घनश्याम आंबोकर
सहाशे पानांचा विस्तार पाहूनच राजन खान यांच्या ‘सिद्ध’ या कादंबरीच्या भव्यतेचा अंदाज येतो. त्यात धर्मासारखा अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचा विषय हाताळलेला. ही कादंबरी एका साध्या वाटणार्या प्रसंगातून सुरू होते. एका गावाच्या पारावर सामान्य वेशातला एक अनोळखी माणूस येऊन बसतो. लोक कुतूहलाने त्याच्याकडे पाहतात, काही दुर्लक्षही करतात. त्यांना खिळवून ठेवते ती त्याची भेदक नजर. पण तो बोलायला लागल्यावर त्याचे वेगळेपण जाणवू लागते. ‘‘हिंदू होगा तो सलाम, मुसलमान असशील तर राम राम’’ हे त्याचे वाक्य लोकांना बुचकळ्यात टाकते. काही अनपेक्षित घटना घडतात आणि लोकांना तो एखादा सिद्ध पुरुष असल्याचा भास होऊ लागतो. कष्टकरी वर्गापासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सगळेच त्याच्याकडे ओढले जातात. त्याचे संस्कृतमधील पठण ऐकून तो हिंदू असल्याचा समज होतो. पण अचानक तो गायब होतो आणि पुन्हा प्रकट होतो तो थेट मशिदीसमोर. चमत्काराच्या शोधात असलेला जनसमुदाय पुन्हा त्याच्याभोवती जमा होतो आणि तिथे तो बांग देऊन सर्वांनाच थक्क करतो. लोकांच्या मनाचा ठाव तो सहज घेतो आणि त्याची ‘सिद्ध’ म्हणून असलेली प्रतिमा अधिकच पक्की होते, आता तो मुसलमान आहे असे लोकांना वाटू लागते.
वाढत्या गर्दीसोबतच गावातील आणि जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी यांचे लक्ष त्याच्याकडे वळते. प्रत्येकाला त्याचा आपल्या स्वार्थासाठी कसा वापर करून घेता येईल याची चिंता लागते. हिंदू पुजारी आणि मुस्लीम मौलवीही आपापल्या धर्माचे आणि पर्यायाने स्वत:चे हित कसे साधता येईल याचा हिशेब मांडू लागतात. इतक्यात बुवा पुन्हा एकदा अदृश्य होतो. तो कुठे गेला हे कोणालाच कळत नाही आणि मग सुरू होतो त्याच्या धर्मावरून वाद, त्याच्यावर हक्क सांगण्याची स्पर्धा, धर्माच्या ठेकेदारांचे आणि राजकारण्यांचे क्षणोक्षणी बदलणारे रंग. या सगळ्यात काही समतोल विचार करणार्यांना त्याची काळजीही वाटते, उत्सुकताही असते. याच सगळ्याचा परिणाम म्हणून दोन धर्मांमध्ये तणाव वाढत जातो, दुरावा निर्माण होतो, निष्पाप बळी जातात आणि धार्मिक विद्वेषाचा भडका उडतो. शासकीय यंत्रणा हतबल आणि निष्प्रभ ठरताना दिसते.
एखादी कादंबरी दोन हेतूंनी लिहिली जाते- एक तर एखादी गोष्ट, कथा सांगण्यासाठी आणि दुसरी म्हणजे एखादा विचार वाचकांच्या मनात रुजवण्यासाठी.
