‘सुंदर!’, ‘अप्रतिम’, ‘मला याची हायरेस इमेज पाठव- फ्रेम करून लावेन घरात’… अशा प्रकारची दाद व्हॉट्सॲपवर तुमच्याही फोटोंना मिळाली असेल. किंवा कुणा सुहृदांनी टिपलेल्या फोटोंचं असं कौतुक तुम्हीही केलं असेल… हे फोटोग्राफीचं लोकशाहीकरण आहे. तो काळ येण्याच्या आधी रघु राय यांची कारकीर्द घडली. तेव्हा महाग असलेला फोटोग्राफीचा छंद त्यांना भावामुळे (एस्. पॉल- शर्मपाल चौधरी) जपता आला. सिव्हिल इंजिनीअर होऊनही आणि सरकारी नोकरी मिळूनही त्यात जीव रमेना म्हणून त्यांनी २३ व्या वर्षी कॅमेरा हाती घेतला तो सोडलाच नाही, हे कुठे ना कुठे वाचायला मिळतंच. त्यापेक्षाही लांब असा रघु राय यांचा बायोडेटा कुठंही वाचता येतोच. हिंदुस्तान टाइम्स आणि इंडिया टुडेमध्ये ते कोणत्या पदावर होते किंवा युरोपातल्या कोणत्या सात देशांमध्ये त्यांच्या फोटोंची प्रदर्शनं कधी कधी झाली हे तर विकिपीडियावरही वाचता येतं. या प्रकारच्या माहितीचा रघु राय नावाचा कलावंत आपल्याला भिडण्याशी काहीही संबंध नसतोच. आज जे वयानं पन्नाशीपार असतील, त्यांना रघु राय यांनी टिपलेले इंदिरा गांधींचे, भोपाळचे फोटो आठवत असतील. पण रघु राय यांचं निधन हे फक्त एका चांगल्या फोटोग्राफरच्या देहान्तापुरतं नसून तो एका पर्वाचाही अस्त कसा काय, त्या पर्वामधलं रघु राय यांचं महत्त्व काय, हे कळण्यासाठी जरा अलीकडे- पलीकडे पाहावं लागतं.
म्हणजे अगदी ‘लाला दीनदयाळ हे पहिले भारतीय फोटोग्राफी कलावंत मानले जातात’ या इतिहासापासून नाही, तरीदेखील आंरी कार्तिए-ब्रेसाँपासून सुरुवात करावी लागते. हे कार्तिए-ब्रेसाँ फ्रेंच. फाळणीच्या काळात भारतात आले. ‘लोकांना गांधीजींच्या निधनाची बातमी पंतप्रधान नेहरू सांगत आहेत’ हा फोटो टिपून काही दिवसांत परत गेले. पण स्वातंत्र्याच्या उष:काळातला भारत कसा टिपायचा, याचा वस्तुपाठच घालून ते गेले. ‘देश म्हणजे देशातील माणसे’ हे मराठीत श्री. म. माटे यांना उमगलेलं सत्य कार्तिए-ब्रेसाँला फ्रेंचमध्ये कळलं असणार! ही माणसं सामान्य असतात, तसंच पदांवरलीही असतात. ‘मी अमुकच माणसांचे फोटो टिपणार’ असं देश टिपणार्यानं म्हणायचं नसतं; हे रघु राय यांना बहुधा कार्तिए-ब्रेसाँमुळे उमगलं. त्यांचं मोठेपण राय मान्यही करायचे. वृत्त-छायाचित्रण किंवा ‘छायापत्रकारिते’त लालित्य आणलं ते या कार्तिए-ब्रेसाँ यांनी. ते लालित्य रघु राय यांनी जोपासलं.
एखाद्याबद्दल लिहिताना दुसर्याचं नाव काढलं की लगेच लोक म्हणू लागतात, ‘पण तुलना कशाला करायची?’ वगैरे! दोघांमध्ये तुलनेशिवाय काही असूच शकत नाही का, या प्रतिप्रश्नानंच असल्या प्रश्नांचं उत्तर देता येतं. रघु राय हे ज्या ‘पर्वा’चा भाग होते- जे पर्व त्यांच्या निधनानं संपल्यासारखं वाटतं, त्या पर्वातल्या अन्यही अनेक छायाचित्र- कलावंतांची आठवण रघु राय यांचे फोटो पाहताना होते. किंवा त्या दुसर्यांचे फोटो पाहताना रघु राय यांचे असेच फोटो आठवतात. ही तुलना नसते. ते अनुकरणही नसतं. अभिजात संगीताला सर्वस्व मानणार्यांमध्ये जशी ‘तिच्या/ त्याच्यासारखी तान मीही घेऊन पाहीन’ अशी ऊर्मी असते, किंवा नवता शोधणार्या कवींमध्ये जशी जाणिवेची समतानता असते, तसंच हे असू शकतं. तिथं तुलना होऊ शकत नाही, कारण दोघांचंही काम चांगलंच असतं.
