|| नीलिमा बोरवणकर

वाचनालयं, पुस्तकांची दुकानं बंद असण्याच्या लॉकडाऊनच्या काळात सदा भुकेल्या वाचकाच्या हाती अचानक नवा कथासंग्रह आला तर अक्षरश: त्यावर झडप घालून त्याचा फडशा पाडला जातो. पण भारत सासणेंचा दीर्घकथासंग्रह असेल तर मात्र तो पटकन् वाचून संपवता येत नाही.

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

‘दाट काळा पाऊस’मध्ये सहा दीर्घकथा आहेत. दीर्घ म्हणजे तब्बल ५७ ते ७५ पृष्ठसंख्येच्या. सासणेंच्या शैलीत एक अनवट गूढता आहे. गांभीर्य आहे. परिस्थितीनं आलेली अद्भुतता आहे. त्यांच्या कथेची रचना सरळ नाही. त्यात गुंतागुंत आहे. एवढी मोठी कथा एका बैठकीत वाचू न शकण्याचं जडत्व आहे. चांगल्या लेखकाची कथा खिळवून ठेवतेच; पण सासणेंची कथा पायातल्या बेडीनं पाऊल उचलणं कठीण होऊन विश्रांती घ्यायची गरज भासावी तशी वाचता वाचता दमणुकीचा अनुभव देते. बेडी वजनाला जड तर असतेच; शिवाय ती ज्याची त्याला सोडवता येत नाही. सासणेंची कथाही अशीच. शब्दांनी आणि शब्दांच्या मधल्या जागेतल्या लपलेल्या अर्थांनी जड झालेली आणि वाचकाभोवती वेढा घालून बसणारी. सहजी सुटका करून न घेता येणारी. त्यांच्या कथा वाचताना थांबावं लागतं आणि पुन्हा सुरू करताना खुणेपासून नाही तर परत मागे जाऊन सुरुवात करावी लागते. का बरं असं होत असावं? याचा विचार करता काही कारणं सापडली. या कथासंग्रहातल्या सहाही कथा अनेक केंद्रबिंदू असलेल्या आहेत. त्यांत व्यक्तिरेखांच्या मनोव्यापाराचा जसा पसारा आणि पिसारा आहे, तितकंच निसर्गाला, वातावरणाला अग्रस्थान आहे. सतत रिपरिप पडणारा किंवा कोसळणारा पाऊस, अंधार, वाऱ्याच्या झोतानं खिडक्यांच्या तावदानांचे होणारे विशिष्ट आवाज हेही जणू व्यक्तिरेखा असाव्यात तसं काही सांगू पाहतात. या कथांत खूप व्यक्तिरेखा आहेत. त्यांचे परस्परसंबंध, त्यांची आपसातली आणि शिवाय पर्यावरणीय वातावरणाशी असलेली नाती असं बरंच काही लक्षात घेत, छुपे अर्थ उलगडत वाचत जावं लागतं. बरं, या कथांतून व्यक्त होणारे जीवनानुभव सर्वसामान्य माणसाला जगताना येणारे नाहीत. म्हणजे व्यक्तिरेखा सामान्य असल्या तरी त्यांच्यात विलक्षण संवेदनशीलता, विविध प्रकारचे गंड, कसला तरी शोध असे व्यक्तिविशेष आढळतात.

त्यामुळे कथा वाचताना आपण त्याची सहअनुभूती घेऊ शकत नाही. त्या प्रसंगांशी सहजी तादात्म्य पावू शकत नाही. एखादा गूढ, अद्भुत सिनेमा बघावा तसं वाटत राहतं.

आणि सिनेमात जसं मध्यांतर आवश्यक असतं तसं या कथा वाचताना मध्ये थांबलं जातं. आणि मग पुन्हा सुरू करताना आधीचा काही

भाग संदर्भ म्हणून वाचावा लागतो.

