय उत्तम जमून आलेला उपरोधिक लेख, गोड गोड बोलण्याचा आग्रह करणारा संक्रांतीचा सण आपल्या रोखठोक प्रवृत्तीला कसा मानवणारा नाही याचं रसभरीत विवेचन, घोडा, सरडा, कासव अशा कुणाच्याच खिजगणतीत नसलेल्या प्राण्यांना विषयवस्तू बनवून मानवी प्रवृत्तीवर केलेले भाष्य, ‘रियुनियन’ नावाचा वाचकाला स्मरणरंजनात बुडविणारा लेख आणि ‘बालपणीची दिवाळी’ नावाचा श्रीमंत मुलांच्या बालपणीच्या भन्नाट आठवणींचा लेख.. असा कुठलाच विषय लेखकाला वज्र्य नाही. महत्त्वाचे म्हणजे बऱ्याचदा स्वत:वर विनोद करून, नैसर्गिकरीत्या निखळ विनोद खुलविण्याचे आणि कुणा व्यक्तीला, समाजाला, जातीधर्माला किंवा राजकीय पक्षाला न दुखविता ते मांडण्याचे कसब लेखकाला उत्तम साधले आहे. अस्सल विनोदाला करुणेची एक किनार असते, पुस्तकातील बऱ्याच लेखांत ही जाणीव कुठेना कुठे आपला ठसा मागे ठेवते.

अत्यल्प दरात अनलिमिटेड डेटा उपलब्ध झाल्यापासून समाजमाध्यमांवरील नवलेखकांनी कुठेही, कोणत्याही विषयात जागोजागी आपल्या तत्त्वज्ञानाचे पेव्हर ब्लॉक घालायचा जो सपाटा लावताय, त्यात सॅबी परेरा आपला वेगळा रंग राखून आहेत. कुंपणावर बसून व्यक्ती-प्रवृत्तींचे ३६० अंशातील दर्शन स्वत:सोबत वाचकांनाही घडविणारे, कोणताही राजकीय अजेन्डा कुरवाळत न बसता, समाजाच्या गळू झालेल्या अस्मितेला ठेच न लावता, सतत विरोधी पक्षात राहून व्यक्तीपेक्षा प्रवृत्तीवर कोपरखळय़ा मारणाऱ्या सॅबी परेरा यांचा ‘तिरकस चौकस’ हा लेखसंग्रह त्यांच्या याआधीच्या महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार विजेत्या ‘टपालकी’ या पुस्तकाइतकाच, किंबहुना कांकणभर सरस असा झालेला आहे.

‘तिरकस चौकस’, – सॅबी परेरा,ग्रंथाली प्रकाशन,
पाने- १६२ , किंमत- २५० रुपये.

Story img Loader