‘सिद्ध’ ही कादंबरी दुसर्या प्रकारातील आहे. राजन खान यांचे प्रत्येक लेखनच आपल्यासमोर विचार मांडते, आपल्या प्रचलित समजुतींना आव्हान देते. ही कादंबरीही तेच करते. कथेचा प्रवाह कुठेही न तोडता लेखक आपल्याला हिंदू-मुस्लीम धर्माचा इतिहास, भूगोल उलगडून दाखवतात. वारकरी, महानुभाव, एकाक्षरी यांसारख्या संप्रदायांचा उगम, त्यांची तत्त्वे, त्यांची गरज आणि त्यांचे योगदान यावर प्रकाश टाकतात, त्याचबरोबर त्यांच्या मर्यादाही स्पष्ट करतात. भारतातील हिंदू-मुस्लीम ऐक्याची गंगा-जमनी परंपरा ते आपल्यासमोर मांडतात. हे सगळे वाचताना लेखकाचा अफाट अभ्यास आणि वैचारिक खोली पदोपदी जाणवते. धार्मिक वादांपेक्षा या देशापुढील सामाजिक आणि आर्थिक प्रश्न किती मोठे आहेत आणि आजही आहेत, याची जाणीव सतत होते. नव्या पिढीला भरकटू न देता योग्य दिशा द्यायची असेल तर धार्मिक सलोख्याची ही परंपरा योग्य माणसांनी, योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. नाहीतर स्वत:ची तुंबडी भरणार्या दोन्ही बाजूच्या स्वार्थी लोकांकडून समाजाची कशी फसवणूक होईल आणि त्यातून सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक किती मोठे नुकसान होईल, हे लेखक ठामपणे सांगतात.
या कादंबरीतील असंख्य व्यक्तिरेखा आणि त्यांचे सूक्ष्म चित्रण हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अगदी छोट्या-छोट्या प्रसंगांमधून संपूर्ण समाजाचे मानसशास्त्र उभे राहते. गावातील प्रत्येक ठिकाणाचे केलेले बारकाईने वर्णन वाचकाच्या डोळ्यांसमोर एखादा सिनेमा उभा करते. लोकांची मानसिकता, त्यांचा विचार करण्याची पद्धत, त्यातील खोली आणि उथळपणा, त्यांच्या चांगल्या-वाईट प्रतिक्रिया, दोन्ही समाजांचे गुण-दोष आणि त्यांच्या जगण्याचे प्रश्न – काय नाही या कादंबरीत? असा प्रश्न पडतो. धार्मिक आणि राजकीय नेत्यांची संधीसाधू वृत्ती, त्यांचे रंग बदलणे आणि त्यासाठीची त्यांची टोकाची कपटनीती आपल्याला माहीत असूनही अस्वस्थ करून सोडते. इतक्या विविध स्तरांवरील व्यक्तिरेखा साकारताना त्यांच्या बोलीभाषेत, लहेजात होणारा बदल हा लेखकाच्या भाषेवरील प्रभुत्वाची आणि माणसांच्या केलेल्या सखोल निरीक्षणाची साक्ष देतो. प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशीच ही कलाकृती आहे.
विचारांची व्याप्ती एवढी मोठी असल्याने पुस्तकाचा आकार थोडा जास्त झाला आहे असे वाटून जाते. आजची तरुण पिढी मराठी वाचनाकडे फारशी वळत नाही, त्यात एवढा मोठा ग्रंथ पाहूनच ते त्याकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. खरे तर हेच विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणे सर्वात जास्त गरजेचे आहे. दुसरीकडे, सध्या मराठी वाचणार्यांमध्ये ज्येष्ठ वाचकांची संख्या जास्त आहे, त्यांना एवढे जाड पुस्तक हातात धरून वाचणे थोडे त्रासदायक ठरू शकते. तरीही चिकाटीने हे पुस्तक वाचले तर प्रत्येक वाचकाला नक्की आनंद मिळेल.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत विचारपूर्वक आणि प्रतीकात्मक पद्धतीने तयार केले आहे. कादंबरीचा नायक कोणत्या धर्माचा आहे? हा प्रश्न संपूर्ण कादंबरीत वाचकाच्या मनात घोळत राहतो आणि तोच भाव मुखपृष्ठावरील त्याच्या पाठमोर्या आकृतीतून आणि वापरलेल्या रंगछटांमधून नेमका व्यक्त होतो. त्याच्या मागे धावणारा जमाव मुद्दाम चेहरा नसलेल्या काळ्या आकृत्यांमध्ये दाखवला आहे- ज्यांना स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व नाही, जे प्रत्येक धर्मात असतात आणि कोणाच्याही इशार्यावर धावत सुटतात. त्यांच्या वरच्या स्तरावर असलेली बुवांची निळ्या रंगातील आकृती त्यांची वैचारिक उंची आणि सामान्यांहून वेगळे असलेले स्थान अधोरेखित करते.
‘सिद्ध’, राजन खान,
संधिकाल प्रकाशन,
पाने- ६००, किंमत- ८०० रुपये.
ggambokar@hotmail.com