सहा कथांचे विषय देणं विस्तारभयास्तव शक्य नाही, पण ‘दाट काळा पाऊस’ या कथेबद्दल थोडक्यात सांगायचं तर  पुण्याहून मुजफ्फरपूरला निघालेला नायक एका सुनसान स्टेशनवर ऐन रात्रीच्या वेळी उतरतो. पावसाची संततधार सुरू आहे… तिथून त्याचा प्रवास सुरू  होतो. या प्रवासात त्याला चित्रविचित्र अनुभव येतात. तो कब्रस्तानात रात्र काढतो. तिथे भेटलेला मुस्लीम मियॉं मृत्यू पावल्याची बातमी कळते. पुढच्या प्रवासात घोड्यांच्या पैदाशीची जागा आणि घोडेवाला भेटतो. पुढे एका देवीचा उत्सव होणारी जागा, तेथील जुना वृक्ष, सर्वत्र पसरलेलं गवत, सापांचा भयावह वावर असं वर्णन. ते ओलांडून टेकडी चढत तो ईप्सित स्थळी पोचतो, जिथे त्याला जायचं होतं- रोहिणीच्या घरी. कथेची जवळपास चाळीस पानं गूढतेच्या जंगलातून वाचकाचासुद्धा प्रवास सुरू असतो… ज्यात प्रवासाला फक्त एकमेव टांगा उपलब्ध असणं, मुक्कामाला कब्रस्तान, फिरणारे साप, टेकडी चढून जाताना आडवा जाणारा मोरांचा तांडा,  झाडी आणि मग अचानक प्रतिष्ठितांचा प्रदेश, सिमेंटची घरं, पोस्ट ऑफिस… नायक असा सगळा प्रवास करून रोहिणीच्या घरी पोचतो. त्या दोघांच्या तारुण्यात घडलेल्या गोष्टींविषयी कबुलीजबाब देण्यासाठी नायक एवढं दिव्य पार करून तिथे गेलाय. तो जे सांगतो ते तिला आणि तिच्या मृत नवऱ्याला आधीच माहीत होतं. त्याच्या चुका त्यांनी पोटात घेऊन त्याच्या मैत्रीला स्वीकारलं होतं, हे कळल्यावर त्याचा अपराधगंड कमी होतो आणि तो शांतपणे परतीच्या प्रवासाला लागतो. हे झालं यातलं थोडक्यात सांगण्याजोगं कथाबीज.

कथा संपूर्ण वाचून झाल्यावर अनेक प्रश्न मनात उभे राहतात. अद्भुत वाटाव्यात अशा घटना, प्रसंग, लोकमान्य टिळकांच्या कुटुंबातल्या एका मुलीचा पुनर्जन्म झाल्याचं सांगणाऱ्या मुलीच्या बापाची व्यक्तिरेखा, आणि अशा बऱ्याच व्यक्तिरेखा- ज्या नायकाला प्रवासात भेटतात, त्यांचा मूळ कथाबीजाशी काय संबंध असेल? यातल्या गूढ व्यक्ती नेमक्या एकाच प्रवासात नायकाला भेटण्यामागचं प्रयोजन नेमकं काय असेल? यातली प्रत्येक व्यक्ती काहीतरी शोधते आहे. कुणाला मुंबईतली त्याची आप्त व्यक्ती, कुणाला पुनर्जन्माचं रहस्य. रेल्वे स्टेशनवरून तिसऱ्या टप्प्यावरच्या सिमेंटची घरं असलेल्या गावात जायला नायकाला जर असा टांग्यातून आणि नंतर टेकड्या चढून प्रवास करावा लागत असेल तर इतर त्या आधुनिक गावात कसे जातात? यासारख्या अनेक प्रश्नांचा मागोवा घेताना त्यातली प्रतीकं शोधण्याचा खेळ करत राहावा लागतो. आणि मग मुख्य प्रश्न उभा राहतो की, आपण शोधलेला अर्थच लेखकाच्या मनात होता की काही वेगळाच? लेखकाला कथेत अभिप्रेत असलेला अर्थ कसा जाणून घेता येईल?

कथासंग्रह वाचताना अजून एक जाणवलं ते असं, की जशा काही रचना संगीतकाराच्या काळजात वाजत असतात… मग आधीच्या चित्रपटाच्या गाण्यातली पाश्र्वसंगीताची धून पुढच्या चित्रपटात गाण्याची चाल होऊन सादर होते, तसं ‘दाट काळा पाऊस’ कथेतल्या मुस्लीम मियॉंकडे असलेला गालिबच्या हस्तलिखित संग्रहाच्या उल्लेखाच्या संदर्भाचं पुढचं टोक ‘इश्काचा जहरी प्याला’ या २०२०च्या ‘दीपावली’ अंकातल्या कथेत सापडतं.

एकूण सासणे यांच्या कथा वाचताना आपल्या कल्पनाशक्तीला मुक्त सोडावं लागतं, आपल्या आकलनशक्तीवर विश्वास ठेवावा लागतो. त्यांची कथा आपलं बोट धरून पुढे नेत नाही, ती आपल्या श्वासात एकरूप होत नाही, तर तिला आपल्या श्वासांचा आधार देऊन आपलं चित्र उभं करायला लावणारी आहे. संग्रहात विलास खोले यांनी या कथांवर लिहिलेला तब्बल ५० पानी रसग्रहणात्मक वाचनीय लेख आहे. पुस्तकाचं निर्मितीमूल्य अत्यंत देखणं आहे. रविमुकुल यांच्या गूढ, गहिरं वातावरण उभं करणाऱ्या सुंदर मुखपृष्ठामुळे पुस्तक अधिकच देखणं झालंय.

 ‘दाट काळा पाऊस’- भारत सासणे, मॅजेस्टिक प्रकाशन,

पाने- ३७२, किंमत- ५००रु.

borwankar.neelima@gmail.com