या समतानतेची तीन उदाहरणं रघु राय यांच्यासंदर्भात जर पाहिली, तर ‘पर्व’ म्हणजे काय हे लक्षात येईल. पहिलं खुद्द कार्तिए-ब्रेसाँ यांचंच. फाळणीनंतर निर्वासित छावण्यांमध्ये जाऊन कार्तिए-ब्रेसाँ यांनी दैन्य, दु:ख टिपलंच, पण जीवनेच्छाही टिपली. राबत्या वयातले पुरुष या छावण्यांमध्ये होते, त्यांच्यात उमेद आणण्यासाठी साध्या खेळांच्या स्पर्धा लावण्याची युक्ती छावणीतल्या कुणी तरी काढली, तेव्हा कार्तिए-ब्रेसाँ यांनी जे छायाचित्र टिपलं ते अजरामर आहे. त्यातल्या पुरुषांचे चेहरे आनंदी नसले, तरी जगण्याची धडपड दाखवणारे आहेत. रघु राय यांनी कारकीर्दीच्या चौथ्याच वर्षी बांगलादेश मुक्ती लढा आणि पाकिस्तानची फाळणी टिपताना भारतात आलेल्या निर्वासितांकडे पाहिलं. बांगलादेशी निर्वासितांच्या छावण्यांत १९७१ मध्ये ते गेले. तिथलं धान्यवाटप, त्यासाठी लागलेल्या रांगा, चेहर्यावर भूक दिसणारे जीव ही छायाचित्रं टिपल्यावर त्यांना कोलकात्याच्या रस्त्यावरली निर्वासित कुटुंबंही दिसू लागली… त्या कुटुंबांमधली जीवनेच्छा राय यांनी नेमकी टिपली. शिजणार्या अन्नाकडे डोळे लावून बसलेलं हे कुटुंब त्यांतलं.
तरीही राय यांच्यावर (किंवा सातत्यानं स्वत:ला पणाला लावणार्या अन्य कोणाही कलावंतावर) अनुकरणाचा शिक्का मारता येत नाही. दुसर्यानं मळवलेल्या वाटेवरून दोन पावलं चालायचं ते स्वत:ची नवी वाट शोधण्यासाठीच, हे अशा कलावंतांना माहीत असतंच, म्हणून तो शिक्का मारणं चूक. हा इशारा पुढल्या उदाहरणांआधी द्यायलाच हवा असा… कारण १९९० सालात रंगीत छायाचित्रण ‘करून पाहू’ म्हणूनच करणार्या आणि तोवर काळ्या-पांढर्याच्या मधल्या अनेक छटा दाखवून, महत्त्वाचे फोटोग्राफर म्हणून ओळखल्या जाणार्या रघु राय यांनी दिल्लीतल्या चपलाबुटांच्या दुकानात जी रस्त्यावरल्या आभासांची गंमत टिपली, तशीच ती १९८९ मध्ये मुंबईच्या केम्प्स कॉर्नरवरल्या ‘लेडीज पर्स’च्या दुकानाच्या काचेआडून, तितकेच महत्त्वाचे छायाचित्रकार रघुबीर सिंग यांनी टिपली होती! हे रघुबीर सिंग कधी थेट वृत्तमाध्यमात नव्हते, पण बनारस आदी पुस्तकं रघू राय यांची जशी गाजली, तशीच रघुबीर सिंग यांचीही गाजली. दोघेही एकाच काळातले. रंगीत फोटोग्राफीचं तोवर सार्वत्रिक होऊ पाहणारं तंत्र, काचेची चकचकीत दुकानं शहरात वाढूनसुद्धा जनसामान्यांच्या आयुष्यात काही चमक येत नसल्याची जाणीव, शहरातला दृश्यखेळ समोर दिसत असताना तो टिपायलाच हवा अशी ऊर्मी हे सारं दोघांकडेही पुरेपूर होतं, इतकंच. पण अशा फोटोंकडे अवाक् होऊन पाहत एक पिढी वाढली.
तेव्हाच्या नव्या पिढीतले फोटोग्राफरसुद्धा आता साठीचे झालेत. या पिढीसाठी रघु राय यांच्या तरुणपणापेक्षा नक्की अधिक संधी उपलब्ध होत्या. याला कारणही रघु राय आदींमध्येच शोधता येतं. उदाहरणार्थ, इंडियन एक्स्प्रेसनं उत्तमोत्तम फोटोग्राफरांची फळीच १९८० च्या दशकात उभी केली. टाइम्स ऑफ इंडियाला उशिरा जाग आली; पण त्याआधी ‘द इंडियन पोस्ट’नं छायाचित्रांना मोठी जागा दिली… तरीही या काळाचे ‘किंग’ रघु रायच होते. इतके की, ‘रघु राय यांच्याहीपेक्षा मोठं कोण आहे असा शोधही अनेक चाहत्यांनी- चाहतेपणा टिकवूनच घेतला असेल आणि त्या शोधप्रवासात त्यांना सुनील जाना आणि सॅबास्तिओ साल्गादो ही दोन नावं नक्की सापडली असतील. यापैकी सुनील जाना आदल्या पिढीतले. बंगालमधल्या १९४३ च्या मानवनिर्मित दुष्काळाची ‘घोर विलापिका’ त्यांनी कॅमेर्यात टिपली होती. योगायोग असा की, जाना आणि राय या दोघांनाही १९७२ मध्येच ‘पद्मश्री’ मिळाली. त्या वेळी जाना यांचं वय होतं ५४, तर राय ३०! साल्गादो मात्र साधारण राय यांच्याच वयाचे, राय यांच्याप्रमाणेच कमी वयात जागतिक ख्याती मिळवणारे. हे साल्गादो भारतात आले धनबादच्या खाण-कामगारांचं चित्रण करण्यासाठी, १९९५ साली. मुंबईत थोडा काळ राहिले. चर्चगेट स्थानकातली गर्दी- त्या गर्दीची लगबग यांतून मुंबईच्या वेगाचं मूर्तरूप त्यांना दिसलं. तो फोटो गाजला. पण पुढल्याच वर्षी राय यांनी, त्याच चर्चगेट स्थानकात- गर्दी, वेग यांच्यातूनही मुंबईकर शोधला. हा मुंबईकर, आसपासच्या गर्दीचं दडपण न घेता निवांत आपल्या गाडीची वाट पाहतो, तोवर वर्तमानपत्रं वाचतो. या दोन छायाचित्रांतला फरक दिसतो आहेच, पण शब्दांत तो सांगायचा तर ‘साल्गादो गर्दीकडे ‘वरून’ पाहत होते- रघु राय यांनी गर्दीत शिरून माणसांकडे पाहिलं’!
या अशा पाहण्यातूनच तर राय यांना भारत टिपता आला. कारकीर्दीच्या सुरुवातीला- १९६७ मध्ये हृषीकेशच्या महेश योगी आश्रमात ‘बीटल्स ग्रुपमधले कलावंत येणार म्हणून’ गेलेले राय वयाच्या साठीनंतर दलाई लामा, गंगोत्री यांतून माणूसपणाच्या पलीकडलं काही तरी टिपण्याचा प्रयत्न करू लागले. त्या दिव्यत्वाचा शोध त्यांना ‘इथं लागला- हा पाहा’ असं म्हणून दाखवता येईल असं एखादंच छायाचित्र नाही चटकन आठवणार कुणाला; पण गरज तरी काय त्याची? ‘पार्थिवतेच्या पराकोटिचे अपार्थिवाला नेइल लोण’ ही मर्ढेकरांची ओळ जगलेत की राय यांचे फोटो आधीच! नेत्यांचा सावधपणा, अनुयायांची अजीजी, गरिबांचा दीनवाणेपणा, मध्यमवर्गीयांचा मुर्दाडपणा याच्याही पलीकडली वैशिष्ट्यं या प्रत्येकात- आणि त्याहीपलीकडे असलेल्या भारतात आहेत, हे राय यांनी टिपलं. तेही अशा काळात, जेव्हा उत्तम फोटोग्राफर हा आपल्या नजरेपेक्षा कुठल्या ना कुठल्या उंच मंचावरला (मग ते वर्तमानपत्र असो, पाक्षिक असो किंवा फोटोपुस्तकं, प्रदर्शनं) कलावंत आहे याची जाणीव मोजक्या लोकांमध्ये होती… किंवा त्या मंचासमोरच्या प्रेक्षागारात काही मोजकेच लोक पोहोचू शकत होते. आता मान खाली घालून पाहत बसण्याच्या मोबाइलवर आपल्यातलेच फोटोग्राफर असतात, त्यांचं कौतुक आपल्याआपल्यात असतं.
हे रघु राय आता गेले. कार्तिए- ब्रेसाँ, जाना हे तर आदल्या पिढीतलेच, पण रघुबीर सिंग, साल्गादो… सगळेच गेले. फोटोग्राफीतलं एक पर्व आता संपलं. काळ्या-पांढर्याच्या मधल्या अगणित छटा आपल्या आसपास असतात, याची सम्यक जाणीव पुढल्या रंगीत छायाचित्रांतही जपणार्यांचं हे पर्व होतं. त्यात हेच नाही, किती तरी जण होते. ते गेले तरीही त्यांचं काम प्रेरणा देत राहील. रघु राय यांनी उत्तरायुष्यात फक्त झाडांचे फोटो ‘पिक्टोरिअल’ शैलीनं टिपले, त्यातला एक फोटो ‘झाड म्हणजे झाडाची सावली’ अशी व्याख्याच मांडणारा आहे. तो फोटो आता पुन्हा पाहताना मात्र बहिणाबाई चौधरींची ‘झाड गेलं निघीसनी मागे सावली उरली’ ही ओळख आठवते.
abhijit.tamhane@expressindia.